स्वच्छतेमुळे देवाचा सन्मान होतो
१ स्वच्छतेची खात्री करण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्रात कडक नियम होते. त्यामुळे, इस्राएल लोकांकडून शारीरिक व आध्यात्मिक शुद्धतेची अपेक्षा केली जात होती व इतर लोकांपासून ते वेगळे होते. (लेवी. ११:३५, ३६; १५:१-११; यश. ५२:११) या स्वच्छ स्थितीमुळे यहोवाचा सन्मान होत असे व राष्ट्र देखील निरोगी राहत असे.
२ आज देखील, यहोवाचे लोक स्वच्छतेकरता ओळखले जातात. ही स्वच्छता, समूह या नात्याने यहोवाच्या लोकांची ओळख पटवून देत असली तरी, व्यक्तिगतपणे तुमच्या बाबतीत हे खरे आहे का? आपण नीटनेटकेपणा आणि व्यक्तिगत स्वच्छतेबद्दल जी काळजी घेतो त्यावरून यहोवाच्या नियमांबद्दल आपल्याला किती गुणग्राहकता आहे ते प्रतिबिंबित होते.
३ आपले घर कसे आहे? आपण देत असलेल्या राज्य संदेशाला ते न शोभणारे आहे का? आपले स्वतःचे घर घाणेरडे असेल व घराच्या आवारात जंगली गवत व झाडेझुडपे वाढलेली असतील तर, पृथ्वी एका सुंदर बागेसारखी होईल असे आपण लोकांना सांगतो तेव्हा त्यांना आपल्या संदेशाविषयी शंका वाटू शकण्याची शक्यता आहे का? आपले घरच अस्ताव्यस्त असले किंवा गलिच्छ सवयींमुळे घरात घाणेरडा वास येत असला तर, “देव राज्यातील नवीन जगासाठी योग्य अशा स्वच्छतेच्या सवयी” आपण स्वतःला लावल्या आहेत असे आपण म्हणू शकतो का?—om-MR पृष्ठे १३०-१.
४ क्षेत्र सेवेसाठी आपण वापरत असलेले वाहन कसे आहे? आपल्या कार्याला लोक नावे ठेवणार नाहीत अशाप्रकारे ते स्वच्छ आहे का? आपले कपडे, पुस्तकाची बॅग, व केशभूषा कशी आहे? आपले स्वरूप नीटनेटके व चांगले आहे का व आपल्याला पाहून कोणी अडखळत तर नाही ना? नेहमी अंघोळ करून व कपडे धुऊन स्वच्छ राहणे उचित आहे.
५ एखाद्या बांधवाच्या निष्काळजीपणामुळे त्याची अस्वच्छता किंवा त्याच्या घराच्या परिसराची अस्वच्छता मंडळीवर निंदा आणण्याचे कारण ठरली असेल तर काय? कदाचित वयोमानामुळे किंवा आजारपणामुळे त्या बांधवाला फक्त प्रेमळ मदतीची गरज असेल. असे असल्यास, त्यांना मदत करणे हा चांगुलपणा असेल. कदाचित ही एखाद्याची समस्या असेल व त्याला याची जाणीव देखील नसेल. अशा वेळी, प्रेमळ सल्ला दिल्याने तो सुधारणा करेल. या बाबतीत नेहमीच वाईट उदाहरण ठेवणाऱ्या व्यक्ती, मंडळीतील खास विशेषाधिकारास योग्य ठरणार नाहीत. अर्थात, वडिलांनी त्यांच्या स्वतःचे नियम किंवा आवडीनिवडी लोकांवर थोपवू नयेत.
६ नवीन आस्थेवाईक व्यक्तींना आपल्या राज्य सभागृहात आध्यात्मिक मेजवान्यांचा उपभोग घेण्यास आमंत्रित केले जाते. बहुधा, सभागृह आकर्षक आणि स्वच्छ असल्यामुळे आपण आमंत्रण देण्यास उत्सुक असतो. तरीपण, त्या स्थितीत ठेवायला मेहनत घ्यावी लागते. तुमच्या सभागृहाभोवती पाहा. खुर्च्या, फरशी आणि भिंती स्वच्छ आहेत का? शौचालये नियमितपणे साफ करण्यात येतात का? आपल्याला मळीन झालेले पडदे किंवा रंगाचे पापुद्रे निघत असलेल्या भिंती पाहण्याची सवय झाली तर, कालांतराने आपल्याला त्यात काहीच गैर वाटणार नाही. तथापि, पहिल्याच वेळी भेट देणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर त्याची चांगली छाप पडणार नाही. सुंदर आणि आकर्षक राज्य सभागृह टिकवून ठेवण्यासाठी आपण होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. साफसफाई किंवा दुरुस्ती करण्यात आपण भाग घेतला पाहिजे.
७ एकही शब्द न बोलता केवळ आपण आपला पेहराव आणि आपली घरे, वाहने आणि राज्य सभागृहे स्वच्छ ठेवून देवाचे गौरव करू शकतो. आपले चांगले उदाहरण कोणालाही अडखळणास कारण ठरणार नाही तर आपली उपासना शुद्ध व सरळ आहे याची साक्ष देईल.—१ करिंथ. १०:३१, ३२; याको. १:२७.