आपल्या मनापेक्षा यहोवा फार थोर आहे
स्तोत्रकर्त्याने लिहिले: “जे परमेश्वराचे भय धरितात, . . . त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.” आपले सेवक आपल्या नियमांप्रमाणे चालण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत हे पाहून सृष्टिकर्त्याचे मन आनंदाने फुलते. तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना आशीर्वाद आणि उत्तेजन देतोच, शिवाय संकटांच्या वेळी हिम्मतही देतो. त्याला माहीत आहे, की त्याच्या सेवकांच्याही काही कमतरता आहेत, त्यामुळे तो त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करत नाही.—स्तोत्र १४७:११.
यहोवाचे त्याच्या सेवकांवर फार प्रेम आहे, या गोष्टीवर आपण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. पण, काही लोकांना वाटते की आपण फार वाईट आहोत त्यामुळे यहोवा आपल्यावर कधीच प्रेम करणार नाही. कदाचित मनात ते असा विचार करतील: “माझ्यासारख्या पापी व्यक्तीवर यहोवा कधी प्रेम करूच शकणार नाही.” अशा भावना केव्हा ना केव्हा आपल्या मनात देखील दाटून येऊ शकतील. पण काहींना नेहमीच असे वाटत राहते, की त्यांच्या जीवनाला काही अर्थ नाही, त्यांचे जीवन अगदी निरस, निकामी आहे.
निकामीपणाची भावना
प्राचीन काळातील काही धार्मिक, सात्विक लोकांना देखील काहीवेळा जीवन निरस, निकामी वाटले होते. ईयोबालाही असेच वाटले होते. देवाने आपल्याला सोडून दिले आहे, असे त्याला वाटत असल्यामुळे त्याला जीवनातला प्रत्येक क्षण युगासारखा भासत होता. हन्नाच्याही भावना काहीशा अशाच होत्या. आपण वांझ आहोत हे सत्य पचवणे तिच्याकरता फार कठीण होते. या दुःखामुळे तिच्या भावना अनावर व्हायच्या. दावीद आपल्या दुःखामुळे ‘अगदी वाकून गेला होता.’ एपफ्रदीतला जेव्हा कळाले की त्याच्या आजारपणामुळे त्याचे बांधव चिंतेत आहेत तेव्हा तो खूप उदास झाला होता.—स्तोत्र ३८:६, १ शमुवेल १:७, १०; ईयोब २९:२, ४, ५; फिलिप्पैकर २:२५, २६.
आज आपल्याबाबत काय? आपल्यालाही आजारपण, म्हातारपण किंवा काही कठीण समस्यांतून जावे लागते आणि अशावेळी आपल्याला देवाच्या सेवेत हवे तितके करता येत नाही. त्यामुळे यहोवासाठी आणि आपल्या बांधवांसाठी आपण काहीच करू शकत नाही या विचाराने आपण हताश किंवा निराश होऊ. किंवा काहीजण पूर्वी केलेल्या चुकांमुळे स्वतःला सतत दोष देत राहतील. यहोवा देव आपल्याला कधीही माफ करणार नाही असा विचार कदाचित त्यांच्या मनात येईल. तसेच, प्रेमाचा ओलावा नसलेल्या कुटुंबात वाढलेल्यांना वाटेल की त्यांना इतरांचे प्रेम कधीच मिळू शकणार नाही. असे का होते?
काहीजण प्रेमाचा अभाव असलेल्या कुटुंबात लहानाचे मोठे होतात. अशा कुटुंबातील सदस्य केवळ स्वतःचा स्वार्थ पाहतात, एकमेकांची उठसूट टीका करतात, आणि त्यामुळे त्यांच्यात नेहमी दुरावा असतो. अशा वातावरणात वाढलेल्यांना भरभरून प्रेम करणारे, कौतुक करणारे, शाबासकी देणारे प्रेमळ वडील कसे असतात हे माहीत नसते. असे प्रेमळ वडील मुलांकडून होणाऱ्या लहानसहान चुकांकडे दुर्लक्ष तर करतातच, पण जरी त्यांच्या हातून काही गंभीर चुका घडल्या तरी मोठ्या मनाने क्षमा करायला तयार असतात. त्यांच्या प्रेमामुळे घराला घरपण येते. पण अशा वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्यांना आपला स्वर्गीय पिता आपल्यावर किती प्रेम करतो, आपली किती काळजी घेतो हे सहजासहजी समजेल का?
फ्रिट्सच्याच बाबतीत काय घडले ते पाहा.a त्याने लिहिले: “माझ्या बाबांच्या कठोर वागण्याचा माझ्या बालमनावर इतका आघात झाला होता की आजवर मी त्यातून सावरू शकलो नाही. त्यांनी कधी मला जवळ घेऊन माझं कौतुक केलेलं मला आठवतं नाही. त्यामुळं मला त्यांच्याविषयी आपुलकी, आपलेपणा वाटण्याऐवजी त्यांची सतत भीतीच वाटायची.” आज फ्रिट्स यांनी वयाची पन्नाशी उलटली आहे. मार्गरेटच्या बाबतीत हेच घडले. ती म्हणते: “माझे आईवडील फार कठोर होते, त्यांनी माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही. त्यामुळे बायबलचा अभ्यास करताना प्रेमळ वडिलांबद्दल सांगितलं जायचं तेव्हा ते समजणं माझ्याकरता खूप अवघड होतं.”
असे वाटण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण एकदा अशी चुकीची भावना आपल्या मनात घर करून राहिल्यास प्रेमापोटी नव्हे तर केवळ भीतीपोटी आपण देवाची सेवा करू लागतो. आपण कितीही केले तरी ते अपुरेच आहे असे आपल्याला वाटू लागते. यहोवाला आणि आपल्या भाऊबहिणींना आनंदी ठेवण्याची आपली मनापासून इच्छा असते, पण आपल्याला वाटते की यात आपण कधीच यशस्वी होणार नाही. अशा नकारात्मक भावनेपुढे शेवटी आपण हात टेकतो, आणि स्वतःलाच दोष देत राहतो.
पण अशा भावनेतून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? होय आहे. हे समजण्याकरता आपल्याला कदाचित या गोष्टीची आठवण करून द्यावी लागेल, की यहोवाचे मन खूप मोठे आहे. प्रेषित योहानाला या गोष्टीची खात्री पटली होती.
“आपल्या मनापेक्षा देव थोर आहे”
सा.यु. पहिल्या शतकाच्या अखेरीस योहानाने ख्रिस्ती बांधवांना लिहिले: “आपण सत्याचे आहो हे ह्यावरून आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ (स्वतःच्या मनाची खात्री पटवू); कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.”—१ योहान ३:१९, २०.
यहोवाच्या सेवकांच्या मनात वेळोवेळी दोषी भावना डोकावू शकतात हे योहानाला चांगल्याप्रकारे माहीत असल्यामुळे त्याने वरील वचन लिहिले होते. त्याला स्वतःला देखील असे कित्येक वेळा वाटले असावे. तो तरुण होता तेव्हा तर एवढ्या-तेवढ्या गोष्टींवरून त्याच्या रागाचा पारा चढायचा आणि त्यामुळे येशूने एकदा त्याला दटावले देखील होते. अशा या रागीट स्वभावामुळे येशूने त्याला आणि त्याच्या भावाला, याकोबाला “बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र” म्हटले.—मार्क ३:१७; लूक ९:४९-५६.
पुढील ६० वर्षांच्या कालावधीत योहानाचा स्वभाव खूपच शांत झाला होता. तो विचारपूर्वक बोलायचा; लोकांशी प्रेमाने आणि दयेने व्यवहार करायचा. प्रेषितांपैकी तोच एकटा राहिला तेव्हा त्याने देवाच्या प्रेरणेने पत्र लिहिले. आतापर्यंत त्याला याची पक्की खात्री पटली होती की, यहोवा त्याच्या सेवकांच्या प्रत्येक लहानसहान गोष्टींचा हिशेब ठेवत नाही. तर तो एक दयाळू पिता आहे, त्याचे मन फार मोठे आहे, तो उदार आहे, दयेचा सागर आहे. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना, खरेपणाने त्याची सेवा करणाऱ्यांना त्याच्या मनात फार मोठे स्थान आहे. म्हणूनच योहानाने लिहिले: “देव प्रीति आहे.”—१ योहान ४:८.
आपल्या सेवेने यहोवा आनंदी होतो
यहोवाला आपल्या कमतरता माहीत आहेत. दावीदाने लिहिले: “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” यहोवाला हे माहीत आहे, की आपण ज्या वातावरणात मोठे होतो त्याचा आपल्या स्वभावावर खूप परिणाम होतो. खरे तर, आपण स्वतःविषयी जितके जाणतो त्यापेक्षा कितीतरी अधिक यहोवाला आपल्याविषयी माहीत आहे.—स्तोत्र १०३:१४.
आपण आपल्या स्वभावात चांगले बदल करू इच्छितो पण आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपण कमी पडतो हे यहोवा जाणतो. आपली स्थिती प्रेषित पौलासारखीच आहे. त्याने लिहिले: “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो.” आपण सर्व एक प्रकारची लढाई लढत आहोत. पण ही लढाई लढताना काही जणांना त्यांचे मन स्वतःला दोषी ठरवत राहते.—रोमकर ७:१९.
पण, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: आपल्याला स्वतःविषयी काय वाटते हे समजून घेण्यापेक्षा यहोवाला आपल्याविषयी काय वाटते हे अधिक महत्वाचे आहे. आपण त्याने सांगितलेल्या मार्गानुसार चालत आहोत हे पाहून त्याला केवळ समाधानच होत नाही तर त्याचे मन आनंदित होते. (नीतिसूत्रे २७:११) त्याच्या सेवेत आपण जे काही करत आहोत ते कदाचित आपल्या दृष्टीने फार कमी असेल. पण यहोवा आपले अंतःकरण पाहतो, त्याची सेवा करण्यामागे आपली कोणती भावना आहे हे तो पाहत असल्यामुळे आपण किती सेवा करतो हे नव्हे, तर आपल्याला काय करण्याची इच्छा आहे हे तो पाहत असतो; तो आपले मन जाणू शकतो.—यिर्मया १२:३; १७:१०.
उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांमधील काहीजण लाजऱ्या स्वभावाचे असल्यामुळे होता होईल तितके ते लोकांपासून दूर राहणे पसंत करतात. अशा लोकांना प्रचार कार्यात भाग घेणे एक आव्हान असते. तरीदेखील यहोवा देवावरील व शेजाऱ्यांवरील प्रेमामुळे ते लोकांना बायबलविषयी सांगण्यास शिकतात. कधी कधी त्यांना असे वाटते की आपल्या प्रचारकार्याची विशेष फलप्राप्ती होत नाही. त्यामुळे कदाचित ते फार दुःखी होतील किंवा त्यांचे मन त्यांना खात राहील. पण, यहोवाच्या सेवेतील त्यांचे श्रम वाया जाणार नाहीत. तो त्यांना जरूर आशिर्वादीत करील. आणि त्यांनी पेरलेल्या बिजांना केव्हा अंकुर फुटेल, त्यांची केव्हा वाढ होईल आणि केव्हा फळ लागेल हे त्यांनाही सांगता येणार नाही!—उपदेशक ११:६; मार्क १२:४१-४४; २ करिंथकर ८:१२.
खूप दिवसांपासून अंथरूणाला खिळलेले असल्यामुळे किंवा वय झाल्यामुळे काही साक्षीदारांना सभांना नियमित येणे जमत नाही. प्रचार कार्यात आवेशी असण्याबद्दलचे एखादे भाषण ऐकल्यामुळे त्यांना कदाचित त्यांचे मागचे दिवस आठवतील. पूर्वी त्यांनी प्रचार कार्यांत खूप आवेशाने, जोमाने भाग घेतलेला असेल, पण आता त्यांच्याने होत नाही. त्यांची तब्बेत त्यांना साथ देत नाही. दिलेल्या सल्ल्याप्रमाणे कार्य करण्याची त्यांची खूप इच्छा असूनही ते तितके करू शकत नाहीत. अशावेळी त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, यहोवाच्या नजरेत त्यांची एकनिष्ठता आणि धीर फार मोलाचा आहे. त्यांनी यहोवाची एकनिष्ठेने कित्येक वर्षे केलेली सेवा तो विसरणार नाही.—स्तोत्र १८:२५; ३७:२८.
‘स्वतःच्या मनाची खात्री पटविणे’
यहोवा देवाचे मन किती मोठे आहे याची आता योहानाला जाणीव होऊ लागली. त्याने काय लिहिले होते ते आठवा: “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.” याशिवाय, आपण ‘आपल्या मनाची खात्री पटवावी’ असेही त्याने सांगितले. यावरून योहानाला खरेतर काय म्हणायचे होते?
वाईन्स एक्सपॉजिट्री डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टामेंट वड्र्स या अनुसार, ज्या ग्रीक क्रियापदाचे भाषांतर ‘खात्री पटविणे’ असे करण्यात आले आहे. त्याचा अर्थ, “समजावणे, पटवून सांगणे, जिंकणे, मन वळवणे” असा होतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्या मनाची खात्री पटविण्याकरता आपल्याला आपले मन जिंकावयाचे आहे आणि आपल्या मनाला हे समजावयाचे आहे, की यहोवाचे आपल्यावर प्रेम आहे. हे आपण कसे करू शकतो?
या लेखाच्या सुरवातीला फ्रिट्स यांचा उल्लेख करण्यात आला आहे; २५ पेक्षा जास्त वर्षांपासून यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीमध्ये ते वडील म्हणून काम करत आहेत. व्यक्तिगत अभ्यासाच्या वेळी त्यांना याची खात्री पटली आहे की यहोवा खरोखरच फार प्रेमळ आहे. ते म्हणतात: “मी दररोज बायबलचा आणि संस्थेच्या प्रकाशनांचा काळजीपूर्वक अभ्यास करतो. त्यामुळे भूतकाळातील गोष्टींवर दुःख करत बसण्याऐवजी मी येणाऱ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करतो. कधीकधी भूतकाळातील आठवणी मला निराश करतात आणि मला वाटायला लागते, की यहोवा माझ्यावर कधी प्रेम करूच शकत नाही. पण कित्येकदा मला हेच पाहायला मिळाले आहे, की अभ्यास करत राहिल्यामुळे मला हिम्मत मिळते, माझा विश्वास मजबूत होतो तसेच मी निराशेच्या भावनेवर ताबा ठेवू शकतो आणि त्यामुळे माझा आनंद मला टिकवता येतो.”
हे खरे आहे, की बायबलचे केवळ वाचन केल्याने आणि त्यावर विचार केल्याने आपली परिस्थिती सुधारणार नाही. पण, आपल्या दृष्टिकोनात मात्र जरूर फरक पडू शकतो. देवाच्या वचनात आपल्याला त्याचे विचार वाचायला मिळतात आणि त्यामुळे आपण त्याच्यासारखाच विचार करू लागतो. यहोवाचे मन किती मोठे आहे हे बायबलचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला आणखी चांगल्याप्रकारे समजते. आपले बालपण ज्या परिस्थितीत गेले त्याकरता किंवा आपल्यातील काही उणिवांमुळे यहोवा आपल्याला दोषी ठरवत नाही. आपल्या जीवनातील चिंता, आपले दुःख यासर्वांची त्याला जाणीव आहे. आणि आपल्यासोबत व्यवहार करताना यहोवा या गोष्टी लक्षात ठेवतो.
वर उल्लेख केलेल्या मार्गरेटचे काय झाले? बायबल अभ्यासाद्वारे यहोवाला ओळखल्यामुळे तिला खूप फायदा झाला. फ्रिट्सप्रमाणे तिलाही, वडिलांविषयीच्या दृष्टिकोनात बदल करावा लागला. मार्गरेटने जे काही बायबलमधून शिकले होते त्याचे महत्त्व जाणण्याकरता तिला प्रार्थनेने मदत केली. ती म्हणते: “प्रेमळ वडील कसे असतात हे मला माहीत नव्हतं, पण एक चांगला मित्र कसा असतो ते मला माहीत होतं, त्यामुळे मी यहोवाला माझा जिवलग मित्र मानू लागले. हळूहळू माझ्या भावना, माझ्या समस्या, माझ्या चिंता सर्व काही मी यहोवाला सांगू लागले. प्रार्थनेद्वारे मी वारंवार यहोवासोबत बोलायचे आणि एखादे चित्रं पूर्ण दिसण्यासाठी जसे त्याचे वेगवेगळे तुकडे एकत्र लावले जातात त्याचप्रमाणे मी देखील शिकत असलेल्या नवनवीन गोष्टींचा संबंध एकमेकांशी लावू लागले. आणि आता मी यहोवाच्या इतक्या निकट आले आहे, की तो मला एखाद्या मित्रापेक्षा एक प्रेमळ पिताच वाटतो.”
सर्व समस्यांपासून मुक्ती
हे दुष्ट जग अस्तित्वात असेपर्यंत समस्याही असणारच. पण, समस्या किंवा चिंता सतावत असतात तेव्हा यहोवा खरोखरच आपल्यावर प्रेम करतो की नाही असे काही ख्रिश्चनांना वाटत असेल. आणि त्यामुळे ते दुःखी देखील होऊ शकतात. पण आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो, की यहोवाला हे चांगल्याप्रकारे माहीत आहे, की आपले विचार, हेतू चांगले आहेत. आणि आपण होता होईल तितकी त्याची सेवा करू इच्छितो. त्याच्या नावाखातर आपण दाखवलेले प्रेम तो कधीही विसरणार नाही.—इब्री लोकांस ६:१०.
मशिहाच्या राज्याधीन असणाऱ्या नव्या जगात, यहोवाचे सर्व एकनिष्ठ सेवक या सैतानी जगाच्या ओझ्यापासून मुक्ती मिळण्याची अपेक्षा बाळगू शकतात. त्यानंतर ते सुटकेचा श्वास घेतील! तेव्हा आणखीन चांगल्याप्रकारे आपल्याला हे पाहता येईल, की देवाचे मन किती मोठे आहे. पण तोपर्यंत तरी, “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते,” या गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो.—१ योहान ३:२०.
[तळटीपा]
a नावे बदलण्यात आली आहेत.
[३० पानांवरील संक्षिप्त आशय]
यहोवा जुलमी शासक नाही, तर फार मोठे मन असलेला, दयेचा सागर आहे. तो आपला प्रेमळ पिता आहे
[३१ पानांवरील चित्र]
देवाच्या वचनात दिलेले विचार त्याच्याप्रमाणे विचार करण्याकरता आपली मदत करतात