जीवन कथा
पूर्ण वेळेच्या सेवेद्वारे—यहोवाचे आभार मानणे!
स्टॅनली ई. रेनॉल्ड्स् यांच्याद्वारे कथित
सन १९१० मध्ये लंडन, इंग्लडमध्ये माझा जन्म झाला. पहिल्या महायुद्धानंतर आम्ही विल्टशायरच्या वेस्टबरीला या छोट्याशा गावात राहायला गेलो. ‘देव कोण आहे?’ हा प्रश्न लहानपणी माझ्या मनात नेहमी यायचा. पण या प्रश्नाचं उत्तर मला कोणी दिलं नाही. आणि मला हे देखील समजत नव्हतं, की आमच्या या छोट्याशा वस्तीत एकाच देवाची उपासना करण्याकरता दोन-दोन प्रार्थना घरांची आणि चर्चची काय गरज आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या चार वर्षांपूर्वी, सन १९३५ मध्ये मी आणि माझा धाकटा भाऊ डिक सुटीला सायकलवरून निघालो. आम्ही इंग्लडच्या दक्षिण किनाऱ्यावर वेमथ खाडीवर सुटीला गेलो. तेथे पोहंचल्यावर पाऊस पडू लागला त्यामुळे आम्हाला तंबूतच बसून राहावं लागलं. आता काय करावं अशा विचारात आम्ही होतो; तेवढ्यात एक वयस्कर गृहस्थ आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला बायबलची समज देणारी तीन पुस्तकं दिली—द हार्प ऑफ गॉड, लाईट I आणि लाईट II. वाचण्यात तेवढाच वेळ निघून जाईल म्हणून मी ती पुस्तकं घेतली. पण, या पुस्तकांनी तर जणू माझ्यावर मोहिनीच केली. ही पुस्तकं पुढे आम्हा दोघा भावांचं जीवनच बदलून टाकतील असं तेव्हा मला वाटलं नव्हतं.
घरी आल्यानंतर आईला मी या पुस्तकांविषयी सांगितलं. तेव्हा आई म्हणाली की, केट पारसन्स नावाची एक वयस्कर स्त्री देखील गावातील लोकांना अशीच बायबलवर आधारित पुस्तकं देते. सगळेजण त्यांना ओळखायचे, कारण त्या आमच्या परिसरातील लोकांना भेटण्याकरता आपल्या छोट्या मोटारसायकलने यायच्या. मी त्यांना भेटायचं ठरवलं. भेटल्यानंतर त्यांनी मला वॉचटावर संस्थेची क्रिएशन आणि रिचेस तसेच इतरही पुस्तकं वाचायला दिली. त्या एक यहोवाच्या साक्षीदार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मी ती सगळी पुस्तकं वाचली, आणि त्यात दिलेली वचनं माझ्या बायबलमधून काढून पाहिली तेव्हा मला याची खातरी पटली की, यहोवाच खरा देव आहे. मला आता त्याची उपासना करायची होती. त्यामुळे मी चर्च सोडत असल्याची एक चिठ्ठी माझ्या चर्चच्या पाळकाला लिहिली. आणि त्यानंतर मी जॉन आणि ॲलिस मूडी यांच्या घरी सभांकरता जाऊ लागलो. आमच्या घरापासून जवळच वेस्टबरीमध्ये त्यांचं घर होतं. त्या सभांना केवळ सात लोक यायचे. सभेच्या आधी आणि नंतर, केट पारसन्स हारमोनियम वाजवायचे आणि आम्ही मोठ्या उत्साहाने राज्यगीतं गायचो!
सुरवातीचे दिवस
आपण एका विशेष काळात जगत आहोत हे मला आता समजू लागलं होतं. मत्तय २४:१४ मधील भविष्यवाणीनुसार प्रचार कार्यात भाग घेण्याची माझी मनापासून इच्छा होती. त्याकरता मी सिगारेट ओढण्याचं सोडून दिलं, प्रचारकार्याकरता एक ब्रिफकेस विकत घेतली आणि यहोवा देवाला माझं जीवन समर्पित केलं.
सन १९३६ च्या ऑगस्ट महिन्यात वॉच टावर संस्थेचे अध्यक्ष जोसेफ, एफ. रदरफर्ड, स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामध्ये आले होते आणि ते “हर्मगिदोन” या विषयावर भाषण देणार होते. माझ्या राहत्या ठिकाणापासून ग्लासगो शहर सुमारे ६०० किलोमीटर दूर होतं. तेथे जाऊन बाप्तिस्मा घेण्याचा मी निर्णय घेतला. माझ्याकडे थोडेच पैसे होते, त्यामुळे मी स्कॉटलंडच्या हद्दीवर असलेल्या कारलाइल शहरापर्यंत रेल्वेनं प्रवास केला. सोबत मी माझी सायकल देखील घेऊन गेलो होतो. कारलाइल येथे पोहंचल्यानंतर मी उत्तरेकडे १६० किलोमीटरचा प्रवास सायकलने केला. घरी परत येताना मी जास्तीत-जास्त प्रवास सायकलनेच केला आणि त्यामुळे घरी पोहंचेपर्यंत मी अगदी थकून गेलो होतो, पण आध्यात्मिकरित्या मी फार ताजातवाना आणि मजबूत झालो होतो.
मी आसपासच्या गावातील लोकांना माझ्या विश्वासासंबंधी सांगू लागलो. त्याकाळी साक्षीदारांकडे बायबलचा संदेश लिहिलेलं एक टेस्टमनी कार्ड असायचं जे आम्ही लोकांना वाचायला द्यायचो. तसेच बायबलवर आधारित संस्थेच्या अध्यक्षांची भाषणं आम्ही ग्रामोफोनद्वारे लोकांना ऐकवायचो. आणि हो, आमच्यासोबत नेहमी मॅगझिन बॅगa असायची; ही बॅग पाहून आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत हे लोकांना लगेच कळायचं.
युद्ध चालू असताना पायनियरींग
सन १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. सन १९४० मध्ये माझ्या भावाने बाप्तिस्मा घेतला. प्रचाराचं महत्त्व ओळखून आम्ही दोघा भावांनी पायनियरींगचा अर्ज भरला. आम्हा दोघांना ब्रिस्टल पायनियर होममध्ये जाऊन तेथील पायनियरांसोबत काम करायला सांगण्यात आलं. तेव्हा आम्हाला झालेल्या आनंदाचं वर्णन करता येणार नाही. ब्रिस्टल पायनियर होममध्ये ईडथ पूल, बर्ट फार्मर, टॉम आणि डॉरथी ब्रिजिस, बर्नार्ड होटन आणि अनेक पायनियर होते. कित्येक वर्षांपासून या पायनियरर्सना पाहून आम्हाला उत्तेजन मिळायचं आणि आता तर प्रत्यक्ष त्यांच्यासोबत आम्ही काम करणार होतो.
एक लहानशी व्हॅन आम्हाला प्रचाराला घेऊन जाण्यासाठी आली. या गाडीच्या दोन्ही बाजूला मोठ्या अक्षरांमध्ये “यहोवाचे साक्षीदार” असं लिहिलं होतं. स्टॅनली जोन्स हे गाडी चालवत होते. नंतर मिशनरी कार्याकरता त्यांना चीनमध्ये पाठवण्यात आलं आणि तेथे त्यांना प्रचारकार्यामुळे अटक करण्यात आली व सात वर्षे अंधारकोठडीत डांबून ठेवण्यात आलं.
दुसरं महायुद्ध जोर पकडत होतं त्यामुळे आमची झोप उडाली होती. आमच्या पायनियर होमच्या आजूबाजूला बॉम्ब पडत होते. बॉम्बमुळं आसपास कुठं आग तर लागली नाही ना, हे पाहण्यासाठी आम्हाला डोळ्यात तेल घालून जागं राहावं लागायचं. या काळादरम्यान ब्रिस्टल शहराच्या मध्यभागी एक संमेलन आयोजित करण्यात आलं, त्या संमेलनाला २०० साक्षीदार आले होते. संमेलनानंतर, बॉम्बवर्षावातच जीव मुठीत घेऊन आम्ही आमच्या पायनियर होममध्ये परतलो.
आमचं काही सामान घेण्याकरता मी आणि डिक दुसऱ्या दिवशी शहरात गेलो. ब्रिस्टल शहर बॉम्ब हल्ल्यामुळं जळून खाक झालं होतं. शहराचा झालेला उध्वंस पाहून आमचं तर अवसानचं गळालं. पार्क स्ट्रीटवरील राज्यसभागृहावर बॉम्ब पडला होता तेथील मातीच्या ढिगाऱ्यातून अजूनही धूर निघत होता. पण, या हल्ल्यात आमच्या कोणत्याही भाऊबहिणींना इजा झाली नव्हती किंवा कोणाला जीव गमवावा लागला नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, राज्य सभागृहातील बायबल साहित्य आधीच दुसरीकडे हालविल्यामुळे त्याचेही नुकसान टळलं होतं. याकरता आम्ही यहोवाचे खूप आभार मानले.
अनपेक्षित स्वातंत्र्य
लढाईत भाग घेण्यास नकार दिल्यामुळे कित्येक बांधवांना अटक करण्यात आली होती. मला देखील इतरांप्रमाणे सैन्यात भरती होण्याकरता आवश्यक असणारी कागदपत्रं भरण्याची ताकीद देण्यात आली. त्यावेळी मी ६४ प्रचारक असलेल्या ब्रिस्टल मंडळीचा प्रिसायडिंग ओव्हरसियर होतो. ब्रिस्टलच्याच कोर्टात माझ्याविरूद्ध खटला भरण्यात आला. ॲन्थनी बक हे बांधव माझे वकील होते. त्यांनी आधी जेलमध्ये अधिकारी म्हणून काम पाहिलं होतं. ते धाडसी आणि निडर स्वभावाचे होते आणि मोठ्या आवेशाने लोकांना बायबलचे सत्य सांगायचे. त्यांनी इतक्या चांगल्याप्रकारे खटला लढवला, की त्यानंतर मिळालेल्या निर्णयावर माझा विश्वासच बसला नाही. सैन्यात भरती होण्यापासून एका अटीवर मला पूर्ण सूट देण्यात आली होती. ती अट म्हणजे, मी प्रचार कार्य कधीही बंद न करता निरंतर करत राहावं!
या स्वातंत्र्यामुळे माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. मी मग पक्कं ठरवलं, की मिळालेल्या या स्वातंत्र्याचा पूर्ण फायदा घ्यायचा, होता होईल तितकं प्रचार काम करायचं. त्यानंतर एके दिवशी मला एक फोन आला आणि लंडन शाखा दफ्तराचे ओव्हरसियर बंधू अल्बर्ट श्रोडर यांनी मला तिथे बोलावलं. यहोवा आता मला कोणतं काम देणार आहे, हा प्रश्न साहजिकच माझ्या मनात आला. इंग्लडच्या यॉर्कशायरच्या क्षेत्रात सर्किट ओव्हरसियर म्हणून काम करायला बंधू श्रोडर यांनी मला सांगितलं तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मला दर आठवडी वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटून त्यांना उत्तेजन द्यायचं होतं, त्यांची मदत करायची होती. हे काम मला पेलवेल असं मला खरं तर वाटलं नव्हतं, पण सैन्यात भरती होण्यापासून मला सूट देण्यात आली होती आणि मी कोठेही जाऊन प्रचार करू शकत होतो. त्यामुळे यहोवाने दिलेल्या नियुक्तीला आनंदाने होकार देऊन मी या कामाला लागलो.
बंधू श्रोडर यांनी हडर्सफील्डच्या एका संमेलनात माझी ओळख तेथील बांधवांशी करून दिली आणि एप्रिल १९४१ मध्ये मी या नवीन कामाला जुंपलो. या प्रेमळ भाऊबहिणींचा सहवास मिळाल्यामुळे मला जो आनंद मिळाला त्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील! त्यांच्या प्रेमामुळे आणि चांगुलपणामुळे ही गोष्ट माझ्या मनात पूर्ण ठसली, की यहोवाचे लोक मनापासून त्याची सेवा करतात आणि आपल्या बांधवांवर त्यांचे जिवापाड प्रेम आहे.—योहान १३:३५.
सेवा करण्याच्या अनेक संधी मिळाल्या
सन १९४१ मध्ये लीस्टर शहरातील ड मॉन्तफर्ट हॉलमध्ये पाच दिवसांचं एक अधिवेशन झालं. त्यावेळी देशामध्ये राशन कार्डवर धान्य मिळायचं आणि येण्या-जाण्याकरता बस आणि रेल्वेच्या इतक्या सोयी नव्हत्या. तरी देखील अधिवेशनाची हजेरी वाढत गेली आणि रविवारी तर १२,००० लोक या अधिवेशनाला आले होते. आणि त्यावेळी ब्रिटनमध्ये फक्त ११,००० साक्षीदार होते. संस्थेच्या अध्यक्षांचं भाषण ऐकवण्यात आलं आणि चिल्ड्रन पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. दुसरं महायुद्ध सुरू असताना हे अधिवेशन भरवण्यात आल्यामुळे ब्रिटनमधील यहोवाच्या साक्षीदारांकरता या अधिवेशनाचं महत्त्व काही निराळंच होतं.
या अधिवेशनानंतर मला लंडन बेथेलमध्ये सेवा करण्याकरता बोलवण्यात आलं. मी तेथे शिपिंग आणि पॅकिंग विभागांत काम केलं आणि त्यानंतर मला देशभरातील मंडळ्यांची काळजी घेणाऱ्या विभागांत काम देण्यात आलं.
युद्धादरम्यान लंडन शहरावर रात्रंदिवस हवाई हल्ले होत होते आणि त्यामुळे बेथेल कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. शिवाय सरकारी अधिकाऱ्यांकडून संघटनेतील जबाबदार बांधवांची एकसारखी चौकशी चालू होती. प्राइस ह्यूज, ईवर्ट चिटी आणि फ्रँक प्लॅट या सर्व बांधवांना युद्धात भाग घ्यायला नकार दिल्यामुळे अटक करण्यात आली होती आणि अखेरीस अल्बर्ट श्रोडर यांना अमेरिकेला परत पाठवण्यात आलं. या सर्व समस्या असूनही प्रचार कार्यात प्रगती होत होती आणि मंडळ्यांची हवी ती काळजी घेण्यात येत होती.
गिलियडसाठी रवाना!
सन १९४५ मध्ये युद्ध संपल्यानंतर मी गिलियड स्कूलमध्ये मिशनरीचे प्रशिक्षण मिळावे म्हणून अर्ज भरला आणि मला १९४६ मध्ये आठव्या वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. संस्थेने कित्येक बांधवांची येण्याची व्यवस्था केली होती, माझ्यासोबत टोनी ऑटवुड, स्टॅनली जोन्स, हेराल्ड किंग, डॉन रेन्डेल आणि स्टॅनली वुडबर्न हे बांधव या वर्गाला येणार होते. आम्ही फॉईच्या कॉर्निश बंदरापासून प्रवास सुरू केला. तिथल्याच एका बांधवाने मालवाहू जहाजाने जाण्यासाठी आमची तिकीटं काढली होती. हे जहाज चिनीमाती घेऊन चाललं होतं. आम्हाला देण्यात आलेल्या खोल्या फारच लहान होत्या आणि जहाजाच्या डेकवर नेहमी पाणी भरलेलं असायचं. फिलाडेल्फिया बंदराजवळ आमचं जहाज एकदाचं थांबलं आणि आम्ही सुटलो.
गिलियड स्कूलचं कॅम्पस, न्यूयॉर्क शहराच्या उत्तरेकडील साऊथ लॅन्सिंगच्या सुंदर परिसरात होतं. तिथे मिळालेल्या प्रशिक्षणाची मी तुलना करू शकत नाही. आमच्या वर्गात १८ वेगवेगळ्या देशांतून भाऊबहीण आले होते. पहिल्यांदाच संस्थेनं दुसऱ्या देशांतील इतक्या प्रचारकांना या स्कूलकरता बोलावलं होतं. या प्रशिक्षणाच्या काळात आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. फिनलंडमधून आलेल्या कॅले सालवारा या बांधवाची आणि माझी एकाच खोलीत राहण्याची व्यवस्था केली होती त्यामुळं पुढे आमची चांगली मैत्री झाली.
या प्रशिक्षणाचा पाच महिन्यांचा कालावधी कसा निघून गेला काही कळलं नाही. त्यानंतर ब्रुकलीन मुख्यालयातून आलेले संस्थेचे अध्यक्ष बंधू नेथन एच. नॉर यांनी आम्हाला डिप्लोमा दिला आणि आम्हाला कोणकोणत्या क्षेत्रात पाठविण्यात येईल ते सांगितलं. मिशनरी झाल्यानंतर कोठे पाठवण्यात येईल हे आधीच विद्यार्थ्यांना सांगितलं जात नव्हतं. पदवीदानाच्या कार्यक्रमाच्यावेळी नियुक्त देशांची किंवा ठिकाणांची नावं जाहीर केली जायची. मला परत लंडनमध्ये माझं काम पुढे चालू ठेवण्याकरता पाठवण्यात आलं.
लंडनला परत
युद्धानंतर ब्रिटनमध्ये आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. अन्नधान्य, जीवनावश्यक इतर वस्तू आणि कागद देखील रेशनवर दिला जात होता. त्यामुळे आम्हाला कसंतरी भागवावं लागत होतं. पण या गोष्टी यहोवाच्या कामात आड येऊ शकल्या नाहीत. बेथेल कार्यासोबतच मी प्रांतिय आणि विभागीय संमेलनांना संस्थेचा प्रतिनिधी या नात्याने जात होतो, शिवाय आयर्लंडच्या तसेच इतर मंडळ्यांना सर्किट ओव्हरसियर म्हणून भेट देत होतो. या दरम्यान मला युरोपच्या भाऊबहिणींना आणि खासकरून बंधू एरिक फ्रॉस्ट यांना भेटण्याची संधी मिळाली. नात्सी यातना शिबिरांत सहन कराव्या लागणाऱ्या यातना आणि तशातही यहोवाशी एकनिष्ठ राहणाऱ्या बंधूभगिनींचे अनुभव ते आम्हाला सांगायचे. बेथेलमध्ये राहून मला हे सर्व आशीर्वाद मिळाले.
सन १९५२ मध्ये जोन वेबसोबत माझं लग्नं झालं. मी तिला दहा वर्षांपासून ओळखत होतो. ती लंडनच्या उत्तरेकडील वॉटफर्ड येथे स्पेशल पायनियर होती. लग्नानंतर मला बेथेल सोडावं लागलं. पण आम्हा दोघांना पूर्णवेळच्या सेवेत राहायचं होतं त्यामुळे मला सर्किट ओव्हरसियर बनवण्यात आलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. इंग्लडच्या दक्षिणेकडील सससेक्स आणि हॅम्पशायर क्षेत्र हे आमचं पहिलं सर्किट होतं. त्याकाळी सर्किट ओव्हरसियरचं काम इतकं सोपं नव्हतं. आम्ही बहुतेकवेळा बसने, सायकलने किंवा पायीच प्रवास करायचो. कित्येक मंडळ्यांचं क्षेत्र लांबपर्यंत असायचं आणि घरं देखील दूर-दूर असायची. अशा क्षेत्रांत पोहंचणं फार कठीण व्हायचं, पण साक्षीदारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच होती.
सन १९५८, न्यूयॉर्क शहर
सन १९५७ मध्ये मला पुन्हा लंडन बेथेलमध्ये सेवा करायला बोलावलं. त्या आमंत्रण पत्रात लिहिलं होतं: “सन १९५८ मध्ये न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये आणि पोलो ग्राऊन्ड्सवर आंतरराष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यामुळे शाखा दप्तरात येऊन बांधवांच्या येण्याजाण्याच्या व्यवस्थेचं काम करायला तुम्हाला आवडेल का?” संस्थेने भाड्याने घेतलेल्या विमानांचं आणि जहाजाचं बुकिंग करण्याकरता बांधवांचे अर्ज येऊ लागले आणि आम्ही दोघं या कामाला जुंपलो. या ‘डिवाइन विल आंतरराष्ट्रीय संमेलनाला’ २,५३,९२२ लोक आले होते. या अधिवेशनामध्ये ७,१३६ लोकांनी बाप्तिस्म्याद्वारे यहोवाला केलेलं समर्पण जाहीर केलं. बायबलच्या अहवालानुसार सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जितक्या लोकांनी बाप्तिस्मा घेतला होता त्याच्या दुप्पट या अधिवेशनात बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या होती.—प्रेषितांची कृत्ये २:४१.
स्वतः बंधू नॉर यांनी आम्हा दोघांना पाठवलेलं ते खास आमंत्रण आम्ही कधीच विसरणार नाही. १२३ देशांतून न्यूयॉर्कला अधिवेशनासाठी आलेल्या भाऊबहिणींची काळजी घेण्यातला आनंद आणि समाधान आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
पूर्णवेळ सेवेचे आशीर्वाद
न्यूयॉर्कवरून परतल्यावर आम्ही सर्किट व्हिजीटच्या कामाला लागलो, पण माझी पत्नी जोन आजारी पडल्यामुळे तिला दवाखान्यात ॲडमीट करावं लागलं, माझी तब्येतही बिघडली होती त्यामुळे आम्हाला हे काम थांबवावं लागलं. काही वेळ आम्ही स्पेशल पायनियर म्हणून काम करू लागलो आणि थोड्या दिवसांसाठी पुन्हा सर्किट ओव्हरसियर म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. शेवटी आम्ही ब्रिस्टल येथे स्थायीक झालो. येथे देखील आमचं पूर्णवेळचं सेवाकार्य चालूच होतं. डिक, माझा भाऊ त्याच्या कुटुंबाबरोबर जवळच राहतो. आम्ही एकत्र येतो तेव्हा जुन्या गोष्टींच्या आठवणी हमखास निघतातच.
सन १९७१ मध्ये माझी नजर कमजोर झाल्यामुळे मला स्पष्ट दिसेनासं झालं. तेव्हापासून मला वाचताना फार त्रास होतो त्यामुळे मी संस्थेची पुस्तकं टेप रेकॉर्डवर ऐकतो. यहोवाने केलेल्या या व्यवस्थेबद्दल मी किती आभारी आहे! आजही मी आणि जोन लोकांना बायबलविषयी सांगतो आणि आजपर्यंत आम्हाला ४० लोकांना सत्याचे ज्ञान देण्याचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यांमध्ये सात जणांचं एक कुटुंब देखील आहे.
यहोवाला आम्ही समर्पण केले तेव्हापासूनच त्याची शेवटपर्यंत पूर्णवेळ सेवा करण्याची आमची इच्छा होती आणि या गोष्टीला आता ६० पेक्षा जास्त वर्षं झाली आहेत. आजही यहोवाची सेवा करण्याची ताकद आमच्यात आहे याकरता आम्ही यहोवाचे किती कृतज्ञ आहोत! यहोवाचे आभार मानण्याकरता आणि त्याची दया व आशीर्वाद याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता पूर्णवेळची सेवा हा एक उत्तम मार्ग आहे.
[तळटीप]
a ही एक प्रकारची शबनम बॅग होती. वॉचटावर आणि कन्सोलेशन (अवेक!) नियतकालिकांच्या प्रती व्यवस्थित बसतील अशी ही बॅग बनवण्यात आली होती.
[२५ पानांवरील चित्र]
माझा भाऊ डिक (अगदी डावीकडे उभा असलेला) आणि इतर पायनियरांसोबत ब्रिस्टल पायनियर होमच्या समोर
[२५ पानांवरील चित्र]
ब्रिस्टलचं पायनियर होम, सन १९४०
[२६ पानांवरील चित्रे]
जानेवारी १२, १९५२ रोजी स्टॅनली आणि जोन रेनॉल्ड्स् यांच्या लग्नाच्या दिवशी घेतलेला फोटो आणि त्यांचा आताचा फोटो