सर्वदूर यहोवाचे गुण प्रसिद्ध करा
१. यहोवाचे गुणगान करण्याची प्रेरणा आपल्याला कशामुळे मिळते?
१ “हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच; आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच.” (१ इति. २९:११) यहोवाबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे व कृतज्ञतेमुळे आपल्याला कोणती प्रेरणा मिळते? निश्चितच ‘ज्याने [आम्हास] अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध करण्याची’ प्रेरणा आपल्याला मिळते. (१ पेत्र २:९) आपल्या महान देवाबद्दल इतरांना सांगितल्याशिवाय आपल्याला राहावत नाही! मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत आपल्याला यहोवाचे गुणगान करण्याची उल्लेखनीय संधी मिळेल.
२. स्मारकविधीची जाहिरात करण्याकरता कोणती खास मोहीम आयोजित करण्यात आली आहे आणि यात कोण सहभाग घेऊ शकतात?
२ स्मारकविधीची जाहिरात करण्याकरता खास मोहीम: सोमवार, एप्रिल २ रोजी आपण प्रभुच्या सांज भोजनाला उपस्थित राहून यहोवाच्या गुणांकडे इतरांचे लक्ष वेधू. या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या विशेष निमंत्रणपत्रिका मार्च १२ ते एप्रिल २ पर्यंत सबंध जगात वितरीत केल्या जातील. सर्वांना या मोहिमेत सहभाग घेण्याचे प्रोत्साहन दिले जाते. नवीन विद्यार्थी सुवार्तेचे प्रचारक बनण्यास पात्र असल्यास या कार्यात पदार्पण करण्याची ही एक उत्तम संधी आहे. तुमचे बायबल विद्यार्थी अथवा मुले याकरता पात्र असल्यास, पुढाकार घेऊन याविषयी वडिलांशी बोला.
३. स्मारकविधीकरता लोकांना निमंत्रित करताना आपण काय म्हणू शकतो?
३ “मुक्तिसमय जवळ आहे” या प्रांतीय अधिवेशनाच्या संबंधाने जी मोहीम झाली होती त्याच्यासारखीच ही मोहीम देखील असेल. मंडळ्यांना पुरेशा निमंत्रणपत्रिका पाठवण्यात येतील जेणेकरून प्रत्येक प्रचारकाला ५० आणि पायनियरांना १५० प्रती मिळतील. अगदी संक्षिप्त प्रस्तावना देऊन ही निमंत्रणपत्रिका घरमालकाला द्यावी. तुम्ही असे म्हणू शकता: “लवकरच होऊ घातलेल्या एका महत्त्वाच्या वार्षिक कार्यक्रमाची ही निमंत्रणपत्रिका आहे. तुमचे या कार्यक्रमाला हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमासंबंधी सर्व माहिती निमंत्रणपत्रिकेवर आहे.” अर्थात घरमालकाला काही प्रश्न असल्यास त्यांची सविस्तर उत्तरे त्यांना द्यावीत. बायबल काय शिकवते या पुस्तकाच्या परिशिष्टातील पृष्ठ २०६ वरील प्रभुचे सांज भोजन या शीर्षकाखालील माहिती यासंदर्भात उपयुक्त ठरेल. शनिवार-रविवारी खास निमंत्रणपत्रिकेसोबत आपण मासिकांचे चालू अंक देखील देऊ. कोणी आस्था व्यक्त केल्यास त्यांचे नाव व पत्ता नोंदावा व पुन्हा त्यांची भेट घेण्याकरता व्यवस्था करावी.
४. स्मारकविधीच्या खास निमंत्रणपत्रिका कशाप्रकारे वितरीत केल्या जातील?
४ जेथे कोठे शक्य असेल तेथे ही निमंत्रणपत्रिका प्रत्येक घरमालकाला वैयक्तिकरित्या दिली पाहिजे. त्यामुळे, घरी न भेटलेल्या लोकांची नोंद ठेवून दुसऱ्या वेळी त्यांची भेट घेण्याची व्यवस्था करा. ज्या मंडळ्यांकडे बऱ्याच निमंत्रणपत्रिका उरलेल्या असतील त्यांनी केवळ स्मारकविधीच्या आधीच्या एका आठवड्यात (त्याआधी नाही) घरी नसलेल्या लोकांच्या दारात किंवा पत्रपेटीत निमंत्रणपत्रिका टाकण्यास सुरुवात करावी. तुमच्या पुनर्भेटी, बायबल विद्यार्थी, नातेवाईक, सहकर्मचारी, शेजारी आणि इतर ओळखीच्या लोकांनाही निमंत्रणपत्रिका देण्यास विसरू नका.
५. आपण आतापासूनच सहायक पायनियर सेवा करण्याकरता योजना आखण्यास सुरुवात का केली पाहिजे?
५ सहायक पायनियर सेवा: तुम्ही मार्च, एप्रिल व मे या महिन्यांदरम्यान सहायक पायनियर सेवा करण्याद्वारे यहोवाचे गुण आणखी चांगल्याप्रकारे प्रसिद्ध करू शकाल का? असे करण्याकरता कदाचित तुमच्या नित्यक्रमात तुम्हाला थोडाबहुत फेरबदल करावा लागेल. (इफिस. ५:१५-१७) यहोवाच्या सेवेत अधिक परिश्रम घेतल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तसेच यहोवाचा आशीर्वादही मिळेल याची तुम्ही खात्री बाळगू शकता. (नीति. १०:२२) स्मारकविधीचा काळ जवळ येत आहे, तेव्हा आताच योजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे.—नीति. २१:५.
६. मागच्या वर्षी सहायक पायनियर सेवा केलेल्या एका ९० वर्षीय भगिनीच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
६. एका नव्वद वर्षांच्या भगिनीने मागच्या वर्षी सहायक पायनियर सेवा करण्याच्या सुसंधीचा आस्वाद घेतला. त्या सांगतात: “मला बागकाम फार आवडते. खरं तर मला रोपं लावायला सुरुवात करायची होती. पण मला जाणीव झाली की मी ज्या खरोखर महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. राज्याच्या कार्याला जीवनात पहिलं स्थान देण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन मी मार्च महिन्यात सहायक पायनियर सेवा करण्याचा निर्णय घेतला.” त्यांना या प्रयत्नांकरता आशीर्वाद मिळाला का? त्या सांगतात, “मला मंडळीसोबत मिळून कार्य केल्याचा आनंद मिळाला आणि मला आता यहोवाच्याही आणखी जवळ आल्यासारखं वाटतं.” आपणही जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देत आहोत याचे परीक्षण करून आवश्यक फेरबदल करू शकतो का?
७. सहायक पायनियर सेवा करणे कठीण आहे का?
७ सहायक पायनियर सेवेचे ५० तास पूर्ण करणे तुम्हाला वाटते तितके कठीण नाही. तुमच्या दैनंदिन कार्यांचा प्रार्थनापूर्वक आढावा घ्या, मग एक आराखडा तयार करा आणि मग आध्यात्मिक कार्यांकरता तयार केलेल्या तुमच्या दिनदर्शिकेवर याची नोंद करा. तुमच्या वैयक्तिक परिस्थितीची तुम्हालाच सर्वात चांगली कल्पना आहे. जर तुमचे आरोग्य तितके चांगले नसेल आणि बराच वेळ सलग सेवाकार्य करणे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दररोज फक्त एखाद-दोन तास करू शकता. जर तुम्ही पूर्णवेळेची नोकरी करत असाल किंवा शाळेला जात असाल तर तुम्ही संध्याकाळी व शनिवार-रविवारी सेवाकार्य करून सहायक पायनियर सेवा करू शकता.
८. एका विवाहित जोडप्याला कशामुळे सहायक पायनियर सेवा करता आली?
८ बऱ्याच जणांनी कुटुंब मिळून सहायक पायनियर सेवेचा आनंद घेतला आहे. एका विवाहित जोडप्याला पूर्वी सहायक पायनियर सेवेकरता आपले नाव द्यावे की नाही अशी शंका वाटायची. त्यांना असे वाटत होते की त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना सहायक पायनियर सेवा करता येणार नाही. मग त्यांनी याविषयी काय केले? “आम्ही यहोवाला प्रार्थना केली की आम्हाला इतक्या काळापासून जे करण्याची इच्छा होती ते करण्याकरता त्याने आम्हाला मदत करावी.” योग्य नियोजनामुळे ते आपले ध्येय गाठण्यात यशस्वी ठरले. ते म्हणतात: “हा एक अतिशय सुरेख अनुभव होता. आम्हाला अनेक आशीर्वाद मिळाले. आम्ही सर्वांना हा सल्ला देऊ इच्छितो की, सहायक पायनियर सेवा करून पाहा. जर आम्ही करू शकलो तर कदाचित तुम्हीही करू शकाल.”
९. येत्या खास कार्याच्या महिन्यांकरता तयारी करण्याकरता तुम्ही पुढच्या कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी काय करू शकता?
९ येत्या महिन्यांत कुटुंबातील सर्वांना आपले सेवाकार्य कशाप्रकारे वाढवता येईल याविषयी तुमच्या पुढील कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी चर्चा करा. जरी तुमचे पूर्ण कुटुंब सहायक पायनियर सेवा करू शकत नसेल, तरी कदाचित कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मदतीने व सहकार्याने कुटुंबातील निदान एक व्यक्ती सहायक पायनियर सेवा करू शकेल. जर हे शक्य नसेल तर मग कदाचित तुमचे कुटुंब या खास कार्याच्या महिन्यांदरम्यान सेवाकार्यात अधिक वेळ देण्याचे ध्येय ठेवू शकते.
१०. स्मारकविधीच्या काळात सहायक पायनियर सेवा करण्याच्या आपल्या इच्छेविषयी आपण इतरांशी का बोलले पाहिजे?
१० एकमेकांना मदत करा: उत्साह हा सहसा संसर्गजन्य असतो. सहायक पायनियर सेवा करण्याच्या तुमच्या इच्छेविषयी इतरांना सांगा. यामुळे त्यांनाही कदाचित अर्ज भरण्याची प्रेरणा मिळेल. शिवाय, ज्यांनी पूर्वी पायनियर सेवा केली होती ते, वेळेचे कशाप्रकारे नियोजन करता येईल याविषयी तुम्हाला काही उपयुक्त सूचना देऊ शकतील, जेणेकरून तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यास मदत मिळेल. (नीति. १५:२२) जर तुम्ही सहायक पायनियर सेवा करू शकत असाल, तर तुमच्याच सारख्या परिस्थितीत असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या प्रचारकालाही आपल्यासोबत या आनंददायक कार्यात सहभागी होण्याचे तुम्ही सुचवू शकता का?
११. वडील येत्या महिन्यांदरम्यान सहायक पायनियर सेवा करण्याकरता मंडळीत उत्साह कसा निर्माण करू शकतात?
११ बरेच वडील या खास सेवेत सहभागी होण्याकरता आवश्यक तडजोडी करतात. (इब्री १३:७) हे मंडळीतल्या सर्वांकरता निश्चितच अतिशय उत्तेजनदायक आहे! वडील इतरांशी बोलतानाही त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतात. काहीजणांना सहायक पायनियर सेवा करण्यास प्रवृत्त करण्याकरता केवळ प्रेमळपणे बोललेले उत्तेजनाचे दोन शब्द किंवा काही विशिष्ट व्यवहारोपयोगी सूचना पुरेशा असतात. सेवा पर्यवेक्षक या काळात क्षेत्र सेवेकरता नेहमीपेक्षा जास्त सभेची व्यवस्था करतील जेणेकरून सर्वांना कामानंतर किंवा शाळेनंतर सामूहिक साक्षकार्यात सहभागी होता येईल. या व्यवस्थांविषयी वेळोवेळी घोषणा केल्या जातील. तसेच सर्वांजवळ पुरेसे क्षेत्र आणि साहित्य आहे किंवा नाही याचीही ते खात्री करतील.
१२. तुम्ही सहायक पायनियर सेवा करू शकत नसला तरी तुम्ही काय करू शकता?
१२ तुमच्या परिस्थितीमुळे जरी तुम्हाला सहायक पायनियर सेवा करणे शक्य नसले तरीसुद्धा जे अर्ज भरतात त्या सर्वांना तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता, तसेच तुम्ही त्यांच्याकरता प्रार्थनाही करू शकता. (नीति. २५:११; कलस्सै. ४:१२) कदाचित तुम्ही आठवड्यादरम्यान एखादा दिवस त्यांच्यासोबत सेवाकार्य करण्याची योजना करू शकता किंवा एरवीपेक्षा जास्त वेळ साक्षकार्य करून त्यांना मदत करू शकता.
१३. भारतातील प्रचारकांसाठी कोणते ध्येय ठेवण्यात आले आहे आणि तुमची मंडळी हे ध्येय गाठण्याकरता कशाप्रकारे योगदान देऊ शकेल?
१३ एप्रिल महिन्यात ४,५०० सहायक पायनियरांचे ध्येय: भारतातील शाखा दफ्तराने एप्रिल २००६ मध्ये ३,२१६ सहायक पायनियरांचा विक्रमी उच्चांक गाठला. तेव्हा येत्या एप्रिलमध्ये ४,५०० सहायक पायनियरांचे ध्येय ठेवण्यास हरकत नाही. प्रत्येक मंडळीतल्या दर ५ प्रचारकांतून १ प्रचारकाने जरी सहायक पायनियर सेवा केली तरी आपण हे ध्येय गाठू शकतो. अर्थात काही मंडळ्यांत कदाचित यांपेक्षा जास्त प्रचारक असतील जे सहायक पायनियर सेवा करण्याच्या स्थितीत असतील. बहुतेक मंडळ्या हे ध्येय सहज गाठू शकतील. असे ध्येय ठेवल्यामुळे तुमच्या मंडळीत किती उत्साह निर्माण होईल आणि तुमच्या क्षेत्रातील प्रचार कार्यावर याचा किती चांगला परिणाम होईल याची कल्पना करा!
१४. एप्रिल हा सहायक पायनियर सेवेकरता एक उत्तम महिना का आहे?
१४ सहायक पायनियर सेवेकरता एप्रिल हा एक उत्तम महिना का आहे? कारण या महिन्याच्या सुरुवातीलाच स्मारकविधी आहे. त्यामुळे, जे या प्रसंगी उपस्थित राहतील त्यांना पुनर्भेटी देण्याच्या भरपूर संधी आपल्याजवळ असतील. या महिन्यात आपण मासिके सादर करू, आणि पुनर्भेट देताना बायबल काय शिकवते हे पुस्तक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा, एप्रिल महिन्यात सहायक पायनियर सेवा केल्यास नवे बायबल अभ्यास सुरू करण्याच्या अनेक संधी मिळू शकतील. या काळात दिवसही लांब होऊ लागलेले असतील आणि संध्याकाळी तेवढा उकाडाही नसेल. शिवाय, एप्रिल महिन्यात पाच रविवार आहेत आणि शाळेच्या सुट्या आहेत, तेव्हा नोकरी करणाऱ्यांना व शाळकरी मुलांना हे सोयीचे पडेल.
१५. हा स्मारकविधीचा काळ जवळ येताना आपण काळाची निकड का ओळखली पाहिजे?
१५ प्रत्येक स्मारकविधी आपल्याला या दुष्ट जगाच्या नाशाच्या आणखी एक वर्ष जवळ आणतो. आपल्या महान देवाबद्दल इतरांना सांगण्याकरता उरलेल्या काळाचा संक्षेप करण्यात आला आहे. (१ करिंथ. ७:२९) हा स्मारकविधीचा काळ येऊन गेल्यानंतर, त्यानिमित्ताने आपल्या स्वर्गीय पित्याची स्तुती करण्याची जी अनमोल संधी मिळाली होती ती पुन्हा मिळणार नाही. तेव्हा मार्च, एप्रिल व मे महिन्यात यहोवाचे गुणगान करण्याकरता आपल्याने होईल तितके करण्याची आतापासूनच आपण तयारी करायला लागू या!
[४ पानांवरील चौकट]
एप्रिल महिन्यात ४,५०० सहायक पायनियरांचे ध्येय आपल्याला गाठता येईल का?
▪ आपण कोणत्या कार्यांना सर्वात जास्त वेळ देतो याचा आढवा घ्या
▪ कुटुंब मिळून आपल्या ध्येयांविषयी चर्चा करा
▪ इतरांशी आपल्या योजनांबद्दल बोला