राज्याच्या घोषणेला शंभर वर्षे पूर्ण!
१. जवळपास शंभर वर्षांपूर्वी यहोवाच्या लोकांना काय करण्याचे प्रोत्साहन मिळाले होते?
१ “पाहा, राजा राज्य करत आहे! तुम्ही लोकांसमोर त्याचे प्रतिनिधी आहात. म्हणून राजा व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा!” अशा जोरदार शब्दांत ब्रदर रदरफर्ड यांनी जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी यहोवाच्या लोकांना राज्याचा संदेश दूरवर आणि मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्याचे प्रोत्साहन दिले होते. आणि तेच आपण केले आहे. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणे आपण “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला आहे. (कलस्सै. १:२३) गेल्या शतकात आपण राज्याचा संदेश घोषित करण्यासाठी काय केले? राज्याच्या जन्माचा शंभरावा वर्धापनदिन जवळ येत असताना आपण कशा प्रकारे राज्याची घोषणा करत राहू शकतो?
२. आपल्या साहित्याने देवाच्या राज्याला कसा पाठिंबा दिला आहे?
२ आपण काय साध्य केले: अनेक दशकांपासून आपल्या साहित्याने देवाच्या राज्याला पाठिंबा दिला आहे. १९३९ पासून आपल्या मुख्य नियतकालिकाचे शीर्षक, टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक हेच राहिले आहे. हे नियतकालिक वारंवार देवाचे राज्य आणि ते काय साध्य करेल यांबद्दल माहिती देते. तसेच, अवेक! नियतकालिकसुद्धा देवाचे राज्य हेच मानवजातीसाठी एकमेव आशा आहे यावर भर देते. त्यामुळेच या दोन्ही नियतकालिकांचे सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात भाषांतर आणि वितरण करण्यात येत आहे.—प्रकटी. १४:६.
३. राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यासाठी आपण कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला आहे?
३ यहोवाच्या लोकांनी राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला आहे. सुरुवातीच्या दिवसांत आपण साऊंड कार, रेडिओ कार्यक्रम आणि पोर्टेबल फोनोग्राफ यांचा वापर केला. त्या काळात राज्याचे उद्घोषक कमी असल्यामुळे या पद्धतींद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज्याची सुवार्ता पोहचवणे शक्य झाले. (स्तो. १९:४) अलीकडच्या काळात, jw.org या आपल्या वेबसाईटवर बरीच माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे लक्षावधी लोकांना, अगदी ज्या देशांत आपल्या कार्यावर बंदी आहे तेथील लोकांनाही राज्याचा संदेश सांगणे शक्य झाले आहे.
४. आपण कोणत्या विशेष पद्धतींचा वापर केला आहे?
४ राज्याच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी यहोवाच्या लोकांनी विशेष उपक्रमही राबवले आहेत. उदाहरणार्थ, १९९० च्या दशकाच्या मध्यापासून आपण उद्यानांत, पार्किंगच्या ठिकाणी आणि व्यापारी क्षेत्रांत साक्ष देण्याद्वारे घरोघरच्या प्रचार कार्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. अलीकडेच काही देशांतील मोठमोठ्या शहरांमध्ये, महानगरातील खास सार्वजनिक साक्षकार्य आयोजित करण्यात आले होते. शिवाय, अनेक मंडळ्या त्यांच्या क्षेत्रातील वर्दळीच्या ठिकाणी साहित्याच्या ट्रॉलीचा व टेबलाचा वापर करून सार्वजनिक साक्षकार्य करत आहेत. असे असले, तरी घरोघरचे कार्य हे नेहमीच राज्याचा प्रचार करण्याचे प्रमुख माध्यम राहिले आहे.—प्रे. कृत्ये २०:२०.
५. नवीन सेवा वर्षात अनेकांसमोर कोणत्या संधी असतील?
५ आपण पुढे काय करू: सप्टेंबरमध्ये नवीन सेवा वर्षाची सुरुवात होईल तेव्हा अनेक जण सामान्य पायनियर म्हणून सेवा सुरू करतील. तुम्हीही करू शकता का? ते जर शक्य नसेल तर तुम्ही वेळोवेळी साहाय्यक पायनियरिंग करू शकता का? तुम्हाला पायनियरिंग करणे शक्य असो अथवा नसो, राज्याची घोषणा करण्याच्या कार्यात पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी तुम्ही जे काही त्याग कराल त्यासाठी यहोवा नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल.—मला. ३:१०.
६. ऑक्टोबर २०१४ हा महिना आपल्यासाठी खास का असेल?
६ राज्याच्या जन्माचा शंभरावा वर्धापनदिन ऑक्टोबर २०१४ मध्ये असेल. भविष्यावर नजर ठेवून, आपण सर्व जण लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करत राहू या.—प्रे. कृत्ये ८:१२.