२००२ “आवेशी राज्य उद्घोषक” यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
१ “‘आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ,’ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.” (स्तो. १२२:१) स्तोत्रकर्त्याच्या भावनांचा विचार करताना पुढील गोष्टी लक्षात घ्या: (१) यहोवाची उपासना करण्यासाठी त्यालाही बोलावण्यात आले तेव्हा त्याला कसे वाटले, (२) त्याच्या बरोबर असलेले लोक चांगले लोक होते, खऱ्या उपासनेच्या बाबतीत त्यांना आस्था होती व (३) हे आमंत्रण देण्यासाठी, लोकांना एकत्रित करण्यासाठी व देवाच्या घराकडे जाण्याचा प्रवास करण्यासाठी केलेल्या योजना.
२ आगामी अधिवेशनासाठी योजना केल्या जात आहेत हे ऐकून, स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्यालाही वाटत नाही का? आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांतून आपल्याला मिळालेल्या आनंदाची आठवण केल्यावर व यहोवावर प्रेम करणाऱ्या सहबंधूभगिनींबरोबर पुन्हा एकदा एकत्र होण्याच्या संधीचा विचार केल्यावर आपल्यामध्ये उत्सुकता निर्माण होते. भारतामध्ये २००२-२००३ दरम्यान “आवेशी राज्य उद्घोषक” या तीन दिवसीय प्रांतीय अधिवेशनांची योजना करण्यात आली आहे. त्यामुळे या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी केली पाहिजे जेणेकरून आपल्यापुढे वाढून ठेवल्या जाणाऱ्या आध्यात्मिक मेजवानीचा आपण पुरेपूर फायदा घेऊ शकू.
३ ‘विश्वासू व विचारशील कारभाऱ्याने’ अधिवेशनात आपल्यापुढे समयोचित आध्यात्मिक अन्न वाढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. (लूक १२:४२) गत वर्षांमध्ये, अनेक लहान लहान अधिवेशनांची योजना करण्यात आली होती जेणेकरून नवीन लोकांना उपस्थित राहण्यास सोपे जाईल आणि शेकडो लहान शहरांमधील लोकांना, मोठ्या प्रमाणावर यहोवाच्या साक्षीदारांना जवळून पाहता येईल. पण यावर्षी अधिवेशने मोठी असतील; यामुळे अनेक ठिकाणांतील साक्षीदारांना इतर साक्षीदारांबरोबर सहवास राखता येईल. प्रत्येक मंडळीला या मोठ्या अधिवेशनांपैकी एकाला जाण्यास नेमले जाईल; परंतु, अगदी दूरवरच्या उत्तरेकडील व ईशान्येकडील साक्षीदारांसाठी काही लहान अधिवेशनांची योजना करण्यात आली आहे. सोईस्कर लॉज किंवा धर्मशाळेत अधिवेशनाला येणाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्याकरता व्यवस्था केली जात आहे. याशिवाय, पुष्कळ बांधवांनी विविध विभागांची व्यवस्थाही करण्यास सुरवात केली आहे जेणेकरून “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ” शकेल. (१ करिंथ. १४:४०) आपल्या फायद्यासाठी आणि सोयीसाठी आधीपासूनच अनेक गोष्टींची योजना केली जात आहे. मग आपण व्यक्तिगतपणे अधिवेशनाची तयारी कशी करू शकतो?
४ तिन्ही दिवस उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच योजना करा: या वर्षाच्या बहुतेक अधिवेशनांची योजना दिवाळीच्या व डिसेंबर महिन्याच्या सुटीतच करण्यात आली आहे. तरीपण नेमण्यात आलेल्या अधिवेशनाला जाण्यासाठी व संपूर्ण अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला रजेविषयी तुमच्या मालकांशी बोलावे लागेल. काही मालक “कठोर” असतात हे यहोवाला माहीत आहे. (१ पेत्र २:१८) परंतु, आपली अधिवेशने महत्त्वाची आहेत आणि अधिवेशनाच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा याबाबतीत यहोवाला प्रार्थना करा आणि तुम्हाला यश मिळावे म्हणून मार्गदर्शन देण्याची विनंती करा.—नहे. २:४.
५ सहकुटुंब उपस्थित राहण्याची योजना करा: कुटुंबासह प्रवास करून अधिवेशन होणाऱ्या शहरात राहणे आपल्या सर्वांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. पण, काळजीपूर्वक योजना केल्याने आर्थिक ओझे पेलण्यास आपल्याला मदत होईल. आपण आतापासूनच अधिवेशनाला निघेपर्यंत दरडोई फक्त पाच रुपये दरदिवशी बाजूला काढत गेलो तर आपल्याला गाडीभाडे आणि राहण्याचा खर्च जमवता येऊ शकतो.—पडताळा १ करिंथकर १६:२.
६ तुमच्या राहण्याची सोय: प्रत्येक अधिवेशनात एक विभाग असेल जो, तुम्हाला अधिवेशन शहरात मुक्कामाच्या सोयीविषयी माहिती देईल व ती प्राप्त करण्याकरता मदत करेल. तेव्हा तुमच्या राहण्याच्या व्यवस्थेची आधीपासूनच योजना करा. तुमच्या मंडळीचे सचिव तुम्हाला रूम रिक्वेस्ट फॉर्म देतील. आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सचिवांना द्यावा आणि मग सचिव, तुम्ही जेथे अधिवेशनासाठी जाणार आहात तेथील अधिवेशन मुख्यालयास तो पाठवतील. फॉर्मसोबत तुमचा पत्ता असलेले व तिकीटे लावलेले एक पाकीटही द्यावे. धर्मशाळेचे कमीतकमी भाडे, प्रत्येक व्यक्तीमागे एका रात्रीसाठी ५० रुपये असेल; तुम्ही किती भाडे देऊ शकता ते लिहिताना ही गोष्ट कृपया लक्षात ठेवावी. बांधवांच्या घरी तुमची राहण्याची सोय करण्यात आलेली असेल तर त्यांनी दाखवलेल्या आदरातिथ्याचा त्यांना मोबदला देण्याचा प्रयत्न करा. त्यांना कराव्या लागणाऱ्या ज्यादा खर्चाचा भार उचलण्यासाठी तुम्हीही काहीतरी हातभार लावू शकता.
७ मंडळीतील इतरांकडे लक्ष द्या: आपण अशा एखाद्या बांधवाला अथवा भगिनीला ओळखत असू ज्याला/जिला शारीरिक किंवा आर्थिक अडचणीमुळे अधिवेशनाला उपस्थित राहणे कठीण असेल. प्रेमापोटी आपण त्यांना मदत करण्यासाठी आपले मन “विशाल” करून मदत करू शकतो का? (२ करिंथ. ६:१२, १३; अनु. १५:७) २ करिंथकर ८:१४ मध्ये पौल आपल्याला असा आत्मा दाखवण्याचे उत्तेजन देतो. अशा लोकांना तुमच्याबरोबर अधिवेशनाला येण्यासाठी तुम्ही आमंत्रित करू शकता. ते पायनियर असल्यास प्रवासात तुम्हाला त्यांचे चांगले अनुभव सांगू शकतील. ते मंडळीतील वृद्ध सदस्य असतील तर त्यांच्याकडे रोचक ईश्वरशासित इतिहास असेल जो तुम्ही ऐकलेला नसेल. अशा बंधूभगिनींबरोबर तुम्ही सहवास ठेवल्याने याचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर चांगला परिणाम होऊ शकतो. तुमच्या उदारतेची ते मनापासून प्रशंसा करतील आणि यहोवा तुम्हाला आशीर्वादित करेल.—नीति. २८:२७: मत्त. १०:४२.
८ स्वयंसेवक म्हणून स्वखुषीने पुढे या: अधिवेशन होणाऱ्या शहरांमध्ये स्थानीय मंडळ्यांना, अधिवेशनाच्या कित्येक दिवसांआधीपासूनच, अधिवेशनाच्या स्थळाची तयारी करण्याची खास संधी मिळेल. “ईश्वरी शिक्षणामुळे संघटित” (इंग्रजी) हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाबरोबर पाहा आणि योजना केल्या जाणाऱ्या प्रचंड कामात सहभाग घेण्याचा निश्चय करा. यासाठी पुष्कळ दिवस सुटी घ्यावी लागेल हे खरे आहे; परंतु या कामात भाग घेणाऱ्यांना किती आशीर्वाद मिळतील! अधिवेशनाच्या वेळी, सर्व विभागांचे कार्य सुरळीत चालावे म्हणून शेकडो स्वयंसेवकांची आवश्यकता असेल. सभागृहातील अटेन्डंट बसण्यासाठी जागा देण्याचे कार्य पाहतील आणि स्वच्छता विभागाला, आपण उपासनेसाठी जे ठिकाण तात्पुरते वापरणार आहोत ते अधिक साफसुफ करून स्वच्छतेबद्दल आपण कमवलेले नाव आणखी उंचावण्याची सुसंधी मिळेल. आपल्या सहकार्याचा ज्या विभागाला लाभ होऊ शकतो त्या विभागांत आपण काम करू का? तुम्ही आपल्या बांधवांबरोबर “एकचित्ताने” स्वेच्छेने मदत करायला पुढे याल का?—सफ. ३:९.
९ लोक आपण काय करतो ते खरोखरच पाहत असतात का? गेल्या वर्षाच्या एका प्रांतीय अधिवेशनाच्या वेळी, साक्षीदार एका हॉटेलमध्ये राहिले होते जेथे एक असा मनुष्य कामाला होता ज्याने सुमारे २० वर्षांपूर्वी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर अभ्यास करायचे थांबवले होते. परंतु आता पुन्हा बायबलचा अभ्यास करण्याची व सभांना जाण्याची त्याला इच्छा होती असे त्याने काही साक्षीदारांना सांगितले. का? कारण, साक्षीदार जेव्हा हॉटेलमध्ये राहत होते तेव्हा त्याच्याबरोबर ते अगदी प्रेमाने वागले. “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्में पाहून तुमच्या स्वर्गांतील पित्याचे गौरव करावे,” या येशूने दिलेल्या सल्ल्याचे आपण पालन करत आहोत हे पाहून आपल्या स्वर्गीय पित्याला आपला किती अभिमान वाटत असेल!—मत्त. ५:१६.
१० यहोवाच्या उपासनेच्या भवनात जाण्याची आनंदाने वाट पाहणाऱ्या राजा दावीदाच्या मनोवृत्तीवर आपण मनन करू या. आपली प्रांतीय अधिवेशने आध्यात्मिक अन्नाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहेत व तेथे आपण अतुलनीय प्रेमळ सहवासाचा आनंद लुटू शकतो. तेव्हा, या वर्षाच्या “आवेशी राज्य उद्घोषक” या प्रांतीय अधिवेशनाच्या तिन्ही दिवसांच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच योजना करण्याचे आम्ही तुम्हाला अगदी मनापासून उत्तेजन देत आहोत!