अर्थभरीत कौटुंबिक पवित्र शास्त्राभ्यास चालविणे
१ पालक ज्या महत्त्वाच्या कार्यहालचाली पार पाडत असतात त्यापैकी एक म्हणजे आपल्या मुलांना सत्याचे शिक्षण देणे. (अनु. ६:६, ७) अभक्त जगात सदाचाराने वागण्यासाठी मुलांना मार्गदर्शन व नेतृत्व करण्याची गरज आहे. त्यांनी यहोवा व सत्यावर प्रीती करून त्याजशी निगडीत राहण्याचा दृढ निर्धार केला पाहिजे. मार्च १, १९८९ च्या टेहळणी बुरुजमध्ये पान ११ वर म्हटले आहेः “तुम्हाला इतर कोणतीही कामे असली वा तुम्ही कोणत्याही त्रासात असला तरीही आपल्या मुलांसोबत वेळ खर्च करणे याला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे. अशाप्रकारे एकत्रपणे घालविलेला वेळ तुमच्या मुलांना आध्यात्मिक मूल्ये शिकवील आणि त्यांच्या अंतःकरणाचे रक्षण करून त्यांना योग्य दिशा दाखवील.”
२ कुटुंबांनी देवाच्या वचनात दिलेल्या मार्गदर्शिका आचरणात आणायच्या असतील तर मग, नियमित रुपाचा कौटुंबिक अभ्यास करण्यासाठी वेळ बाजूला काढलाच पाहिजे. कुटुंबाच्या आध्यात्मिक काळजीसाठी कुटुंब प्रमुखाने प्राधान्य दिले पाहिजे. घरच्या आध्यात्मिक गरजांची काळजी वाहण्यात जर आता योग्य लक्ष दिले गेले नाही तर मग पालकांना भवितव्यात गंभीर समस्यांचा सामना बहुतेक करावाच लागेल.
अभ्यासाचे साहित्य व पद्धती
३ कशाचा अभ्यास करावा? कुटुंबाला कशाची गरज आहे हे कुटुंब प्रमुख चांगल्या रितीने ठरवू शकतो. हितकारक ठरू शकेल असे काय अभ्यासावे याविषयी ते कुटुंबातील इतरांचा परामर्श घेऊ शकतील व मग त्याविषयी विचार करता येईल. मोकळेपणा हा कुटुंबातील अभ्यास व्यावहारिक व उत्तेजक ठरवू शकतो. पुष्कळ कुटुंबे दर आठवड्याचा टेहळणी बुरुज अभ्यास एकत्रपणे करतात. तथापि, कधीकधी युवकांना शाळेत भेडसावणाऱ्या समस्यांविषयीची सविस्तर चर्चा करण्याची गरज उद्भवते. भेटीगाठी, शाळा सुटल्यावर घडणाऱ्या अधिक हालचाली, खेळ, तसेच अनैतिक प्रवृत्त्या यावर प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्याचा उभारणीकारकपणे व उत्तेजन मिळू शकेल अशा पद्धतीने विचार केला जावा. कुटुंबाला कोणत्या माहितीची गरज आहे व ती त्यांच्या अंतःकरणाप्रत कोणत्या चांगल्या पद्धतीने नेता येईल याविषयी कुटुंब प्रमुखाने सतत परिक्षण करीत राहणे महत्त्वाचे आहे.—पहा द वॉचटावर, फेब्रुवारी १५, १९७१, पृष्ठे १०५-६.
४ अभ्यास कसा चालविला जावा? आरामदायी तसेच आदरणीय वातावरण निर्माण करा. तांत्रिक तसेच अगदीच औपचारिक पद्धत टाळा. अधिक प्रश्न विचारा, विचारास चालना देण्यासाठी उदाहरणे वापरा आणि सर्वांना भाग घेऊ द्या. नकाशे, तक्ते यासारखी दर्शनोपयोगी साधने वापरुन विषयाची अधिक माहिती देता येईल. मुलांचे वय व क्षमता यानुसार इंडेक्स किंवा इन्साईट खंडातील साहित्य शोधून काढण्यास त्यांना नेमून दिले जाऊ शकते. मुले प्रतिसाद देऊ लागतात त्या वयापासूनच त्यांना चर्चेत भाग घेण्याचे प्रोत्साहन द्या. त्यांना थोडक्या शब्दात उत्तर देता येईल असे साधे प्रश्न विचारा. अभ्यासाचा वेळ मुलांना दटाविण्यासाठी वापरु नका. उलटपक्षी, त्यांची प्रशंसा करा, त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन करा आणि त्यांच्याबरोबर आध्यात्मिक दृष्टीकोणांची सहभागिता उत्साहाने करा.
५ तुम्ही अंतःकरणाप्रत जात आहात हे तुम्हाला कसे कळू शकेल? सर्वांना स्वतःच्या शब्दात उत्तरे देण्यास सांगा. अंतःकरणातील स्थिती कशी आहे हे पडताळून पाहण्यासाठी दृष्टीकोनात्मक प्रश्नांचा चतुरपणे उपयोग करा. तुम्हाला विचारता येईलः “शाळेतील मुलांना याविषयी काय वाटते? याविषयी तुम्हाला काही संशय वाटतो का?” या दृष्टीकोणात्मक प्रश्नांना मुले जी उत्तरे देतात ते ऐकून त्यावर प्रतिहल्ला चढवू नका; कारण मग मुलांना प्रामाणिकपणे उत्तरे देण्यात संकोच वाटू लागेल. त्यांना बोलण्यास वेळ द्या. आपल्यामध्ये व आपल्या समस्यांमध्ये पालकांना रस वाटतो आहे ही जाणीव मुलांमध्ये आली म्हणजे तुमच्या शिक्षण पद्धतीला अधिक सहजता प्राप्त होईल.—पहा द वॉचटावर, नोव्हेंबर १, १९८६, पृष्ठे २३-५.
६ कौटुंबिक अभ्यासाचे मुख्य धोरण हे मंडळीच्या सभांमध्ये उत्तरे द्यावीत हे नव्हे तर यहोवाचे विचार मनावर बिंबवावे हे आहे, हे लक्षात ठेवा. (इफिस. ३:१७-१९) याचा अर्थ ती माहिती हृदयाप्रत पोहंचविण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. कुटुंबाने देवाच्या इच्छेप्रमाणे का वागले पाहिजे आणि हाच जीवनामधील सर्वोत्तम मार्ग का आहे याविषयीची कारणमीमांसा कुटुंबाला कळू द्या.
७ कुटुंबाची आध्यात्मिकता वाढविण्यासाठी नियमित रुपाचा कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे जीवनाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी मुलांची तयारी केली जाते. तुमच्या मुलांना मदत देण्याच्या बाबतीत तुम्ही पालकच योग्य स्थानावर आहात. तद्वत, आपली देवप्रणीत जबाबदारी पूर्ण करा. अर्थभरीत असा कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यामध्ये तुम्ही जे जे प्रयत्न कराल ते सर्व यहोवा आशीर्वादित करील याची खात्री बाळगा.