“धीर धरा”
१ सैतानाच्या या जुन्या व्यवस्थीकरणाचा नाश वेगाने जवळ येत आहे; तेव्हा, यहोवा आपली सुटका करील त्या दिवसाची वाट पाहात राहणे आणि असे करताना धीर धरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या दुष्ट शत्रूंचा नाश अतिशय जवळ आला असल्यामुळे यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे आपण दुर्लक्ष करावे म्हणून आता खासकरून ते अतोनात प्रयत्न करीत आहेत; आणि त्यासाठी ते आपल्याला स्वतःचाच स्वार्थ पूर्ण करण्यात सतत रमवून ठेवतात. अशारितीने आपली फसवणूक करून सैतान आपल्याला राज्याचा प्रचार करण्याचे काम सोडून द्यायला भाग पाडू शकतो, किंवा या कार्यात आपल्याला अगदी निरुत्साह करू शकतो. (याको. ५:७, ८; मत्त. २४:१३, १४) तर मग, अत्यंत आवश्यक असणारा हा धीराचा गुण आपल्याला कोणकोणत्या प्रकारे दाखवता येईल?
२ संयम बाळगून: आपल्या सेवाकार्याला प्रतिसाद न देणारे किंवा विरोध करणारे लोक आपल्याला भेटतात, तेव्हा आपण संयम बाळगला पाहिजे; तरच आपल्याला प्रचार कार्यात टिकून राहता येईल. लोक आपल्याशी तुटक वागतात किंवा टाकून बोलतात तेव्हा आपण सहजासहजी खचून जाणार नाही, किंवा लगेच मनाला लावून घेणार नाही. (१ पेत्र २:२३) आपल्याजवळ असे मनोबल असेल तर आपण आपल्या कार्याबद्दल आस्था न बाळगणाऱ्या किंवा त्याला विरोध करणाऱ्यांबद्दल भलेबुरेही बोलणार नाही; कारण त्यामुळे आपला आणि आपल्यासोबत कार्य करणाऱ्यांचाही उत्साह खचतो, याची आपण नेहमी जाणीव ठेवू.
३ धीराने कार्यात टिकून राहून: राज्य संदेशात आस्था दाखवलेल्या व्यक्तीसोबत चांगली चर्चा झाल्यानंतर पुढच्या वेळी ती व्यक्ती आपल्याला घरी सापडत नाही तेव्हा खरंच आपल्या धीराची परीक्षा होते. तसेच आपण ज्यांच्यासोबत अभ्यास करतो त्यांची प्रगती मंद असते किंवा सत्य स्वीकारण्याचा पक्का निर्णय घ्यायला ते उशीर लावतात तेव्हाही आपल्या धीराची परीक्षा होते. पण आपण खचून न जाता आपले काम करत राहिलो तर शेवटी चांगले परिणाम आपल्या पदरी पडतील. (गल. ६:९) एका बहिणीने एका तरुणीकडे कितीतरी वेळा पुनर्भेटी केल्या, तेव्हा कुठे अभ्यास सुरू झाला. पहिल्या पाच वेळा ती गेली तेव्हा या तरुणीला सवडच नव्हती. सहाव्यांदा जाताना ही बहीण जोरदार पावसात अगदी पूर्ण भिजून गेली आणि जाऊन पाहते तर तिला घरी कुणीच सापडले नाही. पण तरीही तिने या तरुणीला आणखी एक संधी देण्याचे ठरवले, ती पुन्हा एकदा तिच्याकडे गेली आणि यावेळेस मात्र ती तरुणी अभ्यास करायला तयार झाली. तिने भराभर प्रगती केली आणि लवकरच आपले जीवन यहोवाला समर्पित केले.
४ यहोवाच्या दिवसाला उशीर लागणार नाही हे आपल्याला ठाऊक आहे. देव स्वतःही धीर धरत आहे आणि याचे परिणाम चांगलेच असणार आहेत याची जाणीव ठेवून आपण सर्वकाही यहोवावर सोपवून देतो. (हब. २:३; २ पेत्र ३:९-१५) यहोवाप्रमाणे आपणही धीर धरला पाहिजे, तसेच आपल्या सेवेत खंड पडू देता कामा नये. “विश्वासाच्या व धीराच्या योगे” यहोवा तुम्हाला तुमच्या परिश्रमांचे प्रतिफळ देईल याची खात्री बाळगा.—इब्री ६:१०-१२.