जीवन कथा
तरुणपणी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना कधीही पस्तावा झाला नाही
माझ्या आजीचे मोठे भाऊ, निकोलाई ड्युबोविस्की यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटल्या काही वर्षांमध्ये आपले अनुभव एकत्र केले होते. यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असताना त्यांना जे चांगले-वाईट अनुभव आलेत ते त्यांनी लिहून ठेवले आहेत. त्यातले बरेच अनुभव सोव्हिएत संघाची आपल्या कार्यावर बंदी होती त्या वेळचे आहेत. अनेक आव्हानं आणि समस्या असतानाही ते यहोवाला नेहमी विश्वासू राहिले. शिवाय, जीवनाविषयी त्यांना कमालीची ओढ होती. तरुणांनी माझा अनुभव ऐकला पाहिजे, असं आजोबा नेहमीच म्हणायचे. त्यामुळे, त्यांच्या जीवनात घडलेल्या काही खास घटना मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्यांचा जन्म १९२६ साली एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब युक्रेनच्या चर्नेवटी ओब्लास्ट इथल्या पॉडवायरीका या लहानशा गावात होतं.
निकोलाई यांची सत्याशी ओळख
आजोबा सांगतात: “१९४१ साली एके दिवशी माझा मोठा भाऊ इवान, साक्षीदारांची काही प्रकाशनं घरी घेऊन आला. त्यानं काही पुस्तिका, टेहळणी बुरूज मासिकं तसंच द हार्प ऑफ गॉड आणि द डिव्हाईन प्लॅन ऑफ दी एजेस ही पुस्तकं आणली. मी ही सर्व वाचून काढली. आज जगात चाललेल्या समस्यांसाठी देव नाही, तर दियाबल सैतान जबाबदार आहे हे समजल्यावर मला आश्चर्यच वाटलं. या प्रकाशनांसोबत मी शुभवर्तमानाची पुस्तकही वाचलीत. आणि हेच सत्य आहे हे मला तेव्हा जाणवलं. मला मिळालेली राज्याची आशा मी इतरांनाही अगदी आवेशानं सांगितली. या साहित्यांचा मी जसजसा अभ्यास करत गेलो, तसतशी सत्याबद्दलची माझी समज वाढत गेली. त्यामुळेच, यहोवाचा सेवक बनण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.
“माझ्या विश्वासांमुळे माझा छळ होईल हे मला माहीत होतं. तो युद्धाचा काळ होता आणि युद्धात कोणाचा जीव घेणं मला जमणार नव्हतं. त्यामुळे, पुढे येणाऱ्या पेच-प्रसंगांना तोंड देता यावं म्हणून मी मत्तय १०:२८ आणि २६:५२ यांसारखी वचनं मुद्दामहून लक्षात ठेवण्यास सुरवात केली. यहोवाला शेवटपर्यंत विश्वासू राहण्याचा माझा पक्का निर्धार होता, अगदी मरण आलं तरी!
“१९४४ साली मी १८ वर्षांचा झालो तेव्हा सैन्यात भरती होण्याकरता मला बोलावण्यात आलं. तिथंच माझी पहिल्यांदा इतर बांधवांसोबत भेट झाली. १८-१९ वर्षांच्या त्या बांधवांनाही सक्तीच्या लष्करी सेवेसाठी, सैन्यभरतीच्या ठिकाणी आणण्यात आलं होतं. आम्ही सर्व साक्षीदार तरुणांनी अधिकाऱ्यांना अगदी ठामपणे सांगितलं, की आम्ही युद्धात सहभाग घेणार नाही. तेव्हा आम्ही तुम्हाला उपाशी मारू, काबाडकष्ट करायला लावू नाहीतर गोळ्या घालून मारू, अशी धमकी त्या चिडलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली. पण, तरीसुद्धा त्यांच्या या धमकीला आम्ही घाबरलो नाही आणि अगदी धीटपणे त्यांना सांगितलं: ‘आम्ही तुमच्या हातात आहोत. पण, तुम्ही काहीही केलं तरी, “खून करू नको,” ही देवाची आज्ञा आम्ही मोडणार नाही.’—निर्ग. २०:१३.
“याचा परिणाम म्हणजे मला आणि आणखी दोन बांधवांना बेलारूसमध्ये पाठवण्यात आलं. तिथं आम्हाला शेतमजूरीच्या कामात आणि युद्धात मोडलेल्या घरांची डागडूजी करण्याच्या कामात जुंपण्यात आलं. मिस्कच्या सीमेजवळ युद्धाचे जे भयंकर परिणाम मी पाहिले, ते मी कधीच विसरू शकणार नाही. रस्त्याच्या कडेला जळालेली झाडं, उघड्यावर पडलेली प्रेतं आणि खड्ड्यांत व जंगलात इकडे-तिकडे पडलेले घोड्यांचे फुगलेले शव. बेवारसपणे पडलेल्या गाड्या, लष्करी सामानसुमान आणि मोडलेल्या विमानांचे सांगाडे. या सर्व गोष्टी पाहून देवाचे नियम मोडण्याचा परिणाम किती भयंकर असतो, हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय.
“१९४५ साली युद्ध संपलं. पण तरीही युद्धात सहभाग न घेतल्यामुळे आम्हाला दहा वर्षं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सुरवातीची तीन वर्षं आम्ही आध्यात्मिक अन्नाला वंचित राहिलो. आम्हाला कोणताच ख्रिस्ती सहवास लाभला नाही, ना कोणती छापील प्रकाशनं आमच्याजवळ होती. पत्राद्वारे काही बहिणींशी आम्ही संपर्क साधला, पण त्यांनाही अटक करून २५ वर्षं सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली.
“पण शिक्षेचा काळ पूर्ण होण्याआधीच १९५० साली आम्हाला सुटका मिळाली आणि आम्ही घरी परतलो. मी तुरुंगात असताना, माझी आई आणि माझी धाकटी बहीण, मारीया यहोवाचे साक्षीदार बनल्या होत्या! माझे मोठे भाऊ अजून साक्षीदार नव्हते, पण त्यांचा बायबल अभ्यास मात्र चालू होता. प्रचारकार्यात मी अगदी आवेशानं काम करायचो. त्यामुळे सोव्हिएतच्या सुरक्षादलाची मला पुन्हा तुरुंगात पाठवण्याची इच्छा होती. त्यामुळे, आपल्या कार्याची देखरेख करण्याऱ्या बांधवांनी मला भूमिगत होऊन साहित्य छापण्याच्या कामात मदत करण्यास सुचवलं. त्या वेळी मी २४ वर्षांचा होतो.”
प्रकाशनं तयार करणं
“‘जर राज्याचं कार्य करण्यावर तुम्ही बंदी घातली, तर आम्ही जमिनीखालून ते करू,’ असं साक्षीदारांचं घोषवाक्यच बनलं होतं. (नीति. २८:२८) छपाई करण्याचं बहुतेक काम लोकांच्या नजरेआड, भूमिगत होऊन केलं जायचं. माझा मोठा भाऊ दिमीत्री याच्या घराखाली बनवलेल्या एका छोट्याशा खोलीत मी माझ्या कामाची सुरवात केली. कधीकधी तर मी सलग दोन-दोन आठवडे त्या खोलीत असायचो. ऑक्सिजन कमी पडल्यामुळे जेव्हा कंदील बंद व्हायचा तेव्हा खोलीत ताजी हवा येईपर्यंत मी झोपून राहायचो.
निकोलाई ज्या ठिकाणी प्रकाशनांच्या प्रती तयार करायचे त्या जमिनीखालच्या खोलीचं चित्र
“एके दिवशी माझ्यासोबत काम करणाऱ्या बांधवानं मला विचारलं, ‘निकोलाई तुझा बाप्तिस्मा झालाय का?’ मी ११ वर्षांपासून यहोवाची सेवा करत होतो, पण अजूनही माझा बाप्तिस्मा झाला नव्हता. त्यामुळे, त्या रात्री त्या बांधवानं माझ्यासोबत या विषयावर चर्चा केली. आणि २६ वर्षांचा असताना एका तलावात मी बाप्तिस्मा घेतला. याच्या तीन वर्षांनंतर माझ्यावर आणखी एक जबाबदारी सोपवण्यात आली. मला कंट्री कमिटीचा सदस्य म्हणून नेमण्यात आलं. त्या वेळी कोणाला अटक केल्यास, त्याच्या जागी दुसऱ्या बांधवाला नेमण्यात यायचं. त्यामुळे, राज्याचं काम कधी थांबायचं नाही.”
भूमिगत होऊन काम करताना आलेल्या अडचणी
“भूमिगत होऊन छापाईचं काम करणं, तुरुंगापेक्षाही कैक पटीनं कठीण होतं! राज्य सुरक्षा समितीच्या (केजीबी) नजरेत येऊ नये म्हणून मी तब्बल सात वर्षं मंडळीच्या सभांना गेलो नाही. त्यामुळे मला स्वतःलाच माझ्या आध्यात्मिकतेची काळजी घ्यावी लागली. मी क्वचितच माझ्या घरी जायचो आणि फक्त तेव्हाच माझ्या कुटुंबाला भेटणं मला शक्य व्हायचं. पण, तरीही ते माझी परिस्थिती समजून घ्यायचे आणि त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळायचं. एकसारखा मानसिक ताण आणि भीती यांमुळे मी अगदी खचून गेलो होतो. आम्हाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावं लागायचं. उदाहरणार्थ, मी राहत असलेल्या घरात एके दिवशी संध्याकाळी दोन पोलीस अधिकारी आले. स्वतःचा बचाव करण्यासाठी मी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीतून उडी मारली आणि थेट जंगलात पळ काढला आणि एका शेतात येऊन पोचलो. तिथं, कोणीतरी शीळ घालत असल्यासारखा आवाज मला ऐकू येत होता. पण जेव्हा गोळीबाराचा आवाज मी ऐकला, तेव्हा मला समजलं की तो आवाज खरंतर बंदुकीच्या गोळ्यांचा आहे! एक अधिकारी तर चक्क घोड्यावर स्वार होऊन माझा पाठलाग करू लागला. बंदुकीच्या सर्व गोळ्या संपेपर्यंत तो माझ्यावर एका मागून एक गोळ्या झाडत होता. त्यातली एक गोळी माझ्या हाताला लागली. शेवटी, पाच किलोमीटर लांब पळ काढल्यानंतर मी जंगलात लपून बसलो आणि कसाबसा त्यांच्या हातून सुटलो. नंतर, जेव्हा माझी चौकशी करण्यात आली तेव्हा मला समजलं, की त्या वेळी माझ्यावर चक्क ३२ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या!
“इतका जास्त वेळ जमिनीखाली राहून काम केल्यामुळे माझा रंग फिका पडला होता. त्यामुळे, मी काय काम करायचो हे लोकांना लगेच लक्षात यायचं. म्हणून, मी जास्तीतजास्त वेळ उन्हात घालवायचो. जमिनीखाली राहून काम करत असल्यामुळे माझ्या तब्येतीवरही त्याचा परिणाम झाला. एकदा तर माझ्या नाकातोंडातून रक्त येत असल्यामुळे, इतर बांधवांसोबत असलेल्या एका महत्त्वाच्या सभेलाही मला जाता आलं नाही.”
निकोलाई यांना अटक
१९६३ साली मॉदविनीया इथल्या सक्तमजुरीच्या शिबिरात
“२६ जानेवारी १९५७ साली मला अटक करण्यात आली आणि सहा महिन्यांनंतर युक्रेनच्या सर्वोच्च न्यायालयानं निकाल जाहीर केला. मला गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. पण, देशात मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केल्यामुळे माझ्या शिक्षेमध्ये फेरबदल करून मला २५ वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. या काळादरम्यान आम्हा आठ जणांना सक्तमजुरीची शिक्षाही देण्यात आली. यासाठी आम्हाला मॉदविनीया इथल्या शिबिरात पाठवण्यात आलं. तिथं जवळजवळ ५०० साक्षीदार होते. आम्ही अगदी गुप्तपणे छोट्या गटांमध्ये एकत्र येऊन, टेहळणी बुरूजचा अभ्यास करायचो. जप्त करण्यात आलेली आमची काही मासिकं वाचल्यानंतर तिथल्या एका पहारेकऱ्यानं म्हटलं: ‘तुम्ही जर ही मासिकं असंच वाचत राहिलात, तर तुमचा विश्वास तोडणं अशक्यच होईल!’ आम्ही अगदी प्रामाणिकपणे आमचं काम करायचो. खरंतर आमच्यावर जितकं काम सोपवण्यात यायचं, त्यापेक्षा जास्त काम आम्ही करायचो. पण, तरीही शिबिराचा अधिकारी नेहमी कुरकूर करायचा. तो म्हणायचा, ‘तुम्ही राबताय त्याचं आम्हाला काही घेणं-देणं नाही. आम्हाला तुमच्याकडून फक्त देशभक्तीची अपेक्षा आहे.’”
“आम्ही अगदी प्रामाणिकपणे आमचं काम करायचो. खरंतर आमच्यावर जितकं काम सोपवण्यात यायचं त्यापेक्षाही जास्त काम आम्ही करायचो”
निकोलाई शेवटपर्यंत एकनिष्ठ होते
वेलकीई लूकी इथलं राज्य सभागृह
१९६७ साली सक्तमजुरीच्या शिक्षेतून सुटका झाल्यानंतर आजोबांनी एस्टोनीया आणि सेंट. पीटर्सबर्ग इथं मंडळ्या स्थापित करण्याच्या कामात मदत केली. १९९१ सालच्या सुरवातीला काही सबळ पुरावे नसल्यामुळे, न्यायालयानं १९५७ साली दिलेला निकाल, रद्द करण्यात आला. त्या वेळी ज्या अनेक साक्षीदारांना अधिकाऱ्यांच्या वाईट वागणुकीचा सामना करावा लागला होता त्यांच्यावर लावलेल्या आरोपातून त्यांनाही मुक्त करण्यात आलं होतं. १९९६ साली आजोबांनी सेंट पीटर्सबर्गपासून जवळजवळ ५०० किलोमीटर लांब असलेल्या स्कोवा ओब्लास्ट इथल्या वेलकीई लूकी या शहरात स्थलांतर केलं. तिथं त्यांनी एक घर घेतलं आणि २००३ साली त्यांच्या स्वतःच्या जागेवर एक राज्य सभागृह बांधण्यात आलं. आता तिथं दोन मंडळ्यांच्या सभा चालतात.
माझे पती आणि मी सध्या रशियामधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात सेवा करत आहोत. २०११ सालच्या मार्च महिन्यात, आजोबांनी त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांआधी आम्हाला शेवटची भेट दिली. त्या वेळी त्यांचं वय ८५ होतं. आमच्याशी बोलताना ते म्हणाले: “सध्या जे काही घडतंय, त्याविषयी मला हेच वाटतंय की यरीहोभोवती सातवी प्रदक्षिणा आता सुरू झाली आहे.” (यहो. ६:१५) हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज होतं. त्यांचे ते शब्द आमच्या मनात अगदी खोलवर गेले. तसं पाहायला गेलं तर आजोबांचं जीवन काही सोपं नव्हतं. पण तरी, ते म्हणायचे: “मला याचं नेहमी समाधान वाटतं, की मी तरुण वयातच यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. मला याचा कधीच पस्तावा वाटला नाही!”