नियतकालिक मार्गाच्या साहाय्याने आस्था वाढवा
१. आस्था वाढवण्यासाठी आपण नियतकालिक मार्गाचा उपयोग कसा करू शकतो?
१ सेवेमध्ये आपल्याला भेटणारे अनेक लोक आपले स्वागत करतात आणि आपण दिलेले साहित्य घेतात पण नियमित बायबल अभ्यास करण्यास कचरतात. अशा लोकांची आस्था वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे नियतकालिक मार्ग तयार करणे. तुम्ही जेव्हा त्यांना नियतकालिके देता तेव्हा त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, केव्हा भेट दिली ती तारीख, कोणते नियतकालिक दिले ते, कोणत्या शास्त्रवचनावर चर्चा केली, आणि त्या व्यक्तीची आवड दर्शवणारी कोणती गोष्ट तुम्ही पाहिली, हे सर्व टिपून घ्या. नियतकालिकाचा नवीन अंक आल्याबरोबर, त्यात, तुम्ही ज्यांच्याकडे नियतकालिक मार्ग तयार केला आहे अशा लोकांना कोणते मुद्दे आवडतील ते पाहा आणि मग जेव्हा तुम्ही त्यांना भेट द्यायला जाता तेव्हा ते मुद्दे त्यांना सांगा. (१ करिंथ. ९:१९-२३) कालांतराने, असे होऊ शकते, की आपल्या नियतकालिकातील एखादा मुद्दा वाचल्यावर त्यांची आवड वाढू शकते आणि ते आपल्याकडून अधिक माहिती जाणू इच्छितील.
२. लोकांनी यहोवाचा शोध आता घेणे अगत्याचे का आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो?
२ आपल्याला हे माहीत आहे, की बहुतेक लोक, स्वतःहूनच आपली मासिके वाचल्यावर यहोवाचे सेवक बनणार नाहीत. पण लोकांनी यहोवाचा शोध आता घेणे अगत्याचे आहे; तर मग त्यांना मदत करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो? (सफ. २:२, ३; प्रकटी. १४:६, ७) दर वेळी जेव्हा आपण त्यांना मासिके द्यायला जातो तेव्हा आपण त्यातून विचारपूर्वक निवडलेले एखादे शास्त्रवचन त्यांना सांगून त्यांची आस्था वाढवू शकतो.
३. (क) केवळ एका शास्त्रवचनाच्या आधारावर करता येईल अशा चर्चांची यादी आपण कशी तयार करू शकतो? (ख) तुमच्या क्षेत्रांतील लोकांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टींची चिंता वाटते?
३ एका शास्त्रवचनावर चर्चा: तुम्ही ज्यांच्याकडे नियतकालिक मार्ग सुरू केला आहे त्यांचा विचार करा. केवळ एखाद्या शास्त्रवचनाच्या आधारावर चर्चा करता येईल अशा बऱ्याच शास्त्रवचनांची यादी, त्या त्या व्यक्तीच्या गरजा लक्षात ठेवून तयार करा. (फिलिप्पै. २:४) जसे की, अलिकडेच घरमालकाच्या कोणा प्रिय व्यक्तिचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही मृतांच्या स्थितीविषयी बायबल काय म्हणते आणि पुनरुत्थानाची आशा यांविषयी त्यांच्याशी चर्चा करण्याकरता बऱ्याच पुर्नभेटींचा उपयोग करू शकता. केवळ एका शास्त्रवचनाच्या आधारावर करता येईल अशा या चर्चांची तयारी करण्याकरता, युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील “मृत्यू” आणि “पुनरुत्थान” या प्रमुख विषयांखालील माहितीचा उपयोग केला जाऊ शकतो. यानंतर, आजारपण, वृद्धावस्था, मृत्यू हे संबंधित विषय नंतर आपोआप येतीलच. महत्त्वाची गोष्ट ही आहे, की घरमालकाच्या आवडीचा विषय निवडायचा आणि याविषयावर बायबल काय म्हणते ते त्याला क्रमाक्रमाने दाखवायचे.
४. आपण शास्त्रवचनांचा उपयोग करतो तेव्हा ते समजावून सांगणे महत्त्वाचे का आहे, आणि हे आपण कसे करू शकतो?
४ समजावून सांगा: सोप्या आणि संक्षिप्त चर्चाच नेहमी चांगल्या असल्या तरी, निवडलेले शास्त्रवचन केवळ वाचणे पुरेसे नाही. सैतानाने, सुवार्तेच्या बाबतीत लोकांची मने आंधळी केली आहेत. (२ करिंथ. ४:३, ४) ज्यांच्याकडे बायबल आहे अशा लोकांनाही ते समजावून सांगण्यास मदत केली पाहिजे. (प्रे. कृत्ये ८:३०, ३१) त्यामुळे, ईश्वरशासित सेवा प्रशालेत तुम्ही ज्या प्रकारे भाषण तयार करता त्याप्रमाणे, तुम्ही जे शास्त्रवचन घरमालकाला दाखवता त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा ते समजावून सांगण्यासाठी वेळ काढा. (प्रे. कृत्ये १७:३) घरमालकाला देवाच्या वचनातील सल्ला आपल्या जीवनात कसा लागू करायचा ते समजले की नाही, याची खात्री करा.
५. नियतकालिक मार्गाचे रूपांतर बायबल अभ्यासात कसे होऊ शकेल?
५ घरमालक जे शिकत आहे ते त्याला आवडत आहे असे तुम्हाला दिसल्यास, प्रत्येक भेटीत, तुमच्या चर्चेत हळूहळू बायबलमधील दोन किंवा तीन वचनांचा समावेश करा. अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक सादर करण्याची संधी पाहा. अशाप्रकारे, कालांतराने नियतकालिक मार्गाचे रूपांतर बायबल अभ्यासात होऊ शकेल.