बायबल काय शिकवते या पुस्तकातून शिकवताना थोर शिक्षकाचे अनुकरण करा
१. येशूने कशा पद्धतीने शिकवले?
१ थोर शिक्षकाने अर्थात येशूने नेहमी स्पष्ट व साध्या पद्धतीने शिकवले. आपल्या श्रोत्यांच्या विचारांना चालना देण्याकरता कधीकधी तो प्रथम त्यांचे मत त्यांना विचारत असे. (मत्त. १७:२४-२७) तो देवाच्या वचनाकडे त्यांचे लक्ष वेधत असे. (मत्त. २६:३१; मार्क ७:६) आपल्या शिष्यांवर एकदाच खूप माहितीचे ओझे न लादण्याची त्याने काळजी घेतली कारण त्याला माहीत होते की ते हळूहळू सर्वकाही शिकतील. (योहा. १६:१२) तसेच आपण जे शिकवतो ते शिष्यांना समजले का व पटले का हे ही तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे. (मत्त. १३:५१) आपल्यालाही या पद्धतीने शिकवता यावे या उद्देशाने बायबल काय शिकवते पुस्तकाची विशिष्टप्रकारे रचना करण्यात आली आहे.
२. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला दिलेल्या प्रश्नांचा आपण कशारितीने उपयोग करू शकतो?
२ अध्यायाच्या सुरुवातीचे प्रश्न: एखादा अध्याय सुरू करण्याआधी शीर्षकाखाली दिलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे अतिशय परिणामकारक ठरेल. विद्यार्थ्याचे कुतूहल जागृत करण्यासाठी तुम्ही हे प्रश्न उत्तरांची अपेक्षा न करता नुसतेच वाचून दाखवू शकता. किंवा, तुम्ही या प्रश्नांवर संक्षिप्त टिप्पणी करण्यास विद्यार्थ्याला सांगू शकता. त्याने दिलेल्या उत्तरावर सविस्तर चर्चा करण्याची किंवा त्याने काही चुकीचे मत व्यक्त केल्यास ते दुरुस्त करण्याची गरज नाही. त्याऐवजी, त्याने व्यक्त केलेल्या अभिप्रायाबद्दल आभार मानून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. प्रास्ताविक प्रश्नांना विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तरावरून तुम्हाला कळेल की अध्यायाच्या कोणत्या भागावर आपण जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे.
३. आपण अभ्यास अगदी साध्यासोप्या पद्धतीने कसा घेऊ शकतो?
३ शास्त्रवचने: अभ्यास हा शास्त्रवचनांवर आधारित असला पाहिजे. (इब्री ४:१२) पण प्रत्येक उल्लेखलेले वचन वाचण्याची गरज नाही. आपले मूलभूत विश्वास ज्या वचनांवर आधारित आहेत त्या शास्त्रवचनांवर आपण जोर दिला पाहिजे. जी शास्त्रवचने केवळ एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी समजावण्यासाठी दिलेली आहेत ती वाचणे आवश्यक नाही. बायबल काय शिकवते हे पुस्तक सत्याचा अगदी सोप्या पद्धतीने खुलासा करते. तेव्हा आपणही अगदी साध्यासोप्या पद्धतीने अभ्यास संचलित केला पाहिजे. फक्त मुख्य मुद्द्यांवर भर देऊन, बारीकसारीक तपशीलांविषयी खूप बोलण्याचे किंवा पुस्तकात नसलेल्या अनावश्यक माहितीचा समावेश करण्याचे आपण आवर्जून टाळले पाहिजे.
४. परिशिष्टातील माहितीची अभ्यासादरम्यान चर्चा करावी की नाही हे आपण कसे ठरवू शकतो?
४ परिशिष्ट: परिशिष्टात १४ विषयांवर अतिरिक्त माहिती दिली आहे. अभ्यासादरम्यान या विषयांवर चर्चा करायची की नाही हे तुमच्यावर आहे. काही विषयांकरता, विशेषतः ज्या विषयांवर अध्यायात दिलेली माहिती विद्यार्थ्याला समजली व त्याने ती स्वीकारली अशा विषयांकरता तुम्ही विद्यार्थ्याला स्वतःहून परिशिष्टातील माहिती वाचून काढण्याचे उत्तेजन देऊ शकता. उदाहरणार्थ, येशूच मशीहा आहे हे जर विद्यार्थी आधीपासूनच मानत असेल तर “येशू ख्रिस्त कोण आहे?” हे शीर्षक असलेल्या ४ थ्या अध्यायाची चर्चा करताना, “येशू ख्रिस्त—प्रतिज्ञात मशीहा” या परिशिष्टातील विषयावर अभ्यासादरम्यान चर्चा करण्याची गरज नाही. पण इतर प्रसंगी मात्र परिशिष्टातील एखादा विषय किंवा त्याचा काही भाग अभ्यासादरम्यान सोबत मिळून विचारात घेणे जास्त श्रेयस्कर ठरेल.
५. जर आपण परिशिष्टातील माहिती विचारात घेण्याचे ठरवले तर आपण हे कशाप्रकारे करू शकतो?
५ जर तुम्ही परिशिष्टातील माहितीची अभ्यासादरम्यान चर्चा करण्याचे ठरवले तर तुम्ही आधीपासूनच उचित प्रश्न तयार करू शकता आणि अध्यायाचा ज्याप्रकारे आपण अभ्यास घेतो त्याच प्रकारे एकेक परिच्छेद वाचून विद्यार्थ्यासोबत या माहितीचीही चर्चा करू शकता. किंवा, विशिष्ट माहिती तुमच्या विद्यार्थ्याकरता खासपणे उपयुक्त आहे असे वाटल्यास, तुम्ही त्याला आधीपासून परिशिष्टातील माहिती वाचायला सांगून, अभ्यासादरम्यान त्या माहितीची त्याच्यासोबत उजळणी करू शकता. असे केल्यामुळे विद्यार्थ्याने वाचलेली माहिती त्याला नीट समजली किंवा नाही याची तुम्हाला खात्री करता येईल.
६. प्रत्येक अभ्यासाच्या शेवटी दिलेल्या उजळणीच्या रकान्याचा कशाप्रकारे वापर करता येतो?
६ उजळणीचा रकाना: प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असलेल्या रकान्यात अध्यायाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विधानांच्या रूपात दिलेली आहेत. तुम्ही या विधानांच्या साहाय्याने अध्यायातील मुख्य मुद्द्यांची उजळणी करू शकता. काही प्रचारकांना प्रत्येक विधान वाचून त्यासोबत दिलेले शास्त्रवचन विद्यार्थ्यासोबत उघडून वाचणे परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. शास्त्रवचन वाचल्यानंतर, ते या विधानाला कशाप्रकारे पुष्टी देते हे विद्यार्थ्याला विचारतात. यावरून अभ्यास घेणाऱ्याला हे समजेल की विद्यार्थ्याला अध्यायातील मुख्य मुद्दे आणि बायबल या मुद्द्यांना कशाप्रकारे दुजोरा देते हे समजले किंवा नाही, तसेच त्याला हे मुद्दे पटले किंवा नाहीत. तसेच बायबलच्या आधाराने इतरांना सत्य कशाप्रकारे समजावून सांगता येते याचे विद्यार्थ्याला प्रशिक्षण मिळेल.
७. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण बायबल काय शिकवते या पुस्तकाचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो?
७ लोकांना शिकवण्याची व शिष्य बनवण्याची जी जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे ती पूर्ण करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे येशूच्या शिकवण्याच्या पद्धतींचे अनुकरण करणे. (मत्त. २८:१९, २०) बायबल काय शिकवते हे पुस्तक आपल्याला असे करण्यास सहायक ठरू शकते. तेव्हा इतरांना साध्या, सोप्या व मनाला भावेल अशा पद्धतीने सत्य शिकवण्याकरता या पुस्तकाचा चांगला उपयोग करा.