माझे जीवन समर्पित करण्याजोगी सर्वोत्तम गोष्ट
बॉब अँडरसनद्वारे निवेदित
साधारण दहा वर्षांआधी काही मित्रांनी मला विचारले: “बॉब, तू पायनियर म्हणून इतका काळ कार्य का चालू ठेवलेसं?” मी स्मित केले आणि म्हटले, “पायनियरींग याशिवाय इतर काही चांगले असेल का?”
मी१९३१ मध्ये २३ वर्षांचा असताना पायनियरींग सुरु केली. आता मी ८७ वर्षांचा आहे व आजही पायनियरींग करीत आहे. माझ्या जीवनाचे मी यापेक्षा आणखी काही चांगले करू शकलो नसतो, हे मला माहीत आहे. का ते मला सांगू द्या.
सन १९१४ मध्ये आमच्या घरी एक हस्तपत्रिका देण्यात आली होती. ती, यहोवाचे साक्षीदार ज्यांना त्या काळी आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी असे म्हटले जात असे त्यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आली होती. साक्षीदार परत आल्यावर माझ्या आईने त्यांना अगदी बारकाईने नरकाग्नीबद्दल विचारले. तिची वाढ वेस्लीयन मेथोडिस्ट म्हणून अगदी कट्टरपणे झाली होती, पण तिला या चिरकालिक यातनेच्या तत्त्वाचा प्रेमळ देवाशी मेळ घालता येत नव्हता. या प्रकरणाबद्दलचे सत्य तिला समजल्यावर तिने म्हटले: “माझ्या जीवनात पूर्वीपेक्षा अधिक आनंद मला होत आहे.”
तेव्हा माझ्या आईने लगेच मेथोडिस्टांच्या रविवारच्या शब्बाथ शाळेत शिकवण्याचे सोडून दिले आणि ती बायबल विद्यार्थ्यांच्या लहान गटाच्या वर्गाला जाऊ लागली. तिने बर्कनहेड या आमच्या गावी प्रचाराला सुरवात केली, हे गाव मर्सरी नदीच्या पलीकडे लिव्हरपूल बंदरासमोर आहे. तिने लगेच सायकलवरुन शेजारच्या गावांना देखील रपेट चालू केली. या विस्तारीत क्षेत्रात तिने आपल्या आयुष्यभर साक्षकार्य केले, त्यामुळे ती खूप ओळखीची झाली. तिने आम्हा मुलांपुढे सुंदर उदाहरण ठेवले. ती १९७१ मध्ये ९७ वर्षांची होऊन वारली. शेवटपर्यंत ती क्रियाशील साक्षीदार होती.
माझी बहीण कॅथलिन हिला व मला मेथोडिस्टांच्या रविवार शब्बाथ शाळेतून काढण्यात आले व आम्ही आईसोबत बायबल विद्यार्थ्यांच्या सभांना जाऊ लागलो. नंतर जेव्हा आमचे बाबा देखील आम्हासोबत येऊ लागले तेव्हा आमच्या पालकांनी देवाचा कर्णा (इंग्रजी) या पुस्तकातून नियमित कौटुंबिक बायबल अभ्यास सुरु केला. असा हा अभ्यास त्या काळी नाविन्यपूर्ण होता, पण बायबलच्या मूलभूत सत्याचा जो आरंभीचा पाया घातला गेला त्यामुळे समृद्ध आशीर्वाद मिळाले, कारण काही काळातच मी व माझी बहीण, आम्ही दोघेही पायनियरींग कार्यात उतरलो.
आई म्हणते की, १९२० मध्ये लिव्हरपूल येथे बघितलेले “निर्मितीचे फोटो-नाट्य” आम्हा मुलांमध्ये आध्यात्मिक बदल घडवून आणणारे होते आणि तिचे म्हणणे खरे होते. मी तरूण होतो व त्या नाट्यामुळे माझ्या बालमनावर बरीच छाप पाडली. माझ्या मनात येशूच्या जीवनाची माहिती दाखवणारा, खासपणे तो मृत्यूला सामोरा जात असल्याचा देखावा अजूनही घर करून आहे. या सर्व अनुभवाने मला जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण कामावर—प्रचारावर—आपले लक्ष केंद्रित करण्याची मदत केली!
मी १९२० च्या दशकाच्या आरंभाला आईसोबत रविवारी दुपारी हस्तपत्रिका वाटण्यास सुरवात केली. सुरवातीला आम्हाला सूचना होत्या की त्या केवळ घरात टाकाव्यात, नंतर आम्हाला सांगण्यात आले की, त्या घरमालकाच्या हाती द्याव्या व पुन्हा जाऊन जे आस्थेवाईक असतील त्यांची भेट घ्यावी. मी नेहमीच या गोष्टीला अत्यंत फलदायी असणाऱ्या पुनर्भेटीच्या आणि बायबल अभ्यासाच्या कार्याचा पाया म्हणून बघितले.
पायनियर सेवेमध्ये!
माझा व कॅथलिनचा १९२७ मध्ये बाप्तिस्मा झाला. मी लिव्हरपूल येथे रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम करत होतो तेव्हा १९३१ मध्ये मी यहोवाचे साक्षीदार हे नाव लावून घेण्याचा ठराव संमत झाल्याचे ऐकले. मी संस्थेच्या कॉलपोचरर्स (सध्याच्या पायनियर्सना) लिव्हरपूल येथील व्यापारी क्षेत्रात कार्य करताना बघत होतो आणि त्यांच्या उदाहरणाने मजवर चांगली छाप पाडली. जगिक सहवासापासून मुक्त होऊन माझे जीवन यहोवाच्या सेवेत घालवावे असे मला किती वाटत होते!
त्याच वर्षाच्या उन्हाळ्यात माझ्या एका मित्राने, जेरी जेरार्ड याने, वॉचटावर संस्थेच्या दुसऱ्या अध्यक्षांकडून, जोसेफ एफ. रदरफोर्डकडून भारतात जाऊन प्रचार करण्याच्या नेमणूकीचा स्वीकार केला असल्याचे सांगितले. जहाजावर निघण्याआधी त्याने माझी भेट घेतली आणि पूर्ण वेळेच्या सेवेबद्दल बोलणी केली. तो माझा निरोप घेत असता त्याने मला आणखी प्रोत्साहन देऊन म्हटले, “माझी खात्री आहे बॉब, की तू लवकरच पायनियर होशील.” आणि तेच घडले. मी त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सेवेत रुजू झालो. गावातल्या गल्ल्यांमधून सायकलीने जाणे, विरळ वसाहतीत प्रचार करणे याचा केवढा तो आनंद, केवढी ती स्वतंत्रता! मला वाटायला लागले की, मी सर्वात महत्त्वाच्या कामाला हात घातला आहे.
माझ्या पायनियरींग कार्याची पहिली नेमणूक साऊथ वेल्स येथे होती. तेथे माझा जोडीदार सिरिल स्टेन्टीफोर्ड होता. सिरिलने नंतर कॅथलिनसोबत लग्न केले आणि ते दोघे एकत्र मिळून कित्येक वर्षे पायनियरींग करीत राहिले. त्यांची मुलगी रुथ ही देखील नंतर पायनियर कार्यात उतरली. सन १९३७ पर्यंत मी लॅकशायर येथील फ्लिटवूडमध्ये होतो आणि एरीक कुक्सचा जोडीदार होतो. त्या काळी पायनियर केवळ मंडळीच्या क्षेत्राबाहेरील ब्रिटनच्या ग्रामीण भागात कार्य करीत होते. त्यावेळी संस्थेच्या लंडन शाखा दप्तरात कार्यासाठी जबाबदारपदी असणारे आल्बर्ट डी. श्रोडर यांनी निर्णय घेतला की, आम्ही यॉर्कशायरमधील ब्रॅडफोर्ड या शहरी स्थलांतरीत व्हावे. ही पहिली वेळ होती जेव्हा ब्रिटनमधील पायनियरांना विशिष्ट मंडळीला मदत करण्याची नेमणूक मिळाली.
एरीक १९४६ मध्ये गिलीयडच्या वॉचटावर बायबल प्रशालेला गेला आणि त्याला सध्याच्या झिंम्बाब्वे येथे तेव्हाच्या दक्षिण ऱ्होडेशियामध्ये नेमणूक मिळाली. तो व त्याची बायको अद्याप दक्षिण आफ्रिकेत दर्बान येथे आपले मिशनरी कार्य विश्वासूपणे करीत आहेत.
मला १९३८ मध्ये आणखी एक नेमणूक मिळाली, यावेळी झोन सेवक (सध्याचे विभागीय पर्यवेक्षक) म्हणून वायव्येकडे लँकशायर व लेक डिस्ट्रिक्ट या नयनरम्य स्थळी ही नेमणूक होती. येथे माझी ऑलिव्ह डकेटशी गाठ पडली आणि आमच्या लग्नानंतर ती मजसोबत लगेच विभागीय कार्यात येऊ लागली.
युद्धाच्या वर्षांतील आयर्लंड
सप्टेंबर १९३९ मध्ये ब्रिटनने जर्मनीविरूद्ध युद्ध घोषित केले तेव्हा माझी नेमणूक आयर्लंडला बदलली. ब्रिटनमध्ये युद्धभरती सुरू झाली होती पण ती दक्षिण आयर्लंडच्या रिपब्लिकमध्ये सुरु झाली नव्हती; तो देश युद्धाच्या दरम्यान तटस्थ राहिला होता. आयर्लंडचे रिपब्लिक व उत्तर आयर्लंड या दोघांचा मिळून एक विभाग होणार होता. तथापि, निर्बंध जारी होते आणि ब्रिटन सोडून आयर्लंडच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी प्रवासी परवान्याची जरुरी होती. अधिकाऱ्यांनी मला परवानगी दिली पण म्हटले की, युद्धभरतीसाठी माझ्या वयोगटातील लोकांना बोलावले जाईल तेव्हा लगेच इंग्लंडला परत येण्यासाठी कबूल व्हावे लागेल. मी तोंडी कबूल झालो, पण जेव्हा मला परवाना मिळाला तेव्हा त्याच्यासोबत काहीही अटी जोडल्या गेल्या नव्हत्या हे पाहून मला केवढे आश्चर्य वाटले!
त्या काळी संपूर्ण आयर्लंडमध्ये केवळ १०० पेक्षा काही अधिक साक्षीदार होते. आमचे नोव्हेंबर १९३९ मध्ये डब्लिनमध्ये आगमन झाले तेव्हा, जॅक कॉर हा बऱ्याच काळापासून असणारा पायनियर आम्हाला भेटला. त्याने म्हटले की, जवळच्या गावात आणखी दोन पायनियर्स आणि डब्लिनमध्ये थोडे आस्थेवाईक लोक होते, म्हणजे एकंदर २० लोक होते. जॅकने डब्लिनमध्ये एक खोली सभांसाठी भाड्याने घेतली आणि दर रविवारी तेथे नियमितपणे भेटण्याचे सर्वांनी कबूल केले. ही व्यवस्था १९४० मध्ये मंडळीची स्थापना होईपर्यंत चालू राहिली.
संयुक्त राज्याचा भाग म्हणून उत्तर आयर्लंड जर्मनीसोबत युद्धात गुंतले होते, त्यामुळे आम्ही उत्तरेकडे बेलफास्ट येथे स्थलांतर केले. यावेळी आम्हापाशी रेशनकार्डे होती व रात्रीला अंधारात राहावे लागत होते. नात्सी विमानांना बेलफास्ट शहरी जाऊन परत युरोपातील आपल्या स्थानी येण्यासाठी साधारण १,६०० कि. मी. अंतरापर्यंतचे उड्डाण करायचे होते तरी त्यांनी शहरावर बॉम्ब टाकण्यात यश मिळवले. पहिल्या हल्ल्यात आमच्या राज्य सभागृहाची हानी झाली आणि आम्ही शहराच्या दुसऱ्या भागात बांधवांना भेटण्यासाठी गेलो असता आमच्या फ्लॅटची नासधूस झाली, त्यामुळे आम्ही अगदी विलक्षणरित्या बचावलो. त्याच रात्री एक साक्षीदार कुटुंब सार्वजनिक आश्रयस्थानी धावले. ते तेथे गेले तेव्हा त्यांना ती छावणी पूर्णपणे भरल्याची आढळली, त्यामुळे त्यांना घरी परतावे लागले. या छावणीवर थेटपणे बॉम्बचा हल्ला झाला आणि तेथे असणारे सर्वजण ठार झाले, पण आमचे बांधव बचावले, ते थोडे फार जखमी झाले. या कठीण युद्धकाळात आमचा कोणीही बांधव गंभीरपणे जखमी झाला नाही, याबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानले.
आध्यात्मिक अन्नाचा पुरवठा
युद्ध वाढत गेले तसतसे निर्बंधही कडक झाले आणि शेवटी टपालांची देखील छानणी करण्यात येऊ लागली. याचा अर्थ, टेहळणी बुरुज नियतकालिक टपालात जप्त करण्यात येऊ लागले आणि ते देशात येण्याला बंदी घातली गेली. आता काय करावे ते आम्हाला कळेना तरी, यहोवाचा हात तोकडा नव्हता. एके दिवशी सकाळी मला कॅनडातील कोणा “भाच्याकडून” पत्र आले त्यात माझ्या घरगुती गोष्टींबद्दल लिहिले होते. तो कोण होता ते मला समजू शकले नाही, परंतु पत्राच्या शेवटी त्याने लिहिले की, मी वाचावे म्हणून “एक मनोरंजक बायबलचा लेख” तो सोबत पाठवत आहे. ती तर टेहळणी बुरुजची एक प्रत होती, पण ती साध्या लिफाफ्यात असल्यामुळे परीक्षकांनी ते उघडले नव्हते.
लगेच मी व माझ्या बायकोने स्थानिक साक्षीदारांच्या मदतीने त्या लेखाच्या नकला तयार करण्यास आरंभ केला. या कामात आम्हाला “फोटो-नाट्य” कामाशी संबंधित असणाऱ्या मॅगी कूपर हिने देखील मदत केली. लवकरच, जेव्हा कॅनडा, ऑस्ट्रेलिया, व अमेरिका येथून आम्हाला नवनवीन मित्रांकडून साध्या लिफाफ्यातून टेहळणी बुरुज नियतकालिके येऊ लागली, तसे आम्ही संघटित होऊन देशभर १२० प्रती पाठवल्या. मित्रांचे परिश्रम व दयाळूपणा यामुळे त्या सबंध युद्धकाळात आम्ही एकही अंक चुकवू शकलो नाही.
आम्ही संमेलने देखील भरवू शकलो. यामध्ये १९४१ चे अधिवेशन उल्लेखनीय होते, ज्यात मुले (इंग्रजी) हे नवे प्रकाशन प्रसिद्ध झाले. हे पुस्तक मुलांसाठी आहे असा परीक्षकाने विचार केल्यामुळे त्याने याबद्दल काही हरकत घेतली नाही असे वाटते. या कारणामुळे कोणत्याही अडथळ्याविना आम्ही आमचा साठा देशात आणू शकलो! दुसऱ्या एके प्रसंगी, आम्ही लंडनमधून प्रती आयात करू न शकल्यामुळे शांती—ती टिकेल का? (इंग्रजी) या पुस्तिकेची स्थानिकरित्या छपाई करून घेतली. आम्हावर सगळे निर्बंध लादण्यात आले होते तरी आमची आध्यात्मिकदृष्ट्या चांगली काळजी घेतली गेली.
विरोधावर मात करणे
बेलफास्ट येथे यहोवाच्या एका साक्षीदारामार्फत चालवलेल्या नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या एका पाळकाने समृद्धता (इंग्रजी) पुस्तकाची एक प्रत इंग्लंडमध्ये आपल्या बायकोला पाठवली. तिचा सत्याला विरोध होता आणि तिने आपल्या उत्तरामध्ये ते स्पष्ट केले. आमचे “राष्ट्रद्रोही संघटन” आहे असेही तिने म्हटले. टपाल निरिक्षकाच्या ते लक्षात आले व त्याने ही गोष्ट गुन्हेगारी अन्वेषण खात्याला कळवली. त्यामुळे मला स्पष्टीकरण देण्याकरता पोलिस बराकीत बोलावण्यात आले व येताना सोबत समृद्धता (इंग्रजी) पुस्तकाची प्रत घेऊन येण्यास सांगितले. ते पुस्तक परत दिल्यावर मला हे दिसले की, त्या पुस्तकात जेथे अधोरेखित करण्यात आले होते तो सर्व मजकूर रोमन कॅथलिक चर्चबद्दल होता. मला वाटले की, ते खरेच अभूतपूर्व आहे, कारण पोलिस आय.आर.ए. (आयरिश रिपब्लिकन आर्मी) विरुद्ध सावध होते हे मला ठाऊक होते.
युद्धकाळातील आमच्या तटस्थ भूमिकेबद्दलची समज पोलिसांना न समजल्यामुळे त्यांनी मला अगदी खोदून प्रश्न विचारले. तथापि, अधिकाऱ्यांनी आम्हाविरूद्ध कसलीही कारवाई केली नाही. नंतर मी एका संमेलनाबद्दलची परवानगी घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी दोन पोलिस वार्ताहरांना पाठवण्याचा आग्रह धरला. मी म्हणालो, “आम्ही त्यांचे स्वागतच करू!” त्याप्रमाणे ते आले व दुपारच्या कार्यक्रमास बसून राहिले व त्यांनी लघुलिपीत नोंदी घेतल्या. कार्यक्रमाच्या समाप्तीला ते म्हणाले, “आम्हाला येथे पाठवले तरी कशाला? आम्हाला तर सगळाच कार्यक्रम आवडला!” ते दुसऱ्या दिवशीही आले आणि त्यांनी शांती—ती टिकेल का? (इंग्रजी) या मोफत पुस्तिकेचा आनंदाने स्वीकार केला. संमेलनाचे बाकीचे कार्यक्रम देखील अगदी सुरळीत पार पाडले.
युद्ध संपले आणि प्रवासावरील सर्व निर्बंध ढिले करण्यात आले तेव्हा लंडन बेथेलमधील प्रिस ह्युज बेलफास्ट येथे आले. त्यांच्यासोबत हेरल्ड किंग देखील होते, त्यांना नंतर चीनमध्ये मिशनरी म्हणून पाठवले गेले. लंडन शाखा दप्तरासोबत आमचा सहा वर्षे संपर्क नव्हता, त्यामुळे या बांधवांनी दिलेल्या भाषणांमुळे आम्हाला मोठे चैतन्य लाभले. काही काळानंतर हेरॉल्ड ड्युर्डन या आणखी एका विश्वासू पायनियरला इंग्लंडमधून बेलफास्ट येथे राज्याच्या कामाला बळकट करावे म्हणून पाठवण्यात आले.
इंग्लंडला परतणे
आम्हाला आयरिश बांधवांचा मोठा लळा लागला होता त्यामुळे इंग्लंडला परत जावे हे जरा कठीण वाटत होते. परंतु मला व माझ्या बायकोला परत मँचेस्टर येथे नेमणूक मिळाली व नंतर आम्ही लँकशायरचे एक गाव न्यूटन-ले-विल्लोस् येथे स्थलांतर केले. येथे कार्याची अधिक गरज होती. लोईस या आमच्या मुलीचा १९५३ मध्ये जन्म झाला आणि तिने देखील वयाच्या १६ व्या वर्षीच पायनियरींग सुरु केली हे पाहणे मोठे प्रोत्साहनदायक होते. तिचा विवाह डेव्हीड पार्किन्सन या पायनियरसोबत झाला आणि ते उत्तर आयर्लंडमध्ये त्यांची पूर्ण वेळेची सेवा करीत राहिले, त्यांनी माझ्या व ऑलिव्हच्या पावलांचा मागोवा अनुसरला. आता ते आपल्या मुलांसोबत परत इंग्लंडला आले आहेत, आम्ही सर्व एकाच मंडळीत सेवा करत आहोत.
आमच्या परिस्थितीत पुष्कळ बदल झाले, तरीही मी कधीच पायनियरींग बंद केली नाही—ती बंद करावी अशी माझी व ऑलिव्हची कधीच इच्छा झाली नाही. मला नेहमी वाटते की, आजपर्यंतच्या माझ्या सेवेत माझ्या बायकोचाही वाटा आहे, कारण तिचा नित्याचा प्रेमळ आधार याविना मी पूर्ण वेळेच्या सेवेत टिकू शकलो नसतो. अर्थात, सध्या आम्ही लवकर थकतो, तरीही साक्षकार्य हे अद्यापीही आनंदाचे वाटते, खासपणे आम्ही दोघेही एकत्र आमच्या शेजाऱ्यांसोबत मिळून बायबलचा अभ्यास करतो तेव्हा खूप आनंद वाटतो. या सर्व काळात आम्हाला जवळपास शंभर लोकांना समर्पण करून यहोवाचे बाप्तिस्मा घेतलेले सेवक बनण्याची मदत करण्याचा विशेषाधिकार लाभला. खरेच, केवढा हा आनंद! आणि मला वाटते की, आता ही कुटुंबे तिसऱ्या चौथ्या पिढीच्या लागास आलेली असता व हेही साक्षीदार बनत असता ती संख्या अधिक पटीची बनली आहे.
मी व ऑलिव्ह कधी कधी आमच्या कित्येक विशेषाधिकारांबद्दल आणि वर्षानुवर्षांच्या अनुभवांबद्दल बोलतो. ती केवढी आनंदी वर्षे होती आणि बघता बघता निघून सुद्धा गेली! या सर्व वर्षांत पायनियर या नात्याने बायकोसोबत मिळून आमचा देव यहोवा याची सेवा करणे यापेक्षा जीवनात दुसरी कोणतीही चांगली गोष्ट मला आढळली नसती हे मला ठाऊक आहे. आता मागील वर्षांकडे कृतज्ञतेने पाहत असता किंवा भावी काळाकडे मोठ्या उत्सुकतेने बघत असता मला यिर्मयाचे हे शब्द पुष्कळ अर्थभरीत वाटतात: “आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; . . . म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन.”—विलापगीत ३:२२-२४.
[२६ पानांवरील चित्रं]
बॉब व ऑलिव्ह अँडरसन