२००३ ‘देवाचे गौरव करा’ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
१ आपला विश्वासू संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवाने अशी आज्ञा दिली: “माझ्या लोकांनो, मजकडे लक्ष द्या; माझ्या प्रजे मजकडे कान दे.” (यश. ५१:४) या अंतकाळातील वाढत्या कठीण परिस्थितीत, पूर्वीपेक्षा आता यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे जास्त महत्त्वाचे आहे, हे आपल्याला पटत नाही का? यहोवाकडे “लक्ष” देण्याचा एक मार्ग म्हणजे, उपासनेसाठी एकत्र येण्यासंबंधी त्याने दिलेल्या आज्ञेचे पालन करणे. असे करण्यासाठी वार्षिक अधिवेशनांमुळे आपल्याला मिळत असलेल्या खास संधीची आपण किती आतुरतेने वाट पाहतो! यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने २००३ सालादरम्यान, भारत शाखेच्या क्षेत्रात पुष्कळ प्रांतीय अधिवेशने भरवण्याची पुन्हा एकदा आयोजना केली आहे.
२ गेल्या वर्षी, भारतात झालेल्या “आवेशी राज्य उद्घोषक” या आध्यात्मिकरीत्या तजेला देणाऱ्या प्रांतीय अधिवेशनांना ३३,३७२ जण उपस्थित होते. या नऊ अधिवेशनांच्या संबंधाने ८०७ जणांना पाण्याने बाप्तिस्मा घेण्याद्वारे आपले समर्पण जाहीर करताना पाहून आपल्याला किती आनंद झाला. या अधिवेशनांमध्ये केलेल्या व्यवस्था पाहून अधिवेशनाला आलेले उमेदवार भारावून गेले. चार अधिवेशन शहरांतील (कोची, चेन्नई, मुंबई आणि सिकंदराबाद) बंधूभगिनींनी, संपूर्ण देशांतून आलेल्या हजारो उमेदवारांचे आतिथ्य केले; यांतील पुष्कळांनी आपल्या जीवनात पहिल्यांदा इतके मोठे अधिवेशन पाहिले होते. खरेच, सर्व उमेदवारांनी आनंदपूर्ण सहवासाचा आणि आध्यात्मिक पौष्टिक भोजनाचा स्वाद घेतला. अशाप्रकारचे उत्तेजन मिळाल्यावर आपल्याला, आपले प्रेम व उत्तम कार्ये आणखी वाढवण्याची चालना मिळत नाही का? यात काही शंका नाही, की आजच्या अनुग्रहाच्या काळात होता होईल तितक्या लोकांना देवाचे गौरव करण्यास मदत करण्यासाठी आपण आणखी सज्ज व प्रेरित झालो आहोत.—२ करिंथ. ६:१, २.
३ २००३ सालच्या प्रांतीय अधिवेशनांची वाट पाहत असताना आपण, आपल्या मौल्यवान बंधूवर्गाबरोबर सहवास करण्याच्या आणि यहोवाने आपल्याला दिलेल्या ऐक्याबद्दल त्याचे आभार मानण्याच्या नवनवीन संधींची अपेक्षा करू. आपल्या अधिवेशनांसाठी केल्या जाणाऱ्या व्यवस्थांतून होता होईल तितका फायदा आपल्याला मिळवायचा आहे तर आपण काय करू शकतो?
४ दररोज उपस्थित राहा: विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी पुरवल्या जाणाऱ्या शिक्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याकरता आपण संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (मत्त. २४:४५) अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहता यावे म्हणून तुम्हाला तुमच्या मालकाकडे सुटी मागावी लागेल का? भिंतींची पुनर्बांधणी करण्यासाठी जेरुसलेमला जाण्याची अर्तहशश्त राजाची परवानगी मागण्याआधी नहेम्याने ‘स्वर्गाच्या देवाला प्रार्थना’ केली. (नहे. २:४) अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्याकरता सुटीची परवानगी काढण्यासाठी तुमच्या मालकांबरोबर बोलण्यास धैर्य मिळावे म्हणून तुम्ही देखील प्रार्थना केली पाहिजे. पण तुमचा मालक तुम्हाला सुटी देण्यास कुचराई करत असेल तर? आपल्या अधिवेशनांमध्ये मिळणारे प्रशिक्षण आपल्याला इमानदार, कामासू व भरवसालायक कामगार होण्यास मदत करते, हे समजावून सांगितल्याने कदाचित तो तुम्हाला सुटी द्यायला तयार होईल. शिवाय, आपल्या कुटुंबातील सदस्य सत्यात नसतील तर आपल्या अधिवेशनांबद्दलच्या योजनांविषयी त्यांना होता होईल तितके लवकर सांगणे समंजसपणाचे ठरेल.
५ रुमींगची नवीन व्यवस्था: एका मोठ्या अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या शेकडो बांधवांच्या राहण्याची व्यवस्था करणे ही काही तोंडची गोष्ट नाही. परंतु आता पुष्कळ जण हॉटेलमध्ये किंवा डॉर्मेटरींमध्ये राहणे पसंत करतात. अधिवेशन रूमींग डिपार्टमेंटने, बांधवांची राहण्याची सोय (आणि काही बाबतीत तर कमी दरात) हॉटेलांमध्ये केली होती तरीपण आपल्या पुष्कळ बंधूभगिनींनी त्यांच्या राहण्याची सोय स्वतःच करणे पसंत केले.
६ रूम हवी असलेल्या सर्वांना मदत करण्यासाठी व रूमींगची एकंदर व्यवस्था आणखी सोपी करण्यासाठी शाखा दफ्तराने, “देवाचे गौरव करा” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या बंधूभगिनींसाठी या वर्षी रूमींगची नवीन व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. आम्ही असे ठरवले आहे, की रूमींग डिपार्टमेंट हॉटेलचे आगाऊ बुकींग करणार नाही; त्याऐवजी, हॉटेलांची नावे व त्यांचे भाडे यांची एक यादी पाठवली जाईल जेणेकरून, जे कोणी आपल्या राहण्याची व्यवस्था स्वतः करू इच्छितात ते थेट हॉटेलशी संपर्क साधून पुढच्या सर्व सोयी स्वतःच करतील. परंतु जे डॉर्मेटरींमध्ये राहणे पसंत करतात त्यांच्यासाठी हे लागू होत नाही. ते पूर्वीसारखेच अधिवेशन रूमींग डिपार्टमेंटद्वारे आपले बुकींग करू शकतात.
७. डॉर्मेटरी: बहुतेक वेळा, मंडळ्यांना याबाबतची माहिती, पहिल्या हॉटेलची यादी पाठवल्यानंतर एक महिन्यानंतर पाठवण्यात येईल. अशाप्रकारच्या राहण्याची सोय हवी असणाऱ्यांनी, अधिवेशन रूमींग डिपार्टमेंटने मंडळ्यांना पाठवलेल्या यादीतील सूचना पाळाव्यात.
८ विशेष गरज: विशेष गरज असलेल्यांची काळजी घेण्याची व्यवस्था, ते ज्या मंडळीचे असतात त्या मंडळीद्वारेच सहसा आतापर्यंत करण्यात आली आहे. अशा लोकांबद्दलची माहिती असलेल्या वडिलांनी व इतरांनी प्रेमळपणे अशांना मदत करण्याची तयारी दाखवली आहे आणि हे खरोखरच प्रशंसनीय आहे. ते अशांना आपल्यासोबत नेतात-आणतात; यामध्ये, पूर्ण-वेळेच्या सेवेत असलेले, वयोवृद्ध, आजारी किंवा आवश्यकता असलेले यांचा समावेश होतो. इतर मार्गांनी देखील त्यांनी अशा गरजू लोकांची काळजी घेतली आहे, जसे की व्यवस्था करण्यासाठी त्यांना मदत केली आहे, गरज भासल्यास व आवश्यकता होती तेव्हा त्यांना आर्थिक मदत दिली आहे. (याको. २:१५-१७; १ योहा. ३:१८) आमची खात्री आहे की अशाप्रकारची प्रेमळ काळजी पुढेही दाखवली जाईल. (योहा. १३:३५) परंतु, विशेष गरज असलेल्या ज्या बंधूभगिनींना स्वतःची काळजी घेणे जमत नाही किंवा ते ज्या मंडळीत जातात तेथील कोणाला त्यांची काळजी घेणे जमत नाही अशा लोकांच्या राहण्याची सोय करण्याचे काम अधिवेशन रूमींग डिपार्टमेंट करील. असे बंधूभगिनी आपल्या मंडळीतल्या अधिवेशन संचालकांकडून, स्पेशल नीड्स रूम रिक्वेस्ट फॉर्म मागू शकतात व त्याच वेळी आपल्या परिस्थितीविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करू शकतात.
९ ज्यांना विशेष गरज आहे केवळ त्यांनीच या फॉर्मचा उपयोग करावा. त्यांनी तो फॉर्म भरावा आणि अधिवेशन संचालकांना द्यावा जेणेकरून ते, तो फॉर्म पूर्णपणे, अचूकरीत्या भरला आहे की नाही हे पाहतील आणि अशा लोकांच्या परिस्थितीचा देखील आढावा घेतील. संचालकांनी हा फॉर्म अधिवेशन रूमींग डिपार्टमेंटला पाठवला असला तरीसुद्धा, रूमींग डिपार्टमेंट थेट फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीला/व्यक्तींना त्यांच्या राहण्याच्या सोयीबद्दलची माहिती पुरवतील. विशेष गरज असलेल्या बंधूभगिनींच्या परिस्थितीनुसार, त्यांची राहण्याची सोय खासगी घरांमध्ये व हॉटेलमध्ये करण्यात येईल. कृपया एक गोष्ट लक्षात ठेवावी, की ज्यांच्याजवळ खरोखरच कमी पैसे आहेत अशा लोकांसाठीच सहसा खासगी घरांत राहण्याची सोय केली जाते कारण, त्यांची अशाप्रकारची सोय न केल्यास त्यांच्यावर खरोखरच खूप आर्थिक बोजा पडू शकतो. फुकट किंवा विनाखर्च जसे की सुटीसाठी वगैरेसाठी राहण्याकरता रूम हवी असलेल्यांसाठी ही तरतूद नाही. शिवाय, खासगी घरांत केली जाणारी राहण्याची सोय ही केवळ अधिवेशनाच्या काळापुरतीच असते. अधिवेशनाच्या भागात प्रेक्षणीय स्थळे पाहता यावेत म्हणून बंधूभगिनींच्या घरी अधिवेशनाच्या आधी किंवा नंतर जादा दिवस राहण्याची अपेक्षा करून आपल्या बंधूभगिनींच्या आदरातिथ्याचा गैरफायदा घेणे उचित ठरणार नाही.
१० दुसऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहणे: तुम्हाला ज्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी नेमण्यात आले आहे त्या अधिवेशनाला तुम्हाला तुमच्या परिस्थितीमुळे उपस्थित राहता येत नसल्यामुळे तुम्ही दुसऱ्या एखाद्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असाल व तुम्हाला हॉटेलमध्ये रूम बुक करायची असेल तर कृपया तुमच्या मंडळीतील सचिवांना भेटा. ते तुम्हाला रूम बुकींग करण्याचे पत्ते देतील. उचित पत्त्यावर आपले बुकींग पाठवा आणि सोबत तुमचा पत्ता लिहिलेले व तिकीट लावलेले एक रिकामे पाकीटही पाठवा. त्या शहरातील रूमींग डिपार्टमेंट तुम्हाला हॉटेलांची व त्यांच्या दरांची एक यादी पाठवतील.
११ आपण जगाला जणू तमाशा आहोत: लोकांना, यहोवाचे साक्षीदार आणि जगातील लोकांमध्ये फरक दिसतो का? अर्थात! परंतु, काही वेळा आपल्याला, हॉटेल मालकांकडून अशा तक्रारी ऐकायला मिळतात, की उमेदवारांना त्यांच्या केलेल्या बुकींगची कदर नव्हती किंवा काही उमेदवारांनी, त्यांना सांगितलेल्या दरांत ज्या सेवांचा समावेश नव्हता त्या सेवा आपल्याला मिळाव्यात अशी मागणी केली. काही हॉटेल मालकांनी तर असेही बोलून दाखवले, की पुढच्या वेळेस अधिवेशनांच्या वेळी त्यांना यहोवाचे साक्षीदार नकोत. यावरून हेच दिसून येते, की आपल्यातील सर्वांना याची जाणीव नाही, की आपण आपला देव यहोवा याच्या नावाचे प्रतिनिधीत्व करत आहोत आणि आपल्याकडे लोकांचे बारकाईने लक्ष असते.
१२ परंतु, अशी तुरळक उदाहरणे वगळल्यास, बहुतेक हॉटेल मालकांनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दलचे चांगले मत दिले. एका शहरातील एका मॅनेजरने म्हटले: “अनेक लोकांची अधिवेशने होतात, पण तुम्ही लोक खूपच सहकार्य देणारे व दयाळू आहात.” “मागच्याच आठवडी आमच्या येथे दुसऱ्या एका धार्मिक गटाचे लोक होते. पण त्यांच्यामधला आणि तुमच्यामधला फरक अगदी स्पष्टपणे दिसतो.” “तुमच्या मदतीची आणि सहकार्याची आम्ही नेहमी खात्री बाळगू शकतो.” अशाप्रकारची विधाने आपल्याला हे समजण्यास मदत करत नाहीत का, की ‘वरून येणाऱ्या ज्ञानाचा’ आपल्या व्यक्तिमत्त्वावर किती सकारात्मक प्रभाव पडतो? (याको. ३:१७) आपण ‘जगाला जणू तमाशा’ असल्यामुळे आपल्या आचरणावरून लोकांना आपला देव यहोवा याची प्रतिष्ठा आणि महती दिसून येवो.—१ करिंथ. ४:९.
१३ “जगाचे बाह्य स्वरूप लयास” जात असल्यामुळे अर्थात बदलत असल्यामुळे, आध्यात्मिकरीत्या आपले लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आपल्याला प्रांतीय अधिवेशनांची आवश्यकता आहे. (१ करिंथ. ७:३१) तिन्ही दिवशी उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, पण तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. या वर्षाचे, “देवाचे गौरव करा” हे अधिवेशन, सैतानी जगावर येणाऱ्या यहोवाच्या न्यायदंडाची आपण वाट पाहत असताना, स्थिर उभे राहण्यास आपल्याला मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. तेव्हा, यहोवाकडून मिळणारे हे प्रशिक्षण काही झाले तरी चुकवू नका.—यश. ५१:४, ५.
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमाची वेळ
शुक्रवार आणि शनिवार
सकाळी ९:३० - संध्याकाळी ५:००.
रविवार
सकाळी ९:३० - संध्याकाळी ४:०५.