वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ११/१५ पृ. १३-१८
  • तुमच्या महान निर्माणकर्त्याला स्मरा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या महान निर्माणकर्त्याला स्मरा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इतिहासातील उत्तम उदाहरणे
  • आता, यहोवाला स्मरा!
  • सरत्या वयाचे परिणाम
  • स्मरणात ठेवणाऱ्‍यांकरता कोणते भवितव्य?
  • आयुष्याचा पुरेपूर लाभ घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • देवाप्रती तुम्ही तुमचे पूर्ण कर्तव्यकर्म पार पाडत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • अनिष्ट दिवस येण्याआधी यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ११/१५ पृ. १३-१८

तुमच्या महान निर्माणकर्त्याला स्मरा!

‘अनिष्ट दिवस येण्यापूर्वी तुमच्या निर्माणकर्त्याला स्मरा.’—उपदेशक १२:१.

१. देवाला समर्पित तरुणांनी त्यांच्या शक्‍तीचा कशाप्रकारे उपयोग करण्याचा प्रयत्न करावा?

यहोवा त्याच्या सेवकांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता सामर्थ्य देतो. (यशया ४०:२८-३१) मग त्याच्या सेवकांचे वय कितीही असले तरी त्यामुळे काही फरक पडत नाही. पण विशेषतः देवाला समर्पण केलेल्या तरुणांनी त्यांच्या तारुण्याचा आणि शक्‍तीचा चांगल्याप्रकारे उपयोग करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे प्राचीन काळातील उपदेशक, शलमोन राजाच्या शब्दांचा ते मोठ्या गांभिर्याने विचार करतात. त्याने असे आर्जवले: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यांत मला काही सुख नाही असे तू म्हणशील.”—उपदेशक १:१; १२:१.

२. समर्पित ख्रिश्‍चनांच्या मुलांनी काय केले पाहिजे?

२ तारुण्याच्या दिवसांत महान निर्माणकर्त्याचे स्मरण करण्याचा शलमोनाने दिलेला सल्ला खरे तर इस्राएलमधील तरुण-तरुणींकरता होता. यहोवाला समर्पित असलेल्या राष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर मग, आजच्या समर्पित ख्रिश्‍चनांच्या मुलांविषयी काय म्हणता येईल? होय, त्यांनीही महान निर्माणकर्त्याचे स्मरण केले पाहिजे. मुले देवाचे स्मरण करतात तेव्हा ते त्याला आदर दाखवत असतात आणि असे केल्याने खरे तर लाभच होत असतो.—यशया ४८:१७, १८.

इतिहासातील उत्तम उदाहरणे

३. योसेफ, शमुवेल आणि दावीद यांनी कोणते उदाहरण मांडले?

३ बायबलमध्ये अशा अनेक तरुणांविषयी आपल्याला वाचायला मिळते ज्यांनी महान निर्माणकर्त्याला स्मरण्यात एक उत्तम उदाहरण मांडले आहे. याकोबाचा मुलगा योसेफ याने आपल्या तरुणपणापासूनच निर्माणकर्त्याचे स्मरण केले. पोटीफरच्या पत्नीने योसेफाला अनैतिक संबंध ठेवण्याची गळ घातली तेव्हा त्याने तिला असे म्हणून धुडकावून लावले: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्पत्ति ३९:९) लेवीय शमुवेलाने त्याच्या बालपणीच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण जीवनकालामध्ये निर्माणकर्त्याचे स्मरण केले. (१ शमुवेल १:२२-२८; २:१८; ३:१-५) बेथलेहेमच्या दावीद या तरुणाने निश्‍चितच निर्माणकर्त्याचे स्मरण केले होते. पलिष्टी महाकाय गल्याथ याच्याशी त्याचा मुकाबला झाला तेव्हा दावीदाचा देवावर किती विश्‍वास आहे हे दिसून आले कारण त्याने असे म्हटले: “तू तरवार, भाला व बरची घेऊन मजवर चढून आला आहेस; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस; त्या सेनाधीश परमेश्‍वराच्या नामाने मी तुजकडे आलो आहे. आज परमेश्‍वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शीर धडापासून वेगळे करीन. . . . तेव्हा इस्राएलांमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्‍वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्‍वराचे आहे; तो तुम्हास आमच्या हाती देईल.” आणि तसेच झाले गल्याथ मारला गेला आणि पलिष्टी सैन्याला माघार घ्यावी लागली.—१ शमुवेल १७:४५-५१.

४. (अ) सिरियामध्ये बंदिवासात असलेल्या इस्राएली मुलीने आणि तरुण राजा योशिया यांनी आपल्या महान निर्माणकर्त्याला स्मरले हे कशावरून दिसून येते? (ब) बारा वर्षांच्या येशूने त्याच्या निर्माणकर्त्याला कसे स्मरले?

४ बंदिवासात असलेल्या एका इस्राएल मुलीने देखील महान निर्माणकर्त्याचे स्मरण केले. अरामच्या सेनापतीच्या पत्नीला तिने एक उत्तम साक्ष दिली, की तिच्या पतीने कोड बरा व्हावा म्हणून देवाच्या संदेष्ट्याकडे जावे; नामान देवाच्या संदेष्ट्याकडे गेल्यामुळे त्याचा रोग बरा झाला आणि तो यहोवाचा उपासक बनला. (२ राजे ५:१-१९) तरुण राजा योशिया याने मोठ्या धैर्याने यहोवाच्या शुद्ध उपासनेचा प्रसार केला. (२ राजे २२:१–२३:२५) पण कोवळ्या वयातच आपल्या महान निर्माणकर्त्याचे स्मरण करण्यात कोणी सर्वोत्तम उदाहरण मांडले असेल तर तो होता नासरेथचा येशू. तो १२ वर्षांचा असताना काय झाले याकडे जरा लक्ष द्या. त्याचे आईवडील वल्हांडणासाठी त्याला जेरुसलेमला घेऊन गेले होते. तेथून परतताना येशू त्यांच्यासोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे त्याला शोधण्याकरता ते परत जेरुसलेमला गेले. तिसऱ्‍या दिवशी त्यांना असे दिसून आले, की येशू मंदिरातील शिक्षकांसोबत शास्त्रवचनीय प्रश्‍नांवर चर्चा करत आहे. त्याच्या आईने येशूविषयी चिंता व्यक्‍त केली तेव्हा त्याने म्हटले: “तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” (लूक २:४९) येशूकरता हे लाभदायक होते, की त्याने मंदिरात अर्थात ‘त्याच्या देवाच्या घरात’ आध्यात्मिक मोल असलेली माहिती प्राप्त करावी. आपल्या महान निर्माणकर्त्याविषयी जाणून घेण्याकरता आज यहोवाच्या साक्षीदारांचे सभागृह एक उत्तम स्थान आहे.

आता, यहोवाला स्मरा!

५. उपदेशक १२:१ येथे नमूद करण्यात आलेले विचार तुम्ही स्वतःच्या शब्दांत कसे सांगाल?

५ यहोवाची पूर्ण मनाने सेवा करणाऱ्‍यांना हेच वाटते, की त्यांनी लवकरात लवकर देवाची सेवा करण्याचे सुरू करावे आणि आपल्या पुढील आयुष्यातही त्याची सेवा करत राहावे. पण निर्माणकर्त्याला न स्मरता आपले तारुण्य असेच घालवलेली व्यक्‍ती कोणती आशा बाळगू शकते? ईश्‍वरी प्रेरणेने उपदेशक असे म्हणतो: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यांत मला काही सुख नाही असे तू म्हणशील.”—उपदेशक १२:१.

६. वयोवृद्ध शिमोन आणि हन्‍ना यांनी महान निर्माणकर्त्याला स्मरले याचा कोणता पुरावा आहे?

६ वृद्धापकाळातील “अनिष्ट दिवस” कोणालाही आवडत नाहीत. देवाचे स्मरण करणारे वयोवृद्ध मात्र आनंदी आहेत. उदाहरणार्थ, वयोवृद्ध शिमोनाने मंदिरात येशू बाळाला आपल्या हातांत घेतल्यानंतर मोठ्या आनंदाने असे म्हटले: “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस; कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.” (लूक २:२५-३२) चौऱ्‍याऐंशी वर्षांच्या हन्‍नाने देखील निर्माणकर्त्याला स्मरले. ती नेहमी मंदिरात असायची आणि येशू बाळाला तेथे आणण्यात आले तेव्हा ती मंदिरातच होती. “तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानिले आणि जे यरुशलेमेच्या मुक्‍ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली.”—लूक २:३६-३८.

७. देवाच्या सेवेत वृद्ध झालेल्या लोकांची काय स्थिती आहे?

७ यहोवाची सेवा करता-करता केस पिकलेले देवाचे सेवक वृद्धापकाळामुळे कदाचित दुःखी असतील आणि त्यांना आता पहिल्यासारखे कामही कदाचित होत नसेल. पण तरीही ते किती आनंदी आहेत आणि आपणही त्यांच्या विश्‍वासू सेवेची किती कदर करतो! वृद्ध झालेले देवाचे सेवक कमजोर असले तरी त्यांच्याकडे ‘परमेश्‍वराचा आनंद’ आहे कारण त्यांना माहीत आहे, की यहोवा देव शक्‍तिशाली आहे आणि त्याने शक्‍तिशाली स्वर्गीय राजा म्हणून येशू ख्रिस्ताला राजाधिकार दिला आहे. (नहेम्या ८:१०) अबालवृद्धांनी पुढील आर्जवाकडे लक्ष देण्याची हीच वेळ आहे: “कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्‍वराच्या नावाने स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्‍वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे.”—स्तोत्र १४८:१२, १३.

८, ९. (अ) “अनिष्ट दिवस” कोणाकरता दुःखमय असतात आणि का? (ब) उपदेशक १२:२ या वचनाचा अर्थ तुम्ही कसा सांगाल?

८ ज्यांनी महान निर्माणकर्त्याचा विचारच केला नाही आणि ज्यांना देवाच्या वैभवी उद्देशाविषयी कोणतीही समज नाही अशा लोकांकरता वृद्धापकाळाचे “अनिष्ट दिवस” निराशाजनक किंबहुना खूपच दुःखमय असतात. वृद्धापकाळातील परीक्षा तसेच सैतानाला स्वर्गातून खाली टाकल्यानंतर मानवजातीवर आलेल्या अरिष्टांना तोंड देण्यास मदत करील अशी आध्यात्मिक समज त्यांच्याकडे नाही. (प्रकटीकरण १२:७-१२) त्यामुळे उपदेशक आपल्याला असे आर्जवतो, की आपण ‘सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होण्यापूर्वी; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील त्यापूर्वी’ आपल्या निर्माणकर्त्याला स्मरावे. (उपदेशक १२:२) या शब्दांचा काय अर्थ होतो?

९ शलमोन तारुण्याच्या दिवसांची तुलना पलिष्टी उन्हाळ्यासोबत करतो जेव्हा सुर्य, चंद्र आणि तारे निरभ्र आकाशात प्रकाशत असतात. त्यावेळी जीवनात उमेद, उत्साह, आनंद असतो. पण वृद्धापकाळात मनुष्याचे दिवस थंडीच्या दिवसाप्रमाणे, पावसाळी हिवाळ्याप्रमाणे असतात ज्यावेळी एकानंतर एक समस्या बरसत असतात. (ईयोब १४:१) जीवनाच्या वसंतात निर्माणकर्त्याची ओळख होऊनही त्याची सेवा न करणे हे किती दुःखाचे! जीवनाच्या वृद्धापकाळातील हिवाळ्यात सर्व काही अंधारले जाते, विशेषतः अशा लोकांकरता ज्यांनी तारुण्यात व्यर्थ गोष्टींच्या मागे लागल्यामुळे यहोवाची सेवा करण्याची संधी गमावलेली आहे. पण आता आपले वय कितीही असले तरी आपण सर्व संदेष्टा मोशेचा सोबती विश्‍वासू कालेब याच्याप्रमाणे ‘परमेश्‍वराच्या इच्छेप्रमाणे निष्ठेने’ वागू या.—यहोशवा १४:६-९.

सरत्या वयाचे परिणाम

१०. (अ) “घराचे रखवालदार” म्हणजे काय? (ब)“बळकट पुरुष” कशाला सूचित करतात?

१० शलमोन पुढे काय होणार याविषयी सांगतो: “त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणाऱ्‍या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणाऱ्‍या अंध होतील.” (उपदेशक १२:३) ‘घर’ मनुष्याच्या शरीराला सूचित करते. (मत्तय १२:४३-४५; २ करिंथकर ५:१-८) त्याचे “रखवालदार” खांदे आणि हात आहेत; ज्यांद्वारे शरीराचे रक्षण केले जाते, शरीराच्या गरजा पुरवल्या जातात. वृद्धापकाळात अशक्‍तपणा, भिती आणि पक्षघातामुळे शरीर लटपटू लागते. “बळकट पुरुष”—पाय—कणखर स्तंभ राहत नाहीत, तर ते कमकुवत होतात आणि वाकतात त्यामुळे म्हातारा माणूस पाय फरफटत चालतो. पण, इतके असूनही वयोवृद्ध सहविश्‍वासू ख्रिस्ती सभांना येतात तेव्हा त्यांना पाहून तुम्हाला आनंद होत नाही का?

११. “दळणाऱ्‍या” आणि “खिडकीतून पाहणाऱ्‍या” याचा काय अर्थ होतो?

११ “दळणाऱ्‍या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल”—पण कसे? दात खराब होतात किंवा काढून टाकावे लागतात किंवा पडतात. त्यामुळे अन्‍नाचे चर्वण करताना त्रास होतो, किंवा अन्‍न चावताच येत नाही. “खिडक्यांतून पाहणाऱ्‍या अंध होतील”—मानसिक क्षमतांच्या साह्‍याने पाहणारे आपले डोळे—पूर्णपणे अंध झाले नाहीत, तरी मंदावतात.

१२. (अ) “बाहेरली दारे मिटतील” ती कशी? (ब) वयोवृद्ध प्रचारकांविषयी तुम्हाला काय वाटते?

१२ पुढे उपदेशक असे म्हणतो: “जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील; पक्ष्याच्या शब्दाने देखील त्याच्या निद्रेचा भंग होईल; सर्व गायनस्वर मंदावतील.” (उपदेशक १२:४) देवाची सेवा न करणाऱ्‍या वयोवृद्धांच्या ‘घरात,’ म्हणजे शरीरात जे काही आहे त्याविषयी सांगण्याकरता तोंडाची दारे—ओठ खूपच कमी उघडतात किंवा उघडतच नाहीत. त्यांचे ‘बाहेरचे’ म्हणजेच सामाजिक जीवन जवळजवळ संपुष्टात येते. पण वयोवृद्ध आवेशी राज्य प्रचारकांविषयी काय? (ईयोब ४१:१४) घरोघरी प्रचार करताना कदाचित ते सावकाश चालतील आणि काही जणांना बोलताना पुष्कळ त्रासही होईल, पण ते निश्‍चितच यहोवाची स्तुती करत आहेत!—स्तोत्र ११३:१.

१३. वयोवृद्धांच्या इतर समस्यांविषयी उपदेशक काय सांगतो, पण वृद्ध ख्रिश्‍चनांच्या बाबतीत कोणती गोष्ट खरी आहे?

१३ जात्याचा आवाज मंद होतो कारण तोंडात दातच नाहीत. वृद्ध व्यक्‍तीला शांतपणे झोप येत नाही. पक्षाच्या किलबिलीमुळे त्यांची झोपमोड होते. वृद्ध मनुष्य क्वचितच गाणी गुणगुणतो, आणि असे करताना त्याच्या आवाजात कंप निर्माण होतो. ‘सर्व गायनस्वर मंदावतात.’ वयोवृद्ध लोकांना संगीत आणि गाणे निटसे ऐकू येत नाही. पण अभिषिक्‍त लोक आणि त्यांच्या सोबत्यांपैकी देखील काही जण इतके तरुण नाहीत, पण ते ख्रिस्ती सभांमध्ये देवाची स्तुती करण्याकरता मोठ्या उत्साहाने गाणी गातात. मंडळीमध्ये यहोवाची मनापासून स्तुती करत असताना त्यांचा सहवास लाभणे किती आनंदाचे आहे!—स्तोत्र १४९:१.

१४. वृद्ध व्यक्‍तीला कशाची भिती वाटते?

१४ निर्माणकर्त्याकडे दुर्लक्ष केलेल्या वृद्धांचे जीवन मात्र किती दुःखाचे आहे! पुढे उपदेशक असे म्हणतो: “जे उंच आहे त्यामुळे ते भितील, व मार्गात भये होतील; आणि बदाम झाड फुलेल, व टोळ [रखडताना] भार असा वाटेल व इच्छा थकेल, कारण मनुष्य आपल्या सनातन घरास जातो, आणि शोक करणारे रस्त्यांत फिरतात.” (उपदेशक १२:५, पं.र.भा.) वृद्ध लोकांना पायऱ्‍यांवरून खाली पाहताना पडण्याची भिती वाटते. एखादी उंच इमारत पाहण्यासाठी डोके वर केले तरी कधीकधी त्यांना भोवळ येते. गर्दीच्या रस्त्यावरून जावे लागते तेव्हा इजा होण्याच्या किंवा चोरांच्या भितीने त्यांचा थरकाप होतो.

१५. “बदाम झाड फुलेल” ते कसे आणि टोळ रखडत कसे चालतो?

१५ वृद्ध लोकांचे “बदाम झाड फुलेल,” म्हणजे त्यांचे केस पिकतील किंवा पांढरे शुभ्र होतील. त्यांचे पांढरे केस बदामाच्या पांढऱ्‍या मोहराप्रमाणे पडतील. वृद्ध व्यक्‍ती ‘रखडत चालते’ तेव्हा ती वाकते आणि तिचे दोन्ही हात खाली लटकतात किंवा कंबरेवर असतात तेव्हा त्यांचे कोपर वर येते त्यावेळी ती व्यक्‍ती एखाद्या टोळाप्रमाणेच भासते. आपल्यापैकी कोणी किंचितसे टोळाप्रमाणे दिसत असेल, पण इतरांनी या गोष्टीची नोंद घ्यावी, की आपण यहोवाच्या आवेशी वेगवान टोळांच्या सैन्यात आहोत!—पाहा टेहळणी बुरूज, मे १, १९९८, पृष्ठे ८-१३.

१६. (अ) “इच्छा थकेल” यावरून काय सूचित होते? (ब) मनुष्याचे ‘सनातन घर’ कोणते आहे आणि मृत्यू जवळ येतो तेव्हा कोणकोणती चिन्हे दिसतात?

१६ वृद्ध व्यक्‍तीची भूक मंदावते; त्यांच्यासमोर स्वादिष्ट अन्‍न ठेवले तरी त्यांना भूक लागत नाही, म्हणूनच त्यांची “इच्छा थकेल” असे म्हटले आहे. या सर्व गोष्टींवरून हे दिसून येते, की वृद्ध व्यक्‍ती ‘आपल्या सनातन घरात’ अर्थात कबरेत जाण्याच्या बेतात असते. वृद्ध व्यक्‍तीने आपल्या जीवनात देवाचे स्मरण केले नसेल किंवा देव पुनरुत्थानाच्या वेळी त्याची आठवण करणार नाही असा वाईट मार्ग त्याने आचरला असल्यास त्या घरात त्याला सनातन राहावे लागेल. वृद्ध व्यक्‍तीच्या तोंडून दुःखदायक स्वर किंवा विव्हळणे ऐकू येते तेव्हा त्याचे मरण जवळ आले हे स्पष्ट होते.

१७. “चांदीचा दोर” कसा तुटतो आणि “सोन्याचा कटोरा” कशाला सूचित करतो?

१७ “चांदीचा दोर तुटेल; सोन्याचा कटोरा फुटेल; झऱ्‍याजवळ घडा फुटेल; आडावरचा रहाट मोडेल” त्यापूर्वी आपण निर्माणकर्त्याचे स्मरण करावे, असे आपल्याला आर्जवण्यात येते. (उपदेशक १२:६) “चांदीचा दोर” मणक्याला सूचित करतो. मेंदूपासून निघणाऱ्‍या आवेगाच्या आश्‍चर्यकारक मार्गाची कायमचीच जायबंदी होते तेव्हा मृत्यू हा जवळजवळ ठरलेलाच असतो. “सोन्याचा कटोरा” मेंदूला सूचित करतो; मेंदू कटोऱ्‍यासमान कवटीत असतो आणि त्यालाच मणका जोडलेला असतो. सोन्याप्रमाणे मेंदू मोलवान आहे आणि जेव्हा मेंदू कार्य करण्याचे थांबवतो तेव्हा मृत्यू ओढवतो.

१८. “झऱ्‍याजवळचा घडा” म्हणजे काय आणि तो फुटतो तेव्हा काय होते?

१८ “झऱ्‍याजवळचा घडा” म्हणजे हृदयच; त्याला रक्‍तप्रवाह मिळतो आणि तोच रक्‍तप्रवाह नंतर शरीराच्या इतर भागांपर्यंत पोहंचवला जातो. मरतेवेळी हृदय झऱ्‍याजवळच्या फुटलेल्या घड्याप्रमाणे होते; कारण त्याला आता कोणत्याही प्रकारचा रक्‍तपुरवठा होत नाही आणि ते शरीराच्या पौष्टिकत्वासाठी आणि शरीर कार्यरत राहण्यासाठी रक्‍तपुरवठा करू शकत नाही. ‘आडावरचा रहाट मोडतो’ म्हणजे जीवनवर्धक रक्‍ताचे परिभ्रमण थांबते. सतराव्या शतकात विल्यम हार्वे या चिकित्सकांनी रक्‍ताचे शरीरात परिभ्रमण होते हे दाखवून दिले, पण त्याच्या कितीतरी वर्षांपूर्वी यहोवाने शलमोनाला याविषयी प्रकट केले होते.

१९. उपदेशक १२:७ येथील शब्द मृत्यूच्या वेळी कसे लागू होतात?

१९ उपदेशकाने पुढे असे म्हटले: “मग धूळ पूर्वीसारखी भूमीस पुन्हा मिळेल, आणि ज्या देवाने जीवात्मा [जीव] दिला त्याच्याकडे तो परत जाईल.” (उपदेशक १२:७, पं.र.भा.) ‘आडावरचा रहाट मोडल्यानंतर’ मनुष्याचे शरीर ज्या मातीतून बनवले आहे त्या मातीत ते पुन्हा जाते. (उत्पत्ति २:७; ३:१९) प्राण मरतो कारण देवाने दिलेला जीव किंवा जीवनी-शक्‍ती आपल्या निर्माणकर्त्याकडे परत जाते.—यहेज्केल १८:४, २०, NW; याकोब २:२६.

स्मरणात ठेवणाऱ्‍यांकरता कोणते भवितव्य?

२०. स्तोत्र ९०:१२ येथे मोशेने जे म्हटले त्यावरून तो काय सूचित करत होता?

२० शलमोनाने मोठ्या परिणामकारकपणे हे दाखवून दिले, की आपल्या महान निर्माणकर्त्याला स्मरणे किती महत्वाचे आहे. यहोवाचे स्मरण करणारे आणि पूर्ण मनाने त्याच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्‍या लोकांकरता तुलनात्मकरीत्या सध्याचे अल्प आणि कष्टमय जीवन सर्वकाही नाही. ते वयाने लहान असोत किंवा मोठे असोत त्यांची मनोवृत्ती मोशेप्रमाणे आहे; त्याने अशी प्रार्थना केली: “ह्‍याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.” देवाच्या नम्र संदेष्ट्यांची हीच प्रांजळ इच्छा होती, की यहोवाने त्याला आणि इस्राएल लोकांना हे दाखवावे किंवा शिकवावे की ‘त्यांनी त्यांच्या दिवसाचे’ मोल कसे जाणावे आणि ते दिवस देवाच्या इच्छेप्रमाणे कसे घालवावे.—स्तोत्र ९०:१०, १२.

२१. यहोवाच्या स्तुतीकरता आपल्याला दिवस मोजायचे असल्यास आपण काय केले पाहिजे?

२१ विशेषतः ख्रिस्ती युवकांना उपदेशकाने निर्माणकर्त्याला स्मरण करण्याच्या सल्ल्याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. देवाला पवित्र सेवा देण्याकरता त्यांच्यासमोर किती चांगली संधी उभी ठाकली आहे! पण आपले वय कितीही असले तरी आपण या ‘शेवटल्या काळात’ देवाची स्तुती करण्याकरता आपले दिवस गणण्यास शिकल्यास आपण हे दिवस अनंतकाळापर्यंत मोजत राहू. (दानीएल १२:४; योहान १७:३) तसे करण्यासाठी अर्थातच आपल्या महान निर्माणकर्त्याला स्मरले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण देवाप्रती आपले पूर्ण कर्तव्य पार पाडले पाहिजे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ आपल्या निर्माणकर्त्याला स्मरावे असे तरुणांना का आर्जवण्यात येते?

◻ महान निर्माणकर्त्याला ज्यांनी स्मरले अशी काही शास्त्रवचनीय उदाहरणे कोणती आहेत?

◻ शलमोनाने सांगितल्यानुसार वृद्धापकाळाचे काही परिणाम कोणते?

◻ यहोवाला स्मरून चालणाऱ्‍यांकरता कोणते भवितव्य आहे?

[१५ पानांवरील चित्रं]

दावीद, बंदिवासातील इस्राएल मुलगी, हन्‍ना आणि शिमोन यांनी यहोवाला स्मरले

[१६ पानांवरील चित्रं]

यहोवाचे वयोवृद्ध साक्षीदार आनंदाने आपल्या महान निर्माणकर्त्याला पवित्र सेवा सादर करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा