संकटग्रस्त क्षेत्रात खरी शांती
“जातीय हिंसेचा रानटी पशू पूर्णपणे पिंजऱ्याच्या बाहेर आला आहे,” असे १९६९ मध्ये एका अहवालात म्हटले होते. उत्तर आयर्लंडमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट लोकांमध्ये अशांतता वाढू लागली तेव्हाची ही गोष्ट आहे; आयरिश लोक त्या कालावधीला ट्रबल्स (अशांततेचा, खळबळीचा काळ) म्हणतात.
हत्या करणारे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक लोक अर्थात राजकीय आणि धार्मिक वादविषयात गोवलेले “दोन्ही बाजूंचे रानटी लोक” आयर्लंडवर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष करू लागले तशी जातीय हिंसा आणि हत्या रोजचीच गोष्ट होऊन बसली. तेव्हापासून, हिंसेच्या जवळजवळ ३० वर्षांमध्ये ३,६०० हून अधिक लोक ठार मारले गेले आणि हजारो जण अधू झाले,” असे वृत्त दि आयरिश टाईम्स मध्ये दिले आहे.
अर्थात हा संघर्ष काही नवीन नाही. गेल्या कित्येक शतकांपासून हा संघर्ष आयर्लंडमध्ये चालला आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये त्याचे सर्वात घातक परिणाम उत्तर आयर्लंडमधील लोकांवर झाले आहेत; पण त्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या कटुतेची आणि अशांततेची झळ सबंध आयर्लंडमधील लोकांना पोचली आहे.
अशा या स्थितीत यहोवाचे साक्षीदार गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून या संकटग्रस्त देशामधील समस्यांवरील खरा उपाय काय ते दाखवून देत आहेत. तो उपाय म्हणजे येशू ख्रिस्ताच्या हाती असलेले देवाचे राज्य होय. (मत्तय ६:९, १०) १९६९ साली ट्रबल्सची सुरवात झाली तेव्हा आयर्लंडमध्ये ८७६ यहोवाचे साक्षीदार होते. आता १०० हून अधिक मंडळ्यांमध्ये ४,५०० पेक्षाही अधिक साक्षीदार आहेत. येथे काहींचे अनुभव दिले आहेत; त्यांनी राजकीय आणि निमलष्करी कार्यहालचालींमध्ये भाग घेणे सोडून दिले आहे.
“मी मोठा झाल्यावर आयआरएमध्ये भरती होणार आहे!”
मायकलa एक कॅथलिक होता; आयर्लंड प्रजासत्ताकमध्ये तो लहानाचा मोठा झाला. शाळेमध्ये आयर्लंडच्या इतिहासाविषयी आणि कित्येक शतकांपासून आयर्लंड आणि ब्रिटनमध्ये चालत आलेल्या झगड्याविषयी तो शिकला होता. लहानपणी त्याच्या मनात इंग्रज लोकांबद्दल अत्यंत द्वेष होता; इंग्रज लोक म्हणजे “आयरिश लोकांवर जुलूम करणारे” असे त्याचे मत होते. दहा वर्षांचा असताना तो एकदा आपल्या आजीला म्हणाला, “मी मोठा झाल्यावर आयआरएमध्ये (आयरिश प्रजासत्ताक सैन्य) भरती होणार आहे!” तो म्हणतो, “असे बोलल्यावर मला एक थोबाडीत बसली; ते मी अजूनही विसरलेलो नाहीये.” नंतर त्याला त्याचे कारण कळाले. त्याचे आजोबा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिश सैन्यात होते. एकदा आयआरएचे सदस्य त्याच्या आजोबांना गोळी घालणार इतक्यात त्याची आजी त्याच्या आजोबांपुढे येऊन उभी राहिली आणि त्यांना वाचवले.
तरीही, मोठा झाल्यावर मायकलला उत्तर आयर्लंडमधल्या आपल्या कॅथलिक बांधवांना मदत करण्याची फार इच्छा होती. तो म्हणतो, “त्या वेळी मला असं वाटायचं की, फक्त आयआरएचे लोकच उत्तर आयर्लंडमधल्या कॅथलिक लोकांची मदत करत होते.” त्याला वाटले की आयआरए मध्ये भरती होणेच योग्य आहे आणि तो त्यात भरती झाला; मग त्याने हत्यारे कशी वापरावीत याचे प्रशिक्षण घेतले. उत्तर आयर्लंडच्या प्रोटेस्टंट निमलष्कऱ्यांनी त्याच्या तीन मित्रांना गोळी घालून ठार मारले.
वेगवेगळ्या निमलष्करी गटांमधले संघर्ष आणि झगडे पाहून मायकलला सगळं वायफळ वाटू लागलं; तो गोंधळून गेला होता. आयआरएशी संबंधित कार्यांमध्ये गोवल्यामुळे त्याला तुरुंगात टाकलेले असताना त्याने देवाकडे कायमस्वरूपी शांती आणि न्यायाचा खरा मार्ग दाखवण्यासाठी प्रार्थना केली. काही काळानंतर यहोवाचे साक्षीदार त्याच्या घरी आले. पण त्याच्या मनात ब्रिटिशांबद्दल भेदभाव असल्यामुळे तो त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकला नाही कारण ते साक्षीदार ब्रिटिश होते. मनात हा द्वेषभाव बाळगल्यामुळे त्याला त्यांचे ऐकायला आवडत नव्हते. तो म्हणतो, “त्यांना पाहून मला इतका काही आनंद झाला नाही हे मी त्यांना पुष्कळदा दाखवून दिलं. तरीही ते यायचे आणि माझ्याशी बोलायचे. मग मला कळू लागलं की, मी ज्या अन्यायांविरुद्ध लढत होतो ते सगळे राजकीय आणि सामाजिक अन्याय देवाच्या राज्याकरवी काढून टाकले जातील.”—स्तोत्र ३७:१०, ११; ७२:१२-१४.
मग एकदा आणीबाणीचा प्रसंग आला. त्या दिवशी संध्याकाळी मायकल आयआरएच्या कमांडिंग ऑफिसरला भेटला; ते म्हणाले, “तुझ्यासाठी एक काम आहे.” मायकल म्हणतो, “मला त्याच वेळी निर्णय घेणं भाग होतं असं मला वाटलं. म्हणून मी धैर्य एकवटलं आणि म्हणालो, ‘मी आता एक यहोवाचा साक्षीदार आहे;’ खरं तर माझा बाप्तिस्मासुद्धा झाला नव्हता. पण मला पक्कं ठाऊक होतं की मी यहोवाचाच सेवक बनणार.” माझं उत्तर ऐकून कमांडिंग ऑफिसर म्हणाले, “तुला भिंतीपुढं उभं करून गोळी झाडली पाहिजे.” अशी धमकी मिळूनही मायकलने आयआरए सोडून दिले. यहोवाच्या वचनांचा आपल्या मनावर आणि अंतःकरणावर प्रभाव होऊ दिल्यामुळे तो हे धाडसी पाऊल उचलू शकला. “नंतर माझ्या पत्नीनं आणि माझ्या काही मुलांनीसुद्धा यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं. आम्हाला खरी मनःशांती प्राप्त झाली आहे. यहोवानं आम्हाला सत्य शिकायला आणि एका संकटग्रस्त देशात शांतीचा संदेश जाऊन सांगायला संधी दिली म्हणून आम्ही सदैव त्याचे आभार मानू.”—स्तोत्र ३४:१४; ११९:१६५.
तटस्थता—खरी सुरक्षा
पॅट्रिक म्हणतो, “मी उत्तर आयर्लंडच्या काउंटी डेरी येथील ग्रामीण भागात लहानपण घालवलं. लहानपणची एकच गोष्ट मला आठवते; ती म्हणजे ट्रबल्सचा काळ. तेव्हाच्या वातावरणाने माझ्या दृष्टिकोनावर आणि विचारसरणीवर खोलवर प्रभाव पाडला.” द्वेषपूर्ण राष्ट्रीयवाद आणि ब्रिटिशांबद्दल भेदभाव पाहून पॅट्रिक जहालमतवादी बनला. त्याने पाहिले की, या राजकीय संघर्षाच्या दोन्ही बाजूचे धार्मिक लोक मूलभूत ख्रिस्ती तत्त्वांचे त्याचप्रमाणे माणुसकीच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करत होते. म्हणून त्याने धर्मावर विश्वास करण्याचे सोडून दिले; तो नास्तिक आणि कट्टर मार्क्सवादी बनला.—पडताळा मत्तय १५:७-९; २३:२७, २८.
पॅट्रिक म्हणतो, “उत्तर आयर्लंडमध्ये प्रजासत्ताकच्या कैद्यांनी उपवास कसा धरला होता ते मला आठवतं. त्यांचा माझ्या मनावर फार खोलवर प्रभाव पडला. मला आठवतं मी आयरिश झेंडे फडकवायचो आणि सगळीकडे ब्रिटिशांविरुद्ध चित्रं काढायचो. एकदा तुरुंगामध्ये उपवास धरलेल्या एकाचा देहान्त झाला; तेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारामध्ये मी पहारेकरी होतो. त्या वेळी मी फक्त १५ वर्षांचा होतो.” तेव्हाच्या दंगलीत आणि मारामारीत अनेकजण गुंतलेले होते. पॅट्रिकसुद्धा दंगलींमध्ये आणि मोर्च्यांमध्ये न्याय आणि समानता मागण्यासाठी सहभागी झाला. या दरम्यान, राष्ट्राबद्दल अभिमान बाळगणाऱ्या अनेक जहालमतवाद्यांशी त्यांची मैत्री झाली; यांच्यापैकी बहुतेक लोक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कब्जेत होते.
पॅट्रिक म्हणतो, “त्यानंतर, काही आर्थिक कारणांसाठी मला इंग्लंडमध्ये काही वेळ राहावं लागलं. मी तिथं असताना ब्रिटिश पोलिसांनी माझ्या एका मित्राला अटक केली; तो मित्र बॉम्बस्फोटाच्या एका प्रकरणात गोवलेला होता.” पॅट्रिकला आपल्या राष्ट्राचा अभिमान होता, पण त्याची मनोवृत्ती काहीशी बदलू लागली. त्याला दिसू लागलं की त्याला सर्वच ब्रिटिश लोकांबद्दल जो द्वेष वाटत होता याला काही योग्य कारण नव्हते. तो म्हणतो, “माझ्या लक्षात हेसुद्धा आलं की, निमलष्करी कार्यहालचालींमुळे समस्या कधीच सुटणार नाहीत आणि अन्याय कधीच थांबवता येणार नाही. या निमलष्करी संघटनांचे अधिकारी फार भ्रष्ट होते आणि त्यांच्यात इतरही काही दोष होते.”—उपदेशक ४:१; यिर्मया १०:२३.
शेवटी पॅट्रिक उत्तर आयर्लंडला परतला. “मी परतलो तेव्हा माझ्या एका मित्रानं माझी ओळख यहोवाच्या साक्षीदारांशी करून दिली.” साक्षीदारांबरोबर पॅट्रिक अभ्यास करू लागला तेव्हा त्याला मानवांमधील झगडे आणि बेबनाव यांच्यावर खरा उपाय कोणता आहे हे दिसू लागले. बायबलच्या तत्त्वांचे त्याच्या मनावर आणि अंतःकरणावर प्रभाव होऊ लागला तशी त्याची आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. (इफिसकर ४:२०-२४) तो म्हणतो की, “आता, चालू व्यवस्था काढून टाकण्याचा कट रचण्याऐवजी मी लोकांना बायबलमधला शांतीचा संदेश सांगतो; हा संदेश सांगायला मी ब्रिटिशांना पाठिंबा देणाऱ्यांच्या भागांमध्येही जायचो. पूर्वी तिकडे जायला मी धजलोही नसतो. खरं तर, बेल्फास्टमध्ये जातीय वादावरून खूप खून-मारामाऱ्या होऊ लागल्या तेव्हा ब्रिटिशांच्या सरकाराला पाठिंबा देणाऱ्यांच्या आणि स्वतंत्र आयर्लंडची मागणी करणाऱ्यांच्या भागांमध्ये फक्त यहोवाचे साक्षीदारच बिनधास्तपणे ये-जा करू शकत होते; त्यांना तर आपल्या वाहनांमध्ये संरक्षणासाठी हत्यारेसुद्धा घ्यावी लागत नव्हती.” या काळामध्ये उत्तर आयर्लंडमधील इतर साक्षीदारांप्रमाणे त्यालाही याची प्रचिती मिळाली की, प्राचीन ख्रिश्चनांसारखे तटस्थ राहिल्याने खरी सुरक्षा मिळते. (योहान १७:१६; १८:३६) तो शेवटी म्हणतो: “यहोवा देव येशू ख्रिस्ताद्वारे सर्व मानवजातीला खरा न्याय आणि जुलम यातून मुक्तता देईल हे ऐकून केवढी सुटका मिळाल्यासारखी वाटते.”—यशया ३२:१, १६-१८.
“माझ्या बंदुकाच माझं संरक्षण होत्या”
“मी [प्रोटेस्टंट गटाच्या] राजकीय आणि धार्मिक गटाचा समर्थक होतो,” असे विल्यम म्हणतो. “प्रोटेस्टंट लोकांबद्दल मला फार अभिमान होता आणि कॅथलिक लोकांच्या सर्वच गोष्टींचा मला द्वेष होता. शक्य तोवर मी कोणा कॅथलिक माणसाच्या दुकानातही जात नव्हतो. आयर्लंडला तर मी फक्त एकदाच गेलो. मी वेगवेगळ्या प्रोटेस्टंट गटांसोबत, ऑरेंज ऑडरसारख्या संघटनांसोबत (ही संघटना प्रोटेस्टंट सांप्रदाय आणि जीवनशैलीच्या संरक्षणार्थ उभारण्यात आली आहे) काम करू लागलो.” विल्यम २२ वर्षांचा होता तेव्हा तो अल्स्टर डिफेन्स रेजिमेंटमध्ये (स्थानिक ठिकाणांहून लोकांना भरती करणाऱ्या ब्रिटिश सैन्याचा एक भाग) भरती झाला. त्यातले बहुतेक लोक प्रोटेस्टंट होते. आपल्या परंपरेचे संरक्षण करण्यासाठी तो हत्या करायलाही तयार होता. “माझ्याजवळ पुष्कळ बंदुका होत्या आणि गरज पडली असती तर त्यांचा वापर करायलाही मी मागेपुढं पाहिलं नसतं. रात्रीच्या वेळी मी नेहमी एक बंदूक माझ्या उशीखाली ठेवायचो.”
पण त्याच्या जीवनात एक फार मोठा बदल झाला. “एकदा एका जुन्या घराची डागडुजी करत असताना माझ्यासोबत एक यहोवाचा साक्षीदार होता; हे लोक काही वेगळेच आहेत असं मला दिसून येऊ लागलं. त्या व्यक्तीचा माझ्यावर फार प्रभाव पडला. घराचं काम करता करता मी त्याला ट्रबल्स, धर्म आणि देव या विषयांवर पुष्कळ प्रश्न विचारले; हे प्रश्न सतत मला भेडसावत होते. त्याच्या साध्या-सोप्या, स्पष्ट उत्तरांवरून मला यहोवाच्या साक्षीदारांचं खरं रूप कळालं; त्या लोकांमध्ये फार एकता आहे, हिंसेत किंवा राजकारणातही ते भाग घेत नाहीत, देवाबद्दल आणि शेजाऱ्यांबद्दल त्यांना फार प्रेम आहे या गोष्टी मला समजल्या.”—योहान १३:३४, ३५.
विल्यमने बायबल अभ्यास सुरू करून चारच महिने झाले होते, की त्याने सर्व धार्मिक आणि राजकीय संस्थांशी आपला संबंध तोडून टाकला. तो आठवून सांगतो, “हे पाऊल माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं, कारण बऱ्याच वर्षांपासून बाळगलेल्या परंपरा, आचार-विचार मला सोडून द्यावे लागले.” परंतु, पुढे याहून एक मोठी परीक्षा होती. “उत्तर आयर्लंडमधील परिस्थितीमुळं माझ्या बंदुकाच माझं संरक्षण होत्या असं मला वाटायचं. आयआरए निमलष्करी गटाचे लोक माझ्यावर टपूनच होते. म्हणून ही हत्यारे टाकून द्यायला मला फार जड जात होतं.” परंतु, यशया २:२-४ सारख्या वचनांमधील सल्ल्यामुळे त्याची मनोवृत्ती हळूहळू बदलली. त्याला हे दिसून आले की, ज्याप्रमाणे पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना यहोवाने संरक्षण दिले त्याचप्रमाणे त्याला देखील यहोवाकडूनच संरक्षण मिळू शकत होते. नंतर विल्यमने आपल्या बंदुका देऊन टाकल्या.
विल्यम म्हणतो, “मला एका गोष्टीचा फार आनंद होतो; ती म्हणजे, पूर्वी मी ज्यांना शत्रू समजायचो त्याच लोकांबरोबर आता माझी घनिष्ट मैत्री आहे. आणि पहिल्यांदा मी ज्या क्षेत्रांमध्ये जाऊ शकत नव्हतो अशा क्षेत्रांमध्ये बायबलमधील आशेचा संदेश घेऊन जाणं हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे. सत्यामुळं मला आणि माझ्या कुटुंबाला जे काही प्राप्त झालं त्या सर्व गोष्टींसाठी मी यहोवा आणि त्याच्या संघटनेचा सदैव आभारी राहीन.”
“मला काही कळत नव्हतं”
रॉबर्ट आणि टरीस्सा हे दोघंही दोन भिन्न पार्श्वभूमीतले आहेत. रॉबर्ट म्हणतो, “माझं कुटुंब म्हणजे कट्टर प्रोटेस्टंट कुटुंब. माझे काही नातेवाईक निमलष्करी कार्यहालचालींमध्ये गोवलेले होते. मी स्वतः १९ वर्षांचा असताना ब्रिटिश सैन्याच्या अल्स्टर डिफेन्स रेजिमेंटमध्ये भरती झालो. त्या वेळी टरीस्सा राहायची तिथंच मला बुहतेककरून गस्त घालावी लागत होती. एकदा रात्री मला नेहमीच्या ठिकाणी गस्त घालायला न पाठवता दुसरी कामं करायली दिली होती. त्याच रात्री एका लॅण्ड रोव्हरचा स्फोट झाला; दोन सैनिक जागीच ठार झाले आणि दुसरे दोघं जखमी झाले. मला दुसरी कामं मिळाली नसती तर मीसुद्धा त्याच लॅण्ड रोव्हरमध्ये असलो असतो.”
जीवनाचा काय अर्थ असावा यावर मग रॉबर्ट विचार करू लागला. “तसा देवावर माझा नेहमी विश्वास होता, पण उत्तर आयर्लंडमध्ये जे काही घडत होतं ते पाहून मला काही कळत नव्हतं. मी देवाला प्रार्थना करू लागलो. ‘देवा तू आहेस का आणि असशील तर मला माझ्या जीवनाचा योग्य मार्ग दाखव,’ असं मी देवाला म्हणालो. मी असंही म्हटलेलं मला आठवतं की, ‘देवा कुठंतरी खरा धर्म असलाच पाहिजे!’” काही दिवसांनीच रॉबर्टला एक यहोवाचा साक्षीदार भेटला आणि त्याने काही बायबल साहित्य दिले. त्या रात्री गस्त घालून तो घरी उशिरा आला तेव्हा रॉबर्ट त्या पत्रिका वाचू लागला आणि सकाळी पाचपर्यंत तो वाचत राहिला. तो म्हणतो, “मला लगेच कळालं की यातच सत्य आहे; आणि त्यातलं सगळं काही थेट बायबलमधूनच आहे हेसुद्धा मी पाहिलं.” (२ तीमथ्य ३:१६) त्याने बायबल अभ्यास सुरू केला आणि थोड्याच काळानंतर त्याने आपले जीवन देवाला समर्पित केले.
“साक्षीदार नेहमी बायबलमधूनच दाखवत होते”
टरीस्सा कॅथलिक परिवारातून होती; तिला आपल्या देशाबद्दल गर्व होता. टरीस्सा म्हणते, “लहानपणी मी शिन फेनमध्येb गेले. यामुळं मी निमलष्करी कार्यहालचालींमध्ये गोवले गेले. लष्करी संघर्षासाठी मी निधी गोळा करून देत होते. माझ्या भागातल्या सगळ्या खबरा मी आयआरएला द्यायची. दंगलींमध्येसुद्धा मी सामील झाले होते आणि पोलिसांवर तसंच गस्त घालणाऱ्या सैनिकांवर दगडफेक केली होती.”
टरीस्साच्या कुटुंबातले काहीजण यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागले तेव्हा तिचीही जिज्ञासा वाढली. देवाच्या वचनाचा तिच्यावर फार प्रभाव पडला. ती म्हणते, “कोणत्याही प्रश्नांची उत्तरं साक्षीदार बायबलमधूनच दाखवत होते. दानीएल २:४४ मधले देवाचे अभिवचन वाचून तर माझे डोळेच उघडले. मला कळालं की ज्या अन्यायांविरुद्ध मी संघर्ष करत होते ते सर्व अन्याय काढून टाकणारं एकमेव माध्यम म्हणजे देवाचं राज्य.” निमलष्करी लोकांकडून होणारे काही जुलूम पाहून तिला त्यांचा तिटकारा वाटू लागला. टरीस्साला हे कळत नव्हतं की, अतिरेकी हल्ल्यांमुळे सैनिक किंवा इतरजण मेले किंवा अधू झाले आणि काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली तर दयाळू आणि सभ्य असलेल्या कोणा व्यक्तीला त्यांचा आनंद का व्हावा. तिनेसुद्धा बायबलमधील सत्याला प्रतिसाद दिला आणि देवाच्या तत्त्वांनुसार आपल्या विचारसरणीत बदल केले. तिने आपले जीवन देवाला समर्पित केले आणि बघता बघता तिनेही बाप्तिस्मा घेतला.—नीतिसूत्रे २:१-५, १०-१४.
टरीस्सा आणि रॉबर्ट हे दोघेही उत्तर आयर्लंडमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत सभांना जायचे; तेथे त्यांची ओळख झाली. ती म्हणते: “मी पहिल्यांदा रॉबर्टला भेटले तेव्हा मी या व्यक्तीशी इतक्या शांतपणे कशी बोलतेय यावर माझा विश्वासच बसेना; मी यहोवाची साक्षीदार होण्याआधी त्याला भेटले असते तर हा ब्रिटिशांच्या राजकीय आणि लष्करी गटातला आहे असंच त्याला समजलं असतं. देवाच्या वचनामुळं माझ्या मनातला द्वेष आणि भेदभाव खरोखरच निघून गेला होता.” रॉबर्टच्या आणि तिच्या लक्षात आलं की, भिन्न परंपरा आणि संस्कृतींमुळे निर्माण झालेला द्वेष आणि भेदभाव यांच्याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यामध्ये पुष्कळ साम्य होते. एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या दोघांचेही यहोवा देवावर प्रेम होते. त्यांनी लग्न केले. आता ते दोघेही एकत्र मिळून या संकटग्रस्त देशात सर्व पार्श्वभूमीतल्या आणि धर्माच्या लोकांना देवाचा खऱ्या शांतीचा संदेश सांगण्याचे काम करत आहेत.
आयर्लंडमध्ये इतरही लोकांचे असेच अनुभव आहेत. देवाच्या प्रेरित वचनातील शिकवणी ऐकून त्यांचा स्वीकार करून त्यांनी स्वतःला ‘माणसांच्या तत्त्वज्ञानातून आणि पोकळ भुलथापांतून’ मुक्त केले आहे. (कलस्सैकर २:८) आता ते बायबलमध्ये दिलेल्या देवाच्या अभिवचनांवर पूर्ण भरवसा ठेवतात. लोकांना एका शांतिमय भविष्याच्या आशेबद्दल सांगायला त्यांना आनंद होतो; या शांतिमय भविष्यात कधीच जातीय किंवा इतर कोणतीही हिंसा नसेल.—यशया ११:६-९.
[तळटीपा]
a नावे बदलण्यात आली आहेत.
b तात्पुरत्या आयआरएशी निगडित असलेला एक राजकीय पक्ष.
[१० पानांवरील चित्रं]
संपूर्ण उत्तर आयर्लंडमध्ये, निमलष्करी संघर्षांचे गौरव करणाऱ्या कलाकृती आढळतील