ऑक्टोबर १६ ते नोव्हेंबर १२ पर्यंत एक खास मोहीम!
१ “धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?” हे आहे राज्य वार्ता क्र. ३७ या पत्रिकेचे शीर्षक. ही पत्रिका पुढच्या महिन्यापासून सबंध जगात वितरित केली जाईल. ऑक्टोबर महिन्याचे पहिले पंधरा दिवस आपण टेहळणी बुरूज व सावध राहा! ही मासिके सादर करू. यानंतर सोमवार, ऑक्टोबर १६ पासून रविवार, नोव्हेंबर १२ तारखेपर्यंत आपण राज्य वार्ता क्र. ३७ या पत्रिकेच्या वितरणाच्या कार्यावर लक्ष केंद्रित करू. मोहिमेदरम्यान जे शनिवार-रविवार येतील त्यांत आपण मासिकांच्या चालू अंकांसोबत ही पत्रिका सादर करू.
२ कोण सहभाग घेऊ शकतात?: सुवार्ता प्रचाराच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणारे सर्वजण या मोहिमेत सहभाग घेऊ शकतात. काहीजण जमल्यास सहायक पायनियर सेवाही करू शकतात. तुमची मुले अथवा तुमच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्या व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करत आहेत का? मग ते बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक बनू शकतात का, यासंबंधी वडिलांना विचारण्यास त्यांना साहाय्य करा. वडिलांनी अक्रियाशील झालेल्या प्रचारकांना प्रोत्साहन देण्याकरता त्यांच्याशी बोलण्यात पुढाकार घ्यावा. याकरता, त्यांच्यासोबत अनुभवी प्रचारकांनी कार्य करण्याचीही व्यवस्था केली जाऊ शकते.
३ राज्य वार्ता क्र. ३७ या पत्रिकेचा साठा प्रत्येक मंडळीच्या प्रमुख भाषेत पाठवला जात आहे. प्रत्येक प्रचारकाला व पायनियरांना कमीतकमी ५० प्रती मिळतील. अद्याप प्रचारक न बनलेल्या आस्थेवाईक व्यक्तींना त्यांच्या कुटुंबियांना व मित्रांना देण्याकरता प्रत्येकी ५ प्रती दिल्या जाऊ शकतात. आपण किती प्रती दिल्या, याची सर्वांनी नोंद ठेवावी आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे सेवा अहवाल देताना मागच्या बाजूला तो आकडा लिहावा. मंडळीचे सचिव, सर्व प्रचारकांनी मिळून एकूण किती प्रती दिल्या याची संख्या प्रत्येक महिन्याच्या शेवटी शाखा दफ्तराला कळवतील. मोहीम संपल्यानंतर राज्य वार्तेच्या उर्वरीत प्रती घरोघरच्या अथवा इतर प्रकारच्या सेवाकार्यात उपयोगात आणल्या जाऊ शकतात.
४ काय म्हणावे?: ही पत्रिका देताना, तुमची प्रस्तावना अगदी संक्षिप्त असावी, जेणेकरून या संदेशाचे जास्तीत जास्त प्रमाणात वितरण केले जाऊ शकेल. तुम्ही असे म्हणू शकता: “मी या महत्त्वपूर्ण संदेशाच्या जगव्याप्त वितरणात सहभागी आहे. ही एकप्रकारची समाजसेवा आहे. ही मोफत पत्रिका तुमच्याकरता आहे. कृपया वाचून पाहा.” पत्रिकेतला संदेश जोरदार आहे, तेव्हा लोकांशी बोलताना विचारपूर्वक बोला. कोणाशी वाद घालण्याचे आवर्जून टाळा. घरोघर जाताना साक्षकार्याची बॅग सोबत न नेणेच जास्त चांगले राहील. जे कोणी आस्था व्यक्त करतात त्यांच्याविषयी माहिती नोंदून घेण्यास विसरू नका.
५ क्षेत्र कसे पूर्ण करावे?: राज्य वार्ता ही पत्रिका रस्त्यावरील साक्षकार्यात वितरित करण्याऐवजी, ती घरोघरच्या कार्यात व व्यापार क्षेत्रात देण्याचा अधिक प्रयत्न करावा. क्षेत्रातल्या ज्या भागांत सहसा समस्या निर्माण होतात किंवा जिथे लोक विरोध करतात असे भाग टाळावेत. घरी न भेटलेल्या लोकांची नोंद ठेवावी आणि आठवड्याच्या दुसऱ्या एखाद्या दिवशी किंवा वेळी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करावा. सोमवार, नोव्हेंबर ६ पासून, घरी न भेटणाऱ्या लोकांच्या दाराच्या कडीला पत्रिकेची एक प्रत अडकवून ठेवली जाऊ शकते. पण जर मोहिमेच्या निर्धारित काळात मंडळीचे क्षेत्र पूर्ण होणार नसेल तर मोहिमेच्या सुरुवातीपासूनच घरी न भेटणाऱ्यांच्या दाराच्या कडीला राज्य वार्ता पत्रिकेची प्रत अडकवून ठेवण्याचा निर्णय मंडळीचे वडील घेऊ शकतात.
६ ‘मोठ्या बाबेलचा’ नाश वेगाने जवळ येत आहे. तिचा पूर्ण नाश होण्याआधी लोकांनी तिच्यातून बाहेर पडले पाहिजे. (प्रक. १४:८; १८:८) धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या सर्व दुष्ट कृत्यांचा लवकरच अंत होणार आहे हे लोकांना सांगण्याकरता या जगव्याप्त मोहिमेत पुरेपूर सहभाग घेण्याची आतापासूनच योजना आखा!