अंत जवळ येत असता अधिक साक्षकार्य करणे
१ कापणीचा हंगाम हा सहसा आनंदोत्सव करण्याचा समय असतो. पण, आनंदाबरोबरच ढोर मेहनत करण्याचाही तो समय असतो. एका मर्यादित वेळातच पीक गोळा करावे लागते. त्यामुळे कामकऱ्यांनी आपल्या कामात सुस्ती करता कामा नये.
२ लाक्षणिकरित्या येशूने ‘युगाच्या समाप्तीची’ तुलना कापणीच्या हंगामाशी केली. (मत्त. १३:३९) आपण या युगाच्या समाप्तीच्या काळात जगत आहोत आणि “सर्व जगात” साक्ष देण्यासाठी केवळ एक मर्यादित वेळ बाकी आहे. (मत्त. २४:१४) शिवाय, पूर्वीपेक्षा आता अंत अधिकाधिक जवळ येत असल्यामुळे आपल्याला आपल्या सेवाकार्यातील सहभाग वाढवणे आवश्यक आहे. का? कारण “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत,” असा खुलासा येशूने केला.—मत्त. ९:३७, ३८; रोम. १२:११.
३ निकडीच्या भावनेने साक्ष द्या: येशूने आपले महान प्रचार कार्य करण्यास सुरवात केली तेव्हा त्याला नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या हातात फक्त साडेतीन वर्षे होती. त्याने अगदी निकडीच्या भावनेने प्रचार केला आणि म्हटले: “मला . . . देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.”—लूक ४:४३.
४ आपल्या शिष्यांच्या मनातही येशूने हीच निकडीची भावना रुजवली. (मार्क १३:३२-३७) म्हणूनच, “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” (प्रे. कृत्ये ५:४२) कमी महत्त्व असलेल्या गोष्टींना त्यांनी आपल्या जीवनात प्राधान्य दिले नाही. त्यामुळेच, त्यांची संख्या इतकी कमी असूनही “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” ते सुवार्तेचा प्रचार करू शकले.—कलस्सै. १:२३.
५ ‘सर्वांचा शेवट जवळ आल्यामुळे’ ही निकडीची भावना आता विकसित करणे आणखीनच जरूरीचे आहे. (१ पेत्र ४:७) या व्यवस्थीकरणाचा अंत करण्यासाठी देवाने एक विशिष्ट दिवस आणि एक विशिष्ट वेळ ठरवलेली आहे. (मत्त. २४:३६) आणि उरलेल्या वेळात प्रचाराचे कार्य पूर्ण केले जाईल. त्यामुळेच अधिकाधिक लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आपण सतत प्रयत्नांची शिकस्त करतो.
६ अंत जवळ येत असता साक्ष कार्यातील आपला सहभाग वाढवल्याने येशूप्रमाणेच आपल्यालाही यहोवाला असे म्हणण्यात आत्मसंतुष्टी मिळेल की, ‘जे काम तू आम्हाला करावयास दिले ते पुरे करून आम्ही पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.’—योहा. १७:४.