सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा
१. आपल्या सर्व आचरणात पवित्र असणे का महत्त्वाचे आहे?
१ आपण पवित्र देव यहोवा याचे सेवक आहोत. त्यामुळे आपण देखील आपल्या सर्व आचरणात पवित्र असण्याचा प्रयत्न करतो. (१ पेत्र १:१५, १६) याचा अर्थ आपण जीवनातल्या सर्व कार्यांत यहोवाच्या आदर्शांना जडून राहण्याचा प्रयत्न करतो. या वर्षीचे प्रांतीय अधिवेशन आपल्याला पवित्र आचरण प्रदर्शित करण्याची एक खास संधी देईल.
२. हॉटेलांमध्ये राहताना आपण उत्तम आचरण कसे राखू शकतो?
२ हॉटेल्समध्ये: मागच्या वर्षी अधिवेशनाला आलेल्या प्रतिनिधींनी जेथे मुक्काम केला होता, अशा एका हॉटेलच्या मॅनेजरने म्हटले: “यहोवाचे साक्षीदार चांगले लोक आहेत, ते इथे आल्याने आम्हाला आनंद वाटला. . . . तुमच्यासारख्याच लोकांची सेवा करण्याची आमची इच्छा आहे.” आपला हा नावलौकिक टिकवून ठेवण्याकरता खालील सूचनांचे पालन करणे साहाय्यक ठरेल: (१) तुम्हाला गरज आहे त्यापेक्षा जास्त खोल्या आरक्षित करू नका आणि एका खोलीत जितक्या लोकांना राहण्याची परवानगी आहे त्यापेक्षा अधिक जणांची एका खोलीत सोय करू नका. (२) आरक्षण रद्द करायची गरज पडल्यास, लगेच हॉटेलला कळवा. (३) स्वयंपाक करण्याची ज्या खोल्यांमध्ये परवानगी नाही त्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका. (४) खोलीची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याकरता व वेटरला टीप द्या. (५) खास हॉटेलच्या पाहुण्यांकरता मोफत पुरवल्या जाणाऱ्या, व केवळ मुक्कामादरम्यान फायदा उचलण्याजोग्या सोयींचा जसे की नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांचा गैरफायदा घेऊ नका. (६) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना, खासकरून चेक-इन व चेक-आऊट करण्याच्या घाईघडबडीच्या वेळांमध्ये, आत्म्याची फळे प्रदर्शित करा.—गलती. ५:२२, २३.
३. तरुण साक्षीदारांची वागणूक कशाप्रकारे इतरांना प्रभावित करू शकते?
३ आपला उत्तम शिष्टाचार इतरांना अतिशय प्रभावी साक्ष देऊ शकतो. मागच्या वर्षी एक तरुण साक्षीदाराने एका हॉटेलच्या क्लर्कला काहीतरी स्टेशनरीची वस्तू मागितली आणि मग तिचे आभार मानले. ती क्लर्क खूप प्रभावित झाली आणि तिने म्हटले, “आजकाल इतके सभ्य तरुण-तरुणी क्वचितच आढळतात.” पण काहीवेळा, मुलांवर लक्ष न दिल्यामुळे ती आईवडिलांच्या देखरेखीशिवाय पोहताना, लिफ्टमध्ये खेळताना, मोठ्याने बोलताना आणि हॉटेलच्या जिन्यांवर धावताना आढळली आहेत. आईवडिलांनी आपल्या मुलांना मोकाट सोडू नये तर त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांच्या आचरणानेही यहोवाला गौरव मिळेल याची खात्री केली पाहिजे.—नीति. २९:१५.
४. बाहेर खायला जातो तेव्हा आपण इतरांबद्दल विचारशीलता कशी दाखवू शकतो?
४ उपाहारगृहांत: एका अधिवेशनाच्या ठिकाणाजवळ असलेल्या उपाहारगृहातील वेटरने असे म्हटले: “साक्षीदार इतर लोकांपेक्षा वेगळे आहेत. ते इतरांशी आदराने वागतात.” उत्तम आचरणात हे देखील सामील आहे, की आपण इतरांना त्रासदायक वाटेल इतक्या मोठ्याने बोलू किंवा हसू नये. तसेच आपण हे देखील आठवणीत ठेवावे की बऱ्याच ठिकाणी वेटरच्या सेवेकरता १५ ते २० टक्क्यांची टीप ठेवण्याची रीत आहे; सेवेच्या प्रतीनुसार किती टीप द्यावी हे तुम्ही ठरवू शकता. तर अशारितीने आपण खातपीत असतो तेव्हा देखील सर्वकाही देवाच्या गौरवाकरता करावे.—१ करिंथ. १०:३१.
५. अधिवेशनाच्या ठिकाणी उत्तम आचरण राखण्यात कशाचा समावेश आहे?
५ अधिवेशनाच्या ठिकाणी: खासकरून अधिवेशनाच्या ठिकाणी आपले उत्तम आचरण दिसून आले पाहिजे. वाहनतळे व सभागृह या दोन्ही ठिकाणी कृपया परिचारकांना सहकार्य द्या. (इब्री १३:१७) केरळ येथे आपल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या एका आस्थेवाईक व्यक्तीने असे म्हटले: “इथं सर्वजण किती आनंदी आहेत. मला अशाच लोकांसोबत राहण्यास आवडते.” दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले: “इतका सुनियोजित कार्यक्रम मी पूर्वी कधीच पाहिला नव्हता.” आईवडिलांनी आपल्या मुलांना, किशोरवयीनांना सुद्धा इतर मुलामुलींसोबत बसण्याची परवानगी देण्याऐवजी, कुटुंबांनी एकत्र बसले पाहिजे. सभागृहाच्या विद्युत किंवा ध्वनीप्रक्षेपक यंत्रणेला कोणीही स्वतःची उपकरणे जोडू नयेत; आणि केवळ अशीच उपकरणे वापरावीत की ज्यांमुळे इतरांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. जर तुम्ही छायाचित्रे घेणार असाल तर सत्र सुरू असताना कॅमेराचा फ्लॅश वापरू नये. पेजर आणि मोबाईल फोन्स इतरांचे लक्ष विचलित होणार नाही अशाप्रकारे ॲडजस्ट करून ठेवावीत. जर सभागृहात काही दुर्घटना झाल्याचे आढळल्यास कृपया परिचारकांपैकी एकाला किंवा प्रथमोपचार विभागाला सूचित करावे. अधिवेशनाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत देण्याकरता प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध असतील.
६. अधिवेशनांत आपले आचरण कशाप्रकारे देवाचे गौरव करते?
६ आपले आचरण इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवते आणि आपल्या देवाचे गौरव करते. (१ पेत्र २:१२) अधिवेशनादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांच्या कृती लोकांच्या नजरेत असतील. तेव्हा आपल्या सर्व आचरणात पवित्र असण्याचा निर्धार करा.
[५ पानांवरील चौकट]
पवित्र आचरण राखा
◼ हॉटेलच्या सर्व नियमांचे पालन करा
◼ मुलांवर सदोदित लक्ष असू द्या
◼ इतरांचा विचार करून वागा