बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाच्या अभ्यासाचा आस्वाद घ्या
१ “देवाच्या आज्ञेत राहा” प्रांतीय अधिवेशनाचे एक मनोरंजक वैशिष्ट्य होते, बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचे प्रसिद्धीकरण. आपण लवकरच हे पुस्तक आपल्या क्षेत्र सेवेत आणि खासकरून जेव्हा आपण गृह बायबल अभ्यास संचालित करू तेव्हा बहुतेकदा वापरणार आहोत. पण त्याआधी आपण स्वतः या नवीन प्रकाशनाशी चांगल्याप्रकारे परिचित झाले पाहिजे. २००६ सालच्या एप्रिल १७ तारखेने सुरु होणाऱ्या सप्ताहापासून आपण आपल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासात या पुस्तकाचा अभ्यास सुरू करू तेव्हा या पुस्तकाशी आपण परिचित होऊ शकू.
२ पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक पुस्तकातील प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला असलेल्या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधतील. त्यानंतर पानाच्या खालच्या बाजूला असलेल्या प्रश्नांचा उपयोग करून ते अभ्यास घेतील. मुख्य शास्त्रवचने वाचून त्यांवर चर्चा केली जाईल आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असलेला “बायबल असे शिकवते” हा चौकोन, वाचलेल्या माहितीची उजळणी करण्यास उपयुक्त ठरेल; कारण, चौकोनात अध्यायाच्या सुरूवातीला विचारण्यात आलेल्या शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. तुम्हाला उत्तरे द्यायला आवडेल कारण या पुस्तकातील विषय, स्पष्ट, साध्या आणि रोचक पद्धतीत मांडलेले आहेत.
३ या पुस्तकातील परिशिष्टात देखील विविध विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बायबल विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर अधिक माहिती हवी असते तेव्हा आपण या माहितीचा उपयोग करू शकतो. परिशिष्टातील काही भागांवर पुस्तक अभ्यासादरम्यान चर्चा केली जाईल. एखाद्या विषयावरील परिशिष्टातील माहिती पुस्तक अभ्यासात वाचन करणारा बांधव वाचेल. मोठे लेख असतील तर त्यांची दोन भागात विभागणी केली जाऊ शकते. अभ्यासाचे प्रश्न परिशिष्टात नाहीत. पण पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक उपस्थितांना मुख्य मुद्द्यांवर प्रश्ने विचारून उत्तरे विचारू शकतात.
४ मंडळीच्या पुस्तक अभ्यासात बायबल काय शिकवते पुस्तकाचा अभ्यास लवकर संपेल. पण आपण इतरांबरोबर, खासकरून ज्यांना बायबलविषयी फार कमी किंवा काहीच ज्ञान नाही, अशांबरोबर या प्रकाशनाचा अभ्यास करत असू तर त्यांच्याबरोबर याच गतीने गेले पाहिजे असे नाही. (प्रे. कृत्ये २६:२८, २९) गृह बायबल अभ्यासांत आपल्याला शास्त्रवचनांवर खोल चर्चा करावी लागेल, चित्रे समजावून सांगावी लागतील, वगैरे. तेव्हा, बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाचा जेव्हा आपण मंडळीच्या पुस्तक अभ्यासात अभ्यास करू तेव्हा दर आठवडी उपस्थित राहा आणि अभ्यासात भाग घेण्याचे ध्येय ठेवा.