नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
पुढील वर्षाच्या आरंभी सुरू होणाऱ्या दोन दिवसीय विभागीय संमेलन कार्यक्रमाचा विषय, “यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करत राहणे” असा आहे. (२ पेत्र ३:११, १२, NW) निकडीसंबंधी आपली जाणीव जागृत करण्यासाठी याची रचना केली गेली आहे. लवकरच, पृथ्वीवरील रहिवाशांवर यहोवाचे न्यायदंड बजावले जातील. ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवशी’ कोणाचा निभाव लागेल बरे? केवळ अशाच लोकांचा, जे आध्यात्मिकरित्या जागृत राहून, ‘पवित्र वर्तणुकीच्या व सुभक्तीच्या’ जीवनाचा आदर्श राखतात.—प्रकटी. १६;१४; २ पेत्र ३:११.
यहोवाच्या दिवसातून निभावण्यासाठी बाप्तिस्मा आवश्यक आहे. (१ पेत्र ३:२१) या संमेलनात बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या प्रचारकांनी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांना याची माहिती द्यावी जेणेकरून आवश्यक त्या व्यवस्था ते करतील.
“तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” हा विषय विकसित करणारा चार भागांचा परिसंवाद सुस्पष्टपणे दाखवून देईल, की यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करत राहण्यात कोणकोणती कार्ये अंतर्भूत आहेत. “यहोवाचा दिवस जवळ येत असता सुज्ञतेने वागा,” हे जाहीर भाषण, ‘यहोवाचा, न्यायीपणाचा आणि नम्रतेचा शोध’ घेणे म्हणजे काय याचे स्पष्टीकरण देईल.—सफ. २:३, पं.र.भा.
विभागीय संमेलनाचा समारोप, प्रवासी पर्यवेक्षकांच्या दोन प्रेरणादायी भाषणांनी होईल; या भाषणांची शीर्षके असतील: “तुमचे जीवन सत्याभोवती गुंफलेले आहे का?” आणि “यहोवाच्या दिवसाची सतत अपेक्षा करत राहणे.” या भाषणांमुळे, आपल्याला आपल्या जीवनाचे परीक्षण करण्याची आणि आवश्यक फेरबदल करण्याची प्रेरणा मिळेल. बायबल भविष्यवाद आणि जगीक घटना स्पष्टपणे दाखवून देतात, की देवाचा दिवस जवळ आहे. हा संमेलन कार्यक्रम आपल्याला, ‘सावध व जागे राहण्याचे’ उत्तेजन देईल. (१ पेत्र ५:८) दोन्ही दिवशी उपस्थित राहण्याकरता निश्चित योजना आखा.