बौद्ध व्यक्तीशी संभाषण कसे कराल?
१ काही देशांत, बाप्तिस्मा घेणारे निम्मेअधिक लोक बौद्ध धर्मातले असतात. त्यामुळे मनात विचार येतो, की हे लोक कोणत्या गोष्टीमुळे सत्यात येतात? आणि एखाद्या बौद्ध व्यक्तीला सुवार्ता कशी सांगावी?
२ खरी कळकळ दाखवा: बौद्ध धर्मातून सत्यात आलेल्या अनेकांनी असे म्हटले आहे, की गहन युक्तिवादामुळे नव्हे, तर साक्षीदारांनी दाखवलेल्या मनःपूर्वक कळकळीमुळे ते सत्यात आले. एका साक्षीदार बहिणीच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे अमेरिकेत राहणारी आशियाई स्त्री इतकी प्रभावित झाली, की ती बायबल अभ्यासाला लगेच तयार झाली. तिला इंग्रजी नीटसे बोलताही येत नव्हते; पण, आपल्या बहिणीने धीर सोडला नाही. या स्त्रीला कधीकधी थकल्यासारखे वाटायचे किंवा एखाद्या कारणामुळे अभ्यास करणे शक्य झाले नाही की आपली बहीण तिला फक्त भेटून यायची आणि त्यांचा अभ्यास पुढच्या खेपेस व्हायचा. याचा परिणाम असा झाला की ही स्त्री, तिची दोन मुले आणि तिची वयस्कर आई या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. नंतर ही स्त्री आपल्या मायदेशी परतली आणि तिथे गेल्यानंतर तिने अनेकांना सत्य शिकण्यास मदत केली. सध्या तिचा एक मुलगा शाखा दफ्तरात सेवा करत आहे. खरेच, यहोवाची “दया व मनुष्यावरील प्रेम” व्यक्त केल्याचा किती मोठा आशीर्वाद!—तीत ३:४.
३ बौद्ध विचारधारा: बौद्ध लोक सहसा इतरांचे विचार ऐकून घेतात. पण, एखादे विशिष्ट धर्मतत्त्व पाळणे जरूरीचे आहे असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे त्या प्रत्येकाचे धार्मिक विश्वास सारखेच असतात असे नाही. एका बौद्ध शिक्षणप्रणालीची अशी एक विचारधारा आहे, की जीवनात अतोनात दुःख आहे; तेव्हा, अशा दुःखमय जीवनात पुन्हा जन्म होऊ नये म्हणून प्रबोधनाच्या माध्यमाने जन्ममरणाचे रहाटगाडगे थांबवता येते. या चक्रातून सुटका मिळवण्यासाठी निर्वाण मिळवणे जरूरीचे आहे, अशी समजूत आहे; निर्वाण या स्थितीचे वर्णन करणे शक्य नाही कारण निर्वाण कोणत्याही स्थानाला किंवा घटनेला सूचित होत नाही, तर दुःख आणि पाप यांपासून मुक्त असणाऱ्या स्थितीला सूचित होते. (आपण मरतो तेव्हा काय होते? [इंग्रजी], पृष्ठे ९-१० पाहा.) यावरून काय समजते? हेच, की बौद्ध लोकांशी बोलताना बौद्ध तत्त्वज्ञानावर लांबलचक चर्चा करणे व्यर्थ ठरेल. त्याऐवजी, सर्वसामान्य चिंतेच्या विषयांवर चर्चा करा.
४ सर्वसामान्य जिव्हाळ्याच्या विषयांवर बोला: पृथ्वीवरचे जीवन म्हणजे दुःखमय जीवन, असा बौद्ध लोकांचा ग्रह असल्यामुळे पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची कल्पना त्यांना अगदीच अर्थहीन वाटेल. पण, आपले कौटुंबिक जीवन आनंदी असावे, दुःखाचा अंत व्हावा आणि जीवनाच्या अर्थाचा उलगडा व्हावा असे प्रत्येकालाच वाटते. तेव्हा, अशा सर्वसामान्य जिव्हाळ्याच्या विषयांना धरून बौद्ध व्यक्तीशी संभाषण कसे करावे याकडे लक्ष द्या.
५ सुरवातीला तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “आज जगभरात कित्येक निरापराधी लोक दुःख भोगत आहेत. तुम्हाला काय वाटतं, या दुःखाचा किंवा त्रासाचा अंत कसा होऊ शकेल? [प्रतिसादासाठी वाव द्या.] हजारो वर्षांपूर्वी दिलेल्या एका वचनामुळे मला स्वतःला फार दिलासा मिळाला. [प्रकटीकरण २१:४ वाचा.] अर्थात, ही वेळ अजून आलेली नाही; पण, आली तर आपल्याला नक्कीच आवडेल, नाही का?” यानंतर, दुःखाचा अंत कसा केला जाईल याचा खुलासा करणारे एखादे प्रकाशन घरमालकाला दाखवा.
६ एखादी वयोवृद्ध व्यक्ती भेटल्यास तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “आज, कधी नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत चाललाय आणि याचा आपल्या मुलाबाळांवरही परिणाम होतोय, अशी मला चिंता वाटते तशीच तुम्हालाही वाटत असेल. पण, प्रश्न हा आहे की आजची युवा पिढी अनैतिकतेत इतकी भरकटत का चालली आहे? [प्रतिसादासाठी वाव द्या.] पण, तुम्हाला माहीत आहे का, की हे असं होईल म्हणून बऱ्याच काळाआधी म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन किंवा हिंदू धर्माची स्थापना होण्यापूर्वीच एका ग्रंथात लिहून ठेवलं होतं? [२ तीमथ्य ३:१-३ वाचा.] आणि विशेष म्हणजे, आज धार्मिक शिक्षणाचा इतका प्रसार होत असतानाही ही परिस्थिती काही बदलत नाही. [७ वे वचन वाचा.] या प्रकाशनातून मला जे सत्य समजलं त्याविषयी अनेकजण अजाण आहेत. एखादे पुस्तक किंवा माहितीपत्रक दाखवून घरमालकाला विचारा: “तुम्हालाही हे वाचायला आवडेल का?”
७ बौद्ध लोक बायबलकडे एक पवित्र ग्रंथ म्हणून आदराने पाहतात. तेव्हा, त्यांच्याशी बोलताना सरळ बायबल उघडून वाचा. (इब्री ४:१२) पण, बायबल म्हणजे पाश्चात्त्य लोकांचा ग्रंथ असा जर एखाद्याने आक्षेप घेतला तर बायबलचे सर्व लेखक आशिया खंडातलेच होते असे त्याला सांगा.
८ त्यांच्यासाठी कोणती प्रकाशने सगळ्यात चांगली? अनेक प्रचारकांनी पुढील साहित्याचा अगदी यशस्वीपणे उपयोग केला आहे: मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी), कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य, आणि तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे ही पुस्तके; “पाहा! मी सर्व नवे करतो” आणि जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? ही माहितीपत्रके आणि अजूनही उपलब्ध असल्यास सर्व लोक एकमेकांवर कधी प्रीती करतील का? ही राज्य वार्ता क्र. ३५. सध्या सत्य शिकणारे बहुतेक बौद्ध लोक आधी अपेक्षा माहितीपत्रकाचा आणि नंतर ज्ञान पुस्तकाचा अभ्यास करतात.
९ असे म्हटले जाते, की पौलाने अथेन्समध्ये प्रचार कार्य केले त्याच्या सुमारे ४०० वर्षांपूर्वी बौद्ध मिशनरी तेथे आले होते; पण, बौद्ध विचारसरणीचा कोणी मनुष्य पौलाला भेटला अशी निश्चित माहिती नाही. परंतु, सर्व प्रकारच्या लोकांना साक्ष देण्याच्या बाबतीत पौलाची काय मनोवृत्ती होती हे आपल्याला माहीतच आहे. “सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे” म्हणून त्याने स्वतःला “सर्वांचा दास केले.” (१ करिंथ. ९:१९-२३) लोकांमध्ये वैयक्तिक आस्था घेतल्याने तसेच साक्ष देताना आपणा सर्वांना असलेल्या एका समान आशेबद्दल इतरांना आवर्जून सांगितल्याने आपणही असे करू शकतो.