यहोवाने दाखवलेल्या जीवनाच्या मार्गावर चालत राहण्याचा—आपला संकल्प
१ ईश्वरीय जीवन मार्ग अधिवेशनातील आठवणीत राहिलेल्या खास गोष्टींपैकी एक म्हणजे शेवटल्या भाषणात आपण जाहीरपणे केलेला संकल्प. आम्ही मनःपूर्वक मान्य करतो, की देवाने दाखवलेला मार्ग हाच जगण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे, या शब्दांत सदर संकल्पाची सुरवात झाली. होय असे म्हणून आपण मान्य केलेल्या त्या संकल्पातील काही मुख्य मुद्दे पुन्हा विचारात घ्या.
२ यहोवाच्या नजरेत निर्दोष आणि या जगाच्या मलिनतेपासून निष्कलंक राहण्याचा आमचा संकल्प आहे. आमच्या जीवनात आणखी कशाहीपेक्षा आम्ही सदोदीत देवाच्या इच्छेलाच प्राधान्य देत राहू. देवाचे वचन बायबल हेच आमचे मार्गदर्शक राहील; आम्ही डावीकडे किंवा उजवीकडे मार्गभ्रष्ट होणार नाही आणि याद्वारे जगाच्या मार्गापेक्षा देवाचा मार्ग कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे या गोष्टीला आमची स्वीकृती असल्याचे आम्ही दाखवू.
३ जगातले बरेच लोक देवाने दाखवलेल्या मार्गाने चालत नाहीत आणि त्यामुळे दुष्परिणाम भोगतात. (यिर्म. १०:२३) आपण मात्र सतत आपल्या महान शिक्षकाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा स्वीकार करावा; तो आपल्याला म्हणतो, हाच मार्ग आहे; याने चला. (यश. ३०:२१) बायबलच्या माध्यमातून यहोवाने आपल्याला दाखवलेला जीवनाचा मार्ग सर्वच दृष्टीने श्रेष्ठ आहे. या मार्गावर चालत राहायचे असेल तर आपण यहोवाने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा फायदा करून घेतला पाहिजे.
४ यहोवाची सर्वोत्तम शिक्षणपद्धत: यहोवा आपल्याला जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि आपण आपल्या जीवनाला कशाप्रकारे कारणी लावू शकतो याबद्दल मार्गदर्शन करतो. मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने आपण आपले जीवन पूर्वीपेक्षा आणखी समाधानकारक कसे बनवू शकतो हे तो आपल्याला शिकवतो. तसेच तो आपल्याला हेही शिकवतो की आपण आपल्या बांधवांसोबत, कौटुंबिक सदस्यांसोबत आणि इतर लोकांसोबत शांतीपूर्ण संबंध कसे कायम ठेवू शकतो. हे सारे शिक्षण तो आपल्याला त्याच्या पाठ्यपुस्तकातून अर्थात बायबलमधून आणि त्याच्या संस्थेच्या माध्यमाने देत असतो.
५ हे लक्षात घेता, आपल्या मंडळीच्या सभा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पाचही सभांना नियमित उपस्थित राहून आपण त्यांत सहभाग घेतो, तसतसे आपल्याला सुवार्तेचा प्रचार करण्याकरता बहुव्यापक प्रशिक्षण आणि ख्रिस्ती जीवन जगण्याकरता संतुलित मार्गदर्शन मिळते. २ तीम. ३:१६, १७ या व्यतिरिक्त निरनिराळी संमेलने आणि अधिवेशने यांच्या माध्यमातूनही आपला महान शिक्षक आपल्याला ईश्वरशासित मार्गदर्शन देत असतो. तेव्हा, तब्येत आणि परिस्थिती साथ देते तोवर एकही सभा किंवा अधिवेशनाचा एकही कार्यक्रम कधीही न चुकवण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे.
६ येणाऱ्या दिवसांत आपण देवाने दाखवलेल्या जीवनाच्या मार्गावरच चालत राहण्याचा जिवाभावाने प्रयत्न करत राहू; असे केल्याने यहोवाला तर गौरव मिळेलच, पण आपलेही सार्वकालिक कल्याण होईल!—यश. ४८:१७.