तुम्ही एक उद्देश समोर ठेवून कार्य करता का?
१ यहोवा परमेश्वर उद्देश राखणारा परमेश्वर आहे. (यश. ५५:१०, ११) आणि त्याच्या या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे प्रोत्साहन आपल्याला देण्यात आले आहे. (इफिस. ५:१) खासकरून आपल्या सेवेच्या बाबतीत आपण असे केले पाहिजे. तेव्हा, “तुम्ही एक उद्देश समोर ठेवून कार्य करता का,” असा प्रश्न विचारणे उचित ठरते.
२ घरोघरचे प्रचार कार्य, अनौपचारिक साक्षकार्य आणि बायबल साहित्याचे वितरण या सर्व गोष्टी आपल्या उद्देशपूर्ण सेवेचे भाग आहेत. पण, एक मात्र नेहमी लक्षात असू द्या. आपल्याला नेमून दिलेले कार्य म्हणजे केवळ प्रचार कार्य नव्हे; त्यात शिष्य बनविण्याचे कार्यही समाविष्ट आहे. (मत्त. २८:१९, २०) देव राज्याच्या सत्याचे बीज पेरल्यानंतर त्याची वाढ होण्यासाठी यहोवाची आस धरत असताना आपण पुन्हा जाऊन त्याला पाणी घातले पाहिजे आणि वेळच्या वेळी त्याची काळजी घेतली पाहिजे. (१ करिंथ. ३:६) होय, पुनर्भेटी करण्याबद्दल आणि बायबल अभ्यास सुरू करण्याबद्दल आपण नेहमी जागृत असले पाहिजे.
३ तुमची सेवा वाढवा: सेवेत साध्य केलेल्या गोष्टींचा आपल्याला पुन्हा विचार करायला मिळतो आणि “अखेरीस, मी जे काही ध्येय ठेवलं होतं ते मी साध्य करू शकलो” असे म्हणता येते तेव्हा एक प्रकारचे समाधान मिळते. दुसरे तीमथ्य ४:५ यात नमूद केल्याप्रमाणे पौलाने आर्जवले: “तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर.” असे करण्याकरता, आस्था दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पुन्हा भेट घेण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावा लागेल. तेव्हा, आपल्या साप्ताहिक सेवा आराखड्यात पुनर्भेटी करण्यासाठी एक ठराविक वेळ राखून ठेवा. आणि धार्मिकतेकडे कल असलेल्यांसोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचे ध्येय गाठण्यास झटा. हाच, तुमच्या सेवेचा उद्देश असला पाहिजे.
४ संमेलनात आपल्या बायबल विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घेत असताना पाहून प्रचारकांना कसे वाटले हे त्यांच्याच तोंडून ऐका. बाप्तिस्मा घेणाऱ्यांना जितका आनंद झाला, कदाचित तितकाच आनंद त्यांनाही झाला. याचे कारण, एक मोठे ध्येय त्यांनी साध्य केले होते! एका प्रचारकाने आपला हा आनंद पुढील शब्दांत व्यक्त केला: “शिष्य बनवणे म्हणजे यहोवाचे अधिकाधिक स्तुतीकर्ते तयार करणे. शिवाय, सत्याचा स्वीकार करणाऱ्यांसाठी हे जणू जीवनच होय. इतरांना सत्य शिकवायला मला फार आवडतं—ते किती उत्कृष्ट कार्य आहे! . . . जे लोक यहोवावर प्रेम करण्यास शिकले त्यांपैकी अनेकजण माझे अत्यंत जिवलग मित्र बनले आहेत.”
५ यहोवाचा समर्पित सेवक बनण्यास एखाद्याची मदत करण्यात यशस्वी होण्याच्या आनंदाचा विचार करा! यासारखा आनंद आणखीन कोणता असू शकतो! अर्थात असे प्रतिफळ, एक उद्देश समोर ठेवून सेवा केल्यानेच पदरी पडते.—कलस्सै. ४:१७.