पालकांनो—आपल्या मुलांपुढे उत्तम आदर्श ठेवा
१ देवाचे वचन म्हणते: ‘धार्मिकाचा बाप आणि आई फार उल्लास करतात.’ (नीति. २३:२४, २५) आपल्या मुलांपुढे एक उत्तम आदर्श ठेवणाऱ्या पालकांसाठी किती मोठा आशीर्वाद! आपल्या पालकांविषयी बोलताना शाखा समितीच्या एका सदस्याने म्हटले: “माझ्या आईवडिलांसाठी सत्य सर्वस्व होतं आणि माझ्यासाठीही सत्यच सर्वकाही आहे.” कोणकोणत्या बाबतीत पालकांनी आपल्या मुलांसमोर आदर्श मांडला पाहिजे?
२ शिष्टाचार आणि गहिरा आदरभाव: आपल्या मुलांमध्ये चांगले गुण विकसित करणे ही मुळात पालकांची जबाबदारी आहे. मुले चांगल्या सवयी शिकतात ते केवळ बोध ऐकून नव्हे, तर निरीक्षण आणि अनुकरण करून देखील. तेव्हा पालकहो, तुमचे वागणेबोलणे कसे आहे? “सॉरी,” “प्लिज” “थँक्यू” हे शब्द तुमची मुले तुमच्या तोंडून ऐकतात का? कुटुंबातील सर्वांना तुम्ही आदरभावाने वागवता का? इतर जण बोलतात तेव्हा तुम्ही त्याकडे लक्ष देता का? तुम्ही तुमच्या मुलांचेही ऐकून घेता का? अशा चांगल्या सवयी सभागृहात तसेच घराच्या चार भिंतींच्या आतही तुम्ही प्रदर्शित करता का?
३ मजबूत आध्यात्मिकता आणि आवेशयुक्त कार्य: पन्नासहून अधिक वर्षे पूर्ण-वेळेच्या सेवेत असलेले एक बांधव आठवून सांगतात: “सभांविषयी कृतज्ञता दाखवण्याच्या बाबतीत आणि आवेशाने सेवा करण्याच्या बाबतीत माझे आईबाबा खरोखरच एक उत्कृष्ट उदाहरण होते.” तुमच्या कौटुंबिक सदस्यांच्या आध्यात्मिकतेची तुम्हाला चिंता आहे हे तुम्ही आपल्या मुलांना कसे दाखवून देता? दैनिक वचनाची तुम्ही एकत्र बसून चर्चा करता का? तुमच्या कुटुंबामध्ये बायबलचा अभ्यास नियमितपणे होतो का? तुमची मुले तुम्हाला बायबलचे आणि संस्थेच्या प्रकाशनांचे वाचन करत असल्याचे पाहतात का? तुम्ही कुटुंबाच्या वतीने प्रार्थना करता तेव्हा तुमची मुले काय ऐकतात? तुम्ही तुमच्या मुलांबरोबर उभारणीकारक आध्यात्मिक संभाषण करता का? त्यांच्याबरोबर सत्याच्या आणि मंडळीच्या सकारात्मक गोष्टींची चर्चा करता का? सबंध कुटुंब मिळून मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यासाठी तुम्ही आतूर असता का?
४ तेव्हा पालकहो, आपल्या मुलांसमोर तुम्ही कोणते उदाहरण ठेवत आहात त्याचा विचार करा. ते एक सर्वोत्कृष्ट उदाहरण असू द्या जेणेकरून मुले आयुष्यभर त्याचे चीज करतील. वयाची सत्तरी गाठलेली एका प्रवासी पर्यवेक्षकांची पत्नी म्हणते: “माझ्या ख्रिस्ती पालकांनी माझ्यापुढे मांडलेल्या उत्तम आदर्शाचा आजही मला फायदा होत आहे. आणि येणाऱ्या दिवसांतही, त्यांच्याकडून मला मिळालेल्या या वारशाचा चांगला उपयोग करून त्याबद्दल मला मनस्वी कदर आहे हे मी सिद्ध करीन.”