देवाच्या मार्गानुसार चालत राहा
“परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल.”—स्तोत्र ३७:३४.
१, २. यहोवाच्या मार्गानुसार चालण्याचा दावीदाकरता काय अर्थ होता आणि त्याकरता आज आपल्याकडून कोणती अपेक्षा केली जाते?
“ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लाविले आहे.” (स्तोत्र १४३:८) आज, ख्रिश्चन पूर्ण अंतःकरणाने दावीदाच्या वरील शब्दांचा पुनरूच्चार करतात. यहोवाला आनंदित करावे आणि त्याच्या मार्गानुसार चालावे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. यामध्ये काय गोवलेले आहे? दावीदाकरता याचा अर्थ देवाच्या आज्ञा पाळणे असा होता. आसपासच्या राष्ट्रांशी संबंध ठेवण्याऐवजी यहोवावर भरवसा ठेवणे यात समाविष्ट होते. होय, शेजारच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांची उपासना करण्याऐवजी एकनिष्ठेने यहोवाची उपासना करणे असा याचा अर्थ होता. ख्रिश्चनांकरता, यहोवाच्या मार्गानुसार चालण्यात याहीपेक्षा अधिक काही आहे.
२ आज यहोवाच्या मार्गानुसार चालण्यातील एक गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर हे मान्य करून विश्वास ठेवणे, की तोच केवळ “मार्ग, सत्य व जीवन” आहे. (योहान ३:१६; १४:६; इब्री लोकांस ५:९) “ख्रिस्ताचा नियम पूर्ण” करणे असाही याचा अर्थ होता ज्यामध्ये एकमेकांना विशेषतः येशूच्या अभिषिक्त बांधवांना प्रेम दाखवणे समाविष्ट आहे. (गलतीकर ६:२; मत्तय २५:३४-४०) यहोवाच्या मार्गानुसार चालणाऱ्या लोकांना त्याची तत्त्वे आणि त्याच्या आज्ञा आवडतात. (स्तोत्र ११९:९७; नीतिसूत्रे ४:५, ६) ख्रिस्ती सेवाकार्यात भाग घेण्याच्या त्यांच्या अनमोल विशेषाधिकाराची ते गुणग्राहकता बाळगतात. (कलस्सैकर ४:१७; २ तीमथ्य ४:५) प्रार्थना, हा त्यांच्या जीवनाचा नियमित भाग आहे. (रोमकर १२:१२) ते ‘अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चालतात.’ (इफिसकर ५:१५) क्षणिक भौतिक लाभासाठी किंवा अनैतिक शारीरिक सुखासाठी ते आध्यात्मिक संपत्तीची किंमत मोजत नाहीत. (मत्तय ६:१९, २०; १ योहान २:१५-१७) याशिवाय, यहोवाप्रती एकनिष्ठा आणि त्याच्यावरील भरवसा महत्त्वाचा आहे. (२ करिंथकर १:९; १०:५; इफिसकर ४:२४) का? कारण आपली परिस्थिती त्या प्राचीन काळातील इस्राएल लोकांप्रमाणेच आहे.
भरवसा आणि एकनिष्ठेची गरज
३. एकनिष्ठा, विश्वास आणि भरवसा यांमुळे आपल्याला यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता कशी मदत होईल?
३ इस्राएल हे एक लहानसे राष्ट्र होते आणि ते शत्रुभाव बाळगणाऱ्यांना राष्ट्रांनी वेढले होते; ही आसपासची राष्ट्रे मूर्तिपूजेशी संबंधित असलेल्या अनैतिक विधीसंस्कारांत गुंतली होती. (१ इतिहास १६:२६) केवळ इस्राएल राष्ट्रच एकमेव खऱ्या आणि अदृश्य यहोवा देवाची उपासना करत होते आणि त्याने त्यांच्याकडून हीच अपेक्षा केली, की इस्राएल लोकांनी उच्च नैतिक दर्जे उचलून धरावेत. (अनुवाद ६:४) त्याचप्रमाणे, आजही केवळ काही लाख लोक यहोवाची उपासना करत आहेत, ते त्यांच्यापेक्षा खूपच भिन्न दर्जे आणि धार्मिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या ६०० कोटी लोकसंख्या असलेल्या जगात राहत आहेत. आपण त्या लाखो लोकांपैकी असल्यास, चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. कशा प्रकारे? यहोवावरील निष्ठा, त्याच्यावरील विश्वास आणि त्याने दिलेली अभिवचने तो पूर्ण करील याबद्दल पूर्ण भरवसा यांमुळे आपली मदत होईल. (इब्री लोकांस ११:६) यामुळे जग ज्या गोष्टींकडे आशेने पाहते त्या गोष्टींवर आपण आपला भरवसा ठेवणार नाही.—नीतिसूत्रे २०:२२; १ तीमथ्य ६:१७.
४. राष्ट्रांची “बुद्धी अंधकारमय” का झाली आहे?
४ प्रेषित पौलाने हे दाखवून दिले, की ख्रिश्चनांनी या जगापासून किती अलिप्त राहावे; त्याने लिहिले: “म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत.” (इफिसकर ४:१७, १८) येशू “खरा प्रकाश” आहे. (योहान १:९) जो कोणी त्याचा अव्हेर करतो किंवा जो त्याच्यावर विश्वास असल्याचा दावा करतो, पण ‘ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे’ चालत नाही त्याची “बुद्धी अंधकारमय” झाली आहे. यहोवाच्या मार्गावरून ते केवळ दूरवर भरकटलेच गेले नाहीत, तर “ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत.” जगाच्या दृष्टीने ते स्वतःला कितीही शहाणे समजत असतील, पण सार्वकालिक जीवनाकडे नेणारे एकमेव ज्ञान अर्थात यहोवा आणि येशू ख्रिस्ताविषयीच्या ज्ञानासंबंधी ते अज्ञानी आहेत.—योहान १७:३; १ करिंथकर ३:१९.
५. जगात सत्याचा प्रकाश चमकत असला, तरी अनेक लोकांचे अंतःकरण अप्रतिक्रियाशील का आहे?
५ पण सत्याचा प्रकाश जगात चमकत आहे! (स्तोत्र ४३:३; फिलिप्पैकर २:१५) “ज्ञान [“खरी बुद्धी,” NW] रस्त्यावर पुकारा करिते.” (नीतिसूत्रे १:२०) मागील वर्षी यहोवाच्या साक्षीदारांनी यहोवाविषयी आणि येशू ख्रिस्ताविषयी लोकांना सांगण्यात शंभर कोटीपेक्षा जास्त तास खर्च केले. लाखो लोकांनी प्रतिक्रियाही दाखवली. पण अनेक लोकांनी प्रतिक्रिया दाखवली नाही, याचे आपल्याला आश्चर्य वाटावे का? नाही. कारण पौलाने त्यांच्या ‘अंतःकरणाच्या कठीणपणाविषयी’ सांगितलेच होते. स्वार्थ आणि धनाचा लोभ यांमुळे काही लोकांचे अंतःकरण अप्रतिक्रियाशील आहे. इतर लोकांवर, खोटा धर्म किंवा आज जगव्याप्त असलेला धार्मिक अनास्थेचा दृष्टिकोन यांचा प्रभाव पडला आहे. दुःखद अनुभवांमुळे अनेक लोकांनी देवाकडे पाठ फिरवली आहे. काही लोकांनी देवाच्या नैतिक दर्जांनुसार चालण्याचे नाकारले आहे. (योहान ३:२०) अशाचप्रकारे यहोवाच्या मार्गानुसार चालणाऱ्या व्यक्तीचेही अंतःकरण अप्रतिक्रियाशील होऊ शकते का?
६, ७. इस्राएल लोक यहोवा देवाचे उपासक होते, तरी कोणत्या प्रसंगी ते पापवर्तनात पडले आणि का?
६ पौलाने दाखवून दिल्याप्रमाणे प्राचीन इस्राएलमध्ये हेच घडले. त्याने लिहिले: “ह्या गोष्टी आपल्या उदाहरणादाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर नाच-तमाशा करावयास उठले असे शास्त्रात लिहिलेले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.”—१ करिंथकर १०:६-८.
७ सियोन पर्वताच्या पायथ्याशी इस्राएल लोकांनी सोन्याच्या वासराची उपासना केली त्या प्रसंगाचा उल्लेख पौल पहिल्यांदा करतो. (निर्गम ३२:५, ६) काही आठवड्यापूर्वीच त्यांनी ज्या ईश्वरी आज्ञाचे पालन करण्याचे मान्य केले होते त्या आज्ञेचे हे थेटपणे उल्लंघन होते. (निर्गम २०:४-६; २४:३) त्यानंतर पौल, इस्राएल लोक मवाबी कन्यांसोबत बआलपुढे नतमस्तक झाले त्या प्रसंगाचा उल्लेख करतो. (गणना २५:१-९) अतिशय चैनबाजी आणि नाच-तमाशा ही वासराच्या उपासनेची वैशिष्ट्ये होती.a बआल उपासनेत धडधडीत लैंगिक अनैतिकता आचरली जात असे. (प्रकटीकरण २:१४) इस्राएल लोकांनी ही पातके का केली? कारण मूर्तिपूजेच्या स्वरूपात असोत अथवा व्यभिचारी चालिरीतींच्या स्वरूपात असोत—त्यांनी अशा ‘वाईट गोष्टींचा लोभ धरण्याकरता’ त्यांच्या अंतःकरणाला मुभा दिली.
८. इस्राएलच्या अनुभवांवरून आपण काय शिकू शकतो?
८ आपण या घटनांवरून शिकावे असे पौलाने दाखवून दिले. काय शिकावे? सोन्याच्या वासरापुढे किंवा प्राचीन मोआबी दैवतापुढे नतमस्तक होण्याचा विचार एखाद्या ख्रिश्चनाच्या मनात येणार देखील नाही. पण, अनैतिकता आणि अमर्याद चैनबाजीविषयी काय? या गोष्टी जगात आज सामान्य आहेत आणि या गोष्टींविषयी आपण आपल्या मनात इच्छा जागृत केली तर त्या आपण आणि यहोवा यांमध्ये आडकाठी येऊ शकते. याचा परिणाम मूर्तिपूजा केल्यामुळे होणाऱ्या परिणामापेक्षा वेगळा नसेल—आपण देवापासून दुरावले जाऊ. (पडताळा कलस्सैकर ३:५; फिलिप्पैकर ३:१९.) पौल या घटनांचा समारोप सहख्रिश्चनांना असा आर्जव करून करतो: “मूर्तिपूजेपासून दूर पळा.”—१ करिंथकर १०:१४.
देवाच्या मार्गानुसार चालण्याकरता मदत
९. (अ) यहोवाच्या मार्गानुसार नियमितरीत्या चालत राहण्याकरता आपणास कोणती मदत प्राप्त होते? (ब) ‘आपल्या मागून येणारी वाणी’ ऐकण्याचा एक मार्ग कोणता आहे?
९ यहोवाच्या मार्गानुसार चालण्याचा आपण निर्धार केला असल्यास, आपल्याला वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही. यशयाने अशी भविष्यवाणी केली: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.” (यशया ३०:२१) ‘आपल्या मागून येणारी वाणी आपल्या कानी’ कशी पडते? हे खरे आहे, की आज कोणालाही देवाचा खरोखरचा आवाज ऐकू येत नाही किंवा त्याचा व्यक्तिगत संदेश कोणाला मिळत नाही. ही “वाणी” सर्वांपर्यंत सारख्याच मार्गाने पोहंचते. पहिला आणि सर्वात प्रमुख मार्ग म्हणजे प्रेरित शास्त्रवचन, बायबल ज्यामध्ये देवाचे विचार आणि मानवांसोबतचे त्याचे व्यवहार नमूद करून ठेवण्यात आले आहेत. “देवाच्या जीवनाला पारखे” झालेल्या उगमांच्या मतप्रसाराचा आपल्याला दररोज सामना करावा लागत असल्यामुळे आध्यात्मिकरीत्या चांगली प्रकृती असण्याकरता आपल्याला दररोज बायबल वाचण्याची आणि त्यावर नियमितरीत्या मनन करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला “निरर्थक गोष्टी” टाळण्यास आणि “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होण्यास मदत होईल. (प्रेषितांची कृत्ये १४:१४, १५; २ तीमथ्य ३:१६, १७) त्यामुळे आपल्याला सामर्थ्य मिळेल, आपण दृढ होऊ आणि ‘आपल्याला यशःप्राप्ती होईल.’ (यहोशवा १:७, ८) यामुळे, यहोवाचे वचन आर्जवते: “तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत; बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका.”—नीतिसूत्रे ८:३२. ३३.
१०. ‘आपल्या मागून येणारी वाणी’ ऐकण्याचा दुसरा मार्ग कोणता आहे?
१० ‘आपल्या मागून येणारी वाणी’ ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासामार्फत’ देखील आपल्याला ऐकू येते; हा दास आपल्याकरता “यथाकाळी खावयास” अन्न पुरवतो. (मत्तय २४:४५-४७) हे अन्न पुरवण्याचा एक मार्ग म्हणजे बायबलवर आधारित प्रकाशने; अलीकडच्या काळात हे अन्न मुबलक प्रमाणात पुरवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज नियतकालिकाद्वारे आपल्याला भविष्यवाणीची अधिकाधिक समज प्राप्त झाली आहे. या नियतकालिकांत आपल्याला उत्तेजन देण्यात आले आहे, की लोकांची सत्याप्रती आस्था कमी होत असतानाही आपण प्रचार करण्याच्या आणि शिष्य बनविण्याच्या कामात मग्न राहिले पाहिजे, पाश टाळण्याकरता आपल्याला मदत करण्यात आली आहे आणि उत्तम ख्रिस्ती गुण विकसित करण्याचेही आपल्याला आर्जवण्यात आले आहे. यथाकाळी पुरवल्या जाणाऱ्या या अन्नाविषयी आपण किती कृतज्ञ आहोत!
११. ‘आपल्या मागून येणारी वाणी’ ऐकण्याच्या तिसऱ्या मार्गाविषयी सांगा.
११ विश्वासू आणि बुद्धिमान दास आपल्याला नियमित सभांद्वारे देखील अन्न पुरवतो. त्यांमध्ये मंडळीच्या सभांचा, सहामाही विभागीय संमेलनांचा आणि मोठ्या वार्षिक अधिवेशनांचा समावेश होतो. कोणता विश्वासू ख्रिश्चन या संमेलनांचे मोल जाणत नाही? ही संमेलने यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता आपल्याला मोलाची मदत करतात. अनेकांना कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत भिन्न विश्वास असलेल्या लोकांसोबत पुष्कळसा वेळ घालवावा लागत असल्यामुळे नियमितरीत्या ख्रिस्ती सभांना जाणे खरोखरच जीवनरक्षक ठरते. ‘एकमेकांना प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन’ देण्याची चांगली संधी आपल्याला संभांमध्ये मिळते. (इब्री लोकांस १०:२४) आपल्या बांधवांवर आपले प्रेम आहे आणि आपल्याला त्यांच्या सहवासात राहायला आवडते.—स्तोत्र १३३:१.
१२. यहोवाच्या साक्षीदारांचा कोणता निर्धार आहे आणि अलीकडे त्यांनी तो निर्धार कसा व्यक्त केला?
१२ अशाप्रकारच्या आध्यात्मिक अन्नामुळे दृढ होऊन आज सुमारे ६० लाख लोक यहोवाच्या मार्गानुसार चालत आहेत आणि इतर लाखो लोक या मार्गानुसार चालण्याकरता बायबलचा अभ्यास करत आहेत. या पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांच्या तुलनेत अगदी अल्प असल्याच्या वास्तविकतेमुळे ते निराश किंवा हताश झाले आहेत का? मुळीच नाही! ‘त्यांच्या मागून येणारी वाणी’ नियमितरित्या ऐकण्याचा आणि विश्वासूपणे यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्धाराचे जाहीर प्रकटन “ईश्वरीय जीवनाचा मार्ग” १९९८/९९ या प्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशनांदरम्यान उपस्थित असलेल्या लोकांनी पूर्ण अंतःकरणाने पत्करलेली भूमिका व्यक्त करणारा संकल्प केला. त्या संकल्पाचा मजकूर खालीलप्रमाणे आहे.
संकल्प
१३, १४. यहोवाच्या साक्षीदारांचा जगाच्या परिस्थितीविषयी कोणता वास्तववादी दृष्टिकोन आहे?
१३ “ईश्वरी जीवनाचा मार्ग,” या अधिवेशनाकरता यहोवाचे साक्षीदार म्हणून उपस्थित असलेले आम्ही अगदी मनापासून हे मान्य करतो, की देवाने दाखवलेला मार्ग हाच जगण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. पण आम्ही हे देखील मान्य करतो, की आज बहुतेक लोकांना तसे वाटत नाही. जगण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग शोधण्याकरता मानवी समाजाने अनेक संकल्पनांचा, तत्त्वज्ञानाचा आणि धार्मिक कल्पनांचा उपयोग करून पाहिला आहे. इतिहासाची आणि आजच्या जगाच्या परिस्थितीची प्रामाणिकपणे पाहणी केल्यास यिर्मया १०:२३ येथे नमूद असलेल्या ईश्वरीय घोषणेची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही कारण ते वचन म्हणते: ‘पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.’
१४ “प्रत्येक दिवशी या शब्दांच्या वास्तविकतेचा पुरावा आपल्याला अधिकाधिक स्पष्टपणे दिसतो. मानवी समाजातील बहुतेकजण ईश्वरीय जीवनाच्या मार्गाची उपेक्षा करतात. त्यांना जे योग्य वाटते तेच करण्याच्या मागे ते लागतात. याचा फार दुःखद परिणाम झाला आहे—कौटुंबिक जीवन मोडकळीस येणे, मुलांना मार्गदर्शन न मिळणे; भौतिकवादाचा ध्यास लागणे, अखेरीस रितेपण आणि निराशा पदरी पडणे; विनाकारण गुन्हेगारी आणि हिंसाचार, अनेक लोकांचा बळी जाणे; जातीय संघर्ष आणि युद्ध, प्रचंड प्रमाणात प्राणहानी; अनैतिकतेत लक्षणीय वाढ, लैंगिकरीत्या संक्रमित आजारांना खतपाणी. ज्यांमुळे आनंद, शांती आणि सुरक्षा नाहीशी झाली आहे, त्या असंख्य गुंतागुंतीच्या समस्यांपैकी केवळ काही येथे उल्लेखलेल्या आहेत.
१५, १६. ईश्वरीय जीवनाच्या मार्गाविषयी संकल्पामध्ये कोणता निर्धार व्यक्त करण्यात आला?
१५ “मानवजातीची दुःखद परिस्थिती आणि हर्मगिदोन म्हटलेल्या ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या जवळ आलेल्या लढाईकडे’ पाहता (प्रकटीकरण १६:१४, १६) आम्ही यहोवाचे साक्षीदार असा संकल्प करीत आहोत:
१६ “एक: आम्ही स्वतःला यहोवा देवाच्या मालकीचे समजतो, आम्ही व्यक्तिगतरीत्या त्याला स्वतःचे बिनशर्त समर्पण केले आहे आणि यहोवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे केलेल्या खंडणीच्या तरतुदीवर आम्ही अढळ विश्वास राखू. यहोवाचे साक्षीदार म्हणून सेवा करण्याद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या राज्याद्वारे प्रकट होणाऱ्या त्याच्या सार्वभौम सत्तेला अधीन राहण्याद्वारे आम्ही ईश्वरीय जीवनाच्या मार्गानुसार चालण्याचा निर्धार केला आहे.
१७, १८. नैतिक स्तर आणि ख्रिस्ती बंधुत्व यांबाबतीत यहोवाचे साक्षीदार कोणती स्थिती कायम ठेवत राहतील?
१७ “दोन: बायबलचे उच्च नैतिक आणि आध्यात्मिक दर्जे यांना आम्ही नेहमी जडून राहू. परराष्ट्रातील लोक ज्या भ्रष्ट मनाने चालतात त्याप्रमाणे न चालण्याचा आम्ही निर्धार केला आहे. (इफिसकर ४:१७-१९) यहोवासमोर शुद्ध आणि या जगापासून निष्कलंक राहण्याचा आमचा संकल्प आहे.—याकोब १:२७.
१८ “तीन: विश्वव्यापी ख्रिस्ती बंधुत्व या नात्याने असणाऱ्या आमच्या शास्त्रवचनीय स्थितीस आम्ही जडून राहू. राष्ट्रांमध्ये ख्रिस्ती तटस्थता आम्ही कायम राखू; जातीय, राष्ट्रीय आणि वंशीय द्वेषाच्या आणि फुटीच्या पाशात आम्ही पडणार नाही.
१९, २०. (अ) ख्रिस्ती पालक काय करतील? (ब) सर्व खरे ख्रिस्ती त्यांची ओळख ख्रिस्ताचे शिष्य असल्याचे कशी दाखवून देतील?
१९ “चार: आम्ही पालक, आमच्या मुलांवर देवाच्या मार्गाने चालण्याचे संस्कार करू. नियमित बायबल वाचन, कौटुंबिक अभ्यास आणि पूर्ण मनाने ख्रिस्ती सभांमध्ये आणि क्षेत्र सेवेत भाग घेण्याद्वारे आम्ही स्वतः ख्रिस्ती जीवनात त्यांच्यापुढे आदर्श ठेवू.
२० “पाच: आपल्या निर्माणकर्त्याने दाखवलेले ईश्वरी गुण विकसित करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू, येशूने केल्याप्रमाणे देवाचे व्यक्तिमत्त्व आणि त्याचे मार्ग यांचे अनुकरण करण्याचा आम्ही मनःपूर्वक प्रयत्न करू. (इफिसकर ५:१) आमचे सर्व व्यवहार प्रेमाने करण्याचा आम्ही संकल्प करतो जेणेकरून ख्रिस्ताचे शिष्य अशी आमची ओळख पटावी.—योहान १३:३५.
२१-२३. यहोवाचे साक्षीदार काय करत राहतील आणि त्यांना कशाची खात्री पटली आहे?
२१ “सहा: धिमे न पडता आम्ही देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत राहू, शिष्य बनवत राहू आणि आम्ही त्यांना देवाच्या ईश्वरी मार्गाचे मार्गदर्शन देऊ आणि पुढील प्रशिक्षण मंडळीच्या संभांमध्ये प्राप्त करण्याचे त्यांना उत्तेजन देऊ.—मत्तय २४:१४; २८:१९, २०; इब्री लोकांस १०:२४, २५.
२२ “सात: व्यक्तिगत आणि धार्मिक संघटना या नात्याने आमच्या जीवनात देवाची इच्छा प्रथमस्थानी ठेवत राहू. देवाचे वचन बायबल हेच आमचे मार्गदर्शक राहील; आम्ही डावीकडे आणि उजवीकडे मार्गभ्रष्ट होणार नाही आणि याद्वारे जगाच्या मार्गापेक्षा देवाचा मार्ग कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे या गोष्टीला आमची स्वीकृती असल्याचे आम्ही दाखवू. ईश्वरीय जीवनाचा मार्ग आता आणि निरंतर अनुसरण्याचा आम्ही—दृढपणे आणि एकनिष्ठेने निर्धार केला आहे!
२३ “आम्ही हा संकल्प याकरता करतो कारण देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा सर्वकाळ राहतो, या यहोवाच्या प्रेमळ अभिवचनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही हा संकल्प यासाठी करतो कारण आम्हाला याची खात्री पटली आहे, की शास्त्रवचनीय तत्त्वे, सल्ला आणि बोध यांनुसार चालणे हा आज जगण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे आणि यांमुळे भवितव्याकरता चांगला पायाही रचला जातो जेणेकरून आम्हाला खऱ्या जीवनावरील पकड पक्की करता येईल. (१ तीमथ्य ६:१९; २ तीमथ्य ४:७ ब, ८) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्ही असा संकल्प यासाठी करतो कारण आम्ही पूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने आणि शक्तीने यहोवावर प्रेम करतो!
२४, २५. प्रस्तुत केलेल्या संकल्पाला कशी प्रतिक्रिया मिळाली आणि यहोवाच्या मार्गानुसार चालणाऱ्यांचा काय निर्धार आहे?
२४ “अधिवेशनातील जे कोणी या संकल्पास मान्यता दर्शवू इच्छितात त्यांनी कृपया ‘होय’ असे म्हणावे.”
२५ संपूर्ण जगभरातील शेकडो सभागृहे आणि स्टेडिअम्स उपस्थितांनी “होय” असे म्हटले तेव्हा निनादून उठले. यहोवाच्या मार्गानुसार आपण चालत राहू याविषयी यहोवाच्या साक्षीदारांच्या मनात मुळीच शंका नाही. त्यांचा यहोवावर पूर्ण भरवसा आहे आणि तो त्याची अभिवचने पूर्ण करील यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. कोणतीही परिस्थिती आली तरी ते त्याला एकनिष्ठ राहतात. आणि त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.
‘देव आपल्याला अनुकूल आहे’
२६. यहोवाच्या मार्गानुसार चालणाऱ्यांची कोणती आनंदमय परिस्थिती आहे?
२६ यहोवाच्या साक्षीदारांना स्तोत्रकर्त्याचा आर्जव लक्षात आहे: “परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल.” (स्तोत्र ३७:३४) पौलाचे उत्तेजनप्रद शब्द ते विसरत नाहीत: “देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही?” (रोमकर ८:३१, ३२) आपण यहोवाच्या मार्गानुसार चालत राहिल्यास तो “आपल्या उपभोगासाठी सर्व काही” सज्ज करून देईल. (१ तीमथ्य ६:१७) आपण आपल्या प्रिय बांधवांसोबत आणि बहिणींसोबत यहोवाच्या मार्गानुसार चालत आहोत—यापेक्षा दुसरा कोणता चांगला मार्ग असू शकतो का? यहोवा आपल्या बाजूने आहे, तेव्हा आपण त्याच्या मार्गानुसार शेवटपर्यंत चालत राहण्याचा या विश्वासानिशी निर्धार करू या, की त्याच्या नियुक्त वेळी आपण त्याच्या प्रत्येक अभिवचनाची पूर्णता पाहू.—तीत १:२.
[तळटीपा]
a ‘नाच-तमाशा’ असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा उल्लेख करताना एक टीकाकार असे म्हणतो, की हा शब्द मूर्तिपूजक सणांच्या वेळी होणाऱ्या नाचण्याला सूचित होतो. तो टीकाकार पुढे असे म्हणतो: “यांपैकी अनेक नाच सर्वात अनैतिक वासना जागृत करण्याच्याच उद्देशाने बसवलेले होते हे सर्वज्ञात आहे.”
तुम्हाला आठवते का?
◻ देवाच्या मार्गानुसार चालणाऱ्या ख्रिश्चनाकडून कशाची अपेक्षा केली जाते?
◻ यहोवावरील भरवसा आणि त्याच्याप्रती एकनिष्ठा विकसित करण्याची आपल्याला का आवश्यकता आहे?
◻ यहोवाच्या मार्गानुसार चालता यावे म्हणून आपल्याकरता कोणती मदत उपलब्ध आहे?
◻ “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या अधिवेशनात स्वीकारण्यात आलेल्या संकल्पाचे काही महत्त्वाचे मुद्दे सांगा.
[१८ पानांवरील चित्र]
“ईश्वरी जीवनाचा मार्ग” या प्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशनांत एका महत्त्वपूर्ण संकल्पाचा स्वीकार करण्यात आला