वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ११/१५ पृ. २४-२७
  • ‘यहोवा बुद्धी देतो’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘यहोवा बुद्धी देतो’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “आपला कान ज्ञानाकडे [बुद्धीकडे]” लाव
  • तुम्ही प्रयत्न कराल का?
  • तुम्ही निराश होणार नाही
  • ‘ज्ञान जिवाला रम्य वाटेल’ तेव्हा
  • ‘कुमार्गापासून तुला दूर ठेवील’
  • ‘सरळ जन पृथ्वीवर वस्ती करतील’
  • आपले अंतःकरण समजबुद्धीकडे लाव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुम्ही अधिक समजबुद्धी विकसित करू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • गुप्त खजिन्यासारखा शोध घेत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ११/१५ पृ. २४-२७

‘यहोवा बुद्धी देतो’

कोणत्या गोष्टींमागे तुमचा जास्त वेळ व शक्‍ती खर्च होते? जगात एक चांगले नाव कमावण्याचा तुम्हाला ध्यास लागला आहे का? धनसंपत्ती गोळा करण्यात तुम्ही व्यस्त आहात? एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर बनवण्याचा किंवा शिक्षणाच्या एका किंवा अनेक शाखांत तज्ज्ञ बनण्याचा तुमचा विचार आहे का? इतरांबरोबर चांगले नातेसंबंध प्रस्थापित करण्याची गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटते का? चांगले स्वास्थ्य राखण्याची तुम्हाला जास्त काळजी लागली आहे का?

वर उल्लेखलेल्या सर्व गोष्टी तशा महत्त्वाच्या वाटतील. परंतु याहूनही महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? बायबल याचे उत्तर देते: “ज्ञान [बुद्धी] ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते [ती] संपादन कर.” (नीतिसूत्रे ४:७) आपण बुद्धी कशी प्राप्त करू शकू व तिचे फायदे कोणते आहेत? बायबलमधील नीतिसूत्रे पुस्तकाचा दुसरा अध्याय या प्रश्‍नाचे उत्तर देते.

“आपला कान ज्ञानाकडे [बुद्धीकडे]” लाव

इस्राएलचा सुज्ञ राजा शलमोन प्रेमळ पित्याप्रमाणे असे म्हणतो: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे [बुद्धीकडे] देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे [समजबुद्धी] लावशील, जर तू विवेकाला [ग्रहणशक्‍तीला] हाक मारिशील, सुज्ञतेची [समजबुद्धीची] आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याला शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्‍वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.”—नीतिसूत्रे २:१-५.

बुद्धी प्राप्त करण्याची जबाबदारी कोणावर आहे हे तुम्हाला कळाले का? वरील वचनांत, “जर तू” असे वारंवार म्हटले आहे. तेव्हा, आपल्या प्रत्येकावर बुद्धी आणि बुद्धीसोबत समजबुद्धी व ग्रहणशक्‍ती मिळवण्याची जबाबदारी आहे. परंतु सर्वात प्रथम आपण शास्त्रवचनांत लिहून ठेवलेल्या ज्ञानाचे शब्द ‘स्वीकारण्याची’ व आपल्या स्मरणात ‘साठवून ठेवण्याची’ गरज आहे. यासाठी आपल्याला बायबलचा अभ्यास करावा लागेल.

बुद्धी म्हणजे देवाने दिलेल्या ज्ञानाचा सदुपयोग करण्याची क्षमता होय. बायबलमधील बुद्धी आपल्यासाठी उपलब्ध आहे. बायबलमधील नीतिसूत्रे आणि उपदेशक नावाच्या पुस्तकांमध्ये बुद्धीचे शब्द आहेत; या शब्दांकडे आपण लक्ष देणे आवश्‍यक आहे. ईश्‍वरी तत्त्वे लागू केल्यावर मिळणारे फायदे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर संभावणारे धोके हे दाखवणारी अनेक उदाहरणे देखील बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. (रोमकर १५:४; १ करिंथकर १०:११) उदाहरणार्थ, संदेष्टा अलिशाचा सेवक गेहजी याच्या लोभीपणाच्या वृत्तांताचा विचार करा. (२ राजे ५:२०-२७) हा वृत्तांत आपल्याला लोभीपणा टाळण्याची बुद्धी देत नाही का? आणि याकोबाची मुलगी दीना, हिला कनान देशांतील “स्त्रियांस” भेटायला जाण्यात काही गैर नाही असे वाटले परंतु जो दुःखद परिणाम घडला त्याविषयी काय? वाईट संगत राखणे किती मूर्खपणाचे आहे हे यावरून आपल्याला समजते, हो ना?—नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३.

बुद्धीकडे लक्ष देण्यात, समजबुद्धी व ग्रहणशक्‍ती प्राप्त करणे समाविष्ट आहे. वेबस्टर्स रिवाईज्ड अनअब्रिज्ड डिक्शनरीनुसार, समजबुद्धी म्हणजे “दोन गोष्टींमधला फरक जाणणारी मनाची कुवत अथवा शक्‍ती.” बरोबर आणि चूक यांमधला फरक जाणून घेऊन मग उचित मार्ग निवडणे, याला ईश्‍वरी समजबुद्धी म्हणतात. समजबुद्धीकडे आपण आपले ‘मन लावले नाही’ किंवा समजबुद्धी प्राप्त करण्यास आपण उत्सुक नसलो तर, ‘जीवनाकडे जाणाऱ्‍या मार्गावर’ आपण टिकून कसे राहू शकू? (मत्तय ७:१४; पडताळा अनुवाद ३०:१९, २०.) देवाच्या वचनाचा अभ्यास आणि त्याचे पालन केल्यामुळे आपण समजबुद्धी प्राप्त करू शकतो.

आपण “विवेकाला [ग्रहणशक्‍तीला] हाक” कशी मारू शकतो, अर्थात एखाद्या विषयाचे पैलू एकमेकांशी व एकूणच कसे संबंधित आहेत हे पाहण्याची क्षमता कशी प्राप्त करू शकतो? वय आणि अनुभव अधिक ग्रहणशक्‍ती विकसित करण्याकरता लागणारी कारणे असली तरी, ती नेहमीच जरूरीची आहेत असे नाही. (ईयोब १२:१२; ३२:६-१२) स्तोत्रकर्त्याने म्हटले: “वयोवृद्धांपेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे विधि पाळितो.” त्याने असेही गायिले: “तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.” (स्तोत्र ११९:१००, १३०) यहोवा ‘पुराणपुरुष’ असल्यामुळे सर्व मानवजातीपेक्षा अधिक उच्चत्तम ग्रहणशक्‍ती त्याच्याकडे आहे. (दानीएल ७:१३) देव भोळ्यास समजबुद्धी देऊ शकतो; वृद्धांपेक्षाही अधिक समजबुद्धी तो अशा भोळ्या व्यक्‍तीला देतो. यास्तव, आपण देवाच्या वचनाचा अभ्यास व त्याचे अनुकरण करण्यास मेहनत केली पाहिजे.

नीतिसूत्राच्या दुसऱ्‍या अध्यायातील सुरवातीच्या उताऱ्‍यांमधील “जर तू” या वारंवार आलेल्या वाक्यांशानंतर, ‘स्वीकारणे,’ ‘साठवून ठेवणे’ ‘कान देणे,’ ‘हाक मारणे,’ ‘शोध करणे,’ हे वाक्यांशही आले आहेत. लेखकाने अशा जोरदार वाक्यांशांचा उपयोग का केला आहे? एक संदर्भपुस्तक म्हणते: “नीतिसूत्रातील हा सुज्ञ मनुष्य, बुद्धी मिळवण्याचा मन लावून प्रयत्न करण्याच्या गरजेवर जोर देतो.” होय, आपण बुद्धी आणि बुद्धीशी संबंधित असलेले गुण अर्थात समजबुद्धी आणि ग्रहणशक्‍ती मिळवण्याचा मन लावून प्रयत्न केला पाहिजे.

तुम्ही प्रयत्न कराल का?

बुद्धी मिळवण्यात सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे, बायबलचा मेहनतीने अभ्यास करणे. परंतु फक्‍त माहिती मिळण्यासाठी बायबलचे वाचन करणे पुरेसे नाही. आपण जे काही वाचतो त्याचे उद्देशपूर्ण मनन करणे, शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यामागचा महत्त्वपूर्ण भाग आहे. बुद्धी व समज प्राप्त करण्यात, आपण जे काही शिकतो त्याचा उपयोग समस्या सोडवताना व निर्णय घेताना कसा करता येईल यावर मनन करणे समाविष्ट आहे. आपल्याकडे पूर्वी जी माहिती होती तिच्याशी ही नवीन माहिती कशी जुळते यावर विचार करणे म्हणजे ग्रहणशक्‍ती प्राप्त करणे. बायबलच्या अशा विचारपूर्वक अभ्यासासाठी वेळ आणि जोरदार प्रयत्नांची आवश्‍यकता आहे, ही गोष्ट कोण नाकारेल? अभ्यासात खर्च करण्यात आलेला वेळ व शक्‍ती, ‘रुप्याचा व गुप्त निधीचा शोध करण्यात’ घालवण्याप्रमाणे आहे. असा आवश्‍यक प्रयत्न तुम्ही कराल का? असे करण्यासाठी तुम्ही “वेळ विकत घ्याल” का?—इफिसकर ५:१५, १६, NW.

आपण प्रामाणिकपणे बायबलमध्ये अधिक माहितीसाठी खोदकाम केल्यास आपल्याला किती मोठा खजिना सापडेल याचा विचार करा! आपल्याला, “देवाविषयीचे ज्ञान” मिळेल—आपल्या निर्माणकर्त्याबद्दलचे जीवन-प्रदायक ज्ञान! (योहान १७:३) ‘परमेश्‍वराचे भय’ देखील एक खजिना आहे जो आपण प्राप्त करू शकतो. त्याच्याबद्दल असे आदरयुक्‍त भय बाळगणे किती मौल्यवान आहे! त्याला नाराज करण्याचे हितकर भय, आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत दिसले पाहिजे; आपण जे काही करू त्याला आध्यात्मिक महत्त्व असले पाहिजे.—उपदेशक १२:१३.

आपल्या सर्वांमध्ये, आध्यात्मिक खजिना शोधण्याची व खोदण्याची प्रबळ इच्छा असली पाहिजे. आपले शोधकाम सुलभ व्हावे म्हणून यहोवाने उत्तम हत्यारे दिली आहेत—टेहळणी बुरूज व सावध राहा! ही सत्याची समयोचित नियतकालिके आणि बायबलवर आधारित इतर प्रकाशने. (मत्तय २४:४५-४७) आपल्या वचनाचे आणि मार्गांचे शिक्षण देण्याकरता यहोवाने ख्रिस्ती सभांचे देखील आयोजन केले आहे. आपण या सभांना नियमित उपस्थित राहावे; तेथील कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकावा व मुख्य विचारांवर मन एकाग्र करून ते जपून ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा व यहोवाबरोबरच्या आपल्या नातेसंबंधावर सखोल विचार करायला हवा.—इब्री लोकांस १०:२४, २५.

तुम्ही निराश होणार नाही

पुष्कळदा असे होते, की रत्न, सोने किंवा रुपे यांच्या शोधात निघालेल्यांच्या पदरी निराशाच पडते. परंतु, आध्यात्मिक खजिन्याच्या शोधात निघालेल्यांना असा अनुभव येणार नाही. का नाही? शलमोन आपल्याला आश्‍वासन देतो: “कारण ज्ञान [बुद्धी] परमेश्‍वर देतो; त्याच्या मुखांतून ज्ञान व सुज्ञता [समजबुद्धी] येतात.”—नीतिसूत्रे २:६.

राजा शलमोन त्याच्या बुद्धीमुळे विश्‍वविख्यात होता. (१ राजे ४:३०-३२) वनस्पती, प्राणी, मानवी स्वभाव आणि देवाचे वचन यांसारख्या सर्व व विविध विषयांत तो पारंगत होता, असे शास्त्रवचनांत म्हटले आहे. दोन स्त्रिया एकाच बाळाची आई असल्याचा दावा करत होत्या तेव्हा त्याने हा वाद सोडवताना दाखवलेल्या समजबुद्धीची कीर्ती दूरवर पसरली. (१ राजे ३:१६-२८) त्याच्याकडे इतके ज्ञान कोठून आले? शलमोनाने प्रार्थनेद्वारे यहोवाला “चातुर्य [बुद्धी] व ज्ञान” आणि ‘बरेवाईट समजण्याची कुवत’ देण्याबद्दल विनंती केली. यहोवाने त्याची प्रार्थना ऐकली.—२ इतिहास १:१०-१२; १ राजे ३:९.

आपणही जेव्हा यहोवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्या साहाय्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. स्तोत्रकर्त्याने अशाप्रकारे प्रार्थना केली: “हे परमेश्‍वरा, तुझा मार्ग मला दाखीव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.” (स्तोत्र ८६:११) यहोवाला ही प्रार्थना मान्य होती म्हणूनच तर त्याने ती बायबलमध्ये लिहून ठेवण्याची अनुमती दिली. बायबलमध्ये आध्यात्मिक खजिना मिळावा म्हणून आपण देवाला करत असलेल्या कळकळीच्या व नियमित प्रार्थना तो निश्‍चितपणे ऐकेल अशी आपल्याला पक्की खात्री आहे.—लूक १८:१-८.

शलमोन म्हणतो: “सरळांसाठी तो यशःप्राप्ति [बुद्धी] सुलभ करितो; सात्विकपणे चालणाऱ्‍यांस तो ढाल आहे; अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्‍तांचा मार्ग संभाळावा. धर्म, नीति व सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची तुला जाणीव घडेल.” (नीतिसूत्रे २:७-९) किती सांत्वनदायक शब्द आहेत हे! यहोवा, खरे ज्ञान प्रामाणिकपणे शोधणाऱ्‍यांना केवळ ज्ञानच देत नाही तर प्रांजळ लोकांसाठी तो एक संरक्षणात्मक ढालही बनतो कारण ते लोक खरी बुद्धी दाखवतात आणि त्याच्या धार्मिक दर्जांनुरूप एकनिष्ठेने राहतात. ‘सर्व सन्मार्गाची जाणीव’ होण्यास मदत करणाऱ्‍या लोकांपैकी आपणही असू या.

‘ज्ञान जिवाला रम्य वाटेल’ तेव्हा

बुद्धी प्राप्त करण्याकरता महत्त्वपूर्ण असलेली एक अपेक्षा म्हणजेच बायबलचा व्यक्‍तिगत अभ्यास. पुष्कळ लोकांना अभ्यास आवडतोच असे नाही. उदाहरणार्थ, ५८ वर्षीय लॉरेन्स म्हणतात: “मी एका ठिकाणी बसून कधी काम केलेलं नाही. त्यामुळे अभ्यास करायला मला कठीण जातं.” तसेच, शाळेत अभ्यासात कधीही रस न घेतलेल्या २४ वर्षीय मायकलचं म्हणणं आहे: “मी जबरदस्तीनं अभ्यासाला बसतो.” परंतु, अभ्यास करण्याची इच्छा आपण विकसित करू शकतो.

मायकल काय म्हणतो त्याचा विचार करा. तो म्हणतो: “मी दररोज अर्धा तास तरी अभ्यास करण्याची स्वतःला सवय लावून घेतली. हळूहळू मला, माझ्या स्वभावात, ख्रिस्ती सभांमध्ये मी देत असलेल्या उत्तरांत व इतरांबरोबरच्या माझ्या बोलण्यात फरक झालेला जाणवला. आता तर मी केव्हा अभ्यासाला बसेन याची वाटच पाहत असतो आणि दुसरी कुठलीही गोष्ट अभ्यासाच्या वेळी आलेली मला आवडत नाही.” आपली प्रगती होताना आपण पाहतो तेव्हा आपल्याला व्यक्‍तिगत अभ्यास आवडू लागतो. लॉरेन्स यांनीही व्यक्‍तिगत बायबल अभ्यास करण्याची सवय स्वतःला लावून घेतली आणि कालांतराने ते यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत वडील बनले.

व्यक्‍तिगत अभ्यास आवडू लागण्यासाठी निरंतर प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. परंतु त्यामुळे मिळणारे लाभ मात्र मोठे आहेत. शलमोन म्हणतो: “ज्ञान [बुद्धी] तुझ्या चित्तांत प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा [समजबुद्धी] तुला संभाळील.”—नीतिसूत्रे २:१०, ११.

‘कुमार्गापासून तुला दूर ठेवील’

बुद्धी, ज्ञान, विचार करण्याची क्षमता आणि समजबुद्धी आपला सांभाळ कसा करतील? ‘कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्‍या मनुष्यांपासून, जे सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात; ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून जे उल्लास पावतात; ज्यांचे मार्ग वाकडे आहेत, ज्यांच्या वाटा विपरीत आहेत, अशा लोकांपासून ते तुला दूर ठेवतील.’—नीतिसूत्रे २:१२-१५.

खऱ्‍या बुद्धीची आवड असलेले लोक, बरोबर आणि उचित याच्या विपरित असलेल्या गोष्टी म्हणजेच ‘विवेकशून्य गोष्टी करणाऱ्‍यांची’ संगत करत नाहीत. विचार करण्याची क्षमता आणि समजबुद्धी, सत्य नाकारणाऱ्‍या व अंधकारात चालू इच्छिणाऱ्‍या लोकांपासून आणि कपटी व वाईट गोष्टी करण्यात आनंद मानणाऱ्‍या लोकांपासून आपले संरक्षण करते.—नीतिसूत्रे ३:३२.

खरी बुद्धी आणि त्याच्याशी संबंधित असलेले गुण, अनैतिक स्त्रीपुरुषांच्या वाईट मार्गापासून आपले संरक्षण करते यामुळे आपण किती कृतज्ञ होऊ शकतो! हे गुण “परस्त्रीपासून, मोहक भाषण करणाऱ्‍या परस्त्रीपासून,” आपला ‘बचाव करतात;’ या स्त्रीने “आपल्या तरुणपणाचा मित्र सोडिला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे; तिच्या घरांतून मृत्युमुखाकडे वाट आहे, तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात; जे तिजकडे जातात त्यांतून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत.”—नीतिसूत्रे २:१६-१९.

‘परस्त्री,’ किंवा वेश्‍या ‘आपल्या तरुणपणाच्या मित्राला सोडणारी’—कदाचित तरुण असताना तिच्या पतीला सोडणारी स्त्री आहे.a (पडताळा मलाखी २:१४.) व्यभिचार न करण्याबद्दल नियमशास्त्रात आज्ञा होती हे ती विसरून गेली होती. (निर्गम २०:१४) ती ज्या मार्गावरून चालली आहे तो मार्ग तिला मृत्यूकडे नेणारा आहे. तिच्याबरोबर दोस्ती करणारे ‘जीवनाच्या मार्गावर’ येऊ शकत नाहीत; कारण आज ना उद्या ते अशा टोकापर्यंत (मृत्यूपर्यंत) पोहंचतील जेथून त्यांना पुन्हा मागे फिरता येणार नाही. समजबुद्धी व विचार क्षमता असलेला मनुष्य अनैतिकतेच्या पाशांविषयी सावध असतो व अगदी सुज्ञपणे तो त्यांच्यातून निसटतो.

‘सरळ जन पृथ्वीवर वस्ती करतील’

बुद्धीवर सल्ला देण्यामागच्या हेतूचा सारांश देताना शलमोन म्हणतो: “तू भल्यांच्या मार्गाने चालावे व धार्मिकांच्या रीतीचे अवलंबन करावे.” (नीतिसूत्रे २:२०) बुद्धीमुळे किती अद्‌भुत उद्देश साध्य होतो! बुद्धी आपल्याला देवाची स्वीकृती असलेले आनंदी व समाधानी जीवन जगण्यास मदत करते.

‘भल्यांच्या मार्गाने चालणाऱ्‍या’ लोकांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या आशीर्वादांचा विचार करा! शलमोन पुढे म्हणतो: “सरळ जनच देशांत [पृथ्वीवर] वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यांतून निर्मूलन होईल.” (नीतिसूत्रे २:२१, २२) देवाच्या धार्मिक नवीन जगात अनंतकाळ जगणाऱ्‍या निष्कलंक लोकांमध्ये तुम्हीही असावे अशी आशा!—२ पेत्र ३:१३.

[तळटीपा]

a “परदेशी” हा शब्द, नियमशास्त्राच्या सुसंगतेत असलेल्या गोष्टींपासून वळाल्यामुळे यहोवापासून स्वतःला दूर नेलेल्या लोकांच्या संदर्भात वापरला जायचा. यास्तव, वेश्‍येला ‘परस्त्री’ म्हटले आहे; ती विदेशी असेलच असे नाही.

[२६ पानांवरील चित्र]

शलमोनाने बुद्धीसाठी प्रार्थना केली. आपणही करावी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा