वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १२/१५ पृ. ४-७
  • आधुनिक नाताळाचा उगम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आधुनिक नाताळाचा उगम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चुकीचा पाया
  • भ्रष्टाचाराला सुरवात
  • आंतरराष्ट्रीय सण
  • नाताळात परिवर्तन
  • ‘सत्याची आणि शांतीची आवड धरा’
  • तुम्ही नाताळ साजरा करावा का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • नाताळ—पौर्वात्य देशांमध्येही का साजरा केला जातो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • नाताळाचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • ख्रिस्ताने ख्रिसमसला मान्यता दिलेली आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक ६-४ (gbr6-4)
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १२/१५ पृ. ४-७

आधुनिक नाताळाचा उगम

जगातील कोट्यवधी लोकांकरता नाताळाचा काळ म्हणजे वर्षभरातील सर्वात आनंदाचा काळ. चमचमीत जेवणाचा, पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचा आणि कौटुंबिक ऐक्याचा हा काळ आहे. नाताळाच्या सणाच्या वेळी मित्र आणि नातेवाईक एकमेकांना भेटकार्ड आणि भेटवस्तू देतात.

तथापि, केवळ १५० वर्षांपूर्वी नाताळाचा सण अगदी वेगळाच होता. नाताळासाठी युद्ध (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात इतिहासाचे प्राध्यापक स्टिफन निसनबॉम असे लिहितात: “नाताळाचा . . . काळ म्हणजे पिऊन मस्त होण्याचा काळ होता जेव्हा स्वच्छंदपणे ‘कार्निव्हल,’ उत्सव साजरा करण्यासाठी लोकांचे सामान्य वर्तणुकीचे नियम धाब्यावर बसविले जात; हा उत्सव जवळजवळ डिसेंबर मार्डी ग्रॅस उत्सवाप्रमाणे होता.”

अशा प्रकारचे वर्णन, नाताळाविषयी मनात आदराची भावना असणाऱ्‍यांना अस्वस्थ करेल. देवाच्या पुत्राचा जन्मदिवस साजरा करण्याचा दावा करणारा कोणी हा सण अपवित्र करील का? या प्रश्‍नाच्या उत्तरामुळे तुम्ही कदाचित चकित व्हाल.

चुकीचा पाया

चौथ्या शतकात नाताळाचा आरंभ झाला आणि तेव्हापासूनच तो वादाच्या भोवऱ्‍यात सापडला. उदाहरणार्थ, येशूच्या जन्मदिवसाविषयी प्रश्‍न होता. बायबलमध्ये ख्रिस्ताच्या जन्मदिनाविषयी किंवा महिन्याविषयी स्पष्टपणे सांगण्यात आले नाही, त्यामुळे अनेक तारखा सुचविण्यात आल्या. तिसऱ्‍या शतकात, इजिप्शियन वेदान्तीच्या एका गटाने मे २० ही तारीख सांगितली, तर काहींनी त्याआधीच्या तारखा सांगितल्या, जसे मार्च २८, एप्रिल २ किंवा एप्रिल १९. अठराव्या शतकापर्यंत, येशूच्या जन्मासोबत वर्षाचा प्रत्येक महिना जोडण्यात आला होता! तर मग, शेवटी डिसेंबर २५, ही तारीख कशी निवडण्यात आली?

२५ डिसेंबर ही येशूच्या जन्मदिवसाची तारीख कॅथोलिक चर्चने ठरविली होती, या गोष्टीशी बहुतेक विद्वान सहमत आहेत. का? द न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणते: “याचे कारण कदाचित हे असू शकते, की आरंभीच्या ख्रिस्ती लोकांना अशी तारीख हवी होती जी ‘अविजयी सूर्याच्या जन्मदिवसाच्या’ स्मरणार्थ साजरा करण्यात येणाऱ्‍या मूर्तिपूजक रोमी सणाशी जुळेल.” या ख्रिश्‍चनांना मूर्तिपूजक धर्मांनी अडीच शतकांपेक्षा अधिक काळापर्यंत छळले होते, पण आता त्यांनी अचानक त्यांचा छळ करणाऱ्‍यांपुढे हार का मानली?

भ्रष्टाचाराला सुरवात

पहिल्या शतकात, प्रेषित पौलाने तीमथ्याला असा इशारा दिला, की “दुष्ट आणि भोंदू माणसे” मंडळीत शिरतील आणि अनेकांना चुकीचा मार्ग दाखवतील. (२ तीमथ्य ३:१३) या मोठ्या धर्मत्यागाची सुरवात प्रेषितांच्या मृत्यूनंतर झाली. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) चौथ्या शतकात कॉन्स्टंटाईनच्या तथाकथित धर्मांतरानंतर, मूर्तिपूजक धर्मांतील अनेक लोकांनी त्या काळात अस्तित्वात असणाऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचे स्वरूप अंगीकारले. याचा परिणाम काय झाला? आरंभीचा ख्रिस्ती विश्‍वास आणि मूर्तिपूजक धर्म (इंग्रजी) पुस्तक म्हणते: “तथाकथित ख्रिश्‍चनांच्या लोकांमध्ये खऱ्‍या प्रामाणिक विश्‍वासूंचा तुलनात्मकरीत्या लहान असलेला गट हरवून गेला.”

पौलाचे शब्द खरोखरच किती खरे ठरले! मूर्तिपूजक भ्रष्टाचाराने खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाला जणू गिळंकृत केले होते! इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा सण साजरे करण्याच्या बाबतीत हे दूषण अधिक भासत होते.

खरे तर, प्रभूचे सांजभोजन हाच सण साजरा करण्याची ख्रिश्‍चनांना आज्ञा देण्यात आली आहे. (१ करिंथकर ११:२३-२६) रोमी उत्सवांमध्ये मूर्जिपूजक पद्धती असल्यामुळे आरंभीचे ख्रिस्ती त्यांत सहभागी होत नसत. या कारणामुळे तिसऱ्‍या शतकातील मूर्तिपूजकांनी असे म्हणून ख्रिश्‍चनांवर आरोप लावला: “तुम्ही प्रदर्शनांना भेटी देत नाही; तुम्हाला सार्वजनिक प्रदर्शनांच्या बाबतीत कोणतीही चिंता नसते; तुम्ही लोकांच्या मेजवाण्यांना जात नाही आणि पवित्र स्पर्धांचा तिरस्कार करता.” उलटपक्षी त्यांनी अशी शेखी मिरवली: “आम्ही देवतांची उपासना, आनंद, मेजवाणी, गीत आणि खेळ यांनी करतो.”

चौथ्या शतकाच्या मध्यापर्यंत, अशा प्रकारची कुरकूर कमी झाली होती. कशी बरे? जसजसे जास्तीत जास्त नकली ख्रिस्ती कळपात हळूच घुसले तसतसे धर्मत्यागी कल्पना वाढतच गेल्या. या कारणास्तव रोमी साम्राज्याशी हातमिळवणी करण्यात आली. यावर टिपणी करत आमच्या ख्रिस्ती विश्‍वासात मूर्तिपूजक विश्‍वास (इंग्रजी) हे पुस्तक असे म्हणते: “परंपरेमुळे लोकांना प्रिय झालेल्या मूर्तिपूजक उत्सवांचा अंगीकार करून त्यांना एक ख्रिस्ती स्वरूप देणे, ही एक निश्‍चित ख्रिस्ती धारणा होती.” होय, मोठ्या प्रमाणातील धर्मत्याग त्याची दुःखद किंमत वसूल करत होता. मूर्तिपूजक उत्सवांचा अंगीकार करण्यातील तथाकथित ख्रिस्ती लोकांच्या तत्परतेमुळे आता समाजात काही प्रमाणात मान्यता मिळू लागली. लवकरच, ख्रिस्ती लोकांचेही मूर्तिपूजकांइतकेच वार्षिक उत्सव होऊ लागले. यांमध्ये नाताळ अग्रगामी होता यात कोणतेही आश्‍चर्य नाही.

आंतरराष्ट्रीय सण

ख्रिस्ती विश्‍वासाचे प्रबळ स्वरूप युरोपच्या पलीकडे गेले त्याबरोबर नाताळाचाही विस्तार होत गेला. येशूच्या जन्मदिवसाचा आदर करण्यासाठी एक चिरस्थायी आनंदमय उत्सव असणे उचित आहे, हा दृष्टिकोन कॅथोलिक चर्चने स्वीकारला. त्यानुसार, सा. यु. ५६७ मध्ये कौन्सिल ऑफ टूर्सने “नाताळापासून ते इपिफनीचे १२ दिवस पवित्र आणि मौजमजेचा काळ असल्याची घोषणा केली.”—द कॅथोलिक एन्सायक्लोपीडिया फॉर स्कूल ॲण्ड होम.

उत्तरीय युरोपातील सुगीच्या काळातील लौकिक उत्सवांची अनेक वैशिष्ट्ये नाताळाने लवकरच स्वीकारली. धार्मिकतेपेक्षा मौजमजाच अधिक करण्यात येत असे कारण चैनबाजी करणारे अगदी अधाशीपणे खात-पीत असत. कामासक्‍तीच्या विरोधात बोलण्याऐवजी, चर्चने त्यास राजरोसपणे मान्यता दिली. (पडताळा रोमकर १३:१३; १ पेत्र ४:३.) सा. यु. ६०१ मध्ये, पोप ग्रेगरी पहिला याने इंग्लंडमधील त्याचा मिशनरी, मेलिटस याला लिहिताना असे म्हटले, “अशा प्रकारचे प्राचीन मूर्तिपूजक सण थांबवण्यात येऊ नयेत, तर चर्चच्या पद्धतींनुसार त्यांत सुधारणा करावी, केवळ त्यांच्या कारणांना मूर्तिपूजकापासून ख्रिस्ती बनवावे.” हा अहवाल आर्थर वाइगॉल यांचा आहे, जे एकेकाळी इजिप्शियन सरकारात प्राचीन इतिहासाचे इन्स्पेक्टर जनरल होते.

मध्य युगाच्या दरम्यान, सुधारणा हवी असणाऱ्‍या लोकांना अशा स्वैरपणाविरुद्ध बोलण्याची आवश्‍यकता भासू लागली. त्यांनी “नाताळाच्या मौजमजेच्या दुरुपयोगाविरुद्ध” अनेक हुकूम दिले. अमेरिकेत नाताळ—एक इतिहास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात डॉ. पेनी रिस्टेड असे म्हणतात: “काही पाळकांनी जोर देत असे म्हटले, की पतित मानवजातीला स्वैरपणाच्या आणि स्वच्छंदीपणाच्या काळाची गरज आहे, परंतु हे सर्व ख्रिस्ती देखरेखीखाली करण्यात यावे.” यामुळे नाताळाविषयी असलेला गोंधळ आणखीनच वाढला. तथापि, मूर्तिपूजक रूढी सुरवातीपासूनच नाताळाशी इतक्या चांगल्याप्रकारे एकरूप झाल्या होत्या, की बहुतेक लोकांची त्या चालीरीती सोडण्याची इच्छा नव्हती, यामुळे विशेष असा काही फरक पडला नाही. ट्रिस्ट्रॅम कॉफिन या लेखकाने असे म्हटले: “बहुतेक लोक पूर्वापार करण्यात आलेल्याच गोष्टी करत होते आणि त्यांनी नीतिवेद्यान्त्यांच्या वादविवादांकडे कोणतेही लक्ष दिले नाही.”

युरोपीय लोकांनी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत वास्तव्य करण्यास सुरवात केली तोपर्यंत नाताळ हा सर्वज्ञात उत्सव झाला होता. तरी देखील नाताळाचा वसाहतींमध्ये स्वीकार करण्यात आला नाही. प्युरिटन सुधारक या उत्सवाला मूर्तिपूजक समजत आणि त्यावर १६५९ आणि १६८१ दरम्यान मेसेचुसेट्‌समध्ये बंदी घालण्यात आली.

बंदी काढून घेतल्यानंतर, नाताळाच्या उत्सवामध्ये सर्व वसाहतींमध्ये वाढ झाली, विशेषतः न्यू इंग्लंडच्या दक्षिण भागात. तथापि, या सणाच्या भूतकाळाला लक्षात घेता या गोष्टीचे आश्‍चर्य वाटत नाही, की काही लोकांना देवाच्या पुत्राचा सन्मान करण्यापेक्षा मजा करण्यात अधिक रस होता. नाताळात मौजमजा करणे, ही एक अव्यवस्था माजवणारी खास वहिवाट होती. टपोरी पोरांच्या टोळ्या त्यांच्या परिसरातील श्रीमंत लोकांच्या घरांत घुसत आणि त्यांच्याकडून मोफत जेवण्या-खाण्याची व्यवस्था करण्याची अपेक्षा करत. घरमालक तसे करण्यास तयार न झाल्यास सामान्यपणे त्याला शिव्याशाप दिला जात असे आणि केव्हा केव्हा तर त्याच्या घराची तोडफोड देखील केली जात असे.

सन १८२० च्या दशकात परिस्थिती इतकी विकोपाला गेली, की त्याविषयी प्राध्यापक निसनबॉम म्हणतात, “नाताळ धांगडधिंगा, हा गंभीर सामाजिक धोका” झाला होता. न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फिया सारख्या शहरांत श्रीमंत जमीनदार त्यांच्या मालमत्तेची राखण करण्यासाठी वॉचमन ठेवू लागले. असेही म्हटले जाते, की न्यूयॉर्क शहराने १८२७/२८ च्या नाताळाच्या काळात भडकलेला हिंसक दंगा नियंत्रणात आणण्यासाठी पेशेवाईक पोलिस दलाला पहिल्यांदाच संघटित केले!

नाताळात परिवर्तन

सन १९ व्या शतकात मानवजातीकरता अभूतपूर्व बदल घडून आले. लोक, सामान आणि बातम्या एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी मोठ्या वेगाने पोहंचू लागल्या कारण रस्त्यांचे आणि रेल्वेमार्गांचे जाळे उदयास आले होते. औद्योगिक क्रांतीमुळे कोट्यवधी नोकऱ्‍या उपलब्ध झाल्या आणि कारखान्यांतून मालाचे निरंतर उत्पादन बाहेर पडू लागले. औद्योगीकरणामुळे नवीन आणि कठीण सामाजिक समस्या देखील निर्माण झाल्या, ज्यामुळे नाताळ साजरा करण्याच्या पद्धतीवर शेवटी त्याचा परिणाम झाला.

लोकांनी फार पूर्वीपासून सणांचा, कौटुंबिक बंधन मजबूत करण्याचे माध्यम म्हणून उपयोग केला आहे, आणि हीच गोष्ट नाताळाच्या बाबतीत देखील आहे. नाताळाच्या काही जुन्या परंपरांमध्ये निवडक बदल करून, त्याच्या पुरस्कर्त्यांनी परिणामकारकपणे नाताळाला एका जंगली, मौजमजेच्या सणापासून कौटुंबिक-आधारित सण बनवले.

खरोखरच, १९ व्या शतकाच्या अखेरच्या भागापर्यंत नाताळाला आधुनिक अमेरिकी जीवनाच्या दुःखावर एक प्रकारचा मलम समजण्यात येऊ लागले. डॉ. रिस्टेड म्हणतात, “सर्व सणांमध्ये नाताळ हे, घरात धर्म आणि धार्मिक भावना पोहंचविण्याचे तसेच लोकांचा स्वैरपणा आणि अपयश सुधारण्याचे एक मूर्तिमंत साधन बनले होते.” त्या पुढे असे म्हणतात: “भेटवस्तू देणे, दान करणे, एकमेकांना मैत्रिपूर्ण शुभेच्छा देणे आणि बसण्याच्या खोलीत किंवा नंतर संडे स्कूलच्या सभागृहात एक सदाहरित झाडाची सजावट आणि आनंदाचे वातावरण, प्रत्येक लहान कुटुंबाच्या सदस्यांना एकमेकांसोबत, चर्चसोबत आणि समाजासोबत जोडत असे.”

त्याचप्रमाणे, आज अनेक लोकांकरता नाताळ साजरा करणे, एकमेकांमधील प्रेम दृढ करण्याचे आणि कौटुंबिक एकता कायम ठेवण्यास मदत करण्याचे एक माध्यम आहे. अर्थातच, आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष होता कामा नये. कोट्यवधी लोक येशूच्या जन्मदिनाचा आदर करण्यासाठी नाताळ साजरा करतात. ते कदाचित चर्चच्या खास सभांना जातील, येशूच्या जन्मासंबंधित असणारे देखावे ते आपल्या घरात सजवतील किंवा ते येशूलाच आभाराची प्रार्थना सादर करतील. परंतु याबाबतीत देवाचा दृष्टिकोन काय आहे? तो या सर्व गोष्टी स्वीकारतो का? बायबल काय म्हणते याकडे लक्ष द्या.

‘सत्याची आणि शांतीची आवड धरा’

येशू जेव्हा या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने त्याच्या अनुयायांना असे म्हटले: “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२४) या शब्दांनुरूप येशू जगला. तो नेहमी सत्य बोलला. त्याने त्याच्या पित्याला, ‘सत्यस्वरूप देव, यहोवाला’ पूर्णतः अनुसरले.—स्तोत्र ३१:५; योहान १४:९.

बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींद्वारे यहोवाने हे स्पष्ट केले आहे, की तो फसवणुकीच्या सर्व प्रकारांचा द्वेष करतो. (स्तोत्र ५:६) या गोष्टीचे भान ठेवल्यास, नाताळासंबंधित इतक्या सर्व पैलूंपासून डोकावणारा खोटेपणा उपरोधिक नाही का? उदाहरणार्थ, सांटा क्लॉजच्या गोष्टीचा विचार करा. अनेक देशांतील लोक विश्‍वास करतात त्याप्रमाणे, सांटा दरवाजातून येण्याऐवजी धुराड्यातून येण्याचे का पसंत करतो हे तुमच्या मुलाला समजावण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? आणि सांटा केवळ एका संध्याकाळी इतक्या कोट्यवधी घरांत कसा जातो? उडणाऱ्‍या हरणाबद्दल काय? जेव्हा एका मुलाला हे कळते, की फसवणूक करून सांटा एक वास्तविक व्यक्‍ती असल्याचे आपल्याला सांगण्यात आले आहे, तेव्हा आईवडिलांवरील त्याच्या भरवशास तडा जाणार नाही का?

द कॅथोलिक एन्सायक्लोपीडिया स्पष्टपणे म्हणते: “मूर्तिपूजक चालीरीती . . . अशा रीतीने नाताळामध्ये आल्या.” असे असताना कॅथोलिक चर्च आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या इतर चर्चेसने ख्रिस्ती उगम नसलेला अशा प्रकारचा सण साजरा करण्याचे का चालू ठेवले? यामुळे मूर्तिपूजक शिकवणींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत नाही का?

पृथ्वीवर असताना लोकांनी आपली उपासना करावी, असे उत्तेजन येशूने त्यांना दिले नाही. स्वतः येशूने म्हटले: “परमेश्‍वर [“यहोवा,” NW] तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.” (मत्तय ४:१०) त्याचप्रमाणे, येशूला स्वर्गात महिमा प्राप्त झाल्यानंतर, एका देवदूताने प्रेषित योहानाला म्हटले, की “नमन देवाला कर” यावरून हे समजते, की उपासनेच्या बाबतीत कोणताही बदल झालेला नव्हता. (प्रकटीकरण १९:१०) यामुळे एक प्रश्‍न उपस्थित होतो, नाताळाच्या काळात पित्याऐवजी येशूची उपासनेद्वारे करण्यात येणारी सर्व भक्‍ती येशू स्वीकार करील का?

ही गोष्ट स्पष्ट आहे, की नाताळाविषयीचे सत्य इतके चांगले नाही. मोठ्या प्रमाणात हा तयार करण्यात आलेला सण आहे ज्याच्या अवनीतिबद्दल भूतकाळात अनेक पुरावे आहेत. यामुळे, शुद्ध विवेकाच्या आधारावर लाखो ख्रिस्ती लोकांनी नाताळ साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ, रायन हा तरुण नाताळाविषयी असे म्हणतो: “जेव्हा कुटुंब एकत्र येतं आणि सर्वजण आनंदित असतात तेव्हा लोक वर्षातील काही दिवस किती उद्दीपित होतात. पण यामध्ये विशेष असं काय आहे? माझे आईवडील तर मला संपूर्ण वर्षभर भेटवस्तू देत असतात!” १२ वर्षांची आणखी एक मुलगी म्हणते: “मला कोणत्याही गोष्टीची कमी असल्याचं वाटत नाही. मला संपूर्ण वर्षभर भेटवस्तू मिळत असतात, केवळ अशा विशेष दिवशी नाही जेव्हा लोकांना भेटवस्तू देणं भाग पडतं.”

संदेष्टा जखऱ्‍या याने त्याच्या सहइस्राएलांना ‘सत्याची आणि शांतीची आवड धरण्याचे’ उत्तेजन दिले. (जखऱ्‍या ८:१९) जर आपण, जखऱ्‍या आणि प्राचीन काळातील विश्‍वासू लोकांप्रमाणे ‘सत्याची आवड धरतो’ तर मग, ‘जिवंत व सत्य देवाचा,’ यहोवाचा अनादर करणाऱ्‍या कोणत्याही खोट्या धार्मिक सणांपासून आपण दूर राहू नये का?—१ थेस्सलनीकाकर १:९.

[७ पानांवरील चित्र]

“मला कोणत्याही गोष्टीची कमी असल्याचं वाटत नाही. मला संपूर्ण वर्षभर भेटवस्तू मिळत असतात”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा