चांगले करून प्रशंसा मिळवा!
१ “त्या लोकांत एकप्रकारची शांती असते जी मी दुसऱ्या कोणत्याही लोकांमध्ये पाहिलेली नाही.” “हे लोक येथे आलेले आम्हाला नेहमी आवडेल.” गेल्या वर्षी झालेल्या अधिवेशनांनंतर यहोवाच्या साक्षीदारांना पाहणाऱ्या अनेकांनी अशाप्रकारचे प्रशंसोद्गार काढले. संघटना या नात्याने आपले किती उत्तम नाव आहे, हेच यावरून दिसून येते. (नीति. २७:२; १ करिंथ. ४:९) खरे तर आपली प्रशंसा केली जाते तेव्हा यहोवा देवाचा गौरव होतो. (मत्त. ५:१६) या वर्षाच्या “देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनात, यहोवा देवाचे गौरव करण्याची आणखी एक संधी आपल्यापुढे आहे.
२ दर वर्षी आपल्याला अधिवेशनाच्या वेळी योग्य प्रकारचे वर्तन राखण्याची प्रेमळपणे आठवण करून दिली जाते. का आठवण करून दिली जाते? कारण, या जगाची मनोवृत्ती, पेहराव आणि वागणूक दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे; पण आपण मात्र या गोष्टींपासून वेगळे राहण्याचा प्रयत्न करतो. आपले चांगले नाव खराब होऊ नये अशी आपली इच्छा आहे. (इफिस. २:२; ४:१७) यासाठी पुढील गोष्टी आपण लक्षात ठेवू या.
३ हॉटेल्समध्ये—चांगले वागा: सर्व लोक आपल्याला प्रामाणिक म्हणून ओळखतात. (इब्री. १३:१८) तेव्हा, आपल्या रूममध्ये किती लोक राहणार आहेत याबाबतीत आपण नेहमी सत्य बोलावे. हॉटेलच्या रूममध्ये स्वयंपाक करण्याची परवानगी नसेल तर आपण स्वयंपाक करू नये. एका हॉटेल मालकाने सांगितले, की त्याने यहोवाच्या साक्षीदारांकडून रूमचे भाडे कमी घेतले कारण यहोवाच्या साक्षीदारांनी नेहमी हॉटेलकडून मिळालेले टॉवेल त्यांना परत केले. शिवाय, हॉटेलच्या मालमत्तेचे देखील ते काळजी घेतात हे त्याला माहीत आहे. नक्कीच, हॉटेलची कोणतीही “वस्तू” आपण घेऊ नये. उलट, आपल्या इथे टीप्स द्यायची पद्धत असेल तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपणही काही टीप्स देऊ शकतो. तसेच, हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांशी नेहमी आदरपूर्वक व धीराने वागा.
४ आपली लहान मुले सभ्यपणे व आज्ञाधारकपणे वागत असल्याचे पाहून देखील लोक प्रभावीत होतात. (इफिस. ६:१, २) पालकांनो, आपली मुले (स्विमिंग पूल अथवा मनोरंजनाच्या इतर तरतूदींचा उपयोग करतात तेव्हा देखील) इतरांना त्रास होईल अशाप्रकारे वागणार नाहीत त्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवा. जोराने दार आपटणे किंवा जोरजोराने बोलणे (खासकरून संध्याकाळच्या वेळी) सर्वांनी टाळावे.
५ हॉटेलमध्ये राहायला आलेल्या इतर लोकांचा विचार करून देखील आपण चांगले वागू शकतो. काही हॉटेल मालकांची अशी तक्रार आहे, की अधिवेशनाला आलेले काही साक्षीदार बर्फयंत्रांतील सगळा बर्फ आपल्या कुलरसाठी काढून घेऊन जातात. शिवाय, हॉटेलतर्फे मोफत पुरवले जाणारे खाद्यपदार्थ किंवा नंतर पिण्यासाठी म्हणून कॉफी वगैरे भरून घेणे देखील उचित नाही. हॉटेलच्या नियमांच्या बाबतीत आपल्याला सूट आहे असा आपण कदापि विचार करू नये.
६ अधिवेशनाच्या ठिकाणी आपली वागणूक चांगली ठेवा: अधिवेशनाला आलेल्या काही बंधूभगिनींनी अटेंडेंट असलेल्या बांधवांना सहकार्य देण्यास नकार दिल्याचे आणि काहींनी तर ख्रिस्ती लोकांना शोभणार नाही अशाप्रकारे बोलल्याचे म्हटले जाते. अटेंडेंटकडून मिळणाऱ्या सूचना न पाळल्यामुळे व कायदेशीररीत्या परवानगी नसलेल्या ठिकाणी आपली वाहने उभी केल्यामुळे पोलिसांनी काही बंधूभगिनींची वाहने उचलून नेल्याचे प्रकार घडले आहेत. मी आणि माझे, ही मनोवृत्ती निश्चितच चांगली वागणूक असलेल्या व्यक्तीची नाही, शिवाय त्यातून यहोवा देवाची प्रशंसाही होत नाही. तेव्हा, आपण नेहमी प्रेमाने, धीराने आणि सहकार्याने वागू या.—गलती. ५:२२, २३, २५.
७ अधिवेशन होणाऱ्या सभागृहाचे द्वार सकाळी ८ वाजता उघडले जाते तेव्हा काही बंधूभगिनी “उत्तम” जागा मिळण्याकरता धावपळ, ढकलाढकली व रेटारेटी करत असल्याचे पाहण्यात आले आहे. अशा वागण्यामुळे काहींना दुखापत झाल्याचीही उदाहरणे आहेत. दुपारच्या जेवणाला हलकेफुलके भोजन आणावे असे आपल्याला यापूर्वी सुचवण्यात आले आहे; त्यामुळे अनेक अन्नपदार्थ आणणे योग्य नाही. नाहीतर आपण जणू सहलीला आलो आहोत असे वाटेल.
८ आपली केशभूषा व वेशभूषा चांगली ठेवा: गेल्या वर्षाच्या एका प्रांतीय अधिवेशनानंतर, एका मोठ्या महानगरी बातमीपत्रकाच्या संपादकाने असे लिहिले: “सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे साक्षीदारांचे वर्तन उल्लेखनीय होते. मोठ्या संख्येच्या लोकांची आदरपूर्वक व अदबशीर वागणूक पाहून मन आनंदित होते. उत्तम पोषाख घालून वेगवेगळ्या जातीची व पार्श्वभूमीची शेकडो कुटुंबे अगदी शांतीने अधिवेशनाच्या ठिकाणी चालली होती. त्या सर्वांचे वर्तन, येथे येणाऱ्या बहुतेक घोळक्यांच्या अगदीच विपरीत होते. तसे पाहायला गेलो तर साक्षीदार बहुतेक बाबतीत इतर लोकांमध्ये अगदी उठूनच दिसतात. इतर लोकांची उर्मट वागणूक तर दररोजची गोष्ट झाली आहे. . . . पण साक्षीदारांना पाहून मन अगदी प्रसन्न होते.” तेव्हा, अधिवेशनाच्या आध्यात्मिक वातावरणात आपल्या केशभूषेमुळे, वेशभूषेमुळे अथवा आपल्या वर्तनामुळे कसलाही कमीपणा येणार नाही याची आपण सर्वजण काळजी घेऊ या.—फिलिप्पै. १:१०; १ तीम. २:९, १०.
९ बाप्तिस्म्याच्या वेळी चांगले वागा: बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना, हा प्रसंग निश्चितच सर्वात आदरणीय वाटतो. सभ्य वस्त्र घातल्याने त्या प्रसंगाच्या पवित्रतेची आपण गुणग्राहकता बाळगतो हे प्रदर्शित होईल. बायबल अभ्यास घेणाऱ्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या आधीच, एप्रिल १, १९९५ टेहळणी बुरूजच्या अंकातील “वाचकांचे प्रश्न” या लेखाची उजळणी करावी.
१० आपला पेहराव आणि आपले पवित्र वर्तन, आपल्या ख्रिस्ती विश्वासांची साक्ष देतात व यामुळे प्रांजळ मनाचे लोक सहजपणे सत्य स्वीकारतात. तेव्हा आपण “देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहताना ‘चांगले करून’ लोकांची प्रशंसा मिळवू या.—रोम. १३:३.