‘विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीहि भयभीत होऊ नका’
१ फिलिप्पैकर १:२८ मधील शब्द लिहिताना पौलाला कदाचित, फिलिप्पै येथे तोंड दिलेल्या विरोधाची आठवण झाली असावी. (प्रे. कृत्ये १६:१९-२४) पण विरोधकांना घाबरून त्याने सुवार्तेचा प्रचार करण्याचे सोडून दिले नाही. त्याच्या उदाहरणाचा आज आपल्याला फायदा होऊ शकतो.
२ सेवेमध्ये असताना लोकांच्या जमावाने आपल्याला घेरले तर आपण काय करावे? विरोध करणाऱ्यांनी आपल्याला पोलीस ठाण्यात नेले तर आपण काय करावे? प्रत्येक परिस्थिती वेगवेगळी असली तरी, आपण काही गोष्टींचा विचार करूया ज्यांचा आपल्याला फायदा होऊ शकेल.
३ लोकांचा जमाव आपल्याला घेरतो तेव्हा: लोक जमायच्या आधीच तेथून निघा. (प्रे. कृत्ये १४:६) पण तुम्हाला जर तिथून निघता आले नाही म्हणजे तुम्हाला धरून ठेवण्यात आले असेल तर मोबाईल फोनवरून पोलिसांशी संपर्क साधा. नहेम्याप्रमाणे पटकन मनातल्या मनात प्रार्थना करा. (नहे. २:४) जमावाचा म्होरक्या असेल तर त्याच्याशी किंवा जमावाशी शांतपणे बोलून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीच्या मनात देवाबद्दल आदर असतो. तेव्हा, अशाप्रसंगी लोकांना या आदराची जाणीव किंवा आठवण करून द्या. एके प्रसंगी पौलाला जेव्हा एका हिसंक जमावाने घेरले तेव्हा त्याने हेच तर केले.—प्रे. कृत्ये २१:२७–२२:३०.
४ पण तुम्हाला जर धमकावण्यात आले किंवा मारहाण करण्यात आली तर काय? अशावेळी स्वतःचा बचाव करणे उचित आहे का? हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे. या विषयावरील उपयुक्त तत्त्वे तुम्हाला, “गोंधळलेल्या जगातील गुन्हेगारीस तोंड देणे,” (टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९२ पृष्ठे ४-७) आणि “मी आत्मसंरक्षण शिकावे का?” (सावध राहा! ऑक्टोबर ८, १९९५, पृष्ठे १२-१४) या लेखांमध्ये सापडतील. हे लेख तुम्ही आधीच वाचून ठेवले पाहिजेत.
५ पोलीस ठाण्यात आपल्याला नेले जाते तेव्हा: तुम्ही तुमचे धार्मिक विश्वास शांतीपूर्ण पद्धतीने दुसऱ्यांना सांगत आहात तर काही गुन्हा करत नाही. हा प्रत्येकाचा कायदेशीर हक्क आहे. तुम्ही करत असलेल्या कार्यांचा कोणी आक्षेप घेत असेल तर हे पोलिसांना आदराने सांगा. तसेच, बायबलमधील संदेश इतरांना सांगण्याकरता आपल्याला पैसे दिले जात नाहीत, हेही समजावून सांगा. आणि इतरांचे धर्मांतर करण्याकरता आपण त्यांना कोणत्याही प्रकारचे लालूच दाखवत नाही, हेही सांगा.
६ पोलीस जर तुमच्याशी गैर वागत असतील तर, आपल्याला संरक्षण पुरवण्याचे त्यांचे कर्तव्य आहे याची त्यांना चतुराईने आठवण करून द्या. आवश्यक असल्यास, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचिका सादर करा. (रोम. १३:३, ४; उप. ५:८) आपली मनःस्थिती शांत ठेवा, यहोवा तुमच्या पाठीशी आहे ही खात्री बाळगा.—लूक १२:११, १२.
७ पोलिसांनी तुम्हाला एखाद्या कागदावर सही करण्यास सांगितले तर कागदावरील संपूर्ण मजकूर काळजीपूर्वक वाचल्यावर आणि जे काही लिहिले आहे ते बरोबर असल्याचे तुम्ही मानत असाल तरच सही करा. इथून पुढे मी माझे विश्वास इतरांना सांगणार नाही, असे जर कागदावर लिहिलेले असेल, तर सही करू नका. तुमच्याविरुद्ध जर गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर, तुमच्यावर कोणत्या गुन्ह्याचा आरोप लावण्यात आला आहे व सदर गुन्हा कोणत्या कलमाखाली येतो ते शोधून काढा. विरोधक जर तुमच्याशी गैरपणे वागत असतील तर त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा तुम्हाला हक्क आहे हे वारंवार त्यांना सांगत राहा. तुम्ही जर जखमी झाला असाल तर तुम्हाला डॉक्टरांकडे किंवा इस्पितळात घेऊन जाण्याचा पोलिसांना आग्रह करा.
८ यहोवावर भरवसा ठेवा: तुम्हाला अधिकाऱ्यांसमोर किंवा स्थानीय न्यायालयांत उभे केले जाईल असे येशूने म्हटलेच होते, हे आठवणीत ठेवा. (मत्त. १०:१७, १८) तुम्ही जर विरोधाचा सामना करत असाल तर घाबरून हार मानू नका. शक्तीसाठी यहोवाला प्रार्थना करा. तो तुमची प्रार्थना जरूर ऐकेल हा भरवसा बाळगा. तसेच, अधिकाऱ्यांनी आपल्याला ‘पूर्ण सुभक्तिने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करू द्यावे’ अशीही प्रार्थना करा. (१ तीम. २:१, २) सेवेमध्ये यहोवाविषयी बोलत असताना आपण ही खात्री बाळगू शकतो, की आपला विरोध होत असला तरी यहोवा आपल्याला नक्की बळ देईल.