वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ११/१५ पृ. २८-३१
  • निरुत्साहावर उपाय आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निरुत्साहावर उपाय आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रचार कार्यात निरुत्साह
  • अधिक यशस्वी होण्यासाठी
  • चांगली मनोवृत्ती बाळगणे
  • निरुत्साह आणि नातेसंबंध
  • निरुत्साहित करणाऱ्‍या भावना
  • दोन सर्वोत्तम उपाय
  • निरुत्साहावर विजय मिळवणे
  • निराशेवर मात करणं शक्य आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • तो दिवस जवळ येत असता एकमेकांना उत्तेजन देत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास व निराशेवर मात करण्यास समर्थ केलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • थकलो पण खचलो नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ११/१५ पृ. २८-३१

निरुत्साहावर उपाय आहे का?

निरुत्साहावर मात करण्यासाठी काय करावे? यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना नियमित भेटी देणाऱ्‍या बऱ्‍याच प्रवासी पर्यवेक्षकांना हा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून आपल्याला, निरुत्साहाच्या कारणांचे व काही उपायांचे परीक्षण करायला मदत मिळेल, कारण ही अशी समस्या आहे जी कोणत्याही ख्रिश्‍चनासमोर येऊ शकते.

अर्थात, केवळ परीक्षण केल्याने समस्या तर सुटणार नाहीत; पण परीक्षण केल्याने आपल्याला या समस्येची काही लक्षणे समजून घ्यायला मदत होते. प्रार्थना किंवा व्यक्‍तिगत अभ्यास करण्यास कंटाळा करणे, सभा चुकवण्याची सवय लागणे, आवेश गमावणे व ख्रिस्ती बांधवांबद्दल आपुलकी न वाटणे ही सर्व निरुत्साहाची लक्षणे असू शकतात. परंतु, निरुत्साहाचे ठळक लक्षण म्हणजे, प्रचार कार्यातील आवेश कमी होणे. आपण यांपैकी काही लक्षणांचे जवळून परीक्षण करू या व काही उपायांचा विचार करू या.

प्रचार कार्यात निरुत्साह

शिष्य बनवण्याची कामगिरी पूर्ण करताना बरीच संकटे येतील याची येशू ख्रिस्ताला जाणीव होती. (मत्तय २८:१९, २०) आपल्या अनुयायांना जणू ‘लांडग्यांमध्ये मेंढरांना’ पाठवल्याप्रमाणे आहे; त्यांच्या प्रचारकार्यामुळे त्यांचा छळ केला जाईल हे त्याला माहीत होते. (मत्तय १०:१६-२३) तरीपण, यामुळे त्यांनी निरुत्साहित व्हायचे नव्हते. उलट, यहोवावर प्रार्थनापूर्वक विसंबून राहणाऱ्‍या देवाच्या सेवकांचा विश्‍वास बऱ्‍याचदा अशा छळांमुळे अधिकच बळकट झाला.—प्रेषितांची कृत्ये ४:२९-३१; ५:४१, ४२.

ख्रिस्ताचे शिष्य नेहमीच कड्या विरोधाचा सामना करीत नसले तरी, लोकांनी नेहमीच त्यांचे आनंदाने स्वागत केलेले नाही. (मत्तय १०:११-१५) तसेच, आजही यहोवाच्या साक्षीदारांना त्यांचे कार्य इतके सहजतेने करता येत नाही.a अनेक लोकांच्या मते, देवावर विश्‍वास ठेवणे ही एक व्यक्‍तिगत बाब असून यावर चर्चा करायला त्यांना आवडत नाही. काहींना विशिष्ट धार्मिक संघटनेबद्दल मनात पूर्वग्रह असल्यामुळे तिच्याशी संबंध जोडायची इच्छा नसते; अर्थात, लोक आपल्या कार्याप्रती उदासीन असतात, आपल्या कार्यातून चांगले परिणाम मिळत नाहीत किंवा इतर काही समस्या असतात तेव्हा या गोष्टी उत्साहाने कार्य करण्यात अडथळा आणतात. मग या अडथळ्यांवर कशी काय मात करता येईल?

अधिक यशस्वी होण्यासाठी

आपल्या सेवेतून आपल्याला मिळणाऱ्‍या आनंदाचा काही अंशी, परिणामांशी संबंध आहे. तेव्हा आपण आपली सेवा आणखी फलदायी कशी करू शकतो? आपण, “माणसे धरणारे” आहोत. (मार्क १:१६-१८) प्राचीन इस्राएलमधील कोळी, रात्रीच्या वेळी मासेमारीसाठी जात असत कारण त्यावेळी त्यांना भरपूर मासे मिळायचे. आपणही आपल्या क्षेत्राचे परीक्षण केले पाहिजे जेणेकरून आपण, बहुतेक लोक घरी असतात तेव्हा व आपला संदेश ऐकतील अशा वेळी ‘मासेमारीसाठी’ जाऊ शकतो; कदाचित संध्याकाळच्या वेळी अथवा सप्ताहांती किंवा इतर उचित समयी. ज्या क्षेत्रातील बहुतेक लोक दिवसभर कामाला जातात त्या क्षेत्रात हे उचित असू शकते असे एका प्रवासी पर्यवेक्षकांना वाटते. ते म्हणतात, की संध्याकाळच्या साक्षीकार्यामुळे उत्तम परिणाम मिळतात. टेलिफोनद्वारे किंवा अनौपचारिक साक्षीकार्यामुळे देखील आपण पुष्कळ लोकांच्या संपर्कात येऊ शकतो.

सेवाकार्यात चांगले फळ हवे असल्यास, या कार्यात टिकून राहणे आवश्‍यक आहे. पूर्व युरोपमध्ये आणि काही आफ्रिकन राष्ट्रांत, राज्य प्रचाराचे कार्य प्रगतिपथावर आहे व तेथे बरीच वाढ होत आहे. तसेच, ज्या विशिष्ट क्षेत्रांना अफलदायी समजले जात होते किंवा ज्या क्षेत्रांत वारंवार काम केले जात होते अशा क्षेत्रांतही आज अनेक मंडळ्या तयार झाल्या आहेत. पण मग, तुमच्या क्षेत्रात तुम्हाला काही फळ मिळत नसल्यास काय?

चांगली मनोवृत्ती बाळगणे

येशूने आपल्यापुढे मांडलेली ध्येये आपल्या मनात स्पष्ट असल्यास, सेवेमध्ये लोकांची उदासीनता पाहून आपण निरुत्साहित होणार नाही. आपल्या शिष्यांनी मोठमोठ्या जमावांचे धर्मांतर करावे अशी नव्हे, तर केवळ योग्य लोकांना शोधावे अशी ख्रिस्ताची इच्छा होती. त्याने अनेकवेळा या गोष्टीकडे लक्ष वेधले की बहुतेक इस्राएल लोकांनी जसे प्राचीन संदेष्ट्यांचे ऐकले नाही त्याचप्रमाणे, अधिकांश लोक आताही सुवार्तेचा स्वीकार करणार नाहीत.—यहेज्केल ९:४; मत्तय १०:११-१५; मार्क ४:१४-२०.

“आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असलेले” लोकच ‘राज्याची सुवार्ता’ कृतज्ञतेने स्वीकारतात. (मत्तय ५:३, NW; २४:१४) ते देवाची इच्छा काय आहे हे ओळखून त्याप्रमाणे त्याची सेवा करू इच्छितात. म्हणूनच, आपल्या कार्याच्या परिणामांचा संबंध, आपण संदेश किती कौशल्याने मांडतो त्याच्याशी नव्हे तर लोकांच्या मनोवृत्तीशी आहे. अर्थातच, सुवार्ता अधिक अपीलकारक होण्याकरता आपण आपल्याने होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. तरीपण, परिणाम हे शेवटी देवावरच अवलंबून आहेत, कारण येशू म्हणाला होता: “पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.”—योहान ६:४४.

आपल्या सुवार्तिक कार्याद्वारे आपण यहोवाचे नाव प्रकट करतो. लोक ऐकोत अगर न ऐकोत, आपले प्रचारकार्य यहोवाच्या पवित्र नावाच्या पवित्रीकरणाला हातभार लावते. शिवाय, आपल्या सुवार्तिक कार्याद्वारे आपण ख्रिस्ताचे शिष्य आहोत हे सिद्ध करतो; आणि आपल्या दिवसांत पार पाडल्या जाणाऱ्‍या सर्वात महत्त्वपूर्ण कामगिरीत भाग घेण्याचा सुहक्क आपल्याला मिळाला आहे.—मत्तय ६:९; योहान १५:८.

निरुत्साह आणि नातेसंबंध

कुटुंबात अथवा मंडळीत, काही नातेसंबंधांत बिघाड आल्यामुळे निरुत्साह येऊ शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला कोणी समजून घेत नाही ही भावना मनात येऊ शकते. सहविश्‍वासू बांधवांच्या अपरिपूर्णतेमुळे देखील आपण निरुत्साहित होऊ शकतो. पुन्हा एकदा, शास्त्रवचनांतून आपल्याला बरीच मदत मिळू शकते.

आपला ख्रिस्ती ‘बंधुवर्ग’ म्हणजे संपूर्ण जगभरातील मोठे आध्यात्मिक कुटुंबच आहे. (१ पेत्र २:१७) परंतु, भिन्‍नभिन्‍न व्यक्‍तिमत्त्वामुळे समस्या उद्‌भवतात तेव्हा, आपल्यातील एकोप्याची भावना हळूहळू नाहीशी होऊ शकते. आपल्याला हे माहीत आहे, की पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांपुढे देखील अशा प्रकारच्या समस्या आल्या होत्या; कारण, आपल्यामध्ये ऐक्य टिकवून ठेवा अशी आठवण प्रेषित पौलाला त्यांना वारंवार करून द्यावी लागली. जसे की, ‘युवदीया व सुंतुखे’ या दोन ख्रिस्ती स्त्रियांना त्याने आपापसातील मतभेद सोडवण्यास आर्जवले होते.—१ करिंथकर १:१०; इफिसकर ४:१-३; फिलिप्पैकर ४:२, ३.

आपलीही हीच समस्या असल्यास, आपल्या बंधुभगिनींबद्दल आपण प्रेम पुन्हा कसे जागे करू शकतो? ख्रिस्ताने त्यांच्यासाठी देखील प्राण दिला आहे व आपल्याप्रमाणे त्यांनीही त्याच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवला आहे या गोष्टींची आपण स्वतःला आठवण करून देऊ शकतो. आपले पुष्कळसे बांधव येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्यास तयार आहेत, ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवू शकतो.

काही वर्षांपूर्वी, फ्रान्सच्या पॅरिस शहरात एका राज्य सभागृहाबाहेर एका सूटकेसमध्ये बॉम्ब ठेवला आहे असे कळताच एका तरुण साक्षीदाराने आपल्या जीवाची पर्वा न करता ती सूटकेस उचलली आणि पायऱ्‍यांवरून जोराने धावत जाऊन काही अंतरावर असलेल्या एका कारंज्यात ती फेकून दिली; तेथे त्या बॉम्बचा स्फोट झाला. अशाप्रकारे आपले जीवन धोक्यात घालण्यास तो कशामुळे प्रेरित झाला असे त्याला विचारले असता त्याने उत्तर दिले: “आम्हा सर्वांचेच जीवन धोक्यात आहे हे मी जाणले. त्यामुळे सर्वांनी मरण्यापेक्षा मी एकटा मेलेलो बरा, असा मी विचार केला.”b येशूच्या उदाहरणाचे इतक्या जवळून अनुकरण करणारे असे बांधव आपल्यामध्ये आहेत हा किती मोठा आशीर्वाद!

तसेच, दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान छळछावण्यात असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांमधील एकोप्याच्या आत्म्याचेही आपण चिंतन करू शकतो.c अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाल्यास, मलावीतील आपले बंधुभगिनी खरे ख्रिस्ती या नात्याने एकनिष्ठ राहिले आहेत. मंडळ्यांतील आपले बांधवही विपरीत परिस्थितीत अशाचप्रकारे वागतील या विचाराने आपण दररोजच्या तणावांकडे व समस्यांकडे दुर्लक्ष करण्यास किंवा निदान त्यांना जास्त महत्त्व न देण्यास तरी प्रवृत्त होत नाही का? आपण ख्रिस्तासारखे मन आपल्यामध्ये विकसित केल्यास सहउपासकांसोबतचे आपले दररोजचे नातेसंबंध, निरुत्साहाचे नव्हे तर तजेला देणारे ठरतील.

निरुत्साहित करणाऱ्‍या भावना

“आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते, पण इष्टप्राप्ति जीवनाचा वृक्ष आहे.” (नीतिसूत्रे १३:१२) यहोवाच्या सेवकांपैकी काहींच्या मते या व्यवस्थीकरणाचा शेवट यायला अपेक्षेपेक्षा जास्त उशीर लागत आहे. सत्यात नसलेल्या लोकांप्रमाणे ख्रिश्‍चनांनाही आज आपण ज्या काळात जगत आहोत तो “कठीण” काळ वाटतो.—२ तीमथ्य ३:१-५.

परंतु ख्रिश्‍चनांनी सत्यात नसलेल्या या लोकांप्रमाणे होऊ नये; त्यांच्यावर येणारा हा परीक्षामय समय, येशूच्या उपस्थितीचे एक चिन्ह आहे व यावरून हे सूचित होते की देवाचे राज्य लवकरच या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करणार आहे, हे ओळखून त्यांनी आनंद मानावा. (मत्तय २४:३-१४) ‘मोठ्या संकटादरम्यान’ परिस्थिती नक्कीच आणखीन बिकट होईल, पण अशा बिकट परिस्थितीतही आपण आनंदच मानू कारण देवाचे नवीन जग जवळ आले आहे याचा हा एक पुरावा आहे.—मत्तय २४:२१; २ पेत्र ३:१३.

जगाच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी देवाच्या राज्याला अजून अवकाश आहे असा विचार एखादा ख्रिस्ती करत असेल तर मग तो भौतिक गोष्टींचा पाठलाग करण्यातच आपला बहुतेक वेळ खर्च करत राहील. प्रापंचिक काम आणि मनोरंजन यातच तो आपला सर्व वेळ व शक्‍ती खर्च करत असेल तर आपल्या शास्त्रवचनीय जबाबदाऱ्‍या उचितरीतीने पूर्ण करायला त्याला कठीण जाईल. (मत्तय ६:२४, ३३, ३४) आणि मग यामुळे तो निरुत्साही होईल. एका प्रवासी पर्यवेक्षकांनी म्हटले: “नव्या व्यवस्थीकरणात मिळणारे सर्व आशीर्वाद याच व्यवस्थीकरणात मिळवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे.”

दोन सर्वोत्तम उपाय

नेमक्या कोणत्या कारणामुळे एखादी व्यक्‍ती निरुत्साही झाली आहे हे ओळखल्यावर त्याला प्रभावी उपाय कसा काय मिळू शकेल? व्यक्‍तिगत अभ्यास ही उपलब्ध असलेली सर्वात उत्तम पद्धत आहे. का बरे? “कारण अभ्यास, आपल्याला जे करायचे आहे ते आपण का केले पाहिजे याची आठवण करून देतो,” असे एक प्रवासी पर्यवेक्षक म्हणतात. आणखी एका पर्यवेक्षकांनी म्हटले: “फक्‍त कर्तव्य बजावण्यासाठी म्हणून प्रचार केल्यास कालांतराने ते ओझे वाटू लागते.” परंतु, मन लावून व्यक्‍तिगत अभ्यास केल्याने आपल्याला, आपण अंताच्या जसजसे जवळ जातो तसतसे आपल्या भूमिकेबद्दल एक स्पष्ट दृष्टिकोन ठेवायला मदत करील. याच विचाराबद्दल शास्त्रवचने आपल्याला, देवाची इच्छा पूर्ण करताना खरा आनंद मिळण्याकरता चांगल्याप्रकारे आध्यात्मिक अन्‍नाची भरवणूक करण्याची गरज आहे, याची आठवण करून देतात.—स्तोत्र १:१-३; १९:७-१०; ११९:१, २.

निरुत्साहावर मात करण्यास इतरांना मदत करण्याकरता वडील जन त्यांना मेंढपाळकत्वाच्या भेटी देऊ शकतात. यहोवाच्या लोकांमध्ये प्रत्येकाची कदर केली जाते व प्रत्येकाला महत्त्वाचे स्थान आहे, हे वडील जन या खासगी भेटींदरम्यान दाखवू शकतात. (१ करिंथकर १२:२०-२६) सहख्रिश्‍चनांचा उल्लेख करताना, एका वडिलांनी म्हटले: “ते किती मौल्यवान आहेत यावर जोर देण्याकरता मी त्यांना, गतकाळात त्यांनी साध्य केलेल्या गोष्टींची आठवण करून देतो. ते यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहेत व त्याच्या पुत्राचे रक्‍त त्यांच्याकरताही वाहण्यात आले आहे, या गोष्टीकडे मी त्यांचे लक्ष वेधतो. हे सर्व ऐकून बहुतेक वेळा त्यांना आनंद वाटतो. बायबलमधील उल्लेखांद्वारे या गोष्टी पटवून दिल्यानंतर, निरुत्साहित झालेले हे लोक मग, कौटुंबिक प्रार्थना, अभ्यास आणि बायबल वाचन यासारखी नवीन ध्येये ठेवण्यास तयार होतात.”—इब्री लोकांस ६:१०.

वडिलांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी, की त्यांनी मेंढपाळकत्वाच्या भेटींदरम्यान, देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे असे भासवता कामा नये. उलट, निरुत्साहित झालेल्या सहउपासकांना ते ही गोष्ट पाहण्यास मदत करतील, की येशूच्या अनुयायांवरील ओझे हलके आहे. परिणामतः, आपली ख्रिस्ती सेवा आनंदाचा एक स्रोत ठरू शकते.—मत्तय ११:२८-३०.

निरुत्साहावर विजय मिळवणे

कारण काहीही असो, निरुत्साह एक रोग आहे ज्याच्याविरुद्ध लढले पाहिजे. परंतु या लढतीत आपणच एकटे नाहीत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण निरुत्साहित झालोच तर आपल्या ख्रिस्ती सोबत्यांकडून खासकरून वडिलांकडून मिळणाऱ्‍या मदतीचा आपण स्वीकार करू या. असे केल्याने निरुत्साहामुळे उद्‌भवणाऱ्‍या भावना आपण कमी करू शकतो.

या सर्वांहून अधिक म्हणजे, निरुत्साहाच्या वेळी आपण यहोवाचे साहाय्य घेतले पाहिजे. प्रार्थनापूर्वक त्याच्यावर अवलंबून राहिल्यास, तो आपल्यातील निरुत्साह पूर्णपणे काढून टाकील. (स्तोत्र ५५:२२; फिलिप्पैकर ४:६, ७) कोणत्याही परिस्थितीत, आपण त्याचे लोक या नात्याने, स्तोत्रकर्त्याप्रमाणेच आपल्याही भावना असतील; त्याने गायिले: “ज्या लोकांस उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्‍वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करितात; तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्‍नति होते. कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.”—स्तोत्र ८९:१५-१७.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज (इंग्रजी), मे १५, १९८१ मधील, “घरोघर जाण्याचे आव्हान” हा लेख पाहा.

b वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, फेब्रुवारी २२, १९८५ च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातील पृष्ठे १२ आणि १३ पाहा.

c ऑगस्ट १५, १९८० च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी), मधील “मी ‘मृत्यू पदयात्रेतून’ बचावलो,” आणि जून २२, १९८५ च्या सावध राहा! (इंग्रजी), मधील “नात्सी जर्मनीत सचोटी राखणे” हे लेख पाहा.

[३१ पानांवरील चित्र]

प्रेमळ वडिलांनी दिलेल्या उभारणीकारक मेंढपाळकत्वाच्या भेटींमुळे ख्रिश्‍चनांना निरुत्साहावर मात करण्यास मदत मिळू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा