आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यास मदत करणारे विभागीय संमेलन
१. सुवार्तेची घोषणा करण्याच्या यहोवाकडून मिळालेल्या आज्ञेचे पालन करण्यास तो आपल्याला देत असलेली एक मदत कोणती आहे?
१ सुवार्तेची घोषणा करण्याच्या यहोवाकडून मिळालेल्या आज्ञेचे पालन करण्यास तो आपल्याला सढळ हाताने आवश्यक असलेली माहिती, प्रशिक्षण व प्रोत्साहन देतो. (मत्त. २४:१४; २ तीम. ४:१७) त्या मदतींपैकी एक आपले विभागीय संमेलन, हे आहे. २०१० सेवा वर्षातल्या विभागीय संमेलन कार्यक्रमाचा विषय, “आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवा” हा आहे व तो रोमकर ८:५ आणि यहुदा १७-१९ या दोन वचनांवर आधारित आहे. या संमेलनांची सुरुवात नोव्हेंबर २००९ पासून होईल.
२. (क) कोणकोणत्या मार्गांनी विभागीय संमेलनाचा आपल्याला फायदा होऊ शकतो? (ख) आजपर्यंत झालेल्या विभागीय संमेलनांनी तुम्हाला सेवेमध्ये कशा प्रकारे मदत केली आहे?
२ विभागीय संमेलनाचे फायदे: संमेलन कार्यक्रम आपल्याला, आपले लक्ष विचलित करणाऱ्या किंवा वेळखाऊ गोष्टींबद्दल सावध करून अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे उत्तेजन देईल. स्वैराचारी मनोवृत्तीचा प्रतिकार कसा करायचा व आध्यात्मिक मनोवृत्तीचे असणे म्हणजे नेमके काय हेही आपण शिकू. वाढता दबाव आणि विश्वासाच्या परीक्षा येतात तेव्हा प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबे मिळून आपली आध्यात्मिकता कशी मजबूत करू शकतात हे रविवारच्या परिसंवादात समजावून सांगितले जाईल. या कार्यक्रमात, आपण आपले अंतःकरण कसे जपू शकतो, आपले आध्यात्मिक आरोग्य कसे टिकवून ठेवू शकतो व असे केल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळू शकतात हे सांगितले जाईल.
३. तुमचे पुढील विभागीय संमेलन केव्हा व कुठे आहे व तुम्ही काय करण्याचे ठरवले पाहिजे?
३ तुमचे पुढील विभागीय संमेलन केव्हा व कुठे होणार आहे याची माहिती मिळताच, संमेलनाच्या दोन्ही दिवशी उपस्थित राहून कार्यक्रम लक्ष देऊन ऐकता यावा म्हणून लगेच योजना करा. आगाऊ तयारी करणाऱ्यांच्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देतो ही खात्री बाळगा.—नीति. २१:५.
४. येणाऱ्या विभागीय संमेलनाद्वारे आपल्याला कोणती मदत मिळण्याची आपण खात्री बाळगू शकतो?
४ प्रत्येक उत्तम देणगी यहोवाकडूनच येते यात काही शंका नाही. विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाने बनवलेल्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला ख्रिस्ती सेवक म्हणून आपली सेवा पार पाडण्यास नक्की मदत मिळेल. ‘न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरून’ राहण्यास मदत करण्याकरता यहोवा करत असलेल्या प्रेमळ योजनांबद्दल आपण त्याचे खूप आभारी आहोत.—इब्री १०:२३-२५; याको. १:१७.