‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून’ तुम्ही प्रवेश करणार का?
१. आपल्यासाठी कोणते “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” उघडे आहे?
१ प्रेषित पौलासमोर जेव्हा एक ‘मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार उघडले’ तेव्हा त्याने बऱ्याच विरोधाचा सामना करूनही, राज्याच्या कार्याला बढावा देण्याच्या या सुसंधीचा फायदा घेतला. (१ करिंथ. १६:९) आज, जगभरात जवळजवळ ६,४२,००० राज्य प्रचारकांनी सामान्य पायनियर सेवेत पदार्पण करण्याद्वारे, एका मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून प्रवेश केला आहे.
२. वेळोवेळी आपल्या वैयक्तिक परिस्थितीचा आढावा घेणे का महत्त्वाचे आहे?
२ परिस्थिती बदलत राहते: सध्या आपल्या वैयक्तिक परिस्थितीमुळे जरी आपल्याला जास्त कार्य करणे शक्य नसले तरी, परिस्थिती ही सतत बदलत असते. तेव्हा, सर्व दृष्टीने आदर्श परिस्थितीची वाट न पाहता, वेळोवेळी आपण आपल्या स्वतःच्या परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. (उप. ११:४) तुम्ही एक विद्यार्थी आहात का आणि लवकरच तुमचे शालेय शिक्षण संपणार आहे का? तुम्ही पालक आहात का व तुमची मुले लवकरच शाळेला जाऊ लागतील का? तुम्ही सेवानिवृत्त होणार आहात का? अशाप्रकारचे बदल झाल्यामुळे तुम्हाला कदाचित जास्त फावला वेळ मिळेल आणि सामान्य पायनियर सेवा सुरू करणे शक्य होईल. एका भगिनीला पूर्वी आरोग्य समस्या होत्या, पण तिने आपल्या ८९ व्या वर्षी पायनियर म्हणून नाव नोंदवण्याचे ठरवले. का? एका वर्षापेक्षा जास्त काळापासून दवाखान्यात जावे लागले नसल्यामुळे तिला वाटले की आता ती पायनियर सेवा करण्याच्या स्थितीत आहे.
३. सामान्य पायनियर सेवा करण्याकरता काहींनी कोणते फेरबदल केले आहेत?
३ पौलाच्या बाबतीत पाहिल्यास, मुळात त्याला करिंथ येथे जाऊन बांधवांची भेट घेण्याची इच्छा होती. पण सुवार्ताप्रचारासाठी त्याने आपल्या योजनांमध्ये फेरबदल केला. आज जे बांधव सामान्य पायनियर सेवा करत आहेत त्यांच्यापैकीही अनेकांना पायनियर सेवा करण्याकरता बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या आहेत. काहींनी आपल्या राहणीत इतपत बदल केला आहे की आता त्यांच्या मर्यादित गरजा भागवण्यासाठी त्यांना फक्त अर्ध वेळेची नोकरी करणे पुरेसे आहे. त्यांना पायनियर सेवेतून खूप आनंद मिळाला आहे. (१ तीम. ६:६-८) काही विवाहित जोडप्यांनी फक्त एकाच्याच पगारात खर्च भागेल अशारितीने फेरबदल केले आहेत. यामुळे पत्नीला पायनियर सेवा करणे शक्य झाले आहे.
४. आवश्यक तास पूर्ण करता येतील किंवा नाही याची खात्री नसल्यास तुम्ही काय करू शकता?
४ आपल्याला इतके तास पूर्ण करताच येणार नाहीत असा निष्कर्ष काढून पायनियर सेवेचा विचार लगेच मनातून काढू नका. दररोज फक्त दोन-अडीच तास करण्याची गरज आहे. आपल्याला हे जमेल की नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर एखाद दोन महिने, ७० तासांचे वैयक्तिक ध्येय मनात ठेवून सहायक पायनियर सेवा करून पाहा. यामुळे तुम्हाला पायनियर सेवेचा आनंद अनुभवण्याची संधी मिळेल. (स्तो. ३४:८) जे पायनियर सेवा करत आहेत अशांशी चर्चा करा. कदाचित त्यांनीही तुमच्यासारख्याच समस्यांवर मात केली असेल. (नीति. १५:२२) आपली सेवा वाढवण्याकरता तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यांवर आशीर्वाद देण्याची यहोवाला विनंती करा.—१ योहा. ५:१४.
५. सामान्य पायनियर सेवेकरता केलेले तुमचे सर्व प्रयत्न सार्थकी का लागतील?
५ तुमचे प्रयत्न सार्थकी लागतील: सामान्य पायनियर सेवेमुळे अनेक आशीर्वाद मिळतात. अधिक प्रमाणात दिल्यामुळे तुम्हाला अधिक आनंद अनुभवायला मिळतो. (प्रे. कृत्ये २०:३५) देवाचे वचन नीट हाताळण्यात तुम्ही वाकबगार बनता. (२ तीम. २:१५) तसेच यहोवाचे साहाय्य व्यक्तिशः अनुभवण्याच्या अनेक संधी तुम्हाला लाभतात. (प्रे. कृत्ये ११:२१; फिलिप्पै. ४:११-१३) पायनियर सेवेमुळे तुम्हाला, धीर व यांसारखे अनेक आध्यात्मिक गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात उतरवण्यास व यहोवाच्या आणखी जवळ जाण्यास मदत मिळेल. (याको. ४:८) तर मग, तुम्ही या मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून प्रवेश करून सामान्य पायनियर बनणार का?