नियतकालिक मार्ग—बायबल अभ्यास सुरू करण्यास उपयुक्त
१. यहोवाची संघटना कित्येक वर्षांपासून प्रचारकांना नियतकालिक मार्ग तयार करण्याचे उत्तेजन का देत आली आहे?
१ पुष्कळ लोकांना आपल्याबरोबर बायबल अभ्यास करण्याची इच्छा नसते पण आपली नियतकालिके वाचायला त्यांना आवडतात. त्यामुळे, यहोवाची संघटना कित्येक वर्षांपासून प्रचारकांना नियतकालिक मार्ग तयार करण्याचे उत्तेजन देत आली आहे. लोक आपली नियतकालिके जितकी नियमितपणे वाचतील तितकी त्यांच्या मनात देवाच्या वचनाबद्दलची गोडी निर्माण होईल. (१ पेत्र २:२) आणि नियतकालिके वाचता-वाचता एखादा मुद्दा किंवा एखादा लेख त्यांच्या हृदयाला भिडेल व ते बायबल अभ्यास करण्यास राजी होतील.
२. नियतकालिक मार्गात आपण ज्यांना नियतकालिक देतो त्यांची आवड आपण कशी वाढवू शकतो?
२ सत्याच्या बियांना “पाणी” घाला: नियतकालिके हातावर नुसतीच ठेवून निघून जाण्याऐवजी त्यांच्याबरोबर संवाद सुरू करून मैत्री करायचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला त्यांची परिस्थिती, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे धार्मिक विश्वास समजतील. आणि त्यानुसार मग तुम्ही समंजसपणे त्यांच्याशी बोलू शकाल. (नीति. १६:२३) प्रत्येक भेटीची तयारी करा. शक्य असेल तर, नियतकालिकातील एखादा मुद्दा व त्याजशी संबंधित असलेले शास्त्रवचन दाखवून, त्यांच्या मनात रोवलेल्या सत्याच्या बियांना पाणी घाला. (१ करिंथ. ३:६) भेटायला जात असलेल्या दिवसाची तारीख, दिलेल्या प्रकाशनाची, चर्चा केलेल्या विषयांची व शास्त्रवचनांची नोंद करून ठेवा.
३. नियतकालिक मार्ग तयार केलेल्यांकडे आपण किती लवकर पुन्हा भेट देऊ शकतो?
३ किती लवकर पुन्हा भेट देऊ शकतो? नवीन नियतकालिके मिळाल्याबरोबर आपण नियतकालिक मार्ग तयार केलेल्यांकडे जाऊ शकतो. पण, आपल्याला जमत असेल आणि समोरच्या व्यक्तीला आवड असेल तर कदाचित आपण अनेकदाही जाऊ शकतो. जसे की, नियतकालिके दिल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांनंतर आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणू शकतो: “मी तुम्हाला दिलेल्या नियतकालिकातील काही मुद्दे दाखवण्यासाठी उडती भेट द्यायला आलो आहे.” यामुळे त्या व्यक्तीला तो लेख वाचावासा वाटू शकतो. त्याने जर तो लेख आधीच वाचून काढला असेल तर आपण त्याला त्याचे मत विचारून थोडक्यात चर्चा करू शकतो. किंवा मग त्याला आपली सर्वच प्रकाशने वाचायला आवडत असतील तर आपण पुन्हा त्याच्याकडे जाऊन, त्या महिन्यात आपण सादर करत असलेली पत्रिका, माहितीपत्रक किंवा पुस्तक देऊ शकतो.
४. नियतकालिक मार्गात आपण ज्यांना नियतकालिके देतो ते बायबल अभ्यास करण्यास तयार आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी आपण वेळोवेळी काय करू शकतो?
४ नियतकालिक मार्गात तुम्ही ज्याला नियतकालिके देता त्याने तुम्हाला बायबल अभ्यासाची विनंती करेपर्यंत थांबून राहू नका. तर तुम्ही स्वतः त्याला बायबल अभ्यासाविषयी सांगा. पूर्वी त्याने बायबल अभ्यास करण्यास नकार दिला असला तरी, आपण त्याला अधूनमधून टेहळणी बुरूजमधील “बायबल प्रश्नांची उत्तरे” हा लेख दाखवू शकतो आणि तो आपल्याबरोबर चर्चा करण्यास उत्सुक आहे का ते पाहू शकतो. कदाचित आपण त्याच्या घराच्या दारातच उभे राहून अभ्यास सुरू करू शकतो. आणि अभ्यास सुरू करता येत नसला तरी, त्याची आवड वाढवण्यासाठी आपण त्याला नियतकालिके देत राहू शकतो.