राज्य सभागृह बांधकाम —पवित्र सेवेचा महत्त्वपूर्ण पैलू
१. किती राज्य सभागृहांचे बांधकाम साध्य करण्यात आले आहे, तरीपण आणखी किती सभागृहांची नितांत गरज आहे?
१ गेल्या वर्षी भारत शाखेच्या क्षेत्रात १९ राज्य सभागृहांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या कामात ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपण खूप मोठे काम पार पाडले असले तरी, राज्य सभागृहांच्या बांधकामाच्या बाबतीत आणखी पुष्कळ काम बाकी आहे. आपल्याला अजूनही १७५ आणखी राज्य सभागृहांची निकडीची गरज आहे. यहोवा देवाच्या या पवित्र सेवेच्या महत्त्वपूर्ण पैलूला आपण हातभार कसा लावू शकतो?—प्रकटी. ७:१५.
२. राज्य सभागृहाच्या बांधकामाला आपण थेट हातभार कसा लावू शकतो?
२ तयारी दाखवा: तुम्ही जर बाप्तिस्मा घेतलेले प्रचारक असाल तर आम्ही तुम्हाला राज्य सभागृह बांधकाम विभागाबरोबर काम करण्याचे आमंत्रण देत आहोत. यासाठी तुम्हाला राज्य सभागृह बांधकाम स्वयंसेवक कार्यक्रम नावाचा फॉर्म भरावा लागेल. (स्तो. ११०:३) जे कोणी स्वयंसेवक म्हणून सेवा करू इच्छितात त्यांनी मनापासून तयारी दाखवली पाहिजे आणि सहकार्याची प्रवृत्ती दाखवली पाहिजे. (स्तो. १३३:१) तुमच्याजवळ बांधकामाच्या बाबतीत काही कौशल्ये नसली तरीसुद्धा तुम्ही एखाद्या बांधकाम प्रकल्पाला यशस्वी बनण्यासाठी मोलाचा हातभार लावू शकता. सध्या तरी आम्हाला, प्रशिक्षित बांधवांची गरज आहे जे बांधकामावर देखरेखीचे काम तसेच विविध परवाने मिळण्यास साहाय्य करू शकतील. तुम्हाला प्रशिक्षणही दिले जाईल ज्यामुळे भविष्यात तुमचा अधिक उपयोग करून घेतला जाईल.
३. या व्यवस्थेसाठी आपण आणखी कोणकोणत्या मार्गांनी हातभार लावू शकतो?
३ तुम्ही स्वतः जर स्वयंसेवक म्हणून सेवा करू शकत नसाल तर जे करू शकतात अशांना तुम्ही उत्तेजन देऊ शकता. राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पासाठी जे बाहेर गेले आहेत अशा बंधू अथवा भगिनीच्या मंडळीतील नेमणुका तुम्ही पूर्ण करू शकता. योग्यप्रकारे आयोजन केल्याने मंडळीतील वडील जन, मंडळीतील कोणी, राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पावर काम करत असेल तर त्यांच्या नेमणुका इतरजण पार पाडतील याची खात्री करू शकतात. आपण जेव्हा राज्याच्या वृद्धीसाठी असे एकचित्ताने कार्य करतो तेव्हा यहोवा संतुष्ट होतो यात काही शंका नाही.—इब्री १३:१६.
४. राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पांमध्ये भाग घेणाऱ्यांना आपण उत्तेजन कसे देऊ शकतो?
४ उत्तेजन द्या: उपासना स्थळांच्या बांधकामात पुष्कळ काम आणि कष्ट गोवलेले आहे. तेव्हा, बांधकाम प्रकल्पांवर काम करण्यासाठी ज्यांना बोलवण्यात येईल ते काहीवेळा आपल्या मंडळीपासून दूर असतील, हे समजण्याजोगे आहे. या ‘[अतिमहत्त्वपूर्ण] कामासाठी’ जे त्याग करतात अशा बांधकाम स्वयंसेवकांची प्रशंसा करण्यात व त्यांना उत्तेजन देण्यात आपण तत्पर असावे.—प्रे. कृत्ये ६:३; रोम. १४:१९.
५. बांधकाम स्वयंसेवकांनी कशाप्रकारे संतुलन राखले पाहिजे?
५ संतुलन राखा: देवाच्या राज्याचा प्रचार करणे हे आपल्या ईश्वरशासित कार्यांतील सर्वात महत्त्वपूर्ण कार्य आहे. (मार्क १३:१०) हे मनात ठेवून आम्ही बांधकाम प्रकल्पांचे आयोजन करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून स्वयंसेवकांना आपल्या मंडळीपासून विनाकारण दूर राहावे लागणार नाही. तसेच, बांधकाम स्वयंसेवकांनी, त्यांच्यावर आलेल्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्यात संतुलन राखले पाहिजे. त्यांच्या मंडळीतील नेमणुका दुसरा कोणीतरी करीत आहे याची त्यांनी निघण्याआधी व्यवस्था केली पाहिजे.
६. मंडळीतील सर्वजण खऱ्या उपासनेच्या वृद्धीसाठी एकमेकांना सहकार्य करतात तेव्हा काय साध्य होते?
६ मंडळीतील सदस्य “आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करुन” घेण्याकरता ऐक्याने कार्य करतात, असे प्रेषित पौलाने म्हटले. (इफिस. ४:१६) यहोवा देव आणि खरी उपासना यांबद्दलचे प्रेम आपल्याला सुवार्तेच्या प्रचारकार्याला आणि राज्य सभागृह बांधकामाला हातभार लावण्यास प्रवृत्त करते.