तरुणांनो—अर्थपूर्ण ध्येये गाठण्याचा प्रयत्न करा
१ तुम्ही जीवनात कोणती ध्येये ठेवली आहेत? अनेक तरुण आपल्या जीवनात आध्यात्मिक ध्येये ठेवत नाहीत. पण आध्यात्मिक ध्येये ठेवल्यामुळे आणि ती यशस्वी रीत्या मिळवल्यामुळे जो आनंद मिळतो तो नक्कीच तुम्ही अनुभवला पाहिजे.
२ भौतिक गोष्टी मिळवण्याचे आणि उच्च शिक्षण मिळवण्याचे ध्येय ठेवणे किती व्यर्थ आहे हे अनेक ख्रिस्ती तरुणांना कळून चुकले आहे. जगीक ध्येये ठेवल्यामुळे किती धोके आहेत हे त्यांनी अनुभवले आहे. पण, आध्यात्मिक ध्येये ठेवल्याने आणि देवाच्या मदतीने ती गाठण्याचा प्रयत्न केल्याने आपल्याला आत्ता समाधान लाभेल आणि पुढे अनंतकाळाचे जीवन जगण्याची संधी मिळेल.—उप. १२:१, १३.
३ आध्यात्मिक ध्येये: एक तरुण म्हणून तुम्ही देवाविषयीचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहात का? नीतिसूत्रे २:१-५ या वचनात आपल्याला “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देवाच्या वचनाचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला त्याचे ज्ञान मिळू शकत नाही. नियमितपणे व्यक्तिगत अभ्यास केल्याने यहोवाच्या जवळ येण्यास तयार करण्यात आलेली माहिती तुम्ही तुमच्या मनात बिंबवू शकाल. यामुळे देवाबद्दलचे तुमचे ज्ञान आणखी वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय घेताना हे ज्ञान तुम्हाला उपयोगी पडेल.
४ पण हे सर्व एका दिवसात होणे शक्य नाही. आध्यात्मिक रीत्या प्रौढ होण्यासाठी वेळ देण्याची आणि धीर धरण्याची गरज आहे. पण तुम्ही जर व्यक्तिगत ध्येये ठेवली आणि ती मिळवण्यासाठी योग्य ती पावले उचलली तर तुम्ही आध्यात्मिक रीत्या प्रौढ होऊ शकता.
५ तुम्ही ख्रिस्ती सेवेचे विशेषाधिकार मिळवण्याचा प्रयत्न करता का? घरोघरच्या सेवाकार्यात प्रत्येक आठवडी ठराविक वेळ देण्याचे व्यक्तिगत ध्येय तुम्ही ठेवले आहे का? पुनर्भेटी घेण्यासाठी आणि बायबल अभ्यास चालवण्यासाठी कुशल शिक्षक होण्याचे ध्येय तुम्ही ठेवले आहे का? आपल्या शाळकरी मुलांनी सुटीच्या दिवसांत सामान्य पायनियरिंग करण्याचे ध्येय ठेवले आहे. तुम्हाला पुढच्या व येणाऱ्या वर्षांत कोणती ध्येये साध्य करायची आहेत? तुम्ही सामान्य पायनियर बनण्याचे, बेथेल कुटुंबाचे सदस्य बनण्याचे ध्येय ठेवले आहे का? तुम्ही जर एक तरुण बांधव असाल तर सेवेचे निरनिराळे विशेषाधिकार मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का, जसे की सेवा सेवक बनणे, अविवाहित बांधवांकरता असलेल्या बायबल प्रशालेला उपस्थित राहणे, पुढे जाऊन मंडळीत वडील म्हणून कार्य करणे? जीवनात अर्थपूर्ण ध्येये ठेवल्याने आणि ती मिळवण्याचा प्रयत्न केल्याने तुम्ही तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकाल.
६ तुमची ध्येये व्यावहारिक आणि तुम्हाला गाठता येतील अशी असावीत. तुम्ही आध्यात्मिक ध्येये मिळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा यहोवाला आनंद होतो याची तुम्ही खात्री बाळगू शकता. ठेवलेली ध्येये मिळवण्याचा होता होईल तितका निश्चयपूर्वक प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्या प्रयत्नांचे प्रतिफळ तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला आत्ता आणि पुढेही आशीर्वाद मिळतील.—फिलिप्पै. ४:१३.