प्रकटीकरणातील “सुवार्ता”
“नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.”—प्रकटीकरण १४:६.
१. अपोकॅलिप्स, अर्थात प्रकटीकरण हे पुस्तक देवानेच प्रेरित केले आहे यावर यहोवाच्या साक्षीदारांचा विश्वास असला तरीही त्यांना “अपोकॅलिप्टिक सेक्ट” का म्हणता येणार नाही?
यहोवाचे साक्षीदार जगाचा विनाश होणार असे सांगून लोकांमध्ये दहशत पसरवतात असा त्यांच्यावर आरोप लावला जातो. पण हे खरे नाही. त्यांच्या धर्माला “अपोकॅलिप्टिक सेक्ट” किंवा “डूम्सडे कल्ट” (जगाचा सर्वनाश वर्तवणारे धर्मपंथ) असे मुळीच म्हणता येणार नाही. अपोकॅलिप्स किंवा प्रकटीकरणाचे पुस्तक हे देवाच्या प्रेरित वचनाचा एक भाग असल्याचे ते जरूर मानतात आणि या प्रकटीकरणाच्या पुस्तकात दुष्टांवर येणार असलेल्या न्यायदंडाविषयी सांगितले आहे हे देखील खरे आहे. परंतु देवाचे सेवक केवळ येणाऱ्या अरिष्टांविषयीच लोकांना सांगत नाहीत. उलट ते ॲपोकॅलिप्स अर्थात प्रकटीकरणाच्या पुस्तकात, शिवाय बायबलच्या इतर पुस्तकांतही असलेल्या अद्भुत आशेविषयी खासकरून लोकांना सांगतात. अशारितीने, ते बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवादांत आपणहून काही भर घालत नाहीत आणि त्यातून काही काढतही नाहीत.—प्रकटीकरण २२:१८, १९.
सुवार्तेचे प्रचारक
२. यहोवाचे साक्षीदार प्रचार करताना सहसा बायबलमधल्या कोणत्या वचनांचा उल्लेख करतात?
२ येशूने म्हटले होते, “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” आणि बऱ्याच वेळा उल्लेख केल्याप्रमाणे हेच यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यामागचे मुख्य शास्त्रवचनीय कारण आहे. (मत्तय २४:१४) पण “राज्याची ही सुवार्ता” नक्की आहे तरी काय? बरेच साक्षीदार या प्रश्नाचे उत्तर प्रकटीकरणाच्या २० व्या आणि २१ व्या अध्यायांतून देतील; या अध्यायांत ख्रिस्ताचे हजार वर्षांचे राज्य आणि त्याचे सरकार यांविषयी सांगितले आहे; तसेच एका नव्या मानवी समाजाबद्दलही त्यात सांगितले आहे, ज्यात मरण शोक व रडणे ‘राहणार नाही.’—प्रकटीकरण २०:६; २१:१, ४.
३. यहोवाच्या साक्षीदारांचे सार्वजनिक प्रचार कार्य कोणाच्या कार्याशी जुळते?
३ यहोवाचे साक्षीदार या सुवार्तेचे प्रचारक असले तरी, खरे पाहता एक लाक्षणिक स्वर्गदूत त्यांच्या माध्यमाने ही सुवार्ता घोषित करत आहे. या स्वर्गदूताच्या कार्याचेही वर्णन प्रकटीकरणात आढळते. “नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.” (प्रकटीकरण १४:६) सार्वकालिक सुवार्ता अशी की, “जगाचे राज्य [किंवा, शासन] आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे” आणि “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची” यहोवाने नियुक्त केलेली “वेळ” आली आहे. (प्रकटीकरण ११:१५, १७, १८) ही सुवार्ताच नाही का?
प्रकटीकरण आपल्याकरता अर्थपूर्ण
४. (अ) प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायात कोणती मूलभूत सत्ये दिली आहेत? (ब) प्रकटीकरणातील सुवार्तेचे आशीर्वाद मिळवायचे असतील, तर काय करावे लागेल?
४ प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायात यहोवाचे वर्णन “जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्वसमर्थ, तो . . . अल्फा व ओमेगा,” असे करण्यात आले आहे. तर त्याच्या पुत्राला, अर्थात येशू ख्रिस्ताला “विश्वसनीय साक्षी,” “मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला” व “पृथ्वीवरील राजांचा अधिपति” म्हणण्यात आले आहे. शिवाय, “जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हाआम्हाला पातकांतून मुक्त केले,” असेही या पहिल्या अध्यायात येशूबद्दल म्हटले आहे. (प्रकटीकरण १:५, ८) अशाप्रकारे, अगदी सुरवातीपासूनच प्रकटीकरणाच्या पुस्तकात तारणाकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. “पृथ्वीवर राहणाऱ्यांस” प्रकटीकरणातील सुवार्तेचे आशीर्वाद मिळवायचे असतील, तर त्यांनी यहोवाचे सार्वभौम राजपद ओळखले पाहिजे; येशूने सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवला पाहिजे; तसेच यहोवाने येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान करून त्याला पृथ्वीवर राज्य करण्याकरता नियुक्त केले आहे यावरही त्यांचा विश्वास असणे आवश्यक आहे.—स्तोत्र २:६-८.
५. प्रकटीकरणाच्या २ ऱ्या आणि ३ ऱ्या अध्यायात ख्रिस्ताला कोणत्या भूमिकेत आपण पाहतो?
५ पुढच्या दोन अध्यायांमध्ये याचे वर्णन आहे, की कशाप्रकारे येशू ख्रिस्त स्वर्गातून आपल्या शिष्यांच्या मंडळ्यांची प्रेमळपणे देखरेख करतो. सा.यु. पहिल्या शतकात एशिया मायनरच्या प्रदेशातील सात ख्रिस्ती मंडळ्यांना उद्देशून लिहिलेल्या संदेशांतून ख्रिस्त त्यांना उत्तेजन देतो आणि कडक शब्दांत मार्गदर्शनही करतो; हे संदेश आजही आपल्याकरता अर्थपूर्ण आहेत. या संदेशांच्या सुरवातीला सहसा ‘तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत’ किंवा ‘तुझे क्लेश मला ठाऊक आहेत,’ असे म्हटले आहे. (प्रकटीकरण २:२, ९) येशू असे म्हणू शकला कारण आपल्या शिष्यांच्या मंडळ्यांमध्ये नक्की काय चालले आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. काहींना त्याने शाबासकी दिली कारण त्यांनी प्रेम दाखवले, विश्वास प्रगट केला, सेवाकार्यात परिश्रम केले, धीर धरला, त्याच्या नावावर आणि वचनावर विश्वास दाखवला. पण इतरांची त्याने कानउघडणीही केली कारण त्यांच्यापैकी काही लोक आता यहोवावर व त्याच्या पुत्रावर पूर्वीसारखे प्रेम करत नव्हते, काही अनैतिकतेत किंवा मूर्तिपूजेत गुंतले होते तर काही खऱ्या धर्माचा त्याग करून मंडळीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते.
६. चवथ्या अध्यायातील दृष्टान्तातून आपल्याला काय समजायला मदत होते?
६ चवथ्या अध्यायात यहोवा देवाच्या वैभवी स्वर्गीय सिंहासनाच्या दृष्टान्ताविषयी आपल्याला वाचायला मिळते. या भारावून टाकणाऱ्या दृष्टान्ताविषयी वाचताना आपल्याला यहोवाच्या विलक्षण तेजाची कल्पना येते आणि त्याच्या स्वर्गीय राज्यात कशाप्रकारची व्यवस्था असेल याचीही एक झलक आपल्याला पाहायला मिळते. सबंध विश्वाच्या सनातन राजाच्या सिंहासनाभोवती आपापल्या सिंहासनांवर विराजमान झालेले मुगुटधारी शासक यहोवाला नमन करून म्हणतात: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटीकरण ४:११.
७. (अ) देवदूत पृथ्वीवर राहणाऱ्यांस काय करण्याचे आव्हान देतो? (ब) आपल्या ज्ञान प्रसार कार्याचा एक महत्त्वाचा पैलू कोणता आहे?
७ या सर्व माहितीचा आपल्या काळातील लोकांकरता खरोखरच काही अर्थ आहे का? निश्चितच आहे. कारण येशूच्या हजार वर्षांच्या राज्यात त्यांना जीवन जगायचे असेल, तर मग ‘अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्या देवदूताच्या’ घोषणेकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.” (प्रकटीकरण १४:६, ७) यहोवाचे साक्षीदार बायबलमधील ज्ञानाचा जो प्रसार करतात त्यामागचा एक प्रमुख उद्देश हाच आहे; ते “पृथ्वीवर राहणाऱ्यांस,” मदत करू इच्छितात कारण त्यांची हीच इच्छा आहे, की लोकांनी खऱ्या देवाची उपासना करावी; तोच निर्माणकर्ता आहे हे मानावे आणि त्याचे नीतिमान सार्वभौमत्व स्वेच्छेने स्वीकारावे.
सन्मानास पात्र ठरलेला कोकरा
८. (अ) पाचव्या आणि सहाव्या अध्यायात आपण ख्रिस्ताला कोणत्या भूमिकेत पाहतो? (ब) प्रकटीकरणातील सुवार्ता ऐकणाऱ्यांना या दृष्टान्तातून कोणती माहिती मिळते?
८ पुढच्या दोन, म्हणजे ५ आणि ६ अध्यायांत येशू ख्रिस्ताला आपण एका कोकऱ्याच्या रूपात पाहतो; हा कोकरा सात शिक्के असलेली गुंडाळी उघडण्यास योग्य आहे असे म्हटले आहे. (पडताळा योहान १:२९.) या गुंडाळीत आपल्या काळातील घटनांविषयी सांकेतिक भाषेत वर्णन केले आहे. येशूला सूचित करणाऱ्या त्या कोकऱ्याला असे सांगण्यात येते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस; कारण तू वधिला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत आणि आमच्या ‘देवासाठी’ त्यास ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण ५:९, १०) या दृष्टान्तावरून आपल्याला दिसून येते, की येशूने वाहिलेल्या रक्ताच्या आधारावर सर्व वंश व राष्ट्रे यांतून काही मनुष्यांना स्वर्गात जाण्यासाठी निवडण्यात आले असून ते येशूसोबत “पृथ्वीवर राज्य करितील.” (पडताळा प्रकटीकरण १:५, ६.) या निवडलेल्यांची ठराविक संख्या प्रकटीकरणात नंतर प्रकट करण्यात आली आहे.
९. सहाव्या अध्यायात ख्रिस्त कोणत्या भूमिकेत आपल्यासमोर येतो?
९ याच दृष्टान्तात पुढे आपण ख्रिस्ताला पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेला पाहतो, त्याच्या डोक्यावर मुगुट आहे आणि तो ‘विजयावर विजय मिळविण्यास’ पुढे सरसावतो. आणखी तीन घोडेही आपण पाहतो. या प्रतिकात्मक घोड्यांच्या वेगवान घोडदौडीमुळे, १९१४ या निर्णायक वर्षापासून पृथ्वीवर युद्ध, दुष्काळ आणि मृत्यूचे थैमान माजले आहे; पण आनंदाची गोष्ट म्हणजे पांढऱ्या घोड्यावर स्वार असलेला येशू या सर्व संकटांवर विजय मिळवेल. (प्रकटीकरण ६:१-८) अशारितीने, मनुष्यजातीचे तारण करण्यात आणि यहोवाचे अद्भुत उद्देश पूर्णत्वास नेण्यात देवाचा कोकरा अर्थात ख्रिस्त मध्यवर्ती भूमिका पार पाडतो; यहोवाचे साक्षीदार जो बायबलच्या ज्ञानाचा प्रसार करत आहेत त्याचा मुख्य विषय हाच आहे.
१०. (अ) सातव्या अध्यायात कोणती महत्त्वाची माहिती आढळते? (ब) ज्यांना राज्य दिले जाते त्यांच्याविषयी ख्रिस्त काय म्हणतो?
१० सातव्या अध्यायात खरोखर सुवार्ता आहे. ज्यांना येशूने ‘लहान कळप’ म्हटले होते, आणि ज्यांना कोकऱ्याचा पिता राज्य देतो, त्यांची संख्या केवळ प्रकटीकरणाच्या पुस्तकातच आपल्याला आढळते. (लूक १२:३२; २२:२८-३०) यहोवा देवाने त्यांना आपल्या आत्म्याने मुद्रांकित केले आहे. (२ करिंथकर १:२१, २२) ज्याला प्रकटीकरण कळवण्यात आले, तो प्रेषित योहान स्वतः सांगतो: ‘ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली, एक लक्ष चव्वेचाळीस हजार.’ (प्रकटीकरण ७:४) नंतरच्या एका अध्यायात पुन्हा एकदा उल्लेख आल्यामुळे या निश्चित संख्येची सत्यता पटते; या ठिकाणी एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक स्वर्गीय सियोन डोंगरावर कोकऱ्यासोबत राज्य करण्याकरता “माणसांतून विकत घेतलेले आहेत” असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १४:१-४) तथाकथित ख्रिस्ती धर्माच्या चर्चेसनी या संख्येबाबत दिलेली स्पष्टीकरणे समजायला कठीण आणि मनाला न पटणारी अशी आहेत. पण बायबल अभ्यासक ई. डब्ल्यु. बुलिंगर यांनी या संदर्भात दिलेला अभिप्राय लक्ष देण्याजोगा आहे; ते म्हणतात: “साधीशी गोष्ट आहे: याच अध्यायात एक निश्चित संख्या आहे, तर दुसरी अनिश्चित.”
११. (अ) सातव्या अध्यायात कोणत्या सुवार्ता आहेत? (ब) ‘मोठ्या लोकसमुदायाला’ कोणकोणते आशीर्वाद मिळतील?
११ बुलिंगरच्या मनात कोणती अनिश्चित संख्या होती? ९ व्या वचनात प्रेषित योहान लिहितो: “ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, . . . मोठा लोकसमुदाय . . . माझ्या दृष्टीस पडला.” (प्रकटीकरण ७:९) या मोठ्या लोकसमुदायात कोणकोण आहेत, सध्या त्यांची देवासमोर कोणती भूमिका आहे आणि त्यांना कोणती आशा आहे? या प्रश्नांची प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेली उत्तरे म्हणजे पृथ्वीवरील लोकांकरता सुवार्ताच आहे. कारण आपल्याला असे वाचायला मिळते: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” येशूने वाहिलेल्या रक्तावर त्यांनी विश्वास ठेवल्यामुळे “मोठ्या संकटातून” त्यांचा बचाव होईल. ख्रिस्त “त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटीकरण ७:१४-१७) होय, आज लाखो लोकांना या दुष्ट जगाच्या नाशातून वाचणाऱ्या असंख्य लोकांप्रमाणे स्वतःचा बचाव करून घेण्याची संधी आहे. येशू ख्रिस्त या बचावलेल्या लोकांना त्याच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीमध्ये पृथ्वीवर सार्वकालिक जीवन देईल. ही सुवार्ता नाही का?
“त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत”
१२, १३. (अ) अध्याय ८ ते १९ मध्ये काय आहे? (ब) अशा भविष्यवाण्यांबद्दल जाणून प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना घाबरून जाण्याचे कारण का नाही?
१२ अध्याय ८ ते १९ यांमध्ये मिळणाऱ्या माहितीमुळे अपोकॅलिप्स किंवा प्रकटीकरणाचे पुस्तक म्हणजे भयंकर संकटे भाकीत करणारे पुस्तक असा लोकांचा ग्रह झाला आहे. या अध्यायांत सैतानाच्या व्यवस्थीकरणातील वेगवेगळ्या घटकांविरुद्ध अतिशय जोरदार न्यायसंदेश (कर्ण्यांचे निनाद, अनर्थ, आणि देवाच्या क्रोधाच्या वाट्या यांसारखी प्रतीके वापरून) घोषित केले आहेत. हे न्यायदंड सर्वप्रथम खोट्या धर्मावर (“मोठी बाबेल”), आणि त्यानंतर श्वापदांनी सूचित केलेल्या अधम राजकीय संस्थांवर बजावले जातील.—प्रकटीकरण १३:१, २; १७:५-७, १५, १६.a
१३ या अध्यायांत, सैतान व त्याच्या दूतांना कशाप्रकारे स्वर्गातून घालवून पृथ्वीवर फेकले जाते याचे सचित्र वर्णन आपल्याला वाचायला मिळते. १९१४ सालापासून सबंध जगात कधी नव्हे इतक्या प्रचंड प्रमाणावर एकापाठोपाठ एक संकटे का येऊ लागली याचे मनाला पटेल असे एकमेव स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी सापडते. (प्रकटीकरण १२:७-१२) याच अध्यायांत पृथ्वीवर असलेल्या सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशाचेही लाक्षणिक वर्णन वाचायला मिळते. (प्रकटीकरण १९:१९-२१) अशा या भयानक घटनांमुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी घाबरून जावे काय? नाही, कारण देव न्यायदंड बजावत असताना स्वर्गातील एक जनसमुदाय अशी घोषणा करतो: “हालेलूया! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत, कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत.”—प्रकटीकरण १९:१, २.
१४, १५. (अ) सध्याच्या दुष्ट जगाचा कशाप्रकारे न्याय्यपणे नायनाट केला जाईल? (ब) अपोकॅलिप्सचा खासकरून हा भाग वाचून प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आनंद का वाटला पाहिजे?
१४ यहोवा त्याच्या धार्मिक, नीतिमान व्यवस्थीकरणाची स्थापना करण्यापूर्वी अर्थातच पृथ्वीचा नाश करू पाहणाऱ्यांचा नायनाट करील. (प्रकटीकरण ११:१७, १८; १९:११-१६; २०:१, २) कोणत्याही मनुष्याला किंवा सरकाराला असे करता येणार नाही किंवा तसे करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही. केवळ यहोवाला आणि त्याचा नियुक्त राजा आणि न्यायाधीश अर्थात येशू ख्रिस्तालाच हे नीतीमत्तेने घडवून आणणे शक्य आहे.—२ थेस्सलनीकाकर १:६-९.
१५ प्रकटीकरणात अगदी स्पष्टपणे दाखवल्याप्रमाणे, देवाने सध्याच्या या दुष्ट जगाचा नाश करण्याचा संकल्प केला आहे. जे लोक या पृथ्वीवर “होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत,” त्यांना याबद्दल आनंदच वाटायला नको का? (यहेज्केल ९:४) तसेच सुवार्ता सांगणाऱ्या देवदूताच्या पुढील घोषणेकडे लक्ष देण्याचे महत्त्व त्यांना आणखी प्रकर्षाने जाणवले पाहिजे: “देवाची भीति बाळगा . . . कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.” (प्रकटीकरण १४:७) त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत यहोवाची उपासना केली पाहिजे कारण यहोवाचे साक्षीदार “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” लोक आहेत.—प्रकटीकरण १२:१७.
हजार वर्षांचे वैभवशाली राज्य
१६. (अ) तथाकथित ख्रिस्ती धर्माच्या चर्चेसनी येशूच्या हजार वर्षांच्या राज्याची आशा अमान्य केली असे का म्हणता येईल? (ब) आदर्श प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल असा यहोवाच्या साक्षीदारांना का विश्वास वाटतो?
१६ प्रकटीकरणाच्या २० ते २२ अध्यायांतील माहितीच्या आधारावर आपण येशूच्या हजार वर्षांच्या राज्याची आशा बाळगतो. कारण एक हजार वर्षांच्या काळानंतर स्वर्गात आणि पृथ्वीवर सदासर्वदा सुख, शांती, समाधान नांदेल असे सांगणारा बायबलचा हा एकच भाग आहे. तथाकथित ख्रिस्ती धर्माच्या चर्चेसनी मात्र हजार वर्षांच्या या राज्याची आशा अमान्य केली आहे. कारण चर्चमध्ये हेच शिकवले जाते, की चांगले लोक स्वर्गात आणि वाईट लोक नरकात जातात. मग पृथ्वीवर सुखाचा काळ येण्याचा प्रश्नच कोठे उरतो? येशूने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेत आपण म्हणतो की “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” पण ख्रिस्ती धर्माच्या चर्च सदस्यांसाठी या शब्दांना काही अर्थच राहिला नाही. (मत्तय ६:१०) यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत मात्र असे नाही. त्यांचा पूर्ण विश्वास आहे, की यहोवा देवाने ही पृथ्वी “निर्जन राहावी म्हणून” नव्हे तर “तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून” निर्माण केली आहे. (यशया ४५:१२, १८) अशारितीने, प्राचीन काळातील संदेष्ट्यांची भविष्यवाणी, येशूने शिकवलेली आदर्श प्रार्थना आणि प्रकटीकरणात सांगितलेली हजार वर्षांच्या राज्याची आशा, सर्व एकमेकांशी सुसंगत आहेत. आपल्या हजार वर्षांच्या राज्यात ख्रिस्त, यहोवाची इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही पूर्ण करेल.
१७. “हजार वर्षे” ही संज्ञा अक्षरशः हजार वर्षांच्या संदर्भात वापरलेली आहे हे कशावरून म्हणता येईल?
१७ प्रकटीकरणाच्या २० व्या अध्यायाच्या पहिल्या सात वचनांत “हजार वर्षे” ही संज्ञा सहा वेळा येते. आणि विशेष म्हणजे मूळ भाषेच्या व्याकरणानुसार ही संज्ञा अक्षरशः हजार वर्षांच्या संदर्भात वापरली आहे; तथाकथित ख्रिस्ती धर्मातील बरेच भाष्यकार आपल्याला पटवून देऊ इच्छितात त्याप्रमाणे ही संज्ञा सांकेतिक अर्थाने अनिश्चित कालावधीसाठी वापरलेली नाही. या हजार वर्षांच्या दरम्यान काय घडेल? सर्वप्रथम, सैतानाला जायबंद करण्यात येईल, आणि हजार वर्षांच्या या सबंध काळात तो त्याच अवस्थेत राहील. (प्रकटीकरण २०:१-३; पडताळा इब्री लोकांस २:१४.) ही किती मोठी सुवार्ता आहे!
१८. (अ) हजार वर्षांच्या राज्याला न्यायनिवाड्याचा “दिवस” का म्हटले जाऊ शकते? (ब) हजार वर्षांच्या शेवटी काय घडेल?
१८ “ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य” करणाऱ्यांना “न्यायनिवाडा करण्याचा अधिकार” देण्यात येतो. त्याअर्थी हजार वर्षांचा हा कालावधी म्हणजे न्यायनिवाड्याचा “दिवस” आहे असे म्हणता येईल. (प्रकटीकरण २०:४, ६; पडताळा प्रेषितांची कृत्ये १७:३१; १ पेत्र ३:८.) या दरम्यान, मेलेल्यांचेही पुनरुत्थान करण्यात येईल आणि त्यांच्या तेव्हाच्या कृत्यांच्या आधारावर, “मोठ्या संकटातून” बचावलेल्यांसोबत त्यांचाही न्याय केला जाईल. (प्रकटीकरण २०:१२, १३) हजार वर्षे संपल्यावर, मानवजातीची शेवटची परीक्षा घेण्याकरता सैतानाला थोड्या काळाकरता सोडले जाईल आणि त्यानंतर त्याला, त्याच्या दुरात्म्यांना आणि पृथ्वीवर जे कोणी देवाला सोडून त्याच्या मार्गाला लागतील अशा सर्वांना कायमचे नष्ट केले जाईल. (प्रकटीकरण २०:७-१०) पण जे लोक ही शेवटची कसोटी यशस्वीरित्या पार करतील अशा लोकांची नावे “जीवनाच्या पुस्तकात” कायमची लिहिली जातील आणि त्यांना सार्वकालिक जीवन दिले जाईल; परादीस पृथ्वीवर ते सदासर्वदा आनंदाने यहोवाची सेवा व उपासना करतील.—प्रकटीकरण २०:१४, १५; स्तोत्र ३७:९, २९; यशया ६६:२२, २३.
१९. (अ) प्रकटीकरणाच्या पुस्तकात सापडणारी अद्भुत अभिवचने निश्चित पूर्ण होतील अशी खातरी आपण का बाळगू शकतो? (ब) पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
१९ अशी आनंददायक अभिवचने अपोकॅलिप्स अर्थात प्रकटीकरण या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतात. पण मनुष्याने कल्पिलेल्या निरर्थक अभिवचनांसारखी ती नाहीत. प्रेषित योहानाने लिहिले: “तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: ‘पाहा! मी सर्व गोष्टी नवीन करितो. तो म्हणाला, ‘लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.’” (प्रकटीकरण २१:५) ही सर्व अभिवचने खरी होताना पाहायची असतील तर आपण काय केले पाहिजे? देवाला आनंदित करू इच्छिणाऱ्यांसाठी प्रकटीकरणाच्या पुस्तकात बरेच मार्गदर्शन दिलेले आहे. या मार्गदर्शनाचे पालन केले तर आपण आताच नव्हे तर सर्वदा खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगू शकतो. हाच पुढच्या लेखाचा विषय आहे.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांनी प्रकाशित केलेल्या प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकात, प्रकटीकरणाच्या सबंध पुस्तकाचे स्पष्टीकरण केले आहे.
उजळणीचे मुद्दे
◻ प्रकटीकरणाच्या ४ ते ६ अध्यायांत दिलेल्या कोणत्या मूलभूत सत्यांना सुवार्तेचा मुख्य भाग म्हणता येईल?
◻ प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायात कोणत्या सुवार्ता आहेत?
◻ प्रकटीकरणातील न्यायदंडाच्या घोषणांमुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी घाबरून जाण्याचे का कारण नाही?
◻ हजार वर्षांच्या राज्याला न्यायनिवाड्याचा “दिवस” का म्हणता येईल?
[१० पानांवरील चित्र]
राजा येशू ख्रिस्त पृथ्वीवरून युद्ध, दुष्काळ आणि मरण कायमचे काढून टाकेल