मॅगझीन रूटच्या माध्यमाने “राज्याचे बी पेरणे”
१ यहोवाचे गुणगान करा (इंग्रजी) गीत पुस्तकातील गीत क्रमांक १३३ चे शीर्षक आहे: “राज्याचे बी पेरणे.” हे गीत, येशूने दिलेल्या दाखल्यावर आधारित आहे; या दाखल्यात शिष्य बनविण्याच्या कामाची तुलना बी पेरण्याशी केली आहे. (मत्त. १३:४-८, १९-२३) सदर गीताचे बोल पुढीलप्रमाणे आहेत: “चांगल्या जमिनीवर किती बी पडतात/हे सहसा तुमच्यावरच अवलंबून असू शकते.” मग आपण आपल्या सेवेत अधिक यशस्वी कसे होऊ शकतो? मॅगझीन रूट सुरू करून, तो चालू ठेवण्याद्वारे.
२. मॅगझीन रूट सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत: (१) दर दोन आठवड्यांनंतर नियमित भेटी दिल्यामुळे मासिके घेणाऱ्यांसोबत तुमची ओळख वाढते. (२) टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यातल्या माहितीमुळे लोकांचे जीवन वाचू शकते, आणि तुमच्याकडून मासिके घेणाऱ्यांना तुम्ही अशी ही माहिती नियमितपणे देत असता. (३) तुमच्या संभाषणांद्वारे तुम्ही हळूहळू त्यांच्या मनात बायबल सत्य शिकण्याची इच्छा निर्माण करू शकता; यामुळे कदाचित येथे एक बायबल अभ्यासही सुरू होऊ शकतो.—१ पेत्र २:२, ३.
३ मॅगझीन रूट कसा सुरू करावा: एखाद्या व्यक्तीला आपली मासिके आवडली आहेत असे दिसून येते तेव्हा त्यांना सांगा की या मासिकांच्या प्रत्येकच अंकात अतिशय चांगले लेख असतात, आणि दर दोन आठवड्यांनी तुम्ही हे अंक त्यांच्या घरी आणून द्याल असेही त्यांना सांगा. भेट घेतल्यानंतर व्यक्तीचा नावपत्ता, कोणत्या तारखेला त्यांना भेट दिली, कोणते अंक दिले, कोणता लेख त्यांना दाखवला व त्यांना कोणते विषय खास आवडले हे सर्व लिहून घ्या.
४ सुरवाती-सुरवातीला तुम्ही केवळ काही मोजक्या लोकांचा मॅगझीन रूटमध्ये समावेश करू शकता. मग हळूहळू, जे लोक तुमच्याकडून मासिके घेतात अशांनाही सामील करून तुम्हाला हा मॅगझीन रूट वाढवण्याचा प्रयत्न करता येईल. मॅगझीन रूटमध्ये लोक वाढू लागल्यावर या सर्वांकडे जाणे तुम्हाला सोयीस्कर पडावे म्हणून ते राहतात त्या परिसरांनुसार त्यांची विभागणी करा. तुम्ही कोणत्या तारखेला मासिके द्यायला गेला आणि कोणते अंक दिले याची अचूक नोंद ठेवा. तसेच तुम्ही त्यांच्याशी कोणत्या विषयांवर बोलला आणि पुढल्या भेटीत सत्याविषयी त्यांची उत्सुकता तुम्हाला कशी वाढवता येईल याबद्दलही काही मुद्दे लिहून ठेवा.
५ दुकानदारांना आणि व्यावसायिकांनाही सामील करा: अनुभवावरून असे दिसून आले आहे की बहुतेकदा दुकानदार, व्यापारी व इतर व्यावसायिक लोक आपली मासिके नियमितपणे घ्यायला तयार होतात. एका मंडळीतल्या वडिलांच्या मॅगझीन रूटमध्ये तर शहराचे महापौर देखील होते. दुसऱ्या एका प्रचारकाला एका ८० वर्षांच्या बिल्डिंग सप्लाय कंपनीच्या मालकासोबत अभ्यास सुरू करता आला, पण तब्बल दहा वर्षांपर्यंत त्याला नियमित मासिके देत राहिल्यानंतर!
६ एक पायनियर बहीण एका दुकानात गेली असता तिला एक जोडपे तेथे भेटले; पण ते काही तिच्याशी इतके चांगले बोलले नाहीत. तरी या जोडप्याने मासिके घेतली असल्यामुळे बहिणीने त्यांनाही दर महिन्याची मासिके नेऊन देण्याचे ठरवले. मध्येच तिला या जोडप्याकडे जाणे नकोसे वाटू लागले कारण ते तिच्याशी धड बोलायचेही नाहीत आणि प्रश्न विचारले तरी फारसे बोलत नसत. पण या बहिणीने याविषयी यहोवाकडे मदत मागितली; काही काळानंतर या दांपत्याने तिच्याकडून अंनतकाल जगू शकाल पुस्तक घेतले. पुस्तक वाचल्यानंतर त्या स्त्रीला इतका आनंद झाला, की ती म्हणाली: “यातला शब्द न् शब्द खरा आहे!” मग बायबल अभ्यास सुरू झाला आणि नंतर या दांपत्याने बाप्तिस्माही घेतला. निराश होण्याऐवजी ती पायनियर बहीण या दांपत्याकडे जात राहिली, म्हणूनच हा चांगला परिणाम घडून आला.
७ पुनर्भेटींची तयारी: नवीन नियतकालिक मिळताच त्यातला हरएक लेख वाचून काढा. तुमच्या मॅगझीन रूटमध्ये असलेल्या कोणत्या व्यक्तीला कोणता मुद्दा आवडेल हे लक्षात ठेवून मासिक वाचा. मग तुम्ही पुन्हा भेट देता तेव्हा असे म्हणू शकता: “हा लेख वाचताना मला तुमची आठवण झाली होती; मला वाटतं तुम्हाला हा लेख आवडेल.” मॅगझीन रूट सुरू करण्यासाठी वयाचे बंधन नाही. लहान मुले देखील असे म्हणून मासिक देऊ शकतात: “तुम्हाला पुन्हा भेटून मला आनंद झाला. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांचे तुमचे नवीन अंक मी आणले आहेत. . . . हा लेख तुम्हाला नक्कीच आवडेल.”
८ “आमच्या पुढील अंकात” ही पेटी दाखवून तुम्ही पुढच्या मासिकात येणाऱ्या लेखांविषयी उत्सुकता वाढवू शकता. एखाद्या विशिष्ट विषयावर जेव्हा सलग दोन तीन अंकात माहिती येते, अशावेळेस मासिक घेणाऱ्यांना प्रत्येक अंक न चुकता वाचण्याची आठवण करून द्या. आणि विसरू नका, मॅगझीन रूटच्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही जेव्हा जेव्हा मासिके द्यायला जाता त्या प्रत्येक वेळी एक पुनर्भेट मोजता येते. आणि सर्वात मुख्य म्हणजे, गृह बायबल अभ्यास सुरू करणे हा आपला उद्देश असला पाहिजे.
९ एकही अंक देण्याचे चुकवू नका: मासिके देण्यासाठी केव्हा जायचे हे तुमचे तुम्ही ठरवू शकता; आठवड्यातील एखाद्या दिवशी सकाळी, दुपारी थोडे उशिरा किंवा संध्याकाळी थोडे लवकर निघून, किंवा मग शनिवार-रविवारी घरोघरचे कार्य केल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. आजारी असल्यामुळे किंवा सुट्टीला गेल्यामुळे स्वतः मासिके द्यायला जाणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या किंवा मंडळीतल्या एखाद्या प्रचारकाला जायला सांगू शकता, म्हणजे लोकांना त्यांची मासिके बरोबर वेळच्या वेळी मिळतील.
१० तुम्ही आपल्या मॅगझीन रूटच्या सर्व लोकांना वेळच्या वेळी टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिके नेऊन देता तेव्हा एका अर्थाने तुम्ही राज्याचे बी पेरत असता. मग या लोकांना तुम्ही बायबलमध्ये असणारे सत्य शिकवता तेव्हा कदाचित ते राज्याचे वचन ऐकून समजून घेतील आणि कालांतराने ते देखील राज्याचे फळ उत्पन्न करण्यात तुमच्यासोबत सहभागी होऊ शकतील.—मत्त. १३:८, २३.