जुळवून घेण्याद्वारे—वैयक्तिक आस्था असल्याचे दाखवा
१ प्रेषित पौलाने आपल्या श्रोत्यांच्या पार्श्वभूमीनुसार व विचारसरणीनुसार सुवार्ता सादर करण्याची पद्धत जुळवून घेण्याच्या बाबतीत, आपल्या सर्वांकरता एक उत्तम आदर्श ठेवला आहे. (१ करिंथ. ९:१९-२३) आपणही असेच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सहसा, आपण आधीपासूनच थोडा विचार करुन आमची राज्य सेवा यात नमुनेदाखल दिलेल्या सादरता आपल्या क्षेत्रातील लोकांच्या गरजांनुसार जुळवून घेऊ शकतो. एखाद्या घराकडे जात असताना आपल्याला अशा काही गोष्टी दिसतील ज्यांची घरमालकाला आवड आहे. सुवार्ता सादर करताना आपण त्या गोष्टींचा उल्लेख करू शकतो. पण आपल्या सेवाकार्यात आपण आणखी एका मार्गाने सादरता जुळवून घेऊ शकतो.
२ घरमालकाच्या अभिप्रायात भर घाला: सुवार्ता सांगताना आपण सहसा घरमालकाला एखादा प्रश्न विचारतो आणि त्याचा अभिप्राय मागतो. त्याने दिलेल्या अभिप्रायाबद्दल आपली कशी मनोवृत्ती असते? अभिप्राय व्यक्त केल्याबद्दल फक्त नावापुरते त्याचे आभार मानून तुम्ही पूर्वतयारी केल्यानुसार पुढे बोलत राहता का? की तुम्ही पुढे जे बोलता त्यावरून तुम्ही घरमालकाने व्यक्त केलेल्या अभिप्रायाची दखल घेतल्याचे दिसून येते? जर त्याच्या बोलण्याकडे तुम्ही मनापासून लक्ष दिले असेल, तर तुम्ही विचारशीलपणे आणखी प्रश्न विचारून त्याच्या मनात खरोखर काय चालले आहे हे समजून घेऊ शकाल. (नीति. २०:५) अशारितीने, त्या विशिष्ट घरमालकाला ज्या गोष्टींबद्दल आस्था वाटते त्यांकडे थेट लक्ष देऊन तुम्ही राज्याचा संदेश सादर करू शकता.
३ याचा अर्थ आहे की आपण घरून ज्या विषयावर चर्चा करायची असे ठरवून आलो होतो, त्याशिवाय इतर विषयांवरही बोलण्यास आपण तयार असले पाहिजे. समजा, आपण बातम्यांमध्ये आलेल्या एखाद्या घटनेबद्दल सांगून सुरुवात केली, पण घरमालकाने मात्र त्याच्या वस्तीत घडलेल्या एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या वैयक्तिक समस्येचा उल्लेख केला; अशावेळी, घरमालकाच्या गरजांनुसार त्याला मदत करण्याची आपल्याला मनापासून इच्छा असल्यास, त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयावर आपण बायबलमधून चर्चा करण्यास आपोआपच प्रवृत्त होऊ.—फिलिप्पै. २:४.
४ त्यांच्या गरजांनुसार जुळवून घेणे: घरमालक एखादा प्रश्न विचारतो तेव्हा, लगेच उत्तर देण्यापेक्षा त्या विषयावर आणखी थोडे संशोधन करून नंतर कधीतरी त्या विषयावर चर्चा करणे जास्त उपयुक्त ठरेल. तसेच त्या विषयावर सविस्तर माहिती पुरवणारे एखादे प्रकाशन आपण त्याला देऊ शकतो. असे केल्यामुळे, यहोवाला जाणून घेण्यास इतरांना मदत करण्याची आपल्याला मनापासून इच्छा असल्याचे दिसून येते.—२ करिंथ. २:१७.