देवाच्या सेवकांसाठी एक तरतूद
१. सन १९३८ मध्ये कोणती नवीन व्यवस्था सुरू झाली आणि का?
१ सन १९३८ मध्ये यहोवाच्या संघटनेने एक नवीन व्यवस्था सुरू केली. एका ठराविक पट्ट्यातल्या मंडळ्यांना परिमंडळ संमेलनाला, ज्यांना आता विभागीय संमेलन म्हटले जाते त्या संमेलनांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. कशासाठी? जानेवारी १९३९ चा इंफोरमंटचा (आता, आमची राज्य सेवा) अंक असे उत्तर देतो: “ही संमेलने यहोवाच्या ईश्वरशासित संघटनेचा भाग आहेत जेणेकरून राज्याचे काम आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. संमेलनात दिल्या जाणाऱ्या सूचना प्रत्येक सेवकासाठी महत्वाच्या असतात, यामुळे प्रत्येकाला सोपवण्यात आलेले काम तो योग्य रीत्या पार पाडू शकेल.” सन १९३८ मध्ये फक्त ५८,००० राज्य प्रचारक होते. तेव्हापासून २००९ पर्यंत प्रचारकांची संख्या ७०,००,००० पेक्षा अधिक झाली आहे आणि यावरून स्पष्ट दिसून येते की विभागीय संमेलने, सेवकांना “नेमून दिलेले काम” सिद्धीस नेण्याकरता मदत करत आहेत.
२. नवीन सेवा वर्षात होणाऱ्या विभागीय संमेलनात कोणती माहिती दिली जाणार आहे?
२ आगामी संमेलनाचा विषय: सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विभागीय संमेलनाची व त्यातून मिळणाऱ्या उत्तेजनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. या संमेलनाचा विषय “तुम्ही जगाचे नाही” असा आहे आणि तो योहान १५:१९ या वचनावर आधारित आहे. ख्रिस्ती सेवकांना फायदा होईल अशी कोणती भाषणे संमेलनात दिली जातील? “पूर्ण-वेळेच्या सेवेमुळे आपले संरक्षण होते—कसे?” हे भाषण आपण शनिवारी ऐकणार आहोत. तीन भागात असलेल्या परिसंवादाचा देखील आपण आनंद घेणार आहोत. या परिसंवादाचा विषय आहे “जंगली श्वापद,” ‘मोठी कलावंतीण’ आणि “पृथ्वीवरील व्यापारी” . . . यामुळे दूषित होऊ नका.” आणि रविवारी आपण, “यहोवावर प्रेम करा, जगावर नाही” हा विषय असलेला परिसंवाद ऐकणार आहोत. संमेलनात दिल्या जाणाऱ्या इतर भाषणांचे विषय आहेत: “‘प्रवासी व परदेशवासी’ असेच राहा” व ‘धीर धरा! तुम्ही जगाला जिंकू शकता.’
३. विभागीय संमेलनाला हजर राहिल्यामुळे आपल्याला कोणते फायदे मिळू शकतात?
३ अलीकडे एक बहीण जी सेवेत मंद झाली होती ती विभागीय संमेलनाला उपस्थित राहिली. तिने लिहिले की विभागीय संमेलनामुळे तिने तिची “परिस्थिती पुन्हा पडताळून पाहिली व काहीही कारणे न देता प्रचाराला” जाण्याचा निश्चय केला. यात काही शंका नाही की नवीन सेवा वर्षात होणारे विभागीय संमेलन आपल्या सर्वांना जगावर प्रेम करण्याऐवजी यहोवावर प्रेम करण्यास मदत करेल. (१ योहान २:१५-१७) ख्रिस्ती सेवकांसाठी करण्यात आलेल्या या प्रेमळ तरतूदीचा पुरेपूर लाभ घेता यावा म्हणून संमेलनाला उपस्थित राहण्याची व लक्षपूर्वक ऐकण्याची खातरी करा!