पौर्वात्य देशांमधील नाताळ
सुमारे दोनशे वर्षांआधी, एक नामवंत कोरियन विद्वान चीनमधील पेकिंग येथे आला. तेथील ख्रिस्ती लोकांच्या देवळाच्या छतावर मरीयेने बाळ येशूला कुशीत घेतल्याचे चित्र पाहून तो आश्चर्यचकित झाला; त्याने त्या चित्राचे असे वर्णन केले:
“एका स्त्रीच्या मांडीवर पाच-सहा वर्षांचे एक हाडकुळे बाळ होते. ती इतकी व्याकूळ दिसत होती की जणू तिला आपल्या बाळाची स्थिती पाहावत नव्हती. त्यांच्या मागच्या बाजूस पुष्कळ भुते होती; पंख असलेली बाळे आजूबाजूला उडत होती. मी ते चित्र पाहत होतो तेव्हा असे वाटत होते की जणू कोणत्याही क्षणी त्या चित्रातले लोक माझ्यावर कोसळतील. मी घाबरून पटकन त्यांना झेलण्याकरता हात वर केला.”
हीघटना घडली तेव्हा युरोपमध्ये धर्मसुधारणेची चळवळ होऊन कित्येक वर्षे लोटली होती; मध्य युगातला अज्ञानाचा काळ केव्हाच सरला होता. तरीही, पौर्वात्य देशांमधल्या लोकांना ख्रिस्ती धर्म त्या पेंटींगइतकाच अपरिचित आणि नवीन होता. पण आजची स्थिती किती वेगळी आहे! दर वेळी नाताळाच्या सणामध्ये बाळ येशूची चित्रे प्रदर्शित केली जातात. अशा चित्रांची आता पौर्वात्य लोकांना सवय झाली आहे; नाताळाच्या वेळी तिथले सजलेले रस्ते पाहिले की युरोपमधील रस्त्यांचीच आठवण होते.
सन १९९८ नोव्हेंबर २५ च्या संध्याकाळी म्हणजेच नाताळाच्या एक महिना आधी, शॉनझेलीझेच्या (पॅरिस येथील प्रसिद्ध रस्ता) दोन्ही बाजूंनी असलेल्या ३०० वृक्षांवर १,००,००० दिव्यांची भव्यदिव्य प्रकाशयोजना करतात. अगदी असाच थाटमाट कोरियातील सीओल शहरातल्या एका रस्त्यावर दिसून येतो; तेथे एका मोठाल्या डिपार्टमेंट स्टोअरच्या सौजन्याने एक प्रचंड मोठे ख्रिसमस ट्री सजवलेले असते. आणि मग सबंध शहरात त्याचा प्रकाश पसरतो. हळूहळू सर्व रस्त्यांवर नाताळाची सजावट केली जाते.
दररोज टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांमधून नाताळावर आधारित कार्यक्रम आणि विषय सादर केले जातात. सबंध देश नाताळमय झालेला असतो; सगळेजण वर्षअखेरीला येणाऱ्या या सणाचे स्वागत करण्यात गर्क असतात. सीओलमधल्या चर्चेसची सजावटही लगबगीने केली जाते; तेथील असंख्य चर्चेस पाहून पर्यटकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. एकीकडे कोरिया आणि पूर्वेतील इतर राष्ट्रे नाताळाची तयारी करण्यात दंग असतात तर दुसरीकडे अमेरिका थँक्सगिव्हिंग डेची (नोव्हेंबरच्या अखेरीस येणारा सण) जय्यत तयारी करण्यात गोवलेली असते.
पूर्वेतील बहुतेक देश ख्रिस्ती धर्मजगतात गणले जात नाहीत. उदाहरणार्थ, कोरियाच्या लोकसंख्येतील केवळ २६.३ टक्के लोक ख्रिस्ती असल्याचा दावा करतात. हाँगकाँगमध्ये ७.९ टक्के लोक ख्रिस्ती आहेत, तायवानमध्ये ७.४ टक्के तर जपानमध्ये फक्त १.२ टक्के ख्रिस्ती आहेत. यावरून स्पष्ट दिसून येते की, पूर्वेतील बहुतेक लोक ख्रिस्ती नाहीत; तरीही ते नाताळ मोठ्या उत्सुकतेने साजरा करतात. खरे पाहिले तर, पाश्चिमात्त्य देशांपेक्षा पौर्वात्य देशांमधलाच नाताळ प्रचंड थाटामाटाने साजरा केला जातो. हाँगकाँगचेच उदाहरण घ्या. इथले बहुतांश रहिवाशी बौद्ध किंवा ताओ धर्म मानत असले तरीही इथला भव्यदिव्य नाताळ सण तर फारच प्रसिद्ध आहे. चीनमध्येही केवळ ०.१ टक्के लोक ख्रिस्ती असल्याचा दावा करतात; पण नाताळाचा सण तेथेही वेगाने लोकप्रिय होऊ लागला आहे.
पौर्वात्य देशांमध्ये नाताळ साजरा करण्याचे इतके औत्सुक्य का? ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांच्या मते नाताळ हा येशूचा जन्मदिवस आहे. तर मग, येशूला मशीहा न मानणारे लोकही नाताळ का साजरा करतात? नाताळाविषयी खऱ्या ख्रिश्चनांनी देखील त्यांच्यासारखाच दृष्टिकोन बाळगावा का? नाताळ हा सण कोरियासारख्या प्राचीन पौर्वात्य देशात कसा लोकप्रिय झाला हे पडताळताना आपल्याला वरील प्रश्नांची उत्तरे सापडतील.