तुम्ही अधिक समजबुद्धी विकसित करू शकता का?
समजबुद्धी म्हणजे “एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीचे भेद जाणण्याची मनाची शक्ती किंवा मनाचे सामर्थ्य होय.” ती, “न्याय करण्याचा अचूकपणा” किंवा “गोष्टींमधील वा कल्पनांमधील भेद जाणण्याची आकलन शक्ती” देखील असू शकतो असे वेबस्टर्स युनिव्हर्सल डिक्शनरी म्हणते. स्पष्टतः, समजबुद्धी हा हवा असणारा गुण आहे. त्याचे मूल्य शलमोनाच्या शब्दांतून दिसून येते: “ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल, . . . समंजसपणा [समजबुद्धी] तुला संभाळील म्हणजे कुमार्गापासून . . . तो तुला दूर ठेवील.”—नीतिसूत्रे २:१०-१२.
होय, आज विपुलतेत असलेल्या ‘कुमार्गाचा’ प्रतिकार करण्यासाठी समजबुद्धी आपल्याला मदत करील. तिच्यामुळे आपल्याला इतर लाभ देखील मिळतात. उदाहरणार्थ पालक, ‘तुम्हाला काही समजतच नाही!’ असे त्यांची मुले त्यांना म्हणताना ऐकतात. जरासे परीक्षण करून, समजबुद्धी असलेल्या पालकांना, त्यांच्या मुलांना अस्वस्थ करणाऱ्या भावनांना व वादविषयाला त्यांच्याकडून कसे काढून घ्यावे ते माहीत असते. (नीतिसूत्रे २०:५) समजबुद्धी असलेला पती, त्याच्या पत्नीचे ऐकेल व उतावीळपणे अनुमान काढण्याऐवजी तो तिचे विचार आणि तिच्या भावना समजून घेईल. पत्नी देखील तिच्या पतीसोबत असाच व्यवहार करील. अशा प्रकारे, “सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने [समजबुद्धीने] ते मजबूत राहते.”—नीतिसूत्रे २४:३.
समजबुद्धी एखाद्याला काही प्रसंग यशस्वीपणे हाताळण्यास मदत करते. नीतिसूत्रे १७:२७ म्हणते: “जो मितभाषण करितो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ति शांत तो समंजस [समजबुद्धी] असतो.” समजबुद्धी असलेला मनुष्य तापट स्वभावाचा नसतो, तो कोणत्याही प्रसंगी अविचारीपणे घाई करत नाही. काहीही करण्याआधी तो बारकाईने संभाव्य परिणामांचा विचार करतो. (लूक १४:२८, २९) इतरांसोबत त्याचे अधिक शांतीदायक नातेसंबंध असतात कारण ‘सुज्ञतेमुळे’ तो काळजीपूर्वकतेने त्याचे शब्द निवडतो. (नीतिसूत्रे १०:१९; १२:८) परंतु, याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजबुद्धी असलेला मनुष्य नम्रपणे त्याच्या स्वतःच्या मर्यादांना ओळखतो आणि मार्गदर्शनासाठी मानवाकडे पाहण्याऐवजी देवाकडे पाहतो. हे यहोवाला आनंदविण्याचे व समजबुद्धी विकसित करण्याचे आणखी एक कारण आहे.—नीतिसूत्रे २:१-९; याकोब ४:६.
इस्राएलच्या समजबुद्धीची उणीव
समजबुद्धी न दाखवल्याचा धोका इस्राएलच्या आरंभीच्या इतिहासातील एका घटनेतून दिसून येतो. त्या समयाचा विचार करत प्रेरित स्तोत्रकर्ताने लिहिले: “आमचे पूर्वज मिसरात असता तुझी आश्चर्यकर्मे समजले नाहीत, तुझ्या प्रेमदयांचा समुदाय त्यांना आठवला नाही आणि समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळच ते फितूर झाले”—स्तोत्र १०६:७, पंडिता रमाबाई भाषांतर.
मोशेने इस्राएलला इजिप्तमधून बाहेर नेले तेव्हा, यहोवाने त्या शक्तिमान जागतिक सत्तेला दहा पिडांनी पीडित करण्याद्वारे त्याच्या लोकांना मुक्त करण्याचे त्याचे सामर्थ्य आणि त्याचा दृढनिश्चय आधीच दाखवला होता. फारोने इस्राएली लोकांना जाऊ दिल्यानंतर, मोशेने त्यांना तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आणले. पण, इजिप्तच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केलाच. असे दिसत होते, की इस्राएली जणू जाळ्यात अडकले व त्यांना नुकतेच मिळालेले स्वातंत्र्य अल्पकाळाचे होते. यास्तव बायबलचा अहवाल म्हणतो: ‘इस्राएल लोकांना भीती वाटली व ते परमेश्वराचा [यहोवा, NW] धावा करू लागले.’ ते मोशेला म्हणाले: “आम्हाला तू मिसरातून बाहेर आणिले ते काय म्हणून? . . . येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांच्या गुलामगिरीत राहणे परवडते.”—निर्गम १४:१०-१२.
त्यांनी यहोवाच्या सामर्थ्याची दहा उल्लेखनीय प्रदर्शने आधीच पाहिली होती याची आपण आठवण करतो तोवर त्यांना अशी भीती का वाटत होती हे समजण्याजोगे आहे. त्यांना आधीच माहीत होते की मोशे त्यांना नंतरच्या ४० वर्षांची काय आठवण करून देईल: “परमेश्वराने पराक्रमी हाताने व उगारिलेल्या भुजाने, महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार ह्यांच्यायोगे आम्हाला मिसर देशातून बाहेर आणिले.” (अनुवाद २६:८) यास्तव, स्तोत्रकर्त्याने लिहिल्याप्रमाणे, इस्राएली लोकांनी मोशेच्या मार्गदर्शनाविरुद्ध कार्य केले ते त्यांना “समजले नाही.” तरीदेखील, यहोवाने त्याच्या अभिवचनानुसार, इजिप्तच्या बळाला जोरदार तडाखा देऊन त्यांचा पराजय केला.—निर्गम १४:१९-३१.
आपल्यावर परीक्षा येतात तेव्हा आपण त्या परीक्षांकडे शंकेने किंवा द्विधावृत्तीने पाहिले तर आपलाही विश्वास अशाच प्रकारे लटपटत राहू शकतो. समंजसपणा आपल्याला गोष्टींकडे योग्य सापेक्ष प्रमाणात पाहण्यास मदत करील. आपला विरोध करणाऱ्यांपेक्षा यहोवा किती तरी पटीने महान आहे याची आपल्याला आठवण होईल. यहोवाने आपल्यासाठी आधी जे काही केले आहे ते सर्व लक्षात ठेवण्यासाठी देखील समजबुद्धी आपल्याला मदत करील. यहोवा, ‘त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो,’ ही वस्तुस्थिती आपण कधीही न विसरण्यास ते आपल्याला मदत करील.—स्तोत्र १४५:१८-२०.
आध्यात्मिक समजबुद्धी प्राप्त करणे
आपण जसजसे मोठे होत जातो तशी समजबुद्धी आपोआप येत नसते. तिला विकसित करावे लागते. समजबुद्धीबद्दल आंतरराष्ट्रीय ख्याति असलेल्या सुज्ञ राजा शलमोनाने म्हटले: “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करितो, तो मनुष्य धन्य होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे.” (नीतिसूत्रे ३:१४, १५) शलमोनाला समजबुद्धी कोठून मिळाली? यहोवाकडून. शलमोनाला कोणता आशीर्वाद हवा असे यहोवाने विचारले तेव्हा तो उत्तरला: “आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्यावाइटांचा विवेक [समज] करिता येईल.” (१ राजे ३:९) होय, शलमोनाने यहोवाकडे त्याचा साहाय्यक असे पाहिले. त्याने त्याच्याजवळ समजबुद्धी मागितली आणि यहोवाने ती त्याला असामान्य प्रमाणात दिली. त्याचा परिणाम? “शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी यांच्याहून अधिक होते.”—१ राजे ४:३०.
शलमोनाचा अनुभव, आपण समजबुद्धीचा शोध घेण्यासाठी कोठे जावे ते दाखवतो. शलमोनाप्रमाणे आपणही, यहोवाकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. ते कसे? यहोवाने आपल्याला त्याचे वचन, बायबल दिले आहे जे आपल्याला त्याच्या विचारांमध्ये अंतर्दृष्टी देते. आपण बायबल वाचतो तेव्हा, ज्ञानाची मौल्यवान खाण खोदत असतो की जी आपल्याला आध्यात्मिक समजबुद्धीचा आधार देऊ शकेल. बायबल वाचनातून आपण जी माहिती साठवतो त्यावर मनन करणे आवश्यक आहे. मग, योग्य निर्णय घेण्यासाठी तिचा उपयोग केला जाऊ शकतो. कालांतराने, आपली ग्रहणशक्ती इतक्या प्रमाणात विकसित होते, की आपण “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे” होऊन आपल्याला “चांगले आणि वाईट समजण्याचा [किंवा भेद जाणण्याचा] सराव” होतो.—१ करिंथकर १४:२०; इब्रीयांस ५:१४; पडताळा १ करिंथकर २:१०.
यहोवाने शलमोनाला दिलेल्या समजबुद्धीचा आपल्याला अजूनही लाभ मिळवता येतो ही आस्थेची गोष्ट आहे. ते कसे? शलमोन नीतिसूत्रांच्या स्वरूपात सुज्ञता व्यक्त करण्यात निपुण झाला. खरे पाहता, ही नीतिसूत्रे म्हणजे संकलन करण्यात आलेली ईश्वर प्रेरित बुद्धी होती. यापैकीचे अनेक नीतिबोध नीतिसूत्रे नावाच्या बायबलमधील पुस्तकात जतन करून ठेवण्यात आली आहेत. त्या पुस्तकाचा अभ्यास, शलमोनाच्या समंजसपणातून लाभ मिळवून घेण्यास तसेच स्वतःमध्ये समंजसपणा विकसित करण्यास आपल्याला मदत करतो.
बायबल अभ्यासामध्ये आपल्याला साहाय्य करण्यासाठी आपण बायबल अभ्यास साधने जसे की टेहळणीबुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचा वापर करू शकतो. टेहळणीबुरूज नियतकालिक ११६ पेक्षा अधिक वर्षांपासून नम्र हृदयाच्या लोकांना यहोवाच्या राज्याची घोषणा करीत आहे. सावध राहा! नियतकालिक आणि त्याच्या आधीची नियतकालिके १९१९ पासून जगाच्या परिस्थितींवर विवेचने मांडत आली आहेत. ही दोन नियतकालिके बायबल सत्यांचे परीक्षण करतात आणि ख्रिस्ती धर्मजगताने शिकवलेल्या चुकीच्या शिकवणी असोत किंवा आपल्या विचारसरणीत आढळणाऱ्या चुका असोत त्या समजून घेण्यास मदत करण्यासाठी प्रगतीशील आध्यात्मिक प्रज्वलन पुरवतात.—नीतिसूत्रे ४:१८.
समजबुद्धी विकसित करण्यासाठी आणखी एक मदत योग्य सहवास ही आहे. राजा शलमोनाचे एक नीतिसूत्रे म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) राजा शलमोनाचा पुत्र रहबाम याने त्याच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगी या नीतिसूत्राची आठवण केली नाही ही लाजेची गोष्ट आहे. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर, इस्राएल वंशाचे लोक त्यांचा भार कमी करावा ही मागणी घेऊन त्याच्याजवळ आले होते. पहिल्यांदा, रहबामाने वृद्ध जनांची मसलत घेतली तेव्हा आपल्या प्रजेचे ऐकावे असे त्यास उत्तेजन देऊन त्यांनी समजबुद्धी दाखवली. मग तो तरुण पुरुषांकडे गेला. इस्राएलांना धमक्यांनी उत्तर द्यावे असे त्यांनी रहबामाला उत्तेजन दिली व याद्वारे ते कमअनुभवी आणि समजबुद्धी नसलेले असे स्वतःला प्रदर्शित केले. रहबामाने तरुण पुरुषांचे ऐकले. त्याचा परिणाम? इस्राएलने बंड पुकारले व रहबामाने त्याचा राज्यातील मोठा हिस्सा गमावला.—१ राजे १२:१-१७.
समजबुद्धी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण भाग, पवित्र आत्मा मिळवण्याचा प्रयत्न करणे होय. इजिप्तमधील दास्यत्वातून सुटका मिळाल्यानंतर इस्राएलसोबत यहोवाच्या व्यवहाराची उजळणी करताना बायबल लेखक नहेम्याने म्हटले: “समजबुद्धी प्राप्त व्हावी म्हणून तू त्यास आपला सदात्मा दिला.” (नहेम्या ९:२०, NW) समजबुद्धीचे होण्यासाठी यहोवाचा आत्मा आपल्याला देखील मदत करू शकतो. तुम्हाला समजबुद्धी द्यावी म्हणून तुम्ही यहोवाच्या आत्म्याची मदत मागता तेव्हा आत्मविश्वासाने प्रार्थना करा कारण यहोवा “कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.”—याकोब १:५; मत्तय ७:७-११; २१:२२.
समजबुद्धी आणि सूक्ष्मदृष्टी
राष्ट्रांच्या लोकांना सत्याचा प्रचार करून प्रेषित पेत्राने समजबुद्धी दाखवली. उदाहरणार्थ, एकदा, अथेन्समध्ये त्याने “फिरता फिरता” त्यांच्या पूज्य वस्तू पाहिल्या. पौलाच्या आजूबाजूला मूर्त्याच मूर्त्या होत्या व ते पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. आता त्याला एक निर्णय घ्यावयाचा होता. सुरक्षित मार्ग अनुसरून शांत राहावे का? की, त्याला चीड आणणाऱ्या सर्वत्र चाललेल्या मूर्तिपूजेबद्दल उघडपणे बोलणे घातक ठरत असले तरी त्याच्याबद्दल त्याने बोलावे?
पौलाने समजबुद्धी दाखवली. त्याने “अज्ञात देवाला” ही अक्षरे लिहिलेली वेदी पाहिली. चतुराईने, पौलाने मूर्तींबद्दल त्यांची भक्ती कबूल केली आणि मग “ज्या देवाने जग व त्यांतले अवघे निर्माण केले” त्या देवाच्या विषयाची ओळख करून देण्यासाठी वेदीचा उपयोग केला. होय, त्यांना यहोवा देवाबद्दल माहीत नव्हते! यास्तव, पौलाने या विषयावरील त्यांची संवेदनशीलता निरीक्षली आणि तो त्यांना एक उत्तम साक्ष देऊ शकला. त्याचा परिणाम काय झाला? अनेकांनी सत्य स्वीकारले, “ज्यामध्ये अरीयपगकरच्या न्यायालयाचा न्यायाधीश दिओनुस्य आणि दामारीस नावाच्या एका स्त्रीचा आणि त्यांच्याबरोबर दुसऱ्यांचा” देखील समावेश होता. (प्रेषितांची कृत्ये १७:१६-३४, NW) पौल समजबुद्धीचे किती उत्तम उदाहरण होता!
समजबुद्धी सहजरीत्या किंवा स्वाभाविकपणे येत नाही यात काही प्रश्नच नाही. पण धीर, प्रार्थना, मनःपूर्वक प्रयत्न, सुज्ञ सहवास, बायबलचा अभ्यास आणि त्याचे मनन तसेच यहोवाच्या पवित्र आत्म्यावरील भरवशाने तुम्ही देखील तो विकसित करू शकता.