बायबल अभ्यास सुरू करण्याकरता नवीन मालिका
१. टेहळणी बुरूजच्या सार्वजनिक आवृत्तीमध्ये कोणती नवीन मालिका प्रकाशित होणार आहे, आणि ही कशासाठी तयार करण्यात आली आहे?
१ येत्या महिन्यापासून, टेहळणी बुरूजच्या सार्वजनिक आवृत्तीमध्ये, आपल्याला बायबल अभ्यास सुरू करण्यास मदत करणारी एक नवीन मालिका प्रकाशित होईल. तिचे शीर्षक असेल “देवाच्या वचनातून शिका.” क्षेत्रातील काही लोकांना या मालिकेतील लेख वाचायला नक्कीच आवडतील. परंतु हे लेख खासकरून घरमालकाशी चर्चा करण्यासाठीच तयार करण्यात आले आहेत.
२. या नवीन लेखांची काही वैशिष्ट्ये काय आहेत?
२ नवीन लेखाची वैशिष्ट्ये: या लेखाचे शीर्षक आणि त्यातील पोटमथळे प्रश्नांच्या स्वरूपात आहेत; तेव्हा घरमालकाशी चर्चा करताना तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारू शकता. लेखात मुख्य वचने उद्धृत नाहीत, तर त्यांचा फक्त उल्लेख केलेला आहे, त्यामुळे घरमालक थेट ती वचने बायबलमधून पाहू शकतात. परिच्छेद लहान असल्याकारणाने त्यावर दारात उभे राहूनदेखील घरमालकाशी चर्चा केली जाऊ शकते. प्रत्येक लेखात बायबल काय शिकवते या पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला आहे; त्यामुळे, योग्य वेळी त्या पुस्तकातून अभ्यास सुरू केला जाऊ शकतो.
३. घरोघरच्या प्रचार कार्यात असताना, आपण या मालिकांचा उपयोग करून दारात उभे राहूनच बायबल अभ्यास कसा सुरू करू शकतो?
३ याचा उपयोग कसा करावा: दर तीन महिन्यातून एकदा येणाऱ्या सार्वजनिक आवृत्तीच्या अंकात नव्या मालिकेतील तीन लेख असतील. नियतकालिक देताना तुम्ही घरमालकाला, लेखात दिलेल्या माहितीवर असा एखादा प्रश्न विचारू शकता ज्यामुळे घरमालकाची आवड जागृत होऊ शकेल. उदाहरणार्थ, जुलै ते सप्टेंबर अंकातील पहिल्या लेखात बायबल अनमोल आहे यावर चर्चा करण्यात आली आहे. तुम्ही विचारू शकता: “तुम्हाला काय वाटतं, बायबल एक पवित्र पुस्तक आहे की फक्त एक चांगलं पुस्तक आहे? [उत्तरासाठी थांबा.] याबाबतीत माझ्याकडे काही माहिती आहे.” पहिल्या प्रश्नाकडे घरमालकाचे लक्ष वेधा, पहिला परिच्छेद वाचा, आणि उल्लेखित वचन पाहा. पुन्हा एकदा प्रश्न वाचा, आणि घरमालकाला त्याचे उत्तर देण्यास सांगा. उचित ठरत असेल तितक्याच माहितीवर चर्चा करा, क्रमांक दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा. शेवटी, क्रमांक दिलेल्या पुढच्या प्रश्नावर चर्चा करू या असे घरमालकाला सांगा आणि पुनर्भेटीची व्यवस्था करा. प्रत्येक आठवडी लेखातील इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी परत जा. तो लेख संपल्यावर, आवश्यक वाटल्यास, या चर्चेचे रूपांतर सहजपणे बायबल काय शिकवते पुस्तकाचा उपयोग करून नियमित बायबल अभ्यासात होईपर्यंत मालिकेतील इतर लेखांवर चर्चा केली जाऊ शकते. दुसरा एक मार्ग म्हणजे आवड असलेल्या घरमालकाला तुम्ही सरळ बायबल अभ्यासाविषयी सांगू शकता. नंतर, नियतकालिकातील लेखाचा उपयोग करून अभ्यास कसा केला जातो ते दाखवू शकता.
४. पुनर्भेटी घेताना आपण या लेखांचा उपयोग कसा करू शकतो?
४ तुम्ही या नवीन मालिकांचा उपयोग नियतकालिक मार्गात आणि पुनर्भेटी देतानाही प्रभावीपणे करू शकता. तुम्ही फक्त असे म्हणू शकता: “या टेहळणी बुरूज नियतकालिकात एक नवीन लेख आहे. याचा उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवतो.” या नवीन मालिकेमुळे आपल्याला खूप लोकांना, ‘सत्याचे परिपूर्ण ज्ञान’ घेण्यास मदत करता येईल अशी आपण देवाठायी आशा बाळगतो.—१ तीम. २:४.