गुप्त खजिन्यासारखा शोध घेत राहा
देवाचा शब्द पवित्र शास्त्र यात ज्ञानाबद्दलची असलेली रत्ने किती अनमोल आहेत! ही रत्ने ईश्वरी संकेतांना प्रकट करतात व अंतःकरण भारावून जाईल अशा भवितव्याची मांडणी आमच्यापुढे उभी करतात. ती आम्हाला समाधान प्राप्त करून देतात व देवाला कसे संतुष्ट करावे हेही दाखवून देतात. (रोमकर १५:४) ही रत्ने, इतरांशी सूज्ञतेने वागण्यासाठी मदत करतात. खरेच, देवाकडून लाभलेले सूज्ञान जीवनाच्या मार्गावरुन समाधानाने व आनंदाने चालण्यास मदत करते.—स्तोत्रसंहिता १६:११; ११९:१०५.
सूज्ञतेचे फायदे पुष्कळ असल्यामुळे आम्ही त्याची बहुमूल्यता जाणून घेतली पाहिजे. मनुष्यवाणीतून बोलताना सूज्ञता म्हणतेः “माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत, त्यात काही वाकडे व विपरीत नाही. ज्याला समजूत आहे त्याला ती सर्व उघड आहेत; ती ज्ञान प्राप्त झालेल्यांस सरळ आहेत. रुपे घेऊ नका, तर माझे शिक्षण घ्या. उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे; सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तु त्याच्याशी तुल्य नाहीत.”—नीतीसूत्रे ८:८-११.
शोध घेत का राहायचे?
तसे पाहिले तर पुरलेल्या रत्नांचा, सोन्याचा वा चांदीचा शोध बहुधा निष्फळ ठरत असतो. पण हे ईश्वरी सूज्ञतेच्या शोधाच्या बाबतीत खरे ठरत नाही. पण हा शोध घेण्यात आम्हाला यश कसे मिळवता येईल? यशाची ही गोष्ट अर्थातच, खजिना प्राप्त करण्याविषयीची तुम्हाला किती उत्कट तळमळ आहे व त्यासाठी किती प्रमाणात कष्ट उचलण्याची तुमची तयारी आहे यावर अवलंबून आहे. त्याची खरी किंमत आम्ही ओळखली तर इतर कोणत्याही मौल्यवान वाटणाऱ्या वस्तुंपेक्षा ते अधिक जवळचे वाटेल. कारण, काही झाले तरी, “ज्ञानप्राप्ती ही उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सूज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.”—नीतीसूत्रे १६:१६.
नीतीसूत्रे २:१-६ आम्हाला असे प्रोत्साहीत करतेः “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्विकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सूज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सूज्ञतेची आराधना करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील तर यहोवाच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान यहोवा देतो. त्याच्या मुखातून ज्ञान व सूज्ञता येतात.”
पुरलेले खजिने गुप्त असल्यामुळे त्यांचा प्रथम शोध घेणे अत्यावश्यक असते. उत्खननाचे काम करताना करमणूकीचा वेळ, अन्न तसेच झोप यांना काही प्रमाणात काट देतात. पण जेव्हा खजिना मिळतो तेव्हा हे प्रयत्न सार्थकी लागल्यासारखे वाटतात. याचप्रमाणे देवाचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अशाच त्यागांची जरुरी आहे. गुप्त खजिन्याचा शोध परिश्रम सातत्याने करण्याची मागणी करतो त्याचप्रमाणे सूज्ञतेचा पाठलाग करताना अशाच चिकाटीच्या प्रयत्नांची आवश्यकता असते. पवित्र शास्त्र व इतर ख्रिस्ती प्रकाशने केवळ वरवर वाचून चालणार नाही. आध्यात्मिक माणके शोधण्यासाठी वेळ, संशोधन व मनन या गोष्टींची अतिशय जरुरी आहे. हे केल्यामुळे, पवित्र शास्त्र वचनांमध्ये जी सूक्ष्मदृष्टी मिळते त्यामुळे केवढा आनंद मिळतो!—नेहम्या ८:१३.
खजिन्याचा यशस्वी शोध
होय, देवाच्या वचनाचे उत्खनन करून सूज्ञतेची माणके शोधण्याचा परिणाम हर्षदायक आहे. (नीतीसूत्रे ३:१३-१८) या कारणासाठी, आम्ही स्वतःचे वैयक्तीक वा कौटुंबिक ग्रंथालय उभारले तर ते शहाणपणाचे ठरेल. पण यामध्ये कशाचा समावेश असण्यास हवा? यहोवाचे साक्षीदार चांगल्या शब्दकोशाखेरीज पवित्र शास्त्राच्या विविध भाषांतरांच्या आवृत्त्या, त्याचप्रमाणे ख्रिस्ती पवित्र शास्त्रीय प्रकाशने ज्यामध्ये दरवर्षीचे टेहळणी बुरुज व अवेक! मासिकांचे खंड ठेवणे उपयुक्त आहे असे समजतात. जर खजिना शोधकाला याकडून फायदा व्हावयाचा आहे तर मग या ग्रंथालयाचा वापरही योग्य रितीने केला जाण्यास हवा.
ज्ञानाचा शोध घेताना आम्ही तो विषय व शास्त्रवचनाचा भाग वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स किंवा वॉचटावर सोसायटीच्या पुस्तकांमागे तसेच मासिकांच्या खंडांच्या शेवटाला जी सूचि मिळते त्यांचा परामर्श घेऊ शकतो. ईश्वरी ज्ञानाचा शोध घेण्यासाठी लागणारी अशी ती प्रारंभिक साधने आहेत. खरे म्हणजे हे, ईश्वरी ज्ञानाच्या गुप्त खजिन्याकडे नेणाऱ्या नकाशासारखे आहेत. (नीती २:४) संशोधन करण्यासाठी लागणारी प्रकाशने जर आमच्याकडे नसतील तर यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक राज्य सभागृहामध्ये ती उपलब्ध होऊ शकतील.
आता आपण खजिन्याचा शोध कसा यशस्वीपणे केला जाऊ शकतो त्याची उदाहरणे पाहू. पवित्र शास्त्र वाचन करताना येशूचा विश्वासघात केल्यावर यहुदा इस्कर्योत कसा मरण पावला हे पाहताना आम्हाला आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. मत्तय २७:५ म्हणतेः “त्याने जाऊन गळफास घेतला.” परंतु, प्रे. कृत्ये १:१८ सांगते की, “तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर आली.” तर मग, यहुदा कसा मरण पावला? याचे उत्तर, इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स या प्रकाशनामध्ये “स्क्रिपचर इंडेक्स” विभागात ही शास्त्रवचने जेथे देण्यात आली आहेत तेथील संदर्भ काढून वाचल्यावर मिळू शकते. तो संदर्भ सांगतोः “असे दिसते की, मत्तय या आत्महत्येची पद्धत विशद करतो तर प्रे. कृत्ये याजमध्ये त्याचा अंतिम परिणाम दाखवला गेला आहे. हे दोन्ही अहवाल जर एकत्र केले तर असे दिसून येते की, यहुदाने एखाद्या सुळक्यावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला असावा परंतु तो दोर किंवा झाडाची फांदी तुटून तो खाली पडला व खडकावर आपटून त्याचे पोट फुटले असेल. यरुशलेमाची भौगोलिक परिस्थिती अशी घटना घडण्याची शक्यता दाखवते.”—खंड २, पृष्ठ १३०.
सूचिपत्रामुळे पवित्र शास्त्रात वचने कोठे आहेत ते आपल्याला समजते. अर्थात, एखाद्या शास्त्रवचनाविषयीची चर्चा करताना त्याचा मागील-पुढील संदर्भ आपण विचारात घेतला पाहिजे. हे पाहण्यासाठी आपण स्तोत्रसंहिता १४४:१२-१४ वचने विचारात घेऊ. काही लोकांची प्रतिपादने व्यक्त करण्यात ही वचने सांगतातः ‘आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपासारखे असावेत; आमच्या कन्या राजवाड्याच्या कोपऱ्यांच्या कोरिलेल्या खांबासारख्या असाव्यात; आमची भंडारे भरलेली असावीत; आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत.’ आपल्याला कदाचित वाटेल की, देवाच्या लोकांनाच ही वचने लागू पडतात. परंतु, संदर्भ हे दाखवितो की, ती लागू होत नाहीत. ११व्या वचनात स्तोत्रकर्ता दाविद असत्य बोलणाऱ्यांच्या हातून मुक्त करण्याविषयीची याचना मांडतो. हे लोक आपले पुत्र, कन्या, कळप व गुरे यांजविषयी फुशारकीने बोलतात. १५ व्या वचनानुरुप हे अधर्मी लोक म्हणतातः “अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य!” उलटपक्षी दाविद असे म्हणतो की, “ज्या लोकांचा देव यहोवा आहे ते धन्य!”
आध्यात्मिक माणिकमोत्यांची विपुलता!
ज्ञानाचा यशस्वी शोध घेतल्यावर त्याची परिणिती आनंदात होते. याचप्रमाणे संशोधनाकरवी जी आध्यात्मिक माणके मिळतात त्यात पवित्र शास्त्रीय प्रश्नांना मिळालेल्या समाधानकारक उत्तरांचाही समावेश होतो. आम्ही शोघ घेत राहिलो तर किती सुंदर उत्तरे आपल्याला मिळतात! उदाहरणार्थ, काईनाला त्याची बायको कोठून मिळाली? द वॉचटावर (ऑक्टोबर १, १९८१) म्हणतेः “पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की, आदाम-हव्वेला केवळ दोनच (काईन व हाबेल) मुले नव्हती तर पुष्कळ मुले होती. ‘शेथ झाल्यावर आदाम आठशे वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे आणि मुली झाल्या.’ (उत्पत्ती ५:४) ही माहिती मिळाल्यावर, आता, काईनाला बायको कोठून मिळाली याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? होय, त्याचा विवाह त्याच्या बहिणींपैकीच एकीशी झाला असावा. आज, इतक्या जवळच्या नातेसंबंधातून जन्माला येणाऱ्या संततीला धोका होण्याची दाट शक्यता आहे. पण मानवी इतिहासाच्या सुरवातीला, जेव्हा मनुष्य पूर्णत्वाच्या अगदी जवळ होता तेव्हा काही समस्या नव्हती.”
आता अशी कल्पना करा की, आपण पवित्र शास्त्रातील नीतीसूत्रे या पुस्तकाचे वाचन करीत आहोत. नीतीसूत्रे १:७ मध्ये जे लिहिले आहे ते वाचल्यावर आम्हाला कदाचित नवल वाटेल की, ‘हे “यहोवाचे भय” म्हणजे काय?’ संशोधन करीत करीत आपण ऑक्टोबर १९८७ च्या टेहळणी बुरुज अंकाकडे येऊ ज्यात म्हटले आहेः “ते महान, गंभीर भीतीवह आदर व त्याला असंतुष्ट न करण्याविषयीची भीती आहे कारण आम्ही त्याची दया व चांगुलपणाची आवड बाळगतो. ‘यहोवाचे भय’ म्हणजे तो सर्वोच्च न्यायाधीश व सर्वसमर्थ आहे तसेच त्याची अवज्ञा करणाऱ्यांवर शासन किंवा मृत्यु आणण्याचा हक्क व सामर्थ्य असणारा असे त्यास ओळखणे आहे. त्याचा अर्थ देवाची सेवा विश्वासूपणे करणे, त्याजवर पूर्ण भाव ठेवणे व त्याच्या दृष्टीने वाईट त्याचा द्वेष करणे आहे.”
शोध घेत राहा
अमूल्य अशा आध्यात्मिक रत्नांचा कळकळीने शोध घेणाऱ्या लोकांसाठी टेहळणी बुरुज हे मासिक प्रकाशित केले जात आहे. आम्हा सर्वांनाच देवाच्या वचनातील सूज्ञान व समज असणे जरुरीचे आहे. नीतीसूत्रे ४:७, ८ हे देखील तेच म्हणतेः “ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ती संपादीत कर; आपली सर्व संपत्ती वेचून सूज्ञता संपादीत कर. त्याला उच्च पद दे, म्हणजे ते तुझी उन्नती करील; त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करील.”
पवित्र शास्त्र वचनांकडून सूक्ष्मदृष्टी मिळण्याद्वारे आणि सूज्ञतेचा योग्य रितीने वापर करण्याद्वारेच आम्हाला खऱ्या आनंदाचा लाभ होऊ शकतो. होय, या ईश्वरी ज्ञानाला उपयोगात आणण्याद्वारेच आम्ही यहोवा देवाला संतुष्ट करू शकतो. तर मग, या सूज्ञानाचा गुप्त खजिन्यासारखा शोध घेत राहण्यामध्ये कोणालाही अडखळण बनू देऊ नका.
[४, ५ पानांवरील चित्रं]
पुरण्यात आलेला खजिना शोधून काढण्यासाठी पराकाष्ठेने खणावे लागते. तर मग, आपण ईश्वरी ज्ञानाचा शोध घेण्यासाठी नेट राखू नये का?