देवाचे गौरव करणारे आचरण ठेवा
१ आपल्या आचरणावरून आणि शृंगारावरून लोकांना आपल्याविषयी आणि आपण ज्या देवाची उपासना करतो त्याची साक्ष मिळते. मोठ्या जमावामुळे आपण लोकांच्या नजरेस येतो. त्यामुळे आपण चांगले उदाहरण ठेवले तर देवाच्या नावाचे गौरव होते. (१ पेत्र २:१२) पण, काहींच्या गैर किंवा अविचारी वर्तनामुळे सर्वच देवाच्या सेवकांचे आणि देवाचे नाव खराब होते. (उप. ९:१८ब) आपली वागणूक पाहून लोक आपल्या संस्थेबद्दल आणि आपण ज्या देवाची उपासना करतो त्याच्याबद्दल मत बनवतात. म्हणून ‘आपण जे काही करीतो ते सर्व देवाच्या गौरवासाठी’ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—१ करिंथ १०:३१.
२ हॉटेलमध्ये सभ्य वागणूक राखणे: बहुतेकवेळा, यहोवाच्या साक्षीदारांचा व्यवस्थितपणा, त्यांचे चांगले आचरण, स्वच्छता पाहून हॉटेलचे लोक प्रभावीत होतात. एका हॉटेल मॅनेजरने आपल्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबाविषयी म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांची वागणूक सर्वात उत्तम असते. त्यांचा पेहराव सभ्य असतो. बोलतानाही ते आदराने, सभ्यपणे बोलतात. त्यांचा आतापर्यंत कसलाही त्रास नाही. त्यांना इतके छान वळण लावल्याबद्दल खरं तर तुमचीच प्रशंसा केली पाहिजे. तुमची मुलं आमच्या हॉटेलमध्ये येतात तेव्हा आम्हाला सर्वांना ती आवडतात.” यहोवाच्या लोकांमधील प्रेम आणि आदर पाहून आपल्याबरोबर व्यवहार करणारे लोक लगेच असे उद्गार काढतात.
३ दुसऱ्या बाजूला पाहता काही हॉटेल कर्मचारी अजूनही अशी तक्रार करतात, की काहींचे वर्तन चांगले नाही किंवा ते हॉटेलमधील व्यवस्थांचा गैरफायदा घेतात. यामुळे पुष्कळ समस्या येतात आणि देवाच्या लोकांची विनाकारण बदनामी होते. काही हॉटेल मालकांचे म्हणणे आहे, की मुले आणि तरुण आरडाओरडा आणि दंगा करतात. ते स्वीमिंग पूलवर येतात किंवा मनोरंजनासाठी असलेल्या सोयींचा गैरफायदा घेतात तेव्हा त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्याकडे मुळीच लक्ष नसते.
४ बहुतेक हॉटेलमध्ये त्यांचे काही नियम असतात. तेथे राहायला येणाऱ्यांनी त्यांचे पालन करावे अशी हॉटेल संचालक त्यांच्याकडून अपेक्षा करतात. पण काही बांधवांनी या नियमांचे उल्लंघन केले आहे. जसे, ते हॉटेलमध्ये खूप आवाज करतात किंवा हॉटेल रुममध्ये स्वयंपाक करतात. स्वयंपाक केल्यामुळे आपण हॉटेलवाल्यांच्या मालमत्तेचा दुरूपयोग करत असतो. त्यामुळे रुम्स खराब होतात आणि खोल्यांमध्ये स्वयंपाकाचा वास खूप वेळपर्यंत राहिल्यामुळे हॉटेलवाल्यांना त्या खोल्या खूप दिवस किंवा आठवडे देखील भाड्याने देता येत नाहीत. तेव्हा, स्वयंपाक करण्याची परवानगी आहे, असे जोपर्यंत स्पष्टपणे सांगितले जात नाही तोपर्यंत स्वयंपाक न करणेच उत्तम आहे.
५ हॉटेल व्यवस्थेला पूर्णपणे सहकार्य देण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपल्यापैकी कोणालाही यहोवाच्या लोकांची चुकीची छाप द्यायला आवडणार नाही. ख्रिस्ती या नात्याने आपण सर्ववेळी प्रामाणिक असावयास हवे. हॉटेलमधून आपण चादरी किंवा इतर कोणत्याही “वस्तू” घेऊ नयेत, घेतल्यास ती चोरी होईल. किंवा रुमचे बुकींग करताना एका रुममध्ये किती लोक राहणार आहेत, अथवा आपण थेट हॉटेलमध्ये राहायला येतो तेव्हा किती लोक राहणार आहेत हे सांगताना आपण कधीही खोटे बोलत नाही.
६ अधिवेशनात उचित पेहराव: अधिवेशन ज्या हॉलमध्ये भरवले जाते तो हॉल तात्पुरता राज्य सभागृह बनतो. आपण राज्य सभागृहात जाताना जसा उचित पेहराव किंवा शृंगार करतो तसेच अधिवेशनाला जातानाही केला पाहिजे. अधिवेशनादरम्यान आणि अधिवेशन संपल्यावर घरी गेल्यावरही आपला पोषाख जगीक लोकांप्रमाणे असू नये. नाहीतर आपण जगापासून वेगळे आहोत हे लोकांना मुळीच दिसणार नाही. भगिनींनी खोल गळ्याचे ब्लाऊज किंवा टॉप घालणे अथवा आखुड स्कर्ट घालणे उचित किंवा सभ्य वाटणार नाही. (१ तीम. २:९, १०) आणि असा पेहराव फक्त अधिवेशनाला जातानाच नव्हे तर हॉटेलमध्ये राहत असताना, जेवायला जात असताना, बाजारात जातानाही घालू नये. आपण सर्व वेळी देवाचे सेवक आहोत हे आपल्या वागण्यावरून, पेहरावावरून दिसले पाहिजे. आपण कोणाला अडखळण्यास कारण ठरणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.—२ करिंथ. ६:३.
७ अधिवेशनाच्या वेळी शनिवारी सकाळी बाप्तिस्म्याचा कार्यक्रम असेल. त्या प्रसंगी आपण कसे वागावे याबद्दल टेहळणी बुरूज एप्रिल १, १९९५ पृष्ठ ३० वर काही सूचना आहेत. त्यात असे म्हटले होते: “आम्ही सर्वांनी बाप्तिस्म्याकडे गांभीर्याने पाहावे. तो मोठ्याने जयघोष करण्याचा, मिठाई वाटण्याचा, किंवा आनंदाने गर्जना करण्याचा समय नाही. किंवा मौन पाळण्याचा वा उदास राहण्याचा देखील समय नाही.” बाप्तिस्मा घेणाऱ्यांनी, मग ते पुरुष असोत अथवा स्त्रिया असोत त्यांनी बाप्तिस्म्याच्या वेळी तंग किंवा फारच तोकडे कपडे घालणे उचित नाही. सर्वांनी बाप्तिस्म्याच्या वेळी आनंद व्यक्त करताना या प्रसंगाचे गांभीर्य देखील लक्षात ठेवले पाहिजे.
८ ‘आपण सर्वजण पवित्र वर्तणुकीचे व सुभक्ती करणारे लोक असावे’ अशी पेत्र आपल्याला आठवण करून देतो. (२ पेत्र ३:११) “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या अधिवेशनादरम्यान आपण आपल्या शब्दांद्वारे व कार्यांद्वारे प्रामाणिक लोकांना, आदरास व गौरवास पात्र असलेल्या खऱ्या देवाला ओळखण्यास व त्याची भक्ती करण्यास मदत करू शकतो.—१ करिंथ. १४:२४, २५.