यहोवा आपल्याला या कामासाठी प्रशिक्षित करत आहे
१. यहोवा जेव्हा मानवांना एखादी कामगिरी देतो तो त्या कामगिरीसोबत आणखी काय देतो?
१ यहोवा जेव्हा मानवांना कोणतीही कामगिरी देतो तेव्हा, ती कामगिरी पूर्ण करण्यासाठी तो आवश्यक ती मदतही पुरवतो. जसे की, यहोवाने नोहाला एक अशी कामगिरी दिली जी नोहाने पूर्वी कधी केली नव्हती. यहोवाने त्याला एक जहाज बांधायला सांगितले. पण ते जहाज कसे बांधायचे याच्या सूचनाही त्याला दिल्या. (उत्प. ६:१४-१६) नम्र व मेंढपाळ असलेल्या मोशेला यहोवाने इस्राएल राष्ट्रातील वडिलांना व फारोला यहोवाचा संदेश सांगायची कामगिरी दिल्यावर त्याला असे आश्वासन दिले: “मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलावयाचे ते तुला शिकवीन.” (निर्ग. ४:१२) आज यहोवाने आपल्याला प्रचार करण्याची कामगिरी दिली आहे. ही कामगिरी देऊन त्याने आपल्याला असे वाऱ्यावर सोडून दिलेले नाही. तर, ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा या सभांद्वारे तो आपल्याला या कामगिरीचे प्रशिक्षण देत आहे. तेव्हा, या प्रशिक्षणाचा आपण लाभ कसा घेऊ शकतो?
२. ईश्वरशासित सेवा प्रशालेतून तुम्ही फायदा कसा घेऊ शकता?
२ ईश्वरशासित सेवा प्रशाला: या सभेला उपस्थित राहण्याआधी, सभेत होणारे भाग वाचा आणि त्यांचा अभ्यास करा. आणि मग जेव्हा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला, त्याच्या भाषणातील माहितीचा त्याने कसा उपयोग केला आहे हे पाहता तेव्हा शिकवण्याच्या तुमच्या कलेत तुम्ही सुधारणा करू शकता. (नीति. २७:१७) सभेला येताना तुम्ही तुमचे सेवा स्कूल पुस्तक सोबत आणले तर तुम्ही त्याचा कार्यपुस्तक म्हणून उपयोग करू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले भाषण सादर केल्यानंतर प्रशाला पर्यवेक्षक जेव्हा या पुस्तकातून काही सांगत असतात तेव्हा तुम्ही तुमच्या पुस्तकात, तुम्हाला ज्या मुद्द्यावर काम केले पाहिजे असे वाटते अशा मुख्य मुद्द्यांखाली रेघ मारू शकता किंवा मग बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर तुमच्या नोंदी लिहू शकता. पण प्रशालेचा जास्त फायदा तुम्हाला त्या प्रशालेत स्वतःचे नाव दिल्यावर होऊ शकतो. मग, दिले आहे का तुम्ही तुमचे नाव? प्रशालेत नाव दिल्यानंतर तुम्हाला जेव्हा भाषण देण्याची नेमणूक मिळेल, तेव्हा छानपैकी भाषण तयार करा आणि भाषण सादर केल्यानंतर प्रशाला पर्यवेक्षक जेव्हा तुम्हाला सल्ला देतात तेव्हा त्याचा अवलंब करा. आणि मग प्रचार कार्यात शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करा.
३. सेवा सभेचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?
३ सेवा सभा: सेवा सभेदरम्यान चर्चा केले जाणारे साहित्य आपण आधीच वाचून काढले आणि प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवली, तर भाग सादर केले जातात तेव्हा तिथे दिलेल्या सूचना आपल्या लक्षात राहतील. आणि मग सभेत आपण थोडक्याच शब्दांत उत्तरे देऊ शकतो. यामुळे दुसऱ्यांनाही उत्तरे देण्याची संधी मिळू शकेल. सभेत होणारी प्रात्यक्षिके लक्ष देऊन पाहा आणि तुमच्या सेवेला अधिक प्रभावकारी बनवणाऱ्या सूचना लगेच वापरात आणा. आमची राज्य सेवा यात, सेवेत उपयोगी पडतील असे लेख कधीकधी येतात तेव्हा ते लेख जपून ठेवा आणि तुम्हाला हवे तेव्हा त्यांचा उपयोग करा.
४. यहोवाकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा आपण पुरेपूर फायदा का घेतला पाहिजे?
४ संपूर्ण पृथ्वीवर देवाच्या येणाऱ्या राज्याची आनंदाची बातमी सांगायची आपल्याला मिळालेली कामगिरी, नोहा आणि मोशे यांना यहोवाने दिलेल्या कामगिरीसारखीच कठीण आहे. (मत्त. २४:१४) आपला महान शिक्षक यहोवा याच्यावर आपण अवलंबून राहिलो आणि तो देत असलेल्या प्रशिक्षणाचा आपण पुरेपूर फायदा घेतला तर, आपल्याला मिळालेली कामगिरी आपण यशस्वीरीत्या पार पाडू शकू.—यश. ३०:२०.