आपले घर उपलब्ध करून द्यायला तुम्ही तयार आहात का?
१ पहिल्या शतकात पुष्कळ ख्रिश्चनांनी, मंडळीच्या सभांसाठी आपले घर उपलब्ध केले. (१ करिंथ. १६:१९; कलस्सै. ४:१५; फिले. १, २) आज काही मंडळ्यांमध्ये, मंडळीच्या पुस्तक अभ्यास गटांसाठी व क्षेत्र सेवेच्या सभा घेण्यासाठी पुरेशी ठिकाणे नाहीत. यामुळे एका पुस्तक अभ्यास गटात, सुमारे १५ जण असले पाहिजे अशी शिफारस केली जात असली तरी ३० किंवा त्याहूनही अधिक लोकांना उपस्थित राहावे लागते.
२ एक सुहक्क: तुमच्या घरात मंडळीचा पुस्तक अभ्यास व्हावा म्हणून तुम्ही आपले घर उपलब्ध करण्याबद्दल विचार केला आहे का? मोठी, स्वच्छ, पुरेसा प्रकाश व हवेशीर असलेली खोली पुस्तक अभ्यास घेण्यासाठी उत्तम आहे. पुस्तक अभ्यास हा मंडळीची सभा आणि आपल्या लोकांना प्रशिक्षण देण्याकरता यहोवाने केलेल्या व्यवस्थेचा भाग असल्यामुळे तुमच्या घरात पुस्तक अभ्यास असणे एक सुहक्क आहे. आपले घर अशा उद्देशासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याला अनेक आध्यात्मिक लाभ झाले आहेत असे अनेकजण सांगतात.
३ तुमचे घर उचित असेल तर कृपया वडिलांना सांगा. ते कदाचित आणखी स्थळांच्या शोधात असतील. तुमच्या घरात पुस्तक अभ्यास घेणे शक्य नसेल तर क्षेत्र सेवेच्या सभा तरी निदान घेता येतील का? सध्या गरज नसली तरी, तुम्ही तुमचे घर उपलब्ध केले आहे हे जाणून वडील तुमचे आभार मानतील. भविष्यात कदाचित तुम्हाला संधी मिळू शकेल.
४ शिष्टाचार दाखवणे: खासगी घरात एकत्र जमल्यावर, जमलेल्या सर्वांनी घरमालकाच्या मालमत्तेचा आदर केला पाहिजे. पालकांनी याची खबरदारी बाळगावी की आपली मुले अभ्यासासाठी नेमलेल्या खोलीशिवाय घरातील इतर खोल्यांमध्ये किंवा बागेत विनाकारण जाणार नाहीत. शेजाऱ्यांचा देखील विचार करणे आवश्यक आहे, त्यांना विनाकारण अडथळा होणार नाही याविषयी देखील सावधगिरी बाळगणे उचित ठरेल.—२ करिंथ. ६:३, ४; १ पेत्र २:१२.
५ इब्री लोकांस १३:१६ आपल्याला असे उत्तेजन देते की “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” मंडळीच्या सभेसाठी आपले घर उपलब्ध करून देणे हा, इतरांसाठी चांगल्या गोष्टी करण्याचा आणि “आपल्या [मौल्यवान] द्रव्याने . . . परमेश्वराचा सन्मान” करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.—नीति. ३:९.