वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १२/१ पृ. ३-५
  • विश्‍वविनाशाची भीती कशाला?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वविनाशाची भीती कशाला?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अपोकॅलिप्स किंवा विश्‍वविनाशाच्या भीतीमागचा इतिहास
  • विश्‍वविनाशाची भीती साधार आहे का?
  • अपोकलीप्स—ते काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • अपोकलीप्स केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • प्रकटीकरणाचा संदेश—भीतीदायक की आशादायक?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • प्रकटीकरणातील “सुवार्ता”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १२/१ पृ. ३-५

विश्‍वविनाशाची भीती कशाला?

टाईम पत्रिकेत धार्मिक विषयांवरील लेखक डेमयन थॉम्पसन म्हणतात: “मानव समाज विनाशाकडे वाटचाल करत आहे हे ख्रिस्ती मूलतत्त्ववादी कित्येक दशकांपासून भाकीत करत होते. पण आश्‍चर्य म्हणजे एकेकाळी जे लोक अशा कल्पनांना हसण्यावारी न्यायचे तेच लोक, म्हणजे कॉम्प्युटर तज्ज्ञ, बडे उद्योगपती आणि राजकीय पुढारी आज जागतिक विनाशाच्या भाकितांची गंभीर दखल घेऊ लागले आहेत, किंबहुना ते स्वतःही अशा भाकितांना प्रसिद्धी देऊ लागले आहेत.” थॉम्पसन पुढे असे म्हणतात की, २००० साली जगभरातले संगणक बंद पडण्याच्या भीतीमुळे “देवाधर्मावर काडीमात्र विश्‍वास नसलेल्या व्यक्‍तीसुद्धा येत्या सहस्त्रकात विश्‍वविनाश होणार असा विश्‍वास करू लागल्या आहेत. जगभरात खळबळ माजेल, सरकारे निकामी होतील, अन्‍नपाण्यासाठी लोक एकमेकांच्या जिवावर उठतील, गगनचुंबी इमारतींना विमाने धडकतील” आणि यांसारखी अनेक संकटे मानव समाजावर येतील अशी त्यांना भीती वाटू लागली आहे.

शिवाय, अलीकडे अनेक लहान धर्मपंथांच्या खळबळजनक हालचालींमुळे जनसामान्यांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण पसरले आहे. या पंथांना सहसा “अपोकॅलिप्टिक” (विनाशाच्या सहस्त्रकावर विश्‍वास ठेवणारे) असे संबोधले जाते. १९९९ साली, जानेवारी महिन्यात ल फिगारो या फ्रेंच दैनिकात “जेरूसलेम आणि विश्‍वविनाशाचे संकेत” असे शीर्षक असलेल्या एका लेखात म्हटले होते: “[इस्राएली] सुरक्षा दलांच्या अंदाजानुसार माउंट ऑफ ऑलिव्हझ आणि आसपासच्या परिसरांत विनाशाच्या सहस्त्रकावर विश्‍वास करणारे शेकडो भाविक ख्रिस्ताच्या दुसऱ्‍या येण्याची अर्थात प्रकटीकरणाची वाट पाहत आहेत.”

ब्रिटानिका वार्षिक पुस्तक १९९८ (इंग्रजी) यात “डूम्सडे कल्ट्‌स” (जगाच्या विनाशाची वाट पाहणारे पंथ) यांच्याविषयी एक खास वृत्त आहे. हेव्हन्स गेट, पीपल्स टेम्पल आणि ऑडर ऑफ द सोलर टेम्पल या आत्मत्यागाच्या तत्त्वज्ञानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या पंथांचा या लेखात उल्लेख होता. शिवाय, ओंम शिनरीक्यो या पंथाचाही त्यात उल्लेख होता; या पंथाच्या अनुयायांनी १९९५ साली टोकियोच्या भुयारी मार्गात प्राणघातक विषारी वायू सोडल्यामुळे १२ जण ठार व हजारो जखमी झाले होते. या अहवालाविषयी, शिकागो विद्यापीठातील धर्म या विषयाचे प्राध्यापक मार्टिन ई. मॉर्टी यांनी सारांशात असे लिहिले: “सन २००० मध्ये पदार्पण करण्याची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतसा हरएक प्रकारच्या भविष्यवाण्यांना आणि चळवळींना ऊत आला आहे आणि हे पुढेही निश्‍चितच चालू राहणार. यांतील काही समाजाला हानीकारकही ठरतील. तेव्हा, सतर्कता बाळगली पाहिजे.”

अपोकॅलिप्स किंवा विश्‍वविनाशाच्या भीतीमागचा इतिहास

अपोकॅलिप्स किंवा प्रकटीकरण हे बायबलमधील शेवटल्या पुस्तकाचे नाव आहे; त्याचे लिखाण सा.यु. पहिल्या शतकाच्या शेवटी झाले होते. या पुस्तकाचे भविष्यसूचक स्वरूप आणि त्यातील सांकेतिक भाषा यांच्यामुळे “अपोकॅलिप्टिक” हे विशेषण, बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे लिखाण होण्याच्या बऱ्‍याच काळाआधी सुरू झालेल्या एका विशिष्ट प्रकारच्या लिखाणासाठी वापरण्यात येऊ लागले. या लिखाणांतील दंतकथा आणि सांकेतिक भाषा मुळात प्राचीन पर्शिया आणि त्याहूनही अगोदरच्या इतिहासात आढळते. म्हणूनच, द ज्यूईश एन्सायक्लोपिडियामध्ये “या [यहुदी अपोकॅलिप्टिक] लिखाणांतील बहुतेक दंतकथा आणि संकेतांचे स्पष्ट दिसणारे बॅबिलोनी स्वरूप” असा उल्लेख करण्यात आला आहे.

यहुदी अपोकॅलिप्टिक लिखाणांच्या प्रसिद्धीचा काळ, सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकाच्या सुरवातीपासून सा.यु. दुसऱ्‍या शतकाच्या शेवटपर्यंत होता. ही लिखाणे कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती त्याचे स्पष्टीकरण देताना बायबलच्या एका विद्वानाने लिहिले: “यहुद्यांनी दोन युगांमध्ये काळाचे विभाजन केले होते. एक होते विद्यमान युग जे संपूर्णतः दुष्टाईने व्यापलेले होते . . . यास्तव, यहुदी लोक विश्‍वाचा आहे त्याच स्थितीत विनाश होण्याची वाट पाहत होते. दुसरे होते येऊ घातलेले युग जे संपूर्णतः सात्त्विक असणार होते, ते देवाचे सुवर्ण युग असणार होते ज्यामध्ये शांती, संपन्‍नता आणि सात्त्विकता असणार होती . . . हे रूपांतर कसे घडून येणार होते? हा बदल मनुष्याच्या प्रयत्नांनी कधीच होणार नाही तर देव थेट हस्तक्षेप करील असा यहुद्यांचा विश्‍वास होता. . . . देव येणार होता त्या दिवसाला प्रभुचा दिवस असे म्हटले जात होते आणि तो भयप्रेरक, विनाशकारी आणि न्यायाचा भयंकर काळ असून त्यातूनच नवीन युगाचा जन्म होणार होता. सर्व अपोकॅलिप्टिक लिखाणांमध्ये या घटनांचा उल्लेख केला आहे.”

विश्‍वविनाशाची भीती साधार आहे का?

बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकात ‘देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईचा’ किंवा हर्मगिदोनचा उल्लेख केला आहे; त्यामध्ये प्रथम दुष्टांचा नाश केला जाईल, त्यानंतर एक हजार वर्षांपर्यंत सैतानाला अथांग डोहात टाकले जाईल व ख्रिस्त मानवजातीचा न्याय करील. (प्रकटीकरण १६:१४, १६; २०:१-४) मध्ययुगात, काहींना या भविष्यवाण्यांबद्दल गैरसमज झाला होता कारण कॅथोलिक “संत” ऑगस्टीनने (३५४-४३० सा.यु.) असे म्हटले होते की, ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी या हजार वर्षांची सुरवात झाली होती व ती संपल्यानंतर शेवटला न्याय केला जाईल. ऑगस्टीनने कालगणनेला जास्त महत्त्व दिले नव्हते पण वर्ष १००० जवळ आले तशी लोकांच्या मनात मात्र भीती वाढू लागली. मध्ययुगात जगाच्या विनाशाविषयी लोकांमध्ये निर्माण झालेल्या या भीतीमुळे त्या काळच्या समाजावर कितपत परिणाम झाला यावर इतिहासकारांचे एकमत नाही. पण ती कितीही व्यापक असली तरी निराधार होती, हे कालांतराने सिद्ध झालेच.

आजही, सन २००० किंवा २००१ मध्ये भयानक विश्‍वविनाश होईल अशी भीती व्यक्‍त केली जात आहे; केवळ धार्मिक आधारावरच नव्हे, तर धर्माशी संबंध नसेलल्या क्षेत्रांतही ही भीती व्यक्‍त केली जात आहे. पण या भीतीला काही आधार आहे का? आणि बायबलमधील प्रकटीकरण किंवा अपोकॅलिप्सच्या पुस्तकातला संदेश भीतीदायक आहे की आशादायक? कृपया पुढचाही लेख वाचा.

[४ पानांवरील चित्र]

मध्ययुगात विश्‍वविनाशाविषयी लोकांना वाटलेली भीती निराधार ठरली

[Credit Line]

© Cliché Bibliothèque Nationale de France, Paris

[Picture Credit Line on page 3]

Maya/Sipa Press

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा