नाताळ—पौर्वात्य देशांमध्येही का साजरा केला जातो?
नाताळाच्या सांटा क्लॉजवरून एका प्राचीन पौर्वात्य विश्वासाची आठवण होते. चोवांगशिन नावाच्या एका देवतासंबंधीचा हा कोरियन लोकांचा विश्वास होता; चिनी आणि जपानी लोकांमध्येही असाच विश्वास आढळतो.
चोवांगशिन याला स्वयंपाकघराचे दैवत मानले जात होते. तो एक अग्निदैवत होता. प्राचीन कोरियातील अग्निपूजेशी त्याचा संबंध होता. (प्राचीन काळी, कोरियन लोक जळते विस्तव इकडून तिकडे हलवताना खूप काळजी घ्यायचे; त्या विस्तवांना ते विझू देत नव्हते.) तो कुटुंबातल्या लोकांवर लक्ष ठेवतो आणि नंतर स्वयंपाकघरातल्या स्टोव्हच्या द्वारे किंवा धुराड्यातून वर स्वर्गात जातो असा त्यांचा विश्वास होता.
असे मानले जात होते की चोवांगशिन, डिसेंबर या चांद्रमासाच्या २३ व्या तारखेला स्वर्गातल्या राजाला सगळी खबर देत असे. मग, वर्षाच्या अखेरीला ज्याच्या त्याच्या वर्तनानुसार भेटवस्तू किंवा शिक्षा देण्यासाठी पुन्हा धुराड्यातून आणि स्टोव्हच्या द्वारे तो यायचा असा लोकांचा समज होता. तो येईल तेव्हा कुटुंबातल्या सदस्यांनी स्वयंपाकघरात आणि इतरत्र मेणबत्त्या लावायच्या होत्या. स्वयंपाकघराच्या या दैवताचे सांटा क्लॉजशी आणखी एक साम्य होते—त्याचा पोषाखही लाल रंगाचा होता! दक्षिणायनाच्या वेळी सुनेने पारंपरिक पद्धतीचे कोरियन पायमोजे विणून आपल्या सासूला देण्याची प्रथा होती. त्यावरून, सासू दीर्घायुषी व्हावी (कारण त्या तारखेनंतरचे दिवस मोठे होतात) ही सुनेची इच्छा व्यक्त होते अशी त्यामागची धारणा होती.
वरील वर्णन आणि नाताळ यांमध्ये तुम्हाला काही साम्य दिसून येत नाही का? त्यांच्या कथा आणि प्रथा यांच्यात कितीतरी साम्य आहे: धुराडे, मेणबत्त्या, भेटवस्तू देणे, पायमोजे, लाल रंगाच्या पोषाखातील वृद्ध पुरुष आणि तारीखसुद्धा. परंतु, या दोन सणांमधील सारखेपणामुळेच केवळ कोरियामध्ये नाताळ इतक्या सहजासहजी लोकप्रिय झाला नाही; कारण नाताळ हा सण कोरियामध्ये सर्वात प्रथम सुरू करण्यात आला तेव्हा चोवांगशिनची प्रथा केव्हाच नामशेष झाली होती. वास्तविक पाहता, ही प्रथा एकेकाळी अस्तित्वात होती हे देखील बहुतेक कोरियन लोकांना ठाऊक नाही.
परंतु, दक्षिणायन आणि वर्षअखेरीसंबंधीच्या प्रथा जगभरात वेगवेगळ्या स्वरूपांतून कशा पसरल्या हे यावरून स्पष्ट होते. सा.यु. चवथ्या शतकात, रोमी साम्राज्यात असलेल्या तेव्हाच्या चर्चने सॅटरनेलियाचे (सूर्यदैवताच्या जन्मदिवसाचा मूर्तिपूजक रोमन सण) नाव बदलले आणि त्याला सध्याच्या नाताळाचे रूप दिले. यामुळे जुन्या चालीरीती तशाच राहिल्या; मात्र सणाचे नाव बदलले. हे कसे झाले?
भेटवस्तू देण्याची प्रथा
भेटवस्तू देण्याची प्रथा मात्र थांबलेली नाही; ती अजूनही रूढ आहे. कोरियन लोकांना भेटवस्तू देण्यात आणि घेण्यात अमाप आनंद मिळतो. आणि कोरियामध्ये नाताळाचा सण लोकप्रिय होण्यामागे हे आणखी एक कारण होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर, कोरियात स्थित असलेल्या अमेरिकन सैनिकांना तिथल्या लोकांशी आपले संबंध वाढवायचे होते; म्हणून एकमेकांना भेटणे तसेच भेटवस्तू, अन्न, कपडे, औषधे यांचे वाटप चर्चेसमध्ये होत असे. आणि हे वाटप खासकरून नाताळाच्या दिवशीच होत असे. उत्सुकतेपोटी लहान मुले चर्चेसमध्ये जात असत. आणि तेथेच त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा चॉकलेट पाहिले. मग, लोक नाताळाच्या सणाची आतुरतेने वाट पाहू लागले. का, हे तुम्हाला समजलेच असेल.
या मुलांना सांटा क्लॉज म्हणजे पायमोज्यासारखी लाल टोपी घातलेला अमेरिकन सैनिक वाटायचा. नीतिसूत्रे १९:६ (पं.र.भा.) म्हणते: “प्रत्येक जण देणग्या देणाऱ्याचा मित्र असतो.” होय, भेटवस्तू देण्याचा बराच फायदा झाला. पण त्या वचनावरून हे स्पष्ट होते की, अशा या देणग्यांमुळे कायमची मैत्री कधीच स्थापित होत नाही. कोरियातही असे पुष्कळजण आहेत ज्यांना लहानपणी चॉकलेट मिळवण्यापुरताच चर्चशी संपर्क आला होता. मात्र नाताळ साजरा करण्याचे लोकांनी सोडले नाही. कोरियाची आर्थिक वृद्धी झाली तसे व्यापारीकरण वाढले; मग नाताळाच्या वेळी भेटवस्तू देण्याची प्रथा म्हणजे ग्राहकांची खरेदी वाढवण्याची एक सोपी पद्धत बनली. उद्योगधंदे आपला नफा वाढवण्यासाठी नाताळाचा पुरेपूर फायदा करून घेऊ लागले.
आता तुम्हाला पौर्वात्य देशांमधील नाताळामागची कहाणी लक्षात आली असेल. नाताळात भरपूर खरेदी होत असल्यामुळे नवनवीन उत्पादने बाजारात आणली जातात. जाहिरातींची योजना तर निम्मा उन्हाळा संपतो न संपतो तोच केली जाते. वर्षअखेरीला खरेदीचे प्रमाण सर्वाधिक असते; नाताळासाठी भेटवस्तू, शुभेच्छा कार्ड, संगीताच्या रेकॉर्डींग्स या सर्वांचा त्यात समावेश होतो. नाताळाच्या आदल्या रात्री (ख्रिसमस ईव्ह) बाहेर न जाणे किंवा कोणाला भेटवस्तू न मिळणे म्हणजे खूप दुःखाची गोष्ट असे जाहिरातींमधून तरुणांना भासवले जाते!
नाताळ जसजसा जवळ येतो तसतशी सीओलच्या दुकानांमध्ये भेटवस्तू खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढत जाते; इतर पौर्वात्य देशांचीही हीच कथा आहे. ट्रॅफिक जॅम तर विचारायलाच नको. हॉटेल, बाजार, रेस्टॉरंट्स, नाईटक्लब येथेही ग्राहकांची झुंबड असते. सगळीकडे नुसता धांगडधिंगा असतो आणि गाण्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येत असतो. नाताळाच्या आदल्या रात्री रस्त्यांवर कचराच कचरा असतो; नशेच्या धुंदीत मदहोश झालेले स्त्री-पुरुष झोकांड्या खात चाललेले असतात.
असा असतो हा नाताळ. पौर्वात्य देशांमधील नाताळाच्या सणात तथाकथित ख्रिश्चनांचा पुढाकार राहिलेला नाही. पुढाकार असतो व्यापारीकरणाचा. उद्योजक, ख्रिस्ती धर्मजगताच्या या सणाचा पुरेपूर फायदा उचलतात. कोरियात आणि इतर देशांमध्येही हीच गत आहे. ख्रिस्ताच्या स्वभावाला मुळीच शोभा न देणाऱ्या या नाताळाला केवळ व्यापारीकरण दोषी आहे का? खऱ्या ख्रिश्चनांनी या गंभीर विषयाची दखल घेतली पाहिजे.
नाताळाचे मूळ
पिंजऱ्यात बंद असलेले जंगली जनावर शेवटी रानटीच असते. पिंजऱ्यांत राहिल्यामुळे ते जंगली जनावर आता माणसाळले आहे किंवा आपल्या पिलांबरोबर कसे शांत, सौम्य दिसत आहे असा विचार करणे घोड चूक ठरेल. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांवर पशूंनी हल्ले केल्याचे तुम्ही ऐकलेच असेल.
नाताळाच्या सणाबाबतीतही असेच आहे. सुरवातीला तो ख्रिस्ती धर्मात नसलेला एक “रानटी पशू” होता. “रोमन सॅटरनेलियाशी निगडित” या उपशीर्षकाखाली नाताळाविषयी ख्रिस्ती विश्वकोश (कोरिया भाषेत)a असे म्हणतो:
“सॅटरनेलिया आणि ब्रुमेलिया हे मूर्तिपूजक सणवार खोलवर मुळावलेले असल्यामुळे ख्रिस्ती धर्म त्यांना उपटून काढू शकला नाही. सम्राट कॉन्स्टंटाईन याने रविवार हा दिवस (फिबस आणि मिथ्रस यांचा दिवस त्याचप्रमाणे प्रभुचा दिवस) पाळण्याची मान्यता दिल्यामुळे . . . देवाच्या पुत्राचा [येशूचा] जन्मदिवस आणि प्रत्यक्ष सूर्य देवतेचा जन्मदिवस एकाच वेळी पाळायला काही हरकत नाही असे कदाचित चवथ्या शतकातल्या ख्रिश्चनांना वाटले असावे. [फिबस आणि मिथ्रस यांच्या] मूर्तिपूजक सणाच्या वेळी धांगडधिंगा आणि चैनबाजी चालत असल्यामुळे केवळ सण साजरा करण्यामागील भावना किंवा स्वरूप बदलून तोच मूर्तिपूजक सण साजरा करायला ख्रिश्चनांना चांगलेच निमित्त सापडले.”
एवढा मोठा बदल झाल्यावर काहीच विरोध झाला नसावा का? तोच विश्वकोश पुढे म्हणतो: “पाश्चात्त्य आणि पौर्वात्य देशांजवळच्या ख्रिस्ती प्रचारकांनी ख्रिस्ताचा जन्मदिवस बेशिस्तपणे साजरा केला जात असल्यामुळे विरोध केला; दुसरीकडे, आपल्या पाश्चात्त्य बांधवांनी हा मूर्तिपूजक सण ख्रिस्ती धर्मात स्वीकारल्यामुळे मेसोपोटेमियाच्या ख्रिश्चनांनी त्यांच्यावर मूर्तिपूजा आणि सूर्यउपासना करत असल्याचा आरोप लावला.” खरे तर, सुरवातीपासूनच यात काहीतरी खोट होती. “तरीही हा सण रूढ होत गेला आणि नंतर [ख्रिस्ती धर्मजगताचा] असा काही अविभाज्य भाग बनला की सोळाव्या शतकातली प्रोटेस्टंट धर्मसुधारणाही त्याच्या विरुद्ध काहीच करू शकली नाही,” असे तो विश्वकोश म्हणतो.
होय, खऱ्या ख्रिस्ती धर्मात नसलेला सूर्यदेवतेचा सण तेव्हाच्या चर्चमध्ये स्वीकारण्यात आला. त्याचे नाव तर बदलले पण स्वरूप तेच राहिले. अशातऱ्हेने ख्रिस्ती म्हणवणाऱ्या चर्चेसमध्ये मूर्तिपूजेचा प्रवेश झाला आणि ख्रिस्ती व्यक्तीच्या आध्यात्मिक विश्वासात सळमिसळ झाली. ख्रिस्ती धर्माचा विकास होत गेला तशी “आपल्या शत्रुंवर प्रेम कर” ही मनोवृत्ती नाहीशी झाली, नैतिकतेचा ऱ्हास झाला व हिंसक युद्धांना वाट मिळाली याला इतिहास पुरावा आहे.
नाताळ हे नकली नाव देऊनही धांगडधिंगा, अति मद्यपान, आनंदोत्सव, नाचगाणी, भेटवस्तू देणे आणि ख्रिसमस ट्रीने घर सजवणे यांच्यामुळे नाताळाचा मूर्तिपूजक उगम कालांतराने स्पष्ट दिसून आला. अधिकाधिक खरेदी व्हावी या उद्योजकांच्या एकमेव उद्दिष्टामुळे नाताळाचा पुरेपूर फायदा उचलण्यात आला आहे. प्रसार माध्यमातून नाताळाची स्तुती केली जाते; जनसामान्यांना हे निव्वळ मनोरंजन वाटते. सीओलच्या मुख्य बाजारात, अंतर्वस्त्राचे एक खास दुकान चक्क टीव्हीच्या बातम्यांमध्ये झळकले (त्यांनी ख्रिसमस ट्री फक्त अंतर्वस्त्रांनी सजवलेले होते). वातावरण नाताळमय झाले होते पण ख्रिस्ताचे स्वागत करण्याचे चिन्ह मात्र कोठेच दिसत नव्हते.
नाताळाविषयी शास्त्रवचनांतून समज
या ऐतिहासिक माहितीतून आणि बदलांमधून आपल्याला काय कळते? एखाद्या शर्टाची किंवा ब्लाऊजची बटने सुरवातीपासूनच वर-खाली लावलेली असतील तर पुन्हा बटणे काढून व्यवस्थित लावण्याशिवाय पर्याय नाही. हे खरे नाही का? सत्य परिस्थिती ठाऊक असतानाही काहींचे असे म्हणणे आहे की, नाताळ हा सण मूर्तिपूजक सूर्यउपासनेत मुळावलेला असला तरी ख्रिस्ती धर्मजगताने हा सण स्वीकारला आहे. म्हणून अनेकांच्या मते, या सणाला ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून मान्यता मिळून नवीन अर्थ प्राप्त झाला आहे.
प्राचीन यहूदात घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेवरून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळू शकतो. सा.यु.पू. ६१२ मध्ये यहूदाच्या लोकांनी जेरूसलेमच्या मंदिरात सूर्यउपासनेचा मूर्तिपूजक विधी सुरू केला. हा मूर्तिपूजक उपासनाविधी यहोवा देवाच्या शुद्ध उपासनेसाठी असलेल्या स्थळी होत असल्यामुळे त्याला मान्यता मिळाली का? जेरूसलेमच्या मंदिरात होणाऱ्या सूर्यउपासनेविषयी बायबलचा एक लेखक यहेज्केल याने लिहिले: “तो पाहा, परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या दरम्यान सुमारे पंचवीस इसम . . . पूर्वेकडे तोंड करून उभे होते; ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? यहूदाचे घराणे येथे ही अमंगळ कृत्ये करीत आहे, हे थोडे झाले काय? देश जुलमाच्या कृत्यांनी भरून ते मला पुन्हा पुन्हा संतापवितात; पाहा, ते आपल्या नाकास डहाळी लावीत आहेत.”—यहेज्केल ८:१६, १७.
होय, त्या मूर्तिपूजक उपासनाविधीला मान्यता मिळण्याऐवजी त्यामुळे संपूर्ण मंदिरालाच धोका निर्माण झाला. अशा चालीरीती सबंध यहूदात पसरल्या आणि त्यामुळे तो देश जुलमी आणि अमंगळ कृत्यांनी भरून गेला. ख्रिस्ती धर्मजगतातही हेच घडत आहे; सॅटरनेलियाच्या सूर्यउपासनेत मुळावलेल्या प्रथांना नाताळामध्ये महत्त्व दिले जाते. यहेज्केलला तो दृष्टान्त मिळाल्यावर काही वर्षांनीच जेरूसलेमवर यहोवाने न्यायदंड बजावला—बॅबिलोनी लोकांच्या हाती तिचा नाश झाला.—२ इतिहास ३६:१५-२०.
पहिल्या लेखामध्ये कोरियन विद्वानाने केलेले बाळ येशूचे वर्णन तुम्हाला विचित्रच वाटले असेल. पण खरे पाहता, ते वर्णन ख्रिस्ताविषयी अचूक ज्ञान नसलेल्या व्यक्तीने केलेले असल्यामुळे अधिक महत्त्वाचे ठरते. त्यामुळे नाताळ पाळणारे लोक कदाचित त्याचा गंभीर विचार करतील. का? कारण नाताळात ख्रिस्ताला योग्यरितीने सादर केले जात नाही. उलट, आज तो कोण आहे हे पूर्णपणे लपवले जाते. येशू आता गव्हाणीत ठेवलेले बाळ राहिलेला नाही.
बायबलमध्ये वारंवार यावर जोर दिला आहे की, येशू आता मशीहा आहे; तो देवाच्या स्वर्गीय राज्याचा शक्तिशाली राजा आहे. (प्रकटीकरण ११:१५) नाताळाच्या वेळी काहीजण दानधर्म करतात कारण गरिबी आणि कष्ट यांचा त्यांना विसर पडलेला नसतो. पण येशू ख्रिस्त आता लवकरच या गरिबीचे आणि कष्टाचे निर्मूलन करणार आहे.
नाताळाचा ख्रिस्ती राष्ट्रांना किंवा इतर राष्ट्रांना (पूर्वेकडील राष्ट्रांनाही) खरे पाहता फायदा झालेला नाही. त्यामुळे उलट देव राज्याच्या आणि या सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताच्या खऱ्या ख्रिस्ती संदेशापासून लोकांचे लक्ष विकर्षित झाले आहे. (मत्तय २४:१४) तो अंत कसा येईल याविषयी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांना विचारावे असे आमंत्रण आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि मग, देव राज्याच्या आणि राजा बनलेल्या येशू ख्रिस्ताच्या निर्देशनाखाली पृथ्वीवर येणाऱ्या कायमस्वरूपी आशीर्वादांविषयी तुम्हाला त्यांच्याकडून शिकून घेता येईल.—प्रकटीकरण २१:३, ४.
[तळटीपा]
a द न्यू शॅफ-हर्टसोक एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजियस नॉलेज यावर आधारित
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
नाताळामुळे ख्रिस्ती म्हणवणाऱ्या चर्चेसमध्ये मूर्तिपूजेचा प्रवेश झाला
[५ पानांवरील चित्र]
पुष्कळ मुले फक्त जिज्ञासेपोटी आणि चॉकलेट मिळवण्यासाठी चर्चमध्ये जात होती. त्यामुळे त्यांना पुढच्या नाताळाची उत्सुकता लागून राहायची
[७ पानांवरील चित्र]
सीओल, कोरिया येथील ख्रिसमस ईव्ह (नाताळाची आदली रात्र)
[८ पानांवरील चित्र]
ख्रिस्त आता बाळ नाही; तो देवाच्या राज्याचा शक्तिशाली राजा आहे