वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१४ पृ. २-४
  • सार्वजनिक साक्षकार्याची नवीन पद्धत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सार्वजनिक साक्षकार्याची नवीन पद्धत
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • साक्षकार्य करण्याची उत्कृष्ट व नवीन पद्धत
    आमची राज्य सेवा—२०१४
  • सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • सार्वजनिक ठिकाणी परिणामकारकरित्या साक्ष देणे
    आमची राज्य सेवा—२००५
  • परिणामकारक असलेले रस्त्यावरील साक्षकार्य
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km ६/१४ पृ. २-४

सार्वजनिक साक्षकार्याची नवीन पद्धत

१. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी आपल्यापुढे कोणते उदाहरण मांडले?

१ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी फक्‍त घरोघरी जाऊनच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणीसुद्धा प्रचार कार्य केले. (प्रे. कृत्ये २०:२०) जसे की, मंदिरात पुष्कळ लोक भेटतील हे त्यांना ठाऊक होते. (प्रे. कृत्ये ५:४२) अथेन्समध्ये असताना प्रेषित पौलाने बाजारात भेटणाऱ्‍या लोकांना दररोज सुवार्ता सांगितली. (प्रे. कृत्ये १७:१७) आज आपण सुवार्तेचा प्रचार प्रामुख्याने घरोघरच्या सेवाकार्याद्वारेच करतो. पण, याव्यतिरिक्‍त आपण पार्किंग, दुकाने, बगिचा, रहदारी असलेले रस्ते व लोक भेटतील त्या इतर सर्व ठिकाणी प्रचार कार्य करतो. सार्वजनिक साक्षकार्यात प्रत्येक प्रचारकाला भाग घेण्याचे उत्तेजन दिले जात असले तरीसुद्धा पुष्कळ जणांना सार्वजनिक साक्षकार्याची एक नवीन पद्धत अजमावून पाहण्याची संधी मिळेल. साक्षकार्याची ही पद्धत अतिशय उत्साहवर्धक आहे.

२. सार्वजनिक साक्षकार्य करताना आपण कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे?

२ या लेखात सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करण्याच्या काही विशिष्ट पद्धतींचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याचा अर्थ असा होत नाही, की भारतासाठी असलेल्या आपली राज्य सेवा यात, सेवेमध्ये सावधगिरी बाळगण्याबद्दल यापूर्वी आलेल्या सूचनांचे आता पालन करण्याची गरज नाही. त्या सर्व सूचना आजही लागू होतात. क्षेत्रात विनाकारण लोकांचा रोष ओढवून घेण्याचे आपण टाळले पाहिजे. वडिलवर्गाने त्यांच्या मंडळीच्या संवेदनशील असलेल्या क्षेत्राचा विचार करावा. सार्वजनिक साक्षकार्याच्या या पद्धतींमुळे त्या क्षेत्रातील सेवेवर नकारात्मक परिणाम होणार नाही यावरदेखील विचार करावा. (अधिक माहितीसाठी वडिलांनी, २४ नोव्हेंबर २०१२ आणि १३ फेब्रुवारी २०१४ या तारखा असलेल्या वडिलांना पाठवलेल्या पत्रांवर विचारविनिमय करावा.) घरोघरचे, रस्त्यांवरचे किंवा इतर प्रकारचे साक्षकार्य करताना आपण सहसा T-85 यहोवाचे साक्षीदार—आपल्या शेजाऱ्‍यांना सुवार्ता सांगण्याच्या कार्यातील आपले हक्क व जबाबदाऱ्‍या या माहितीपत्रकाची एक प्रत जवळ बाळगतो. त्याच प्रकारे, सार्वजनिक साक्षकार्याच्या या नवीन पद्धतींनुसार साक्षकार्य करतानाही प्रत्येक प्रचारकाने हे माहितीपत्रक स्वतःजवळ बाळगले पाहिजे, मग ते क्षेत्र संवेदनशील असो अथवा नसो.

३. नोव्हेंबर २०११ साली बांधवांनी कोणता प्रयत्न केला?

३ नोव्हेंबर २०११ साली न्यूयॉर्क सिटीत, सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य सुरू केल्याच्या प्रयत्नांचा अहवाल २०१३ च्या ईयरबुकमध्ये पृष्ठे १६ व १७ वर देण्यात आला होता. शहराच्या विविध ठिकाणी जास्त रहदारी असलेल्या पदपथांवर, लोकांना दिसतील अशा प्रकारे टेबलांवर किंवा फिरत्या स्टॅण्डवर लक्षवेधक विषयांच्या विविध भाषेतील प्रकाशनांचे प्रदर्शन मांडण्यात आले. या पथांवरून हजारो लोकांचे, म्हणजे कडक सुरक्षा असलेल्या इमारतींमधील लोकांचे तसेच घरी भेटत नसलेल्या लोकांचे येणे-जाणे होते. बांधवांना मिळालेला प्रतिसाद अप्रतिम होता; पुष्कळ लोकांनी आपली प्रकाशने घेतली. अवघ्या एका महिन्यात ३,७९७ नियतकालिके आणि ७,९८६ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अनेक लोकांनी बायबल अभ्यासासाठीसुद्धा विनंती केली. बायबल अभ्यास सुरू करण्याचा मुख्य हेतू असल्यामुळे, आवड दाखवणाऱ्‍या लोकांनी दिलेले पत्ते लगेचच योग्य त्या मंडळीला सुपूर्द करण्यात आले जेणेकरून बंधुभगिनी अशा लोकांच्या भेटी घेऊ शकतील.

४. ही नवीन पद्धत कोठे वापरली जाणार आहे, आणि या नवीन प्रकारचे साक्षकार्य एका जोडप्यासाठी फलदायी कसे ठरले?

४ ही सार्वजनिक साक्षकार्याची नवीन पद्धत यशस्वी ठरल्यामुळे आता ही पद्धत पूर्ण जगभरातील जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणीही वापरली जाणार आहे. याबद्दल एका जोडप्याने लिहिले: “प्रकाशनांचं प्रदर्शन मांडून आम्ही टेबलाजवळ उभं राहून दररोज हजारो लोकांना पाहतो तेव्हा जाणवतं, की जगभरातील लोकांना सुवार्ता सांगण्याचं किती मोठं काम आपण पूर्ण करत आहोत. या हजारो लोकांना पाहून मनात विचार येतो, की यहोवाला प्रत्येक व्यक्‍तीची खरोखरच काळजी आहे. त्यामुळं प्रचार कार्याला जीवनात केंद्रस्थानी ठेवण्याचं आम्ही ठरवलं आहे. सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याच्या योग्यतेचं कोण आहे हे पाहण्यासाठी यहोवा, या टेबलाच्या जवळून जाणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीचं हृदय जणू काय पारखतोय, अशी आम्ही कल्पना करतो. या कार्यात आमच्यासोबत देवदूत आहेत, असं आम्हाला जाणवतं.”

५. (क) अनेक मंडळ्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या सार्वजनिक साक्षकार्याची व्यवस्था केली जात आहे? (ख) सार्वजनिक साक्षकार्यात भाग घेत असताना, मंडळ्या एकमेकांना सहकार्य कशा देऊ शकतात?

५ मंडळीद्वारे केले जाणारे सार्वजनिक साक्षकार्य: अनेक मंडळ्यांतील वडीलवर्ग एका नवीन प्रकारच्या सार्वजनिक साक्षकार्याचे आयोजन करत आहेत. या नवीन पद्धतीत प्रचारक, मंडळीच्या क्षेत्राच्या हद्दीतच एका टेबलावर किंवा फिरत्या स्टॅण्डवर प्रकाशनांचे प्रदर्शन मांडतात.—“उत्तम सहकार्य हवे” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.

६. वडील आपल्या मंडळीच्या क्षेत्रात, जेथे व्यावहारिक असेल तेथे सार्वजनिक साक्षकार्याची व्यवस्था कशी करू शकतात?

६ आपल्या मडंळीच्या क्षेत्रातील कोणत्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ असते व तेथे सार्वजनिक साक्षकार्याची व्यवस्था करणे व्यावहारिक आहे किंवा नाही हे वडिलांनी ठरवावे. बस स्टॅण्ड, चौक, बगिचा, रहदारी असलेले मार्ग, शॉपिंग मॉल, कॉलेजचे पटांगण, एअरपोर्ट किंवा दरवर्षी विविध कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणी टेबलावर किंवा फिरत्या स्टॅण्डवर प्रकाशनांचे प्रदर्शन मांडणे शक्य असेल. ठराविक दिवशी, ठराविक वेळी आणि त्याच ठिकाणी टेबलावर किंवा फिरत्या स्टॅण्डवर प्रकाशनांचे प्रदर्शन मांडल्याने बरेच फायदे होऊ शकतात. एकाच मोठ्या दुकानाच्या बाहेर टेबलावर किंवा फिरत्या स्टॅण्डवर प्रकाशनांचे प्रदर्शन मांडले तर लोकांचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही; त्यांना फक्‍त त्या दुकानात जाण्याची घाई असेल. त्यामुळे, कुठल्या तरी एकाच दुकानाच्या बाहेर टेबल मांडण्याऐवजी शॉपिंग मॉल्समध्ये टेबल मांडणे जास्त प्रभावकारी ठरेल. जास्त रहदारी असलेल्या फूटपाथवरसुद्धा आपण एक लहान फिरते प्रकाशनांचे प्रदर्शन मांडू शकतो. टेहळणी बुरूज, व अवेक! नियतकालिकांतील तसेच बायबल काय शिकवते पुस्तकातील लेखांवर आधारित चित्रे किंवा दृश्‍ये कशी बनवायची यासाठी वडील जन आपल्या वेबसाईटवरील खास फाईल्स डाऊनलोड करू शकतात. या फाईल्स सार्वजनिक साक्षकार्यात उपयोगात आणण्याकरता खास बनवण्यात आल्या आहेत. टेबलावर किंवा फिरत्या स्टॅण्डवर प्रदर्शनासाठी असे विषय निवडा जे लोकांना आवडतील आणि कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. या साक्षकार्यात भाग घेणाऱ्‍यांनी सेवा पर्यवेक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. संदेशात आवड दाखवणारी त्यांच्या क्षेत्रात राहत नसलेली व्यक्‍ती भेटल्यास, त्यांनी त्वरित प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म भरावा आणि तो मंडळीच्या सचिवांना द्यावा.

७. हे सार्वजनिक साक्षकार्य कशा प्रकारे केले जाते?

७ कसे केले जाते हे साक्षकार्य? टेबलावर किंवा फिरत्या स्टॅण्डवर प्रकाशने मांडल्यावर लोकांनी आपल्याकडे येण्याची साक्षीदार वाट पाहत थांबतात. प्रकाशने पाहून कोणी जवळ आले तर त्या व्यक्‍तीला तिच्या आवडीचा विषय असलेले प्रकाशन घेण्याची विनंती केली जाते. तिने प्रश्‍न विचारल्यास तिला बायबलमधून त्याचे उत्तर दाखवले जाते. तिने कोणतेही प्रकाशन घेतले तरी तिला दानाच्या व्यवस्थेबद्दल काहीही सांगितले जात नाही. पण जर त्या व्यक्‍तीने, या कामाचा खर्च कसा चालवला जातो असे विचारलेच तर साक्षीदार तिला, प्रकाशनावर असलेल्या पत्त्यावर ती दान पाठवू शकते, असे सांगतात. शक्य असेल तर साक्षीदार त्या व्यक्‍तीला असेही विचारतात: “कोणी तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेट दिली किंवा या विषयांवर तुमच्याबरोबर चर्चा केली तर तुम्हाला आवडेल का?”

८. हे नवीन प्रकारचे साक्षकार्य फलदायी कसे ठरले आहे?

८ हे नवीन प्रकारचे साक्षकार्य खूप फलदायी ठरत आहे. भारतातील एका मंडळीने या साक्षकार्य पद्धतीचा वापर करून फक्‍त एका तासाभरात १,००० पेक्षा जास्त नियतकालिके वाटली आणि आवड दाखवणाऱ्‍या २०० लोकांचे पत्ते मिळवले. बंगळूरमध्ये एका मॉलसमोर मांडलेल्या प्रदर्शनाकडे एक ट्रॅफिक पोलिस आले आणि आपले कार्य पाहून ते खूप प्रभावित झाले. त्यांनी कौटुंबिक सौख्यानंद आणि तरुण लोक विचारतात ही पुस्तके घेतली. आंध्रप्रदेशात, आवड दाखवणाऱ्‍या एका व्यक्‍तीला यहोवाच्या साक्षीदारांना भेटण्याची खूप उत्सुकता होती आणि या सार्वजनिक साक्षकार्याद्वारे तिची यहोवाच्या साक्षीदारांशी भेट झाली. ही व्यक्‍ती आता बायबल अभ्यास करत आहे व सभांना उपस्थित राहत आहे.

९. मंडळीद्वारे सार्वजनिक साक्षकार्याची संघटित व्यवस्था केलेली नसली तरीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करण्याच्या कोणत्या इतर संधी उपलब्ध आहेत?

९ तुमच्या वैयक्‍तिक क्षेत्रात सार्वजनिक साक्षकार्य: काही मंडळ्यांच्या क्षेत्रात लोकांची वर्दळ असलेली फारशी ठिकाणे नाहीत. त्यामुळे ते टेबलावर किंवा फिरत्या स्टॅण्डवर प्रकाशनांचे प्रदर्शन मांडू शकत नाहीत. तरीपण, मंडळीतील प्रचारकांना सार्वजनिक साक्षकार्य करण्याचे उत्तेजन दिले जात आहे. तुमच्या क्षेत्रात बाजार भरतो का? किंवा मग, एखादे असे मोठे दुकान आहे का जेथे बहुतेक लोक खरेदीसाठी जातात? लोक जमतात अशी एखादी बाग किंवा कट्टा आहे का? किंवा नेहमी कार्यक्रम होत असलेले एखादे ठिकाण आहे का? असल्यास तुम्ही योग्य ती खबरदारी बाळगून वडिलांच्या सल्ल्याने सार्वजनिक साक्षकार्याचा आनंद लुटू शकता.

१०. लोक भेटतील तेथे त्यांना आनंदाची बातमी सांगायचा आटापिटा आपण का केला पाहिजे?

१० “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीम. २:४) त्यामुळे अंत येण्याआधी आपण विविध मार्गांनी जास्तीत जास्त लोकांना सुवार्ता सांगण्याचा आटापिटा करत आहोत. (मत्त. २४:१४) पुष्कळ ठिकाणी लोक आपल्याला त्यांच्या घरी भेटत नाहीत. अशा लोकांना आपण बाहेर म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी भेटू शकतो. कदाचित सार्वजनिक साक्षकार्यामुळेच काहींना देवाच्या राज्याची आनंदाची बातमी ऐकायची संधी मिळेल. त्यामुळे लोक भेटतील तेथे त्यांना ही आनंदाची बातमी सांगून आपण आपली सेवा “पूर्ण” करू या.—२ तीम. ४:५.

[३ पानांवरील चित्र]

उत्तम सहकार्य हवे

असे पाहण्यात आले आहे की कधीकधी जवळपासच्या मंडळ्यांतील प्रचारक एकाच रस्त्यावर, पार्किंगच्या ठिकाणी, एकाच बाजारात किंवा रेल्वे अथवा बस स्थानकावर सार्वजनिक साक्षकार्य करतात. यामुळे कधीकधी दुकानदारांना किंवा लोकांना चीड येते. कधीकधी तर वेगवेगळ्या मंडळ्यांचे प्रचारक वेगवेगळ्या वेळी जाऊनही हे दुकानदार व लोक चिडतात. त्यामुळे, मंडळीला नेमण्यात आलेल्या क्षेत्रातच राहून सार्वजनिक साक्षकार्य करणे उचित ठरेल.

एका मंडळीतील प्रचारक दुसऱ्‍या मंडळीच्या क्षेत्रात जाऊन सार्वजनिक साक्षकार्य करू इच्छित असतील तर त्यांनी आपल्या मंडळीच्या सेवा पर्यवेक्षकांशी याबाबत बोलावे. ते मग, दुसऱ्‍या मंडळीच्या सेवा पर्यवेक्षकांकडे त्यांच्या मंडळीच्या क्षेत्रात सार्वजनिक साक्षकार्य करण्याची परवानगी मागतील. वेगवेगळ्या भाषांच्या मंडळ्या एकाच क्षेत्रात प्रचार करत असतील तर या सर्व मंडळ्यांच्या सेवा पर्यवेक्षकांनी एकमेकांबरोबर संपर्क साधावा; असे केल्यास ते क्षेत्रातील लोकांना चीड आणण्याचे टाळू शकतात. एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन गटांनी कार्य करण्याचे टाळण्यासाठी वडील वेगवेगळ्या क्षेत्र गटांना वेगवेगळ्या भागांत पाठवू शकतात किंवा एकाच भागात पण इतर वेळी कार्य करण्यासाठी प्रचारकांना सांगू शकतात. योग्य प्रकारचे सहकार्य दाखवल्यास सर्वकाही “शिस्तवार व व्यवस्थितपणे” पार पडेल.—१ करिंथ. १४:४०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा