प्रकटीकरणाचा संदेश—भीतीदायक की आशादायक?
“अपोकॅलिप्स हे आज फक्त बायबलमधील वर्णन राहिलेले नाही तर ते खरोखर घडण्याची शक्यता आज सर्वत्र व्यक्त केली जात आहे.”—हॉवीएर पेरस दे क्वेयॉर, संयुक्त राष्ट्रसंघाचे भूतपूर्व सेक्रेटरी-जनरल.
पेरस दे क्वेयॉर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीने “अपोकॅलिप्स” हा शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्यावरून अनेक लोकांचा या शब्दाबद्दल काय ग्रह आहे आणि चित्रपट किंवा पुस्तकाच्या शीर्षकांसाठी, पत्रिकेतील लेखांसाठी आणि बातमीपत्रांत या शब्दाचा कोणत्या अर्थाने उपयोग केला जातो हे दिसून येते. अपोकॅलिप्स म्हटल्याबरोबर बऱ्याच लोकांच्या डोळ्यासमोर विश्वविनाशाचे दृश्य उभे राहते. परंतु “अपोकॅलिप्स” या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, बायबलमधील अपोकॅलिप्स किंवा प्रकटीकरण नावाच्या पुस्तकातील संदेश नेमका कशाविषयी आहे?
“अपोकॅलिप्स” हा शब्द “बेपडदा करणे” किंवा “उघड करणे” या अर्थाच्या एका ग्रीक शब्दातून आला आहे. मग, बायबलमधील प्रकटीकरणात काय उघड करण्यात आले किंवा प्रकट करण्यात आले? तो फक्त विनाशाचा संदेश आहे का, असा विनाश ज्यातून कोणीही बचावणार नाही? इंस्टिट्यूट द फ्रान्सचे सदस्य, इतिहासकार झॉन देल्युमो यांना प्रकटीकरणाच्या पुस्तकाबद्दल त्यांचे मत विचारले असता ते म्हणाले: “ते सांत्वनदायक आणि आशेचा संदेश देणारे पुस्तक आहे. लोकांनी त्यातील विनाशकारी वर्णनांवर जास्त भर देऊन त्याला असे भयानक रूप दिले आहे.”
प्रारंभीचे चर्च आणि प्रकटीकरणाचे पुस्तक
प्रकटीकरणाच्या पुस्तकाविषयी आणि त्यात दिलेल्या ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील हजार वर्षांच्या राजवटीच्या आशेबद्दल प्रारंभिक “ख्रिश्चनांचा” काय दृष्टिकोन होता? पुढे त्याच इतिहासकाराने असे म्हटले: “पहिल्या शतकातील बहुतेक ख्रिश्चन हजार वर्षांचा सुखाचा काळ (मिलेनियम) येईल असे मानायचे . . . असे मानणाऱ्या प्रारंभिक शतकातील ख्रिश्चनांपैकी होते आशिया मायनरच्या हायरापोलिस येथील धर्मगुरू पेपीअस, . . . मूळचे पॅलेस्टाईनचे सेंट जस्टीन, ज्यांना १६५ च्या सुमारास रोममध्ये हौतात्म्य पत्करावे लागले; लायॉन्सचे धर्मगुरू सेंट आयरेनियस जे २०२ मध्ये मरण पावले, टर्टुलियन जे २२२ मध्ये मरण पावले आणि . . . नामवंत लेखक लॅकटॅनशीअस.”
ऐतिहासिक अहवालानुसार, पर्गमममध्ये सा.यु. १६१ किंवा १६५ साली हौतात्म्य पत्करावे लागलेल्या पेपीअसविषयी द कॅथोलिक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “संत योहानाचा शिष्य असलेला हायरापोलिसचा धर्मगुरू पेपीअस ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यावरील विश्वासाचा समर्थक होता हे स्पष्ट दिसून येते. त्याला खुद्द प्रेषितांच्या समकालीन लोकांकडून ही शिकवण मिळाल्याचा त्याचा दावा होता; आयरेनियसही सांगतो की, जे इतर ‘प्रेस्बिटर्स’ (धर्मगुरू) शिष्य योहानाच्या सहवासात राहिले होते त्यांना देखील शिष्य योहानाकडूनच प्रभूच्याच शिकवणीचा एक भाग असलेली ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याची शिकवण मिळाली होती. युसेबियसच्या अहवालानुसार . . . पेपीअसने आपल्या पुस्तकात असे ठामपणे म्हटले होते की, पृथ्वीवर ख्रिस्ताच्या दृश्य आणि वैभवी राज्याच्या एक हजार वर्षांनंतर मृतांचे पुनरुत्थान होईल.”
या सगळ्यावरून, ख्रिस्ताच्या प्रारंभिक अनुयायांवर अपोकॅलिप्स किंवा प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा कसा प्रभाव पडला असे आपण समजावे? त्यातील संदेशामुळे लोकांच्यात दहशत निर्माण झाली की उलट त्यांच्या मनात नवी आशा जागृत झाली? लक्ष देण्याजोगी एक गोष्ट अशी आहे की, हीलयेटी (हजार वर्षे) या ग्रीक शब्दावरून इतिहासकार प्रारंभिक ख्रिश्चनांना किलियॅस्ट्स म्हणतात. होय, पृथ्वीवर सुखाचा काळ आणणाऱ्या ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीवर विश्वास ठेवणारे बरेच जण तेव्हा होते. बायबलमध्ये केवळ अपोकॅलिप्स किंवा प्रकटीकरणाच्या पुस्तकातच हजार वर्षांच्या राज्याच्या आशेविषयी स्पष्टपणे सांगितले आहे. (२०:१-७) यास्तव, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याऐवजी अपोकॅलिप्सने उलट त्यांना भव्य आशा देऊ केली. प्रारंभिक चर्च आणि जग (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात चर्च इतिहासावर भाष्य करणारे ऑक्सफोर्डचे प्राध्यापक सेसिल कॉडु लिहितात: “हजार वर्षांच्या राज्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा दृष्टिकोन कालांतराने नाकारण्यात आला असला, तरी बऱ्याच काळापर्यंत तो चर्चमध्ये मानला जात होता; विशेषतः काही नामवंत लेखक त्याविषयी शिकवत होते.”
प्रकटीकरणाचा आशादायक संदेश का नाकारण्यात आला
प्रारंभिक ख्रिश्चनांपैकी बहुतेक ख्रिस्ती, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यात पृथ्वीवर सुखाचा काळ येण्याची आशा करत होते याला इतिहासही दुजोरा देतो हे आपण पाहिले आहे; पण मग “कालांतराने हा दृष्टिकोन” का “त्यागण्यात आला?” रॉबर्ट माऊन्स या विद्वानांनी म्हटल्याप्रमाणे, “दुर्दैवाने, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीवर विश्वास करणाऱ्या अनेकांनी आपल्या कल्पनांचे घोडे मोकाट सोडले आणि हजार वर्षांच्या काळादरम्यान भोगवादी, सुखविलासी जीवन असेल असे ते शिकवू लागले.” त्यामुळे काहींना त्याची टीका करायला कारण मिळाले. परंतु, हजार वर्षांच्या राजवटीची आशा सोडून न देता हे अतिरेकी दृष्टिकोन सुधारता आले असते.
पण तसे झाले नाही; किंबहुना, ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या विश्वासाचा विरोध करणाऱ्यांनी ही कल्पना दडपून टाकण्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबले हे चकीत करणारे आहे. डिक्शनेर द टेऑलॉजी कॅथोलीक यात रोमी पादरी केअसविषयी (दुसऱ्या शतकाच्या शेवटी आणि तिसऱ्या शतकाच्या प्रारंभी) असे सांगितले आहे की, “ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीचा विश्वास दडपून टाकण्यासाठी त्याने अपोकॅलिप्स [प्रकटीकरण] आणि संत योहानाच्या शुभवर्तमानाच्या सत्यतेलाच चक्क नाकारले.” याच डिक्शनेरमध्ये पुढे म्हटले आहे की, तिसऱ्या शतकातला अलेक्झांड्रियाचा धर्मगुरू डायोनायसियस याने ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या विश्वासाच्या विरोधात एक ग्रंथ लिहिला “ज्यामध्ये ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या समर्थकांनी आपल्या या विश्वासासाठी संत योहानाच्या प्रकटीकरणाचा आधार घेऊ नये म्हणून अगदी बिनदिक्कतपणे या पुस्तकालाच खोटे ठरवले होते. पृथ्वीवरील हजार वर्षांच्या राज्याकरवी मिळणाऱ्या आशीर्वादांच्या आशेचा असा हा द्वेषपूर्ण विरोध दाखवून देतो की तेव्हाचे वेदान्ती एका अदृश्य प्रभावाखाली होते.
ख्रिस्ताच्या हजार वर्षे राज्याचा मागोवा (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात प्राध्यापक नॉर्मन कोन लिहितात: “ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीचा विश्वास खोटा ठरवण्याचा सर्वात पहिला प्रयत्न तिसऱ्या शतकात झाला कारण प्राचीन चर्चच्या सर्व वेदान्तींपैकी सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या ओरिजेनने देवाच्या राज्याची स्थापना प्रत्यक्षात होणार नसून भक्तांच्या अंतःकरणात होईल असे सांगण्यास सुरवात केली होती.” बायबलचा आधार घेण्याऐवजी ओरिजेनने ग्रीक तत्त्वज्ञानाचा आधार घेतला; मशीहाचे राज्य ‘भक्तांच्या अंतःकरणात येते’ अशी अनाकलनीय शिकवण देऊन त्याने मशीहाच्या राज्यात पृथ्वीवर अद्भुत आशीर्वाद मिळण्याच्या आशेला निर्रथक करून टाकले. कॅथोलिक लेखक लेओन ग्री यांनी असे लिहिले: “ग्रीक तत्त्वज्ञानाचा पगडा वाढत गेला . . . तसतसा ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या विश्वासाच्या कल्पनांचा ऱ्हास झाला.”
“चर्चकडे आशेचा संदेशच उरलेला नाही”
आपला अस्सलपण आधीच गमावून बसलेल्या ख्रिस्ती धर्मासोबत ग्रीक तत्त्वज्ञानाचा समन्वय साधण्याचा सर्वात जास्त प्रयत्न कोणी केला असेल तर तो आहे धर्मगुरू ऑगस्टीन. सुरवातीला, स्वतः ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या विश्वासाचा समर्थक असलेल्या ऑगस्टीनने नंतर मात्र पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या हजार वर्षीय भावी राज्याची कल्पना पूर्णपणे नाकारली. प्रकटीकरणाचा २० वा अध्याय सांकेतिक आहे असे सांगून त्याने अर्थाचा अनर्थ केला.
कॅथोलिक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “शेवटी ऑगस्टीनने असे मत धारण केले की हजार वर्षांचे राज्य कधीच येणार नाही. . . . त्याचे असे म्हणणे आहे की, या अध्यायात चर्चिलेले पहिले पुनरुत्थान म्हणजे बाप्तिस्मा घेतल्यानंतरच्या आध्यात्मिक पुनर्जन्माला सूचित करते आणि मानव इतिहासाच्या सहा हजार वर्षांनंतरचा एक हजार वर्षांचा शब्बाथ म्हणजेच अनंतकालिक जीवन होय.” द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो: “ऑगस्टीनचा सांकेतिक सहस्त्रकवाद हीच चर्चची अधिकृत शिकवण ठरली . . . लुथरन, कॅल्विनवादी आणि अँग्लीकन सांप्रदायांच्या प्रोटेस्टंट धर्मसुधारकांनी . . . ऑगस्टीनच्या विचारसरणीला शेवटपर्यंत सोडले नाही.” अशाप्रकारे, ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्च सदस्यांना ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याच्या आशेपासून वंचित करण्यात आले.
शिवाय, स्विस तत्त्ववेत्ता फ्रेडेरिक द रुझमॉन यांच्या सांगण्यानुसार, “[ऑगस्टीनने] हजार वर्षांच्या राजवटीवरील आपला विश्वास त्यागून चर्चला भारी नुकसान पोहंचवले. आपल्या प्रभावाने त्याने अशा एका चुकीच्या विश्वासाला मंजुरी दिली ज्यामुळे आदर्श पृथ्वीच्या आशेपासून [चर्च] वंचित झाले.” जर्मन तत्त्ववेत्ता अडॉल्फ हॉरनॉक देखील या विचाराशी सहमत आहेत की, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याचा विश्वास त्यागल्यामुळे सामान्य लोकांना “कळत असलेला धर्म,” अर्थात त्यांचा “जुना विश्वास आणि जुन्या आशा” रद्द करून त्यांना असा धर्म देण्यात आला “जो त्यांच्या बुद्धीपलीकडे होता.” आज अनेक देशांतील रिकामी चर्चेस याचाच बोलका पुरावा आहेत की, लोकांना समजेल असा धर्म आणि पटेल अशी आशा हवी आहे.
प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे ठळक मुद्दे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात बायबल विद्वान जॉर्ज बिझली-मरे यांनी लिहिले: “एका बाजूला ऑगस्टीनच्या प्रचंड प्रभावामुळे आणि दुसऱ्या बाजूला लहान पंथांनी ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याचा विश्वास स्वीकारल्यामुळे कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या दोन्ही सांप्रदायांनी तो विश्वास त्यागला. मग, त्यांच्या विश्वासानुसार या जगात मानवासाठी कोणती पर्यायी आशा आहे असा प्रश्न त्यांना केल्यावर त्यांचे उत्तर आहे: कोणतीही आशा नाही. ख्रिस्ताचे दुसरे येणे झाल्यावर या जगाचा नाश होईल, कोणी अनंतकालिक स्वर्गात तर कोणी नरकात जाईल आणि मानव इतिहास लुप्त होऊन जाईल. . . . चर्चकडे आशेचा संदेशच उरलेला नाही.”
प्रकटीकरणातील अद्भुत आशा अद्यापही आहे!
यहोवाच्या साक्षीदारांना मात्र पूर्ण खात्री आहे की, ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीसंबंधीची अद्भुत अभिवचने निश्चित पूर्ण होतील. “वर्ष २०००: विश्वविनाशाची भीती,” या विषयावर एका फ्रेंच टीव्ही कार्यक्रमात फ्रेंच इतिहासकार झॉन देल्युमो यांनी असे म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांचा ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यावरील विश्वास अटळ आहे कारण त्यांच्या मते लवकरच . . . आपण १,००० वर्षांच्या आनंदमय काळात प्रवेश करणार आहोत—अर्थात, अरिष्टे पार केल्यावरच!”
प्रेषित योहानाने एका दृष्टान्तात अगदी हेच पाहिले आणि त्याचे वर्णन अपोकॅलिप्स किंवा प्रकटीकरणाच्या पुस्तकात केले. त्याने असे लिहिले: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली . . . आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:१, ३, ४.
होता होईल तितक्या लोकांना हा आशादायक संदेश देण्यासाठी यहोवाचे साक्षीदार जगव्याप्त बायबल प्रशिक्षणाचे कार्य करत आहेत. तुम्हालाही अधिक माहिती द्यायला त्यांना निश्चित आवडेल.
[६ पानांवरील चित्र]
पेपीअसला ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीची शिकवण थेट प्रेषितांच्या समकालीन लोकांकडून प्राप्त झाली होती असा त्याचा दावा होता
[७ पानांवरील चित्र]
ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीवर टर्टुलियनचा विश्वास होता
[Credit Line]
© Cliché Bibliothèque Nationale de France, Paris
[७ पानांवरील चित्र]
“[ऑगस्टीनने] हजार वर्षांच्या राजवटीवरील आपला विश्वास त्यागून चर्चला भारी नुकसान पोहंचवले”
[८ पानांवरील चित्र]
प्रकटीकरणाच्या पुस्तकातील अभिवचनाप्रमाणे पृथ्वीवर सुखाचा काळ येण्याची आपण उत्सुकतेने वाट पाहू शकतो